यही है राइट चॉइस बेबी आहा..
गीता गजानन गरुड.
आंब्रड.
#यही_है_राईट_चोइस_बेबी_आहा!
मिता नुकतीच एका मुंबईच्या हाफीसात क्लर्क म्हणून कामाला लागली होती. इथे तसे तिचे नातेवाईक होते.. पण नातेवाईक आठवड्याभरासाठी ठेवतील.आजकाल महागाई, अपुरी जागा यामुळे कोण तसं इतरांना ठेवून घेत नाहीत.आपलंच झालं थोडं अन् व्ह्याने धाडलं घोडं..अशातली गत.
मंबईत भाडीही अव्वाच्या सव्वा.मग तिने बदलापूरला रुम भाड्याने घेतला व राहू लागली.भाडंही तसं परवडेबल होतं .रोज सकाळी आठच्या गाडीला बसायची..संध्याकाळी आठ वाजेपर्यंत परत घरी यायची.बाजूच्याच काकूंकडे पोळीभाजीचा दोन्ही वेळचा डबा लावला होता.
एकूण मिताचं लाइफ बरं चाललं होतं.अधनमधनं आईचे," लग्नाचं वय झालं तुझं.आत्ता लग्न करायला हवं." असे काळजीयुक्त फोन यायचे.मिता सरळ सांगायची," आई,तु नं माझ्या लग्नाचा विचार करु नकोस.मी आहे तशी सुखात आहे."
मिताचा स्वभावही मिश्किल असल्याने ती हाफिसात सगळ्यांना आवडू लागली.एक्सेप्शन होतं फक्त खडूस साहेबाच ,मि.मयंक फावडे. त्याच्या अपरोक्ष सगळी त्याला फावड्याच बोलायची.मिता त्याच्याशी अगदी अदबीने वागायची.
आज सकाळपासून पावसाने जोर धरला होता.तरी मिता वेळेवर हाफीसात पोहोचली.हाफिसात जेमतेम चारपाचच डोकी आली होती. मिरा वाँश घेऊन आली व कामाला बसली.काम करता करता लंच टाईम कधी झाला तिला कळलंच नाही.
आज काकूंनी तिच्या आवडीची भरली वांगी,पोळ्या व लिंबाचं गोड लोणचं दिलं होतं.तिच्या मैत्रिणीही आलेल्या नसल्याने तिने एकटीनेच डब्याचा फन्ना उडवला व थोडावेळ टाईमपास करुन कामाला लागली .एकदोनदा फावड्याने आत बोलावले.त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला कामं करुन दिली. बरीचजणं चारच्या सुमारास हाफिसातून निघून गेली.फक्त फावड्या,मिता व शिपाई उरले.
निता,मि.मयंकचा निरोप घ्यायला गेली.
निता: सर, मी निघू??
मयंक(फावड्या): मिस निता,तुम्ही बदलापूरच्याना.
निता: हो सर.
मयंक: अहो,मग तुम्ही जाणार कशा?घाटकोपरच्यापुढे ट्रेन बंद आहेत.रुळांवर पाणी आलंय.
मिता: सर,स्टेशनवर जाऊन पहाते.
मयंक :ओके.स्टेशनवर चिक्कार गर्दी झालेय.म्हणून पेसंजर्सची सोय जवळच्या शाळांमध्ये केली आहे.तुम्ही..तु म्हंटलं तर चालेलना(मिता मान डोलावते)..तु माझ्या घरी चल.इथून पाचएक मिनटावर माझं घर आहे.
मिताने होकारार्थी मान हलवली.मयंकने आपली बाईक काढली.मिता मयंकच्या मागे बसली.पाऊस तर ओततच होता.मयंकने रेनकोट घातलेला पण मिता छत्री धरुनही चिंब झाली.एवढी डँशिंग ती पण तरी जरा अवघडलीच.
मयंकच घर चाळीत होतं.
मयंकने दार उघडलं .दोघं आत गेली.मिता थंडीने थरथरत होती.तिचे केस भिजून पाणी निथळत होतं.तिने आज छान अबोली रंगाचा ड्रेस घातला होता.तोही भिजून अंगाला चिकटला होता.
मयंक आधी बाथरूममध्ये हातपाय धुवायला घुसला.मिताला रागचं आला.
मनात म्हणाली,'ह्या फावड्याला काय मेनर्सच नैत.नाहीतर टिव्हीत कसे हिरो लोकं कपडेबिपडे आणून देतात हिरोईनला.हे बेणं आपणच बाथरुमात घुसलं.उद्या सांगतेच सगळ्यांना.'
दोन मिनटांत मयंक हातपाय धुवून बाहेर आला..
मयंक: माफ कर हा.त्याचं कायै.आल्याबरोबर पहिले हातपाय धुवायचे ही सवयच लावली आईने.त्यामुळे आपसूकच बाथरूमात घुसलो.तुला वाटेल,आत्ता मी त्या रविंद्र महाजनीसारखं तुला शर्ट,लुंगी देईन.तर छा..तसलं काय नाय हा.मी माझे कपडे देणार नाही..
मिताला आत्ता मयंकचा जाम राग आला.पावसाने भिजलेले तिचे गोबरे गाल अजूनच लाल लाल झाले.मयंकला हसू आलं..पण त्याने दाखवलं नाही..मयंकने कपाट उघडलं व त्याच्या बहिणीचा आकाशी रंगाचा चुडीदार तिला घालायला दिला.व तिला हेही सांगितलं की तुझा तु गिझर लाव..चार शिव्या मनातल्या मनात हासडत मिता बाथरुममध्ये गेली .मस्त न्हाली..आकाशी फुलाफुलांचा चुडीदार घातला. व बाहेर आली.
तोवर मयंकने सिमला मिरची,वांगी,बटाटे यांची कापं करुन ठेवली होती.व भजीसाठी बेसन भिजवून ठेवलं..वरणभाताचा कुकर लावला..मिता बाहेर आली व देवाच्या पाया पडली.छान टोवेलने बांधलेले केस,गोरी नितळ कांती,चेहर्यावरचा बालिशपणा व आकाशी रंगाचा बारीक बकुळ फुलांची नक्षी असलेला चुडीदार...मयंक क्षणभर तिच्या त्या रुपाकडे पहातच राहिला.तिचे डोळे बंद होते..पण क्षणभरच..लगेच त्याने डाळीला तडका लावला..पापड भाजले..आईने दिलेलं त्याचं आवडतं करवंदाचं लोणचं काढलं व सगळं खाली मांडलं..
मिताला भजी तळायला सांगितली..मिताने भजी तळायला घेतली..थोडीशी तळून झाली असतील..सवय नसल्याने हातावर तेल उडवलं..हात चांगलाच चुरचुरला..तिच्या डोळ्यात पाणी आलं..मयंकलापण गिल्टी फील झालं.
मयंकने मिताच्या हाताला बरनोल लावलं व उरलेलं तळण काढलं..मग दोघं पानं घेऊन जेवायला बसली..मयंकने तिच्या घरातल्या माणसांची,इथल्या वास्तव्याची चौकशी केली.मितानेही त्याला सागितलं की त्यांचं चौकोनी कुटुंब ..आईबाबा ,ती व लहान भाऊ जो दहावीला आहे.सगळी खेडला रहातात.
दोघांनी मिळून सगळी आवराआवर केली. मिताने परत एकदा ट्रेनचं स्टेटस पाहिलं..पावसाने जोर धरला होता..रेल्वेरुळांवर कंबरभर पाणी साचल्याने लोकल चालणं शक्यच नव्हतं..दोघं मग गप्पा मारत बसली.
मयंक: मिता,तु मला बाहेर असताना मयंक म्हणत जा.ते साहेब,सर..ओफिसात ठीक ..आणि नायतरी मला तुम्ही फावड्या म्हणताच..मग मयंक म्हंटलेलं काय वाईट??
हे ऐकताच..मिताला कुठे लपू नी कुठे नको असं झालं..
मयंक: मीपण तुमच्या वयातून गेलो आहे..या खुर्चीवर असल्याने थोडं कडक वागावं लागतं.म्हणून मी काही एखादा वाघोबा नाही.
मिता: सर तुम्ही एकटेच रहाता.तुमचं कुटुंब..
मयंक: आईवडील गावी रहातात.गावी आमची भातशेती आहे.बहीण तिथेच काँलेजात शिकते.सुट्टीला येते माझ्याकडे रहायला.
मिता: सर,तुम्ही लग्न का नाही केलंत ओ?
मयंक: काय करु..चांगली मुलीच मिळत नाही..
मिता: चांगली म्हणजे कशी?
मयंक: जी माझ्या घराला आपलं घर म्हणेल.माझ्या आईवडिलांचा आदर करेल..पण हल्लीच्या मुलींना मुलाचे आईवडील नको असतात.
मिता: असं कुणी सांगितलं तुम्हाला??
मयंक: मित्र,आजुबाजूची लोकं.
मिता: आणि तुम्ही त्या चार डोक्यांवर विश्वास ठेवता?अहो सगळ्याच मुली अशा नसतात.शंभरातल्या दहा बारा असतील म्हणून बाकीच्यांना स्वतः हून शिक्के मारुन मोकळे होता??
मयंक : हो ते जरा चुकलच.तुझे लग्नाबाबत काय विचार आहेत?
मिता: मला माझ्यासारखाच सहज,साधासरळ असा नवरा हवा.कडक इस्त्री नको.घर जरा अघळपघळ असलं तरी ज्याला चालेल असा.माझ्या विचारांचा आदर करणारा..असा..मी त्याच्या आईवडिलांचा नक्कीच सांभाळ करेन पण माझ्या आईवडलांचा त्याने आदर केलाच पाहिजे..
मयंक: आणि त्याने तो नाही केला तर..म्हणजे तुझ्या आईला काहीतरी बोलला तर..
मिता: तर..तर मी माझ्या हातात काय असेल ते त्याच्या टाळक्यात मारेन..
आणि मिताने तिच्या हातातला रिमोट मयंकच्या टाळक्यात मारला..मयंक जोरात ओरडला..अगं आई गं$$
तेंव्हा मिता भानावर आली.तिने काय लोचा केलाय हे तिला कळलं..पटकन टेबलवरचं आयोडेक्स घेऊन मयंकच्या डोक्याला चोळलं..
मिता: साँरी आ.ते कायय ना मी जरा पटकन इमोशनल होते.पिक्चर बघतानापण माझं असंच होतं..दु:खी घटना असेल तर घळाघळा गंगायमुना वाहू लागतात डोळ्यातून.हाणामारीचा सीन असेल..तर माझ्यातपण स्टंटमेन संचारतो मग मी भावाला बुकलून काढते..
मयंक मनात म्हणतो यही है राईट चोइस बेबी आहा$$$$$$$
--गीता गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा