तिचा वसंत बहरलाच नाही
#तिचा_वसंत_बहरलाच_नाही!
डॉ.ज्योत्स्ना दोन महिलांची डिलीव्हरी उरकून नुकतीच घरी आली. आठ वर्षाच्या निरागस,निष्पाप लेकीच्या जवळ पहुडली. तिच्या लाडक्या परीला तिने कुशीत घेतले. आज सकाळीच परीने ज्योला गोड पापा दिला व आजीसोबत लॉनवर खेळत बसली. परीने तिची स्कुटी स्टार्टट केली व दहा मिनिटांत 'श्रीकृष्ण' मेटर्निटी होममध्ये गेली. हे इस्पितळ ज्योने स्वतःच्या कष्टाने उभे केले होते. वेटिंग रुममध्ये कॉर्नरला बाळकृष्णाची हसरी मुर्ती होती.
आज जास्त पेशंटची गर्दी नव्हती. ओपीडी संपवून ज्योने ऑलरेडी एडमिट असल्याने ल्या व बाळंत झालेल्या बायांना तपासले. डॉ.ज्यो वयाने लहान असली तरी कडक होती. बाळंतपणाच्या वेळी हातपाय झाडणाऱ्या,वेदनेने आरडाओरडा करणाऱ्या बायांना मायेने समजवायची पण काहीजणी तर तिला हातही चालवू देत नसत. अशांना डॉ.ज्यो सज्जड दम भरे. कधीकधी तर फटकवे. होता होईल तो नैसर्गिक बाळंतपण करण्याकडे तिचा कल होता म्हणून तर तिचे इस्पितळ नेरुळमध्ये प्रसिद्ध होते.
डॉ.ज्योने बाळंत झालेल्या चारही बायांना तपासले. त्यातल्या एकीचं काल संध्याकाळी सिझर करावं लागलं होतं पण ती उठायलाच तयार नव्हती. डॉ.ज्योने तिला दम भरला,"प्रिया,आजपासून इथून जाईपर्यंत तू बेसमेंटमध्ये फेऱ्या मारल्या पाहिजेस." मग ती सिस्टरला ओरडली,बाळाला दुधाला लावलं नाही म्हणून. सिस्टरने प्रियाला उठवून तिच्या पाठीशी उशी ठेवली व बाळाला दुधाला लावलं पण प्रयाची स्तनाग्रे आत असल्याकारणाने बाळ दूध ओढीना. शेवटी सिरींजने दूध काढून बाळाला भरवलं तेंव्हा बाळ मिटक्या मारु लागलं. डॉ.ज्योने प्रियाच्या दंडाला धरुन तिला उठायला मदत केली व भिंतीला धरुन चालण्यास भाग पाडलं.
ज्यो स्कुटी स्टार्ट करुन घरी जायला निघाली. रस्त्याच्या दुतर्फा रक्तवर्णी गुलमोहराची,पिवळ्या पंगेऱ्याची झाडे बहरली होती. या फुलांच्या सड्याने रस्त्यावर पायघडीच घातली होती. ज्योचे सिल्की केस वाऱ्यासोबत हेलकावे घेत होते.
ज्यो घरी आली. वॉश घेऊन परीजवळ गेली. परी चित्रकलेची वही,रंगीत खडूंची पेटी घेऊन बसली होती. अगदी मग्न होऊन चित्र काढत होती. तिचे केसही तिच्या आईसारखेच मऊशार होते. केसांचे दोन बो बांधून त्यात बागेतल्या झेंडूचं फुलं खोवलं होतं. ज्योने गुडघ्यावर बसून लेकीचं चित्र पाहिलं. त्या चित्रात डोंगर होते,वरती ढग,चार उडणारे पक्षी,डोंगरातून झुळूझुळू वहाणारी नदी,एक सुबकसं घर,घरासमोर विहिर,बाजूला शेत व त्या शेतात तीन मुली हातात हात गुंफून उभ्या होत्या.. मधोमध पेटीफ्रॉक ल्यालेली परीराणी.. तिच्या उजव्या बाजूला उंच,गोरीशी टॉप व जीन्स घातलेली तिची मम्मुटली व डाव्या बाजूला फुलाफुलांची साडी नेसलेली ठुसकीशी तिची लाडकी आज्जी. परीराणीच्या या चित्रात तिचा बाबा मात्र नव्हता. परीने बऱ्याचदा मम्माला बाबाविषयी विचारलं होतं पण ती विषय बदलायची किंवा गप्पच रहायची..मग तिला आज्जीनेच तुझे बाबा परदेशात ऑफिसच्या कामासाठी गेलैत व तिथेच रहातात असं सांगून आवरलं होतं,पण कधीतरी परीला सत्य सांगाव लागणार होतं.
सासूने वाढलेल्या वरणभाताचा एक घास ज्योने तोंडात घातला तोच फोनची रिंग वाजली..
सिस्टर अर्पिता बोलत होती,"डॉक्टर, इमरजन्सी आहे. डॉ.निकम यांची पेशंट आहे. डॉ.निकम यांना तातडीच्या कामासाठी गावी जावे लागले होते. जायच्या आधी त्यांनी डॉ.ज्योत्स्नाला अर्जंट केस आली तर ऑपरेट करण्यास विनंती केली होती. ज्यो ताट तसंच ठेवून परत इस्पितळाकडे निघाली. वाटेत तिला परत रक्तवर्णी गुलमोहर भेटला खरा पण आत्ता तिचे सगळे लक्ष इस्पितळाकडे लागले होते. डॉ.ज्योने पेशंटची फाईल पाहिली,पेशंटला तपासले. बाळाचे ठोके फारच कमी पडत होते. सिस्टरने बाकी सगळी तयारी करुन ठेवली होती. डॉ. ज्योने हात चालवला. प्रसुतीमार्ग फारच अरुंद होता,त्यामानाने बाळाचं डोकं मोठं होतं.
पेशंटला कळा येत नव्हत्या. कळा यायचं इंजेक्शन दिलं असतं व पेशंटने हातपाय जोरात आपटले असते तर आधीच थकलेल्या बाळाच्या जीवाला धोका होता. सिझर करावं लगणार असा डिसिजन घेऊन तिने पेशंटच्या नातेवाइकांना केबिनमध्ये बोलवण्यास सांगितलं.
दार उघडून एक व्यक्ती आत आली. ज्यो भुलतज्ञांना फोन लावत होती.
"डॉक्टर आत येऊ?"
डॉ.ज्योने मान वर करुन पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. समोर उभा होता तो सहा फुटी, कानात बीकबाळी ल्यालेला,गौरवर्णाचा,घाऱ्या डोळ्यांचा,पीळदार शरीरयष्टीचा तिचा वसंता. वसंतालाही क्षणभर काहीच सुचेना. डॉ.ज्योने काही क्षण जाऊ दिले. अत्यंत शांत डोके ठेवून वसंताला पेशंटची कंडीशन समजावून सांगितली.
"वसंता,तुला माझ्यावर भरवसा नसेल तर मी माझे कलिग डॉ. सुर्यवंशींना बोलवते.
"नो नेव्हर. आय हेव फुल फेथ इन यु ज्यो. गो अहेड."
वसंताने ऑपरेशन पेपर्सवर सही केली.
क्रमश:
ज्यो तेथून निघाली. मनातली सारी वादळं तिने ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ठेवली. भुलतज्ञांनी पेशंटच्या मणक्यात इंजेक्शन दिले. काही मिनिटांत सीझर सुरु केलं. पेशंटच्या ओटीपोटाला छेद दिला. डॉ.ज्योने बाळाला अलगद बाहेर काढलं व सिस्टरकडे दिलं. सिस्टरने ते पुसून बालरोगतज्ज्ञ डॉ.केयुरकडे दिलं. डॉ.केयुरने बाळाचा ताबा घेतला व त्याच्या नाजूक पावलांवर टिचक्या मारु लागला. थोड्याच क्षणात बाळाने टँटँ केले तेंव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला. डॉ.ज्यो ओटीपोटाला टाके घालत होती. पेशंटला मग बाहेरच्या स्पेशल वॉर्डमध्ये आणण्यात आलं.
डॉ.ज्योने बाळाला कवेत घेतलं. ती बाळाला निरखून बघू लागली. बाळाचं नाक,लांब कान,घारे डोळे..सगळंच वसंतासारखं दिसत होतं. तिच्या वसंतासारखं, जो आत्ता तिचा नव्हता. तिचं मन फार पाठी गेलं. एमबीए शिकणारा वसंता त्यांच्या कॉलनीत भाड्याने रहात होता. ज्यो तेंव्हा नुकतीच एम.डी. झाली होती. बेसमेंटमध्ये कॉलनीतल्या मित्रमैत्रिणींसोबत टेबलटेनिस खेळताना तिची वसंताशी ओळख झाली. तिथेच त्यांच सुत जुळलं. प्रेमाच्या आणाभाका झाल्या.
ज्योने घरी आईआप्पांना वसंता व तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं. आप्पांना ते अजिबात मान्य नव्हतं. आप्पांना ज्योचं लग्न एखाद्या निष्णात डॉक्टरशी करायचं होतं. वसंताला तर नोकरीही नव्हती,वडील नव्हते. ज्योने रडूनभेकूनही आप्पांनी तिच्या लग्नाला पाठींबा दिला नाही. आईचा प्रश्नच नव्हता. त्याकाळच्या इतर घरांप्रमाणेच नवऱ्याच्या शब्दाबाहेर बोलण्याचा तिला हक्क नव्हता.
एके दिवशी निवडक मित्रमैत्रिणींच्या समक्ष ज्यो व वसंताने नोंदणीकृत विवाह केला. त्यादिवसापासून आप्पांच्या घरचे दरवाजे त्यांच्या ज्योसाठी कायमचे बंद झाले. वसंता ज्योला घेऊन त्याच्या नेरुळच्या घरी गेला. दोन रुमचं भाड्याचं घर होतं ते. वसंताच्या आईने त्यांच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. त्यांच्या पापण्यांना पाणी लावलं. उंबरठ्यावरचं माप ओलांडून ज्यो सासरच्या घरात प्रवेशली.
वसंताच्या आईला सगळी परिस्थिती माहित होती. तिने ज्योला कुशीत घेतले तेंव्हा ज्योने मनमोकळं रडून घेतलं.
ज्योची सासू खूप लाघवी होती. ती ज्योला सांभाळून घ्यायची. वसंताला नोकरीत इंटरेस्ट नव्हता. त्याला बिझनेस करायचा होता. ज्योने वसंताच्या या निर्णयाला पुर्ण पाठींबा दिला. घराची आर्थिक धुरा ती सांभाळू लागली. वसंताने मित्रासोबत जॉइंट व्हेंचर सुरु केले. त्याच्या लाघवी बोलण्यामुळे,परफेक्टनेसमुळे एकेक प्रोजेक्ट त्याला मिळत गेले.
ज्यो आई होणार हे जेंव्हा वसंताला कळले तेंव्हा त्याला ज्योला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. ज्योची सासू तिची खूप काळजी घेत होती.
तिची आईही आप्पांच्या अनुपस्थितीत तिला फोन लावायची व तिची विचारपूस करायची पण आप्पांपुढे तिची जबर इच्छा असुनही तिला ज्योला भेटता येत नव्हतं. नववा महिना लागला अन् ज्योने एका सुंदर कन्येला जन्म दिला. लेकीचे डोळेही बाबासारखे घारे होते. ज्योच्या आईची इच्छा असुनही ती नातीला बघायला येऊ शकली नाही.
ज्योच्या सासूने मात्र ज्योचे सगळे लाड पुर्ण केले. ज्यो व वसंताची परीराणी हळूहळू बाळसं घेत होती.. काही महिन्यात रांगू लागली. तिच्या पायातल्या पैंजणांनी घरभर छुमछुमचा नाद होऊ लागला.
वसंताचा व्याप वाढत चालला होता. परदेशचे क्लायंट्स मिळत होते..डील फायनल झालं की लेट नाईट पार्टीज होत होत्या. ज्योही काही महिन्यात तिच्या कामाला लागली. परीराणी आज्जीसोबत छान रहायची. त्यामुळे ज्योला परीराणीची जास्त चिंता नव्हती. दरम्यान तिच्या इस्पितळाचंही कामं चालू होतं.
यात वसंता तिच्या हातून तिच्याही नकळत निसटत चालला होता आणि एके रात्री वसंताने ज्योला सांगितलं की त्याचं त्याच्या सेक्रेटरीवर प्रेम आहे. प्रेमात ती दोघं फार पुढे गेली आहेत.
ज्योला काय बोलावं तेच समजेना. तिचे ओठ रागाने थरथरत होते. एवढा मोठा विश्वासघात तिचा..तोही तिच्या वसंताकडून, ज्याच्यासाठी ती तिच्या आप्पांशी भांडली होती,ज्याच्यासाठी तिनं तिच्या माहेरावर कायमचं पाणी सोडलं होतं.
ज्योला वसंताशी खूप खूप भांडायचं होतं. तिला खूप खूप राग ,चीड आली होती. एका क्षणात वसंताने तिचं स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं पण वसंताशी भांडायचं त्राण नव्हतं तिच्यात. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. फुटत होते नुसते आर्त हुंकार,वेदनांचे..यातनांचे.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हीच गोष्ट वसंताने त्याच्या आईला सांगितली तेंव्हा त्या माऊलीने त्याच्या श्रीमुखात दोनचार भडकावल्या. ती माऊली म्हणाली,"अरे ,तुझे वडील तू दोन वर्षांचा असताना मला टाकून गेले तेंव्हापासून मी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला. माझ्या सगळ्या हौसीमौजी बाजूला ठेवून तुला लहानाचं मोठं केलं. नक्षत्रासारखी बायको लाभली तुला, कमवत नव्हतास तेंव्हा हुं की चू न करता तीनेच पोसलं तुला. भाड्याच्या घरातून तिच्याच पैशाने घेतलेल्या ओनरशीपच्या घरात रहायला आलास आणि आत्ता मोठा साहेब झालास तर माझ्या लक्ष्मीसारख्या सुनेची प्रतारणा करतोस. तिच्या उरावर सवत आणून बसवतोस! मी जीवंत असेपर्यंत बघतेच मी कसा दुसरं लग्न करतोस ते.
त्याचवेळी परीराणीला पाजून ज्यो बाहेर आली. बाहेरचं मायलेकरांच संभाषण तिनं ऐकलं होतं. रात्रभर रडल्याने तिच्या गालांवर ओघळलेली आसवं सुकली होती. तिचा चेहरा खूपच निर्जीव, थकलेला जाणवत होता. ती सासूला म्हणाली,"आई मी हरले. माझा वसंता आत्ता माझा राहिला नाही. जर त्याच्या मनातच माझ्यासाठी जागा नसेल तर कायद्याच्या दोऱ्यांनी मी त्याला अडकवून ठेवणार नाही." मग वसंताकडे नजर रोखून म्हणाली,"वसंता,तुला तुझे मार्ग मोकळे आहेत."
म्युच्युअल अंडरस्टँडींगने ती दोघं वेगळी झाली. वसंताची आई मात्र ज्योसोबत व तिच्या लाडक्या नातीसोबत राहिली. तिचाच काय तो ज्योला आधार होता.
ज्योने बाळाला आईच्या कुशीत ठेवलं व केबिनमध्ये आली. डॉ.केयुरही तिच्या पाठोपाठ केबिनमध्ये आला. दोघं मिळून कॉफी घेत होते. थकलेल्या ज्योला हलक्याफुलक्या विनोदांनी डॉ.केयुर हसवण्याचा प्रयत्न करत असतानाच वसंताने केबिनचं दार उघडलं. डॉ.केयुरची ज्योशी चाललेली सलगी त्यिला रुचली नाही. त्याच्या मस्तकावरची शीर त्याच्याही नकळत तटतटली.
ज्योला वसंताच्या चेहऱ्यावरील बदल जाणवले. अत्यंत निर्विकारपणे ज्योने वसंताला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं व घराकडे निघाली..तिच्या परीराणीला भेटायला..आत्ता तीच तीचं विश्व होतं.
रस्त्यावरचा गुलमोहर त्याचा पसारा घेऊन डोलत होता. स्रुष्टीचा वसंतोत्सव सुरु होता.
तिच्या आयुष्यात मात्र आत्ता वसंत कधीच बहरणार नव्हता!
------सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा