स्त्रीपुरुष मैत्री(भाग पहिला)
स्त्रीपुरुष_मैत्री_आणि_संसारात_वादळ
(भाग पहिला)
"इतका उशीर?"
"अरे ऑफिसमधे थोडं अर्जंट काम आलं होतं. सगळ्यांनाच थांबावं लागलं."
"माझे मिस्टर आजारी आहेत..मला लवकर जावं लागेल असं सांगू शकली असतीस तू."
"का? असं का सांगू मी. तुझा ताप जाऊन साताठ दिवस होत आले. बराऐस की आता. सकाळीच थर्मामीटर बगलेत घालून पाहिलं तर 97 होतं. नॉर्मल दाखवत होतं टेंपरेचर."
"म्हणजे.. तुला काय वाटतं मी ढोंग करतोय!"
"मी असं कुठे काय म्हणाले.'
"बरं आज अगदी लाल हिरव्या काठाची साडी वगैरे..काही विशेष.."
"नाही रे सहजच वाटली नेसावीशी.."
"आणि हल्ली हे स्लीव्हजलेस ब्लाऊज घालतेस ते..मागचा गळाही बराच खोल.."
"अरे राजा उकडतय किती बाहेर. इथे तुला एसीत काही वाटत नाही. रेशनिंगचं ऑफीस आमचं..त्यात कुठून एसी वगैरे..शिवाय..सारखा लोकांचा राबता..ही फाइलनं भरलेली कपाटं..जुनं कधी काळातलं फर्निचर.. जरा पोशाखात बदल केला की मनही फ्रेश होतं."
'हे इतक्या वर्षात सुचलं नव्हतं हिला. सलील ऑफीसला जॉइन झाल्यापासनं जाणवू लागलं. मी कित्येकदा म्हणालेलो..अगं एकदा स्लीव्ह्जलेस घाल निदान घरात तरी तर सरळ नाही म्हणायची नि आता मी घरात पडलोय..वर्क फ्रॉम होम करतोय पण यांची सरकारी ऑफिसं चालू असल्याने बरी नटूनथटून जाते.
केसांना बर्गंडी रंग शोभतोय अगदी..नाही माणसानं असं अपटूडेटच रहावं पण ते कोणासाठी आपल्या जोडीदारासाठी. दुसऱ्या कुणाला आवडतं म्हणून कशाला..असं वाटतं एक घाव दोन तुकडे करावेत..सरळ जान्हवीच्या समोर उभा राहून तिला याचा जाब विचारावा..पण हे सगळं मनातच..'जिग्नेश मनाशीच चरफडत राहिला.
कंपनीच्या नवीन नियमांनुसार जिग्नेशला वर्क फ्रॉम होम करणं क्रमप्राप्त झालं. जान्हवी मात्र ऑफिसला नियमित जात होती. घरी आली की तिच्या सहकर्मचारी सलीलबाबत बरंच काही सांगत बसे . पहिलं पहिलं जिग्नेशला तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून बरं वाटायचं पण हळूहळू हा उत्साह उतरंडीला लागला. त्यांची मुलगी जास्मिन आजीकडे रहायला गेल्यापासनं आलेल्या एकांतवासामुळे अधिकच.
"सलील,किती चटपटीत कटलेट बनवतो ठाऊकै.सलीलचे बायशेप्स नं..
सलीलने आज खास माझ्यासाठी नवलकोलाची भाजी आणलेली डब्यात. अगदी आई बनवते तशी होती..ओला नारळ,चणा डाळ..अहाहा."
हे आणि असं सलीलपुराण ऐकून साधा कुकरसुद्धा धड न लावता येणाऱ्या जिग्नेशला मायग्रेनचा त्रास होऊ लागला होता. बरं आपण संशयी वगैरे नवऱ्यांत मोडत नाही ना याचीही त्याला धास्ती होती.
जान्हवी दमूनभागून आली तरी साधा एक कपभर चहाही जिग्नेशने तिला बनवून दिला नाही. तिनेच पातेलं गेसवर ठेवलं. चहाला आधण ठेवलं. वॉश घेतला. उकळत्या पाण्यात साखरपावडर टाकली न् चहा मुरायला ठेवला. स्कायब्लु कलरचा पांढुरकी बारीक फुलांची नक्षी असलेला गाऊन तिच्या नुकत्याच न्हालेल्या गौर कायेवर खुलून दिसत होता. खांद्यापर्यंतच्या ओलेत्या केसांतील पाणी तिच्या पाठीवर ठिपकत होतं. कपाळाच्या मध्यभागी टिकली लावायची तिची पद्धत..त्यामुळे ती इतर चारजणींपेक्षा उठून दिसत असे.
जान्हवी फ्रिजजवळ गेली..तिने दुधाचा टोप काढला..हे काय आत फक्त सायी..दुध संपलं..
"दूध संपलं तर फ्रीजरमधली पिशवी काढून तापवायची होती न् तुला कॉफीसाठी दूध लागतं ठाऊकै रे मला पण ते संपलं की दुसऱ्या टोपात वरचं दूध काढून गरम करायला कितीसा वेळ लागतो रे?" जान्हवी वरची दुधाचा बर्फ झालेली पिशवी काढता काढता म्हणाली.
"मी घरात बसून आहे म्हणजे रिकामटेकडा वाटतोय का तुला! सतराशे साठ कॉल अटेंड करतोय. हे असलं दूधबिध गरम करणं आपल्याच्याने होणार नाही." जिग्नेश तक्रारीच्या स्वरात म्हणाला.
"मग आता मी पिशवी फोडतेय त्यातलं दूधही घेऊ नकोस. तुझं तू आण."जान्हवीचं बोलणं ऐकून जिग्नेशच्या कपाळावरची शीर तटतटली.
समजते काय ही स्वतःला. नवराय मी जरा तरी मान द्यायला नको का हिने. तो चरफडत राहिला. इतक्यात बेल वाजली..दारात सलील उभा होता..व्हाइट टिशर्ट नि नेव्हीब्लु जीन्स..आणि चकाचक स्माईल.
"वेलकम. आज इकडे कुठे?" जान्हवी हसतहसत बोलली.
"अगं इकडूनच जात होतो. म्हंटलं वर येऊन पहावी तुझ्या मिस्टरांची तब्येत. बरं वाटतय ना आता." सलील जिग्नेशकडे बघत म्हणाला.
"अं.. हो हो." जिग्नेश कसनुसं हसला.
क्रमशः
-----गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा