औक्षवंत व्हा


 #ज्येष्ठकथा


#औक्षवंत_व्हा!


नीलाक्षी व नीलचं लग्न होऊन अवघे सहा महिने झाले होते. दोघंही भरपूर पगारवाले. उच्चपदस्थ. नीलच्या आईवडिलांनी आधीच दोन घरं घेऊन ठेवली होती. नील व निलाक्षी नाही म्हणत असतानाही नीलच्या आईबाबांनी निक्षून सांगितलं की आत्ता आम्हाला काही दिवस एकांत द्या. 


नील व निलाक्षीचा नाईलाज झाला. नीलच्या आईबाबांनी त्याला फक्त घर घेऊन दिलं होतं. बाकीची क्रोकरी,फर्निचर त्या नवीन जोडप्याला त्यांच्या आवडीने घ्यायचं स्वातंत्र्य दिलं होतं.


 निलाक्षीने तिच्या मम्माला रहायला बोलावलं पण तिनेही जाणूनबुजून टाळाटाळ केली. येऊ आरामात असंच सांगितलं. दोघा चिमणाचिमणीने घरातले पडदे,बेड,टेलिव्हिजन, फ्रीज,वॉश़िग मशीन,कटलरी सगळं सगळं ऑनलाईन मागवलं. दुसऱ्या दिवशी सामान घरी हजर. ऑनलाईन शोधकामात कामवालीही मिळाली. पैसे थोडे जास्त गेले. बट फिकर नॉट. पगारही तगडा होता त्यामुळे त्याचं काही वाटलं नाही. 


डेली रुटीन सुरु झालं. रमाक्का रोज सात वाजता यायची. आल्याबरोबर कामाला सुरुवात करायची. केरकचरा, दोघांचे डबे,त्यांच्या आवडीचा नाश्ता,चहा,कॉफी..करुन मग बेसिनमधली भांडी धुवून पुसून नीट रचून ठेवायची. निलाक्षी साडेआठला घरातून बाहेर पडे तर नील साडे दहाला. नील जायच्या अगोदर रमाक्का सर्व आवरुन बाहेर पडे. ती साध्याच पण स्वच्छ धुतलेल्या फुलाफुलांच्या नक्षीच्या साड्या नेसायची,केसात एखादं फुलं माळून यायची.


संध्याकाळी सहा वाजता रमाक्का शेजारच्या आजीकडून चावी घेऊन दार उघडून संध्याकाळचा स्वैंपाक करून ठेवत असे. निलाक्षीच्या सुचनेप्रमाणे येतानाच भाजी घेऊन येई. पै न् पैचा बरोबर हिशेब द्यायची. नील व नीलाक्षीला संसार अगदीच सहज,सोप्पा वाटू लागला होता. असेच सहा महिने निघून गेले. दोघांचेही आईवडील  त्यांचा सुखी संसार बघण्यासाठी येऊन चारपाच दिवस राहून तोंडभर आशिर्वाद,थैलीभर सूचना देऊन गेले. निलाक्षीच्या मम्माने तिला बजावलंच की पुर्वी माझं ऐकलं नाहीस पण आत्ता तरी स्वैंपाक करायला शीक पण निलाक्षी म्हणाली,",यु नो नं मम्मा, वेळच नसतो. रोजच ओव्हर टाईम वर्क करावं लागतं. घरी आल्यावर ताणच उरत नाही आणि ही रमाक्का सगळं करते ग नीट." 


निलाक्षीची मम्मा यावर एक सुस्कारा सोडून तिच्या यजमानांसोबत निघून गेली. निलाक्षीच्या सासूने तर आधीच ठरवलं होतं की त्यांच्या संसारात लुडबूड करायची नाही. 


एकेदिवशी रमाक्काचा भल्या सकाळी फोन आला,"ताई, मला अर्जंट गावी जावं लागतय. भावाची तब्येत खराब हाय. पंधराएक दिसांनी येईन. तवसर संभाळून घेवा." 


निलाक्षी तिला बरं म्हणाली व फोन ठेवला पण मग घरातली कामं..तिने पंधरा दिवसासाठी खालच्या अन्नपुर्णा सेंटरमध्ये पोळीभाजीचा डबा लावला. हाय काय नाय काय निलाक्षी स्वतःशीच म्हणाली. बाजूच्या आजीला रिक्वेस्ट केली. तिने तिच्याकडची मोलकरीण केर,लादी,भांड्यांसाठी पाठवली. अगदी चहासुद्धा अन्नपुर्णातून येऊ लागला..सोबत कांदेपोहे,आप्पे,शिरा काय हवं ते. 


साताठ दिवस अगदी सुरळीत गेले. रमाक्काच्या हातचं जेवण मिळत नव्हतं पण तरी बऱ्यापैकी होतं. मेन म्हणजे आयतं मिळत होतं. त्यांचा डिलीव्हरी बॉय बरोबर वेळेवर पार्सल देऊन जात होता. 


आणि ..आणि तो दिवस उजाडला. रात्री सरकारने संचारबंदी जाहीर केली. मोलकरणींनीही कामावर जायचं नाही असं सांगितलं. निलाक्षीने नीलला विचारलं ,"तुला चहा येतो का रे करता?" नील म्हणाला,"नाही ग,म्हणजे आई सांगायची..जरा स्वैंपाक शीक पण मला फारसं महत्त्वाचं वाटलं नव्हतं ते कधी. आय जस्ट इग्नोअर्ड इट बेब. बट यु शुड बी नोईंग समथिंग."


" ओ,व्हाय मस्ट आय बी नोईंग द कुकी़ग शुकींग एण्ड ऑल देट.. आय नेव्हर हेड इन्टरेस्ट इन हाऊजहोल्ड वर्क. यु बेटर नो माय इंटेलिजन्स. आय हेड नेव्हर व्हेस्टेड माय टाईम इन प्रीपेरिंग मील."


"बट डार्लिंग नाऊ व्हॉट टू डू?"-नील


मग दोघं मिळून युट्युब वर दाखवल्याप्रमाणे चहा बनवू लागले. पण कधी किचनकडे ढुंकून न पाहिल्याने किचनची दयनीय अवस्था झाली. 


चहा उतू गेला. दुधाचा टोप करपला. चहा गेसच्या शेगडीवर..शेगडीवरुन ओट्यावर ओघळला. निलाक्षीच्या गोबऱ्या गुलाबी गालांवर आसवं वाहू लागली. ती पुसायची की चहा ओतायचा या द्विधा मनस्थितीत नील असताना तो बोटांनीच गरम पातेलं उचलू पहात असताना टोप त्याच्या हातून निसटला व बाजूलाच चेअरवर बसलेल्या नीलाक्षीच्या हातापायांवर गरमगरम चहा सांडला." निलाक्षी रागाने लालबुंद झाली व नीलचा इंग्लीशमध्ये उद्धार करु लागली. नीललाही जाम राग आला." 


"तू मुलगी आहेस नं. तुला तरी स्वैंपाक आलाच पाहिजे. साधा चहाही येत नाही!"


"ए हेलो, तुला मी आधीच सांगितलेलं की हाऊजहोल्ड चोअर्स नाय जमत आपल्याला. तेंव्हा बरा,मला फक्त नी फक्त तू हवीस गं नीलू असं बोलत होतास."


"तिथेच चुकलो."


"व्हॉट डू यु मिन..चुकलो बिकलो. आणि काय रे एवढा सुंभासारखा वाढलास. एरवी मेन विमेन इक्वेलिटीची भाषणं झाडतोस. तुला का येत नाही रे घरकाम. बोल बोल. माझ्याशी पंगा नाय घ्यायचा आधीच सांगून ठेवते!"


आत्ता दोघांच्याही डोळ्यांत एकमेकांविषयी कमालीचा राग जमा झाला होता. एवढ्यात त्यांच्या आवाजाने बाजूच्या आजीने दरवाजा ठोकवला. नवीन पेटर्नप्रमाणे ओपन किचन असल्याकारणाने आजीच्या ध्यानात सगळा प्रकार आला व या दोघांचे चेहरेही भांडणाची साक्ष देत होतेच. आजी ओल्या नारळाचे लाडू घेऊन आली होती. आजीने नीलच्या बोटांना व नीलाक्षीच्या हातापायाला बरनॉल लावलं.  नील नीलाक्षी नाही म्हणत असतानाही त्यांचा ओटा आवरून दिला. 


थोड्या वेळाने चहाही घेऊन आली.  मग आजी त्यांना म्हणाली,"हे बघा, कुणी आईच्या पोटातूनच शिकून येत नाही. तुम्ही स्वैंपाककला शिकला नाहीत. तुम्हाला वाटलं,खूप पैसे आहेत आपल्याकडे. पैशाने सगळं काही विकत घेता येतं,पण तसं नसतं बाळांनो. ह्या तुमच्या स्वैंपाकघरात काही वेळ घालवा. मी तुम्हाला साधासोप्पा स्वैंपाक शिकवेन. वाटून वाटून कामं करायची. नील तुलाही स्वैंपाक आलाच पाहिजे.


 तुझे आजोबा बघ आज माझ्यासाठी ओले काजूगर घालून मसालेभात बनवताहेत. कसला सुगंध येतोय बघ..तुला वाटेल बासमतीचा वगैरे..तो तर असतोच रे,पण त्याहून मोहक सुगंध माहितीय का बाळांनो तुम्हाला..तो असतो मायेचा सुगंध. आपल्या हाताने माझ्या आवडीचं करुन मला खाऊ घालायची भारी हौस त्यांना,"असं म्हणत आजी भारी लाजली. तीचं ते लाजणं बघून नीलने निलाक्षीला हळूच डोळा मारला. नीलाक्षीही मग हसू लागली. 


त्या दुपारी नील,नीलाक्षी दोघंही आजीकडे जेवली. दुसऱ्या दिवशीपासून मात्र आजी त्यांना अगदी चहा,कॉफी,वरणभात,पिठलंभात,पोळ्या असे साधेसोप्पे पदार्थ शिकवू लागली. आजीच्या आठवणी,गमतीजमती ऐकत दोघंही मन लावून स्वैंपाक शिकू लागली. कणिक तिंबणं, वेड्यावाकड्या पोळ्या लाटणं,त्यांवर ताटली मारणं असं करता करता महिनाभरात दोघांनाही छान पोळ्या जमू लागल्या.


आजोबाही आत्ताशा नीलनीलाक्षीसोबत गप्पा मारु लागले. कधी पत्त्यांचा डाव रंगू लागला तर कधी गाण्याच्या भेंड्या. गाण्याच्या भेंडीत अ आला की आजोबा गुडघ्यावर बसून आजीकडे हात करत, "ओ मेरी जोहरोजबी तुझे मालूम नहीं,तू अभी तक है हँसी और मैं जवान

तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान.." हे आवडीचं गाणं गात.


आजी मग अल्लड तरुणीसारखी लाजून गोरीमोरी होई. 

यातून नील व नीलाक्षीला संसार कसा फुलवायचा असतो,आयुष्यभर एकमेकांना कशी साथ द्यायची हे सगळं कळत होतं. 


आजीआजोबांचा एक मुलगा होता पण सैन्यात भरती झाला न् चार वर्षात तिरंग्यात लपेटून आला होता. आजीआजोबा फोटोचा अलबम काढून डोळ्यांच्या कडा पुसत ही त्यांची व्यथा सांगायचे. त्या मुलाचं लग्नही झालेलं पण मग आजीआजोबांनीच स्वतः त्यांच्या सुनेसाठी योग्य वर पाहून तिचं कन्यादान केलं होतं. ती आपल्या नवीन जोडीदारासोबत परदेशात सेटल झाली होती. पण आजीआजोबा या जुन्या घटना कुरवाळत बसले नव्हते तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद वेचत होते. प्रत्येक अडचणीत असणाऱ्याला जमेल तशी मदत करत होते. 


आजी व आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीखही नील व नीलाक्षीने अलबममधून टिपून घेतली. त्यादिवशी त्या दोघांनी मिळून आमरस पुरी बनवली. मसालेभात तयार केला. आजीआजोबांना जेवायला बोलावलं. आजी छान नववारी साडी,नथ,अंबाड्यात मोगऱ्याचा गजरा अशा थाटात आल्या. आजोबाही परीटघडीचा सदरालेंगा,त्यावर जाकीट,खिशात लाल गुलाबाचं फुल लावून आले. 


हॉलमधल्या झोपाळ्यावर बसवून आजीआजोबांचे फोटो काढले. निलाक्षीने आजीला हळदीकुंकू लावून तिची ओटी भरली.  दोघांचही औक्षण केलं. आजीच्या आवडीचं मोरपीसी रंगाचा पंजाबी  ड्रेसचं मटेरियल निशाने आजीला गीफ्ट केलं तर आजोबांना त्यांना आवडेल असं घड्याळ गीफ्ट केलं. आजीआजोबांचा एकमेकांना आमरसपुरी भरवतानाचा फोटोही काढला.


 दोघं आजीआजोबांच्या पाया पडली तसं दोघांनाही त्यांनी मिठीत घेतलं व औक्षवंत व्हा असा आशिर्वाद दिला.


-------सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट