निशाची सासू
#निशाची_सासू
निशाच्या लग्नाला दोन वर्ष होत आली. सासू,सासरे,निशा व तिचा नवरा प्रथम असे चौघेजण एकत्र रहात होते. गावातच बंगला होता त्यांचा. नणंद रेवती प्रथमपेक्षा दोन वर्षाने मोठी. तिचं सासरही त्याच गावात होतं.
दोनेक वर्ष संसार सुरळीत चालला होता पण प्रथमची नोकरी गेली आणि महिन्याभरातच घरात कटकटी वाढू लागल्या. निशाला अगदी उपऱ्यासारखं वाटू लागलं. कोणताही पदार्थ उरला तर सासू लगेच बोले,"पैसे काही झाडाला लागत नाहीत. कितीहा उधळेपणा. पैसे कमवायला घाम गाळावा लागतो. फुकट नाही येत,तुझ्या माहेरी चालत असेल अशी उधळण. इथे महिन्याचा खर्च काढताना आम्हा म्हाताऱ्यांचा जीव अगदी मेटाकुटीला येतो. तुम्हाला काय त्याचं!.." हे असे शाब्दिक बाण सतत झेलल्याने निशाची अन्नावरची वासनाच उडून गेली होती. सारखी अपराधीपणाची भावना मनात सलत राहिल्याकारणाने तिची हाडं दिसू लागली होती.
प्रथम रोज नोकरीसाठी वणवण भटकत होता. पुर्वी प्रथम समोर नसताना त्याची आई सोडत असलेले वाग्बाण आत्ता ती प्रथम समोर असतानाही निसंकोचपणे सोडत होती. प्रथम अधिकाधिक खचत चालला होता. रात्री एकटक निशाचा चेहरा पहात बसे व विचार करी,"का मी लग्न केलं? या निष्पाप मुलीला माझ्यामुळे किती त्रास होतोय!"
निशाच्या सासूने त्यांना बाहेरची रुम खाली करून दिली व त्यात रहावयास सांगितलं. आम्ही तुम्हांला आयुष्यभर पोसण्याचा ठेका घेतला नाही असं म्हणू लागल्या. निशा व प्रथमचे फार हाल होऊ लागले. निशाचा भाऊ कधी तिकडे गेला तर तिला चार पैसे देऊन जायचा.
डिप्रेशनमध्ये एकदा प्रथमने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. निशाच्या लक्षात आलं तेंव्हा निशाची नुसती धावाधाव झाली. सासूही मदतीला होतीच. प्रथम बरा झाल्यावर त्याला डिस्चार्ज मिळाला.
निशाने ठरवलं असं हातावर हात धरून चालणार नाही. हातपाय हलवले पाहिजे. तिची आई प्रथमला भेटायला आलेली तेंव्हा तिने आईजवळ हा विषय काढला. आईने लगेच तिला तिच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या काढून दिल्या. प्रथम म्हणाला,"आई,हे काय करताय?" निशाची आई म्हणाली,"माझ्या लेकरांपुढे असे हजार दागिनं ववाळून टाकीन मी. माजी लेकरं म्हंजी माजी संपत्ती. जावयबापू पुन्यांदा असला इचारदेकूल मनात आनू नाही. समदं बेस होईल बगा. ती बहिनाबाय सांगून गेली नव्हं..
तिची उलुशीच चोच
तेच हात तेच बोटं
तुले दिले रे देवाने
दोन हात दहा बोटं
ही माजी पोरगी बटाटेवडे,कांदाभजी मस्त बनविते. तुमी गाडी सुरु करा बटाटेवडे नी कांदाभजीची नी संगतीला येक चायची टपरी टाका. मी ही पोरा ल्हान हुती तवा चाय इकून दिस काडलैत. लय हालवनयास काढलैत. तवा कुठं सुखाचे दिस दिसू लागलैती. तुमचा तर नवाकोरा सौसार. अपेश काय कुनाच्या वाटेला येत न्हाय व्हय? म्हून लगालगा जीव कशापायी देयाचा?"
सासूचं बोलणं ऐकून प्रथममध्येही उत्साह संचारला. नगरपरिषदेचं ऑफिस व शाळा अगदी जवळजवळ होत्या. त्या मोक्याच्या ठिकाणी प्रथमने चहाची टपरी घेतली. तिथेच निशा वडापाव,भजी करुन विकू लागली. माऊलीच्या बांगड्यांमागे तिचे लाख मोलाचे आशिर्वाद होते. शाळेच्या बच्चेकंपनीला निशाकाकूच्या हातचा वडापाव आवडू लागला. निशा तेल,बटाटे,बेसन हे सारं शाळेतल्या मुलीच्या किराणा दुकानातून मागवत असल्याने तिच्यावर पालकांचाही विश्वास होता. पण कुणीतरी तक्रार केली आणि शाळेजवळची सगळीच दुकानं हटवली गेली.
मुलांना निशाकाकूच्या हातच्या वड्यांची,हसऱ्या निशाकाकूची व लाड करणाऱ्या प्रथम काकांची आठवण येऊ लागली. सगळ्यांनी मिळून मुख्याध्यापक सरांना निशा काकू व प्रथमकाकाला शाळेच्या कँटीनमध्ये नोकरी देण्याची विनंती केली. मुख्याध्यापकांनीही ती त्वरीत मान्य केली. निशा व प्रथम शाळेच्या कँटीनमध्ये नोकरी करू लागले. लवकरच त्यांनी चाळीत छोटसं घर घेतलं. तिथे आपलं बिराड हलवलं. निशाची सासू मात्र नातेवाईकांना सांगे की ती दोघं या वयात आम्हांला एकटं टाकून गेलीत. नातेवाईकांनाही निशाच्या सासूचा स्वभाव माहिती होता. तीने निशा व प्रथमच्या पडत्या काळात त्यांना कशी वागणूक दिली होती,कसे वेगळे ठेवले होते याची खबर कानोकानी साऱ्या नातेवाईकांत पसरली होती.
प्रथमची बहीण आईकडे येऊनजाऊन असायची पण तीच्या नवऱ्याची बदली औरंगाबादला झाली व ती तिकडे रहावयास गेली. त्यामुळे निशाचे सासूसासरे एकाकी पडले. वयानुरुप पुर्वीची रगही अंगात राहिली नाही.
निशाच्या सासूने मुलीला थोडे दिवस तुझ्याकडे रहायला येतो सांगितले. दोघंही तिच्याकडे रहायला गेले. पंधराएक दिवस बरे गेले मग लेकीला,जावयालाही त्यांची अडचण होऊ लागली. कुठे फिरायला जायचं म्हंटलं तर या दोघांना घरात ठेवून जाणं जमेना. नातवाला कारटूनच पहायचं असायचं. या दोघांना त्यांच्या आवडत्या मालिका पहाता येईनात. उपरेपणाची जाणीव दिर्घ होऊ लागली तसं त्यांनी लेकीला गाडीत बसवायला सांगितल व आपल्या घरी परतले.
त्यातच निशाच्या सासूची सांधेदुखी चाळवली. हळूहळू एकेक अवयव आखडू लागलं. बरेच औषधोपचार केले पण दुखणं अंगाला चिकटलच. एका रात्री निशाचे सासरे अंथरुणातच गेले. पहाटे सहा वाजता उठणारे ते सात वाजले तरी उठेनात म्हणून निशाची सासू त्यांना हाका मारु लागली,तरी ओ देईनात म्हणून मग तीने हलवलं त्यांना तर लक्षात आलं की रात्रीच त्यांनी आटोपलं होतं. तिथे जवळपास घरंही नव्हती. निशाच्या सासूने मग लेकाला फोन लावला तसे निशा व प्रथम लगोलग आले. प्रथमने पुढचा कार्य आटोपली. निशाचे आईवडील आले. निशा सासूला धीर देत होती. प्रथमची बहीण लेकरांना,नवऱ्याला घेऊन आली. नातेवाईक थोडेच होते. ते येऊन गेले. प्रथमची बहीण आधीच निघाली होती. तिच्या मुलाचा बारावीचा क्लास होता. तिला जास्त दिवस रहाणं शक्य नव्हतं.
निशा व प्रथम जायला निघाले तेंव्हा मात्र निशाच्या सासूला ब्रह्मांड आठवलं. मी कशी भुतासारखी एकटी राहू असं म्हणून रडू लागल्या. निशा सासूच्या जवळ गेली. तिच्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाली,"आई, कुणी सोडून नाही जातय तुम्हांला. आत्ता मुळीच रडायचं नाही. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. आम्हांला तरी दुसरं कोण आहे तुमच्याशिवाय!"
निशाच्या सासूने तिच्यापुढे हात जोडले व म्हणाली,"सुनबाई अपराधी आहे गं मी तुम्हा दोघांचीही. तुम्ही माझी लेकरं असुनदेखील तुमच्या पडत्या काळात मी वैऱ्यासारखं बाहेर काढलं तुम्हांला. माफ करा मला."
प्रथमने आईच्या मांडीवर डोकं टेकलं व म्हणाला,"नको गं आई असं म्हणूस. आत्ता तुझाच आधार राहिलाय आम्हांला."
सासूला धरून उभी असलेली निशा अचानक घामाघूम झाली. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली व एका सेकंदाच्या आत ती धपकन खाली बसली. प्रथमने लगेच डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी नाडी तपासली व म्हणाले,"गोड बातमी आहे बरं! आजी होणार तुम्ही."
प्रथम व निशाच्या सासूच्या आनंदाला पारावार नाही राहिला. कारणही तसंच होतं. लग्नाला चार वर्ष झाली तरी निशा व प्रथमला बाळ होत नव्हतं. हळूहळू त्यांनी बाळाची आशा सोडली होती पण त्या घरात आत्ता बोबडे बोलं म्हणणारं गोबरं बाळ येणार होतं. अंगणात चिमुकली पावलं बागडणार होती. निशाच्या सासूने देव्हाऱ्यातल्या बाळकृष्णापुढे साखर ठेवली व त्याच्यापुढे हात जोडले.
स्वैंपाकघरात जाऊन निशासाठी साजूक तुपातला शिरा बनवला. आत्ता निशाचे सारे डोहाळे त्या हक्काने पुर्ण करणार होत्या.
-------सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा