पश्चातापाचे अश्रु!
#पश्चातापाचे_अश्रु!
सुरेश..वयवर्ष तीस..दोन गोजिरवाण्या मुलींचा बाप. बायको सुकन्या सोज्वळ,सुशील,ग्रुहिणी..सुरेशचे आईवडील सोबत रहायचे. पण काही वर्षांतच सासुसुनेचं पटेना..तेंव्हा ती दोघं आपणहून दुसरीकडे म्हणजे त्याच बिल्डींगीत पण खालच्या मजल्यावर राहू लागली. आर्थिकदृष्ट्या ती तशी स्वतंत्र होती. पण सुनेला लागोपाठ दोन्ही मुली झाल्याने सासूबाई सुनेवर नाराज होत्या. बरं आधुनिकतेच्या बुरख्यामुळे त्या त्यांच्या मनातली खदखद सुनेपुढे मांडू शकत नव्हत्या म्हणून मग पैशावरुन,कामावरुन..जमेल तसं..जमेल तेंव्हा तिला डिवचायच्या.
सुरेशला यातली जास्त माहिती नव्हती कारण हे सगळं सुरेशच्या अपरोक्ष घडायचं व सुरेश रात्री अकरापर्यंत घरी आल्यावर इतका थकलेला असायचा की सुकन्याला तिला होणारा त्रास हा नवऱ्यासमोर उघड करु वाटत नव्हता. ती बिचारी दिवसेंदिवस खंगत चालली होती.
अशातच सुरेशची नोकरी गेली..नि त्याच्या आईने त्याला मानसिक धीर ,आर्थिक आधार द्यायचा सोडून मोठं भांडण उकरुन काढलं व नवऱ्यासोबत भाड्याने रहायला लागली.
खरंतर रहातं घर सुरेशच्या वडिलांचं पण त्यातून त्याला बाहेर काढण्याएवढं धारिष्ट्य नव्हतं तिच्या अंगात. नोकरी गमावलेल्या मुलाला आईने घराबाहेर काढलं असं बालंट उठलं असतं तिच्यावर. घराचं भाडं द्यावं लागलं तरी चालेल पण सुनेला प्रपंचासाठी आर्थिक मदत करायची नाही असा ग्रह होता त्यांचा.
सुरेश रोज सकाळी उठून नवीन नोकरीच्या शोधात फिरायचा नि संध्याकाळी लवकर घरी यायचा.
मुली विचारायच्या"आई,बाबा लवकर घरी का येतात? लवकरची गाडी भेटते त्यांना? काय उत्तर देणार ती मुलींना..बिचारी गप्प बसायची.
घरातला किराणा संपत आला होता. गाठीला असलेले पैसेही संपत आले होते. सुरेशकडे पैशासाठी ती हात पसरु शकत नव्हती. यात तिच्या मदतीला धावून आला तो तिचा भाऊ सुदर्शन. सुदर्शन सहज म्हणून बहिणीच्या घरी गेला होता तर छोटी स्वरदा म्हणाली,"मामा,हल्ली आम्ही भाजी खातच नाही. फक्त पातळ डाळभात खातो."
मामा म्हणाला,"का बरं,भाजीपोळीसुद्धा खायची असते."
मोठी स्वानंदी स्वरदावर डोळे वटारत होती पण स्वरदाचं लक्षच नव्हतं. ती निरागसपणे बोलून गेली,"भाजीसाठी आमच्याकडे पैसेच नाहीत. बाबांची नोकरी गेली. आता पगार नाही. वाणीकाकाही सामान देत नाहीत."
सुकन्या नुकतीच चहा घेऊन बाहेर येत होती. मामाभाचीमधला संवाद ऐकून तिच्या पाणावल्या डोळ्यांचा बांध फुटला.
सुदर्शन तिच्या हातातला चहाचा कप घेत म्हणाला,"ताई,इतकं सगळं झालं पण तुला सांगावसं वाटलं नाही! मी थोडीबहुत मदत करेन पण ती कधीपर्यंत पुरणार! वटपौर्णिमेला नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी उपासतापास करतेस ना मग आताही त्याच्या हलाखीच्या काळात त्याच्या खांद्याला खादा लावून उभी रहा. काहीतरी उद्योग कर ..नोकरीच केली पाहिजे असं नाही. सुरुवातीला भांडवल मी पुरवतो. लेडीज गाऊन्स,ड्रेसचा व्यवसाय सुरु कर. मी तुला माल आणूनही देतो पण गिर्हाईकं शोधणं,त्यांना खरेदीसाठी प्रव्रुत्त करणं हे तुलाच करावं लागेल.
"मामा,मी माझ्या मैत्रिणींच्या आईंना सांगेन घ्यायला शिवाय स्वरदाच्या मैत्रिणींच्या आईही घेतील. आईच्या मैत्रिणी आहेतच." स्वानंदी उत्साहाने म्हणाली आणि खरंच सुदर्शनने पहिला लॉट आणून दिला..
सुकन्या घरातलं काम लवकरात लवकर आवरुन बाजुच्या सोसायट्यांमधून गाऊन्स विकायला फिरु लागली. रंग न जाण्याची गेरेंटी,चांगलं टिकाऊ कापड,..यामुळे माऊथ पब्लिसिटी व्हायला वेळ लागला नाही.
प्रत्येकजणी तीनचार गाऊन्स तरी खरेदी करायच्या. काही नाकं मुरडायच्या..महाग आहेत..यापेक्षा बाजारात कितीतरी स्वस्त मिळतील म्हणायच्या पण सुकन्या प्रत्युत्तर करत नव्हती. काहींनी तर तिला इनर्स पण घेऊन यायची विनंती केली..मग साईजनुसार आतले कपडेही ती विकू लागली.
बायकांना दुकानात जाऊन घेण्यापेक्षा सुकन्याकडून विचारुनसवरुन घेणं अधिक सोयीचं वाटू लागलं.
लग्नकार्यासाठी कोणी साड्यांची,ब्लाऊजपीसची,मेचिंग परकरांची मागणी करु लागलं. वर्षभरात सुकन्याचा या धंद्यात बऱ्यापैकी जम बसला. सुरुवातीला नको ते धंदे करते..नवऱ्याला अजून खड्ड्यात घालणार म्हणणारी सासूही तिच्याकडून साड्या स्वस्त मिळतात म्हणून विकत घेऊ लागली.
दरम्यानच्या काळात सुरेशलाही नोकरी लागली पण आता ती नोकरी टिकलीच पाहिजे अशी टांगती तलवार सुरेशच्या डोक्यावर नव्हती. याला कारण होतं त्याची ग्रुहलक्ष्मी सुकन्या..आणि तिला भरारी घेण्यास प्रव्रुत्त करणारा तिचा दादा सुदर्शन.
दिवस तसेच रहात नाहीत. अंधारातही एखादा प्रकाशाचा किरण गवसतो फक्त डोळे उघडे ठेवले पाहिजे,हातपाय चालवले पाहिजे जे सुकन्याने केलं..आपल्या संसारासाठी,नवऱ्यासाठी केलं.
मधे सुकन्याचे सासरे एडमिट होते..डॉक्टरांनी कसलीसी शस्त्रक्रिया सांगितली होती..बराच पैसा लागणार होता. सुकन्याची सासू सुकन्याकडे आली व म्हणाली,"अडीच लाख रुपये खर्च सांगितलाय. तुम्ही काय ती सोय करा नाही केलात तर लोकं तुम्हालाच हसतील."
सुकन्या म्हणाली,"आई,दागिने आहेत नं तुमचे."
"बाई,बाई..माझे दागिने मोडायला सांगतेस! बघ रे सुरेश..तुझी बायको कशी बोलते ती!"
"आई,दागिने माझ्या स्वाधीन करा. तुमच्या अंगावरचे सौभाग्य अलंकार सोडून राणीहार,सोन्याची दुपदरी माळ,आजेसासुबाईंच्या पाटल्या,सोन्याची नथ,ठुशी..हे सगळं आणून द्या.मग पैसे मिळतील."
सुरेश चिडला पण गप्प बसला. सुकन्याने सासूचे दागिने बँकेत तारण ठेवून मिळालेले पैसे व स्वत:जवळची बचत यातून सासऱ्यांचं हॉस्पिटलचं बील भरलं.
दरमहा पैसे भरून तिने ते दागिने सोडवले..पण सासूबाईंचा टेंभा कायम होता..दोन पैसे मागायला गेली तर दागिने गळपटवलेन असं गणगोतात सांगत सुटलेली..ज्याची सुकन्याला फिकीर नव्हती कारण तिच्या हलाखीच्या परिस्थितीतून वर काढायला हे गणगोत आलं नव्हतं. सासूचा मुळचा स्वभाव काही केल्या बदलायचा नाही हे ती समजून चुकली होती.
वर्षामागून वर्ष सरत होती. मुलीही आता मोठ्या झाल्या. .मोठी नर्स झाली..छोटी स्वरदा मेडीकलला होती. सुकन्याच्या सासऱ्यांना वयोपरत्वे देवाज्ञा झाली..आता सासूच्याने एकटीचं होईना..शेवटी सुकन्येला म्हणाली,"माझ्या नवऱ्याचं घर आहे हे. मी इथे राहू शकते."
सुकन्या म्हणाली,"तुमचे तुम्हीच तर गेलात..आम्हाला मदत करावी लागेल म्हणून."
सासू म्हणाली,"उलट बोलतेस. आईने काही रीतभात शिकवलीच नाही का गं तुला. नुसतं आपलं उचलली जीभ अन् लावली टाळ्याला."
सुकन्या म्हणाली,"तसं नाही आई,काही गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा..बोलून टाकलेल्या बऱ्या असतात. नातं प्रवाही रहातं. तुम्हाला किती प्रेमाने आई म्हणून साद घालायचे मी पण तुम्ही मला कधी मुलगी मानलंच नाही. मायेनं कधी माझ्या अंगावरुन हात फिरवला नाहीत की चार शब्द धीराचे माझ्याशी बोलला नाहीत."
म्हातारीच्या डोळ्यातून ऊन ऊन टिपं गळाली. ते पश्चातापाचे अश्रु होते! का म्हातारपणीची सोय व्हावी म्हणून काढलेले तिचं तीच जाणे.
-----गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा