नणंद भावजय

 #नणंद_भावजय


पल्लवी व प्रशांतच लग्न झालं. हनिमुनला जाण्याएवढी दोघांची आर्थिक परिस्थिती नव्हती. चार पैसे गाठीला होते ते मोडून हनिमुनला जायचा प्रशांतचा विचार पल्लूने धुडकावून लावला. 

घरात नणंद,सासू व सासरे होते. नणंद रिमा हुशार होती. शाळेत


तिने कधी पहिला नंबर सोडला नव्हता. रिमा एमएससी करत होती. पल्लू बीए झाली होती पण रिमाला ती डाऊन मार्केट वाटायची. 

अजुनपर्यंत घरात सगळ्यांनी रिमाचंच कौतुक केलं होतं. पण आत्ता पल्लूचं कौतुक व्हायला लागलं होतं. पल्लूला घरकामाची चांगलीच सवय होती. सकाळी उठल्यावर केर काढणं,फरशी पुसणं,नाश्त्यासाठी रोजरोज नवनवीन पदार्थ तयार करणं हे सारं ती फार हौसेने करायची.


 पल्लूची सासू व सासरेही तिच्या वागणुकीवर खूष होते. सासरे तिचं कौतुक करायचे. तिच्याशी विविध विषयांवर चर्चा करायचे. रोज वर्तमानपत्रं वाचत असल्याने पल्लूला सगळी माहिती असायची. रिमाला मात्र हे वर्तमानपत्र वाचणं,जनरल नॉलेजची पुस्तकं वाचणं वगैरे निव्वळ टाईमपास वाटायचा. ती तसं पल्लूला बोलुनही दाखवायची. 


पल्लूने सासुबाईंकडून विणकाम शिकायला सुरुवात केली. ते शिकवत असताना सासुबाईंशी ती त्यांच्या बालपणीविषयी विचारी. त्यावेळचं राहणीमान,पदार्थ,खेळ हे सांगता सांगता पल्लवीच्या सासुबाई अगदी मोहरुन जायच्या. पल्लूशिवाय कोणाचंच पान हलतं नव्हतं. पल्लूच्या सासऱ्यांना तिच्या हातच्या मऊसूत पोळ्या आवडू लागल्या तर सासूची तर ती मैत्रीणच झाली. 


नेमकं हेच रिमाला खटकू लागलं . तिने आईला एकदोनदा बोलूनही दाखवलं की काय सारखं पल्लू पल्लू करतेस! रिमाची आई मग तिलाच म्हणाली,"अगं असं बोलू नये. तिच्याकडून जरा शीक मोठ्यांशी कसं वागवायचं ते.'

एकदा कॉलेजमध्ये सारी डे होता. रिमा मुद्दाम पल्लूची फेवरेट साडी नेसून गेली. खरंतर ही साडी पल्लूला तिच्या नवऱ्याने लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवशी गीफ्ट दिली होती. पल्लूने अजून तिची घडीही मोडली नव्हती तरी तिने मोठ्या मनाने रिमाला ती साडी दिली. नेमकं रिक्षामधून उतरताना साडीला खिळा लागला व टरकली.


 रिमाने घरी आल्यावर पल्लूला साडी फाटल्याचं सांगितलं पण सॉरी वगैरे काहीच बोलली नाही. पल्लूला फार वाईट वाटलं. पल्लूच्या सासूने तशीच गुलाबी रंगाची साडी पल्लूला दुसऱ्या दिवशी आणून दिली. ती साडी पाहून रिमाला आईचा खूप राग आला. ती म्हणाली,"आई,तू हल्ली वहिनीचे जास्तीच लाड करतैस. एक साडी फाटली तर लगेच दुसरीआणून देण्याची काय गरज होती. हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नसतं. या वहिनीमुळे घरातलं माझं स्थान डळमळीत होतय. दादाही पहिल्यासारखं माझ्याशी गप्पा मारत नाही. नुसता बायकोसोबत असतो. बाबाही तसेच. काही हवं झालं की वहिनीलाच हाक मारतात. मी इथे असून नसल्यासारखी झालेय. वहिनी फक्त माझ्या जागेवर हक्क गाजवू पहातेय. हळूहळू रंग दाखवेल ती तेंव्हा तुम्हाला कळेल." 


आत्ता मात्र रिमाच्या आईला रिमाच्या अशा बोलण्याचा संताप आला व त्या रिमावर गरजल्या,"पहिली माफी माग तिची. अगं माहेर सोडून,आपले आईवडील,भाऊबहीण सोडून इथे आलैय ती. ती आल्यापासून पहातेय रिमा कधी चार शब्द आपुलकीचे बोलली आहेस तिच्याशी?आम्ही बोलतो कारण तसा लळा लावतेय ती आम्हांला.जीभेवर साखर आहे पोरीच्या. आमचंच चुकलं,तुझे जरा जास्तच लाड केले आम्ही उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून एका सॉफ्ट कॉर्नरने पहात आलो तुझ्याकडे. लहानपणापासूनच तुला धाकात ठेवली असती तर आज मोठ्या भावाच्या बायकोविषयी असे उद्गार काढले नसतेस. कधी काय काम सांगितलं की माझा अभ्यास आहे माझा अभ्यास आहे एवढंच पालूपद तुझं. पल्लूही शिकलेय. बीए झालेय व पुढेही शिकेल ती पण तुझ्यासारखी उर्मट नाही वागायची." 


रिमाला आईच्या बोलण्याचा फार राग आला. त्यादिवशीपासून ती हॉस्टेलमध्ये राहू लागली. इकडे पल्लूला दिवस गेले. सासूसासऱ्यांनी तिची छान काळजी घेतली. पल्लूच्या आईची तब्येत बरी नसायची म्हणून पल्लूच्या सासूने पल्लूचं बाळंतपण स्वतः करायचं ठरवलं. पल्लूला नऊ महिने झाले.  एके दिवशी तिच्या पोटात खूप दुखू लागले. ताबडतोब तिला इस्पितळात हलवण्यात आले. 


रिमालाही थोडं अस्वस्थ वाटतं होतं. न रहावून तिने दादाला फोन केला. त्याने रिमाला सर्व कल्पना दिली. रिमा सगळं भांडण वगैरे विसरून इस्पितळात गेली. पल्लूचा रक्तदाब खूप कमी झाला होता. सिझर करावं लागलं होतं. रक्तस्त्रावही जास्त झाला होता. डॉक्टरांनी बाळाला त्याच्या वडिलांच्या हाती दिलं. पल्लू शुद्धीवर आली नव्हती. तिची स्थिती फार गंभीर होती. रिमाने बाळाला दादाच्या हातातून घेतलं. बाळाने आपले इवले इवले डोळे किलकिले करून रिमाकडे पाहिलं. तिचं बोटं त्याने आपल्या चिमुकल्या हातांनी गच्च पकडलं. अतिरक्तस्त्रावामुळे पल्लूची शुद्ध हरपली होती व ग्लानीत ती असंबंध बडबडबत होती. 


रिमाला फार वाईट वाटत होतं. आत्ता तिला तिच्या वहिनीच्या अस्तित्त्वाचं मोल कळत होतं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डब्यातल्या पावडरचं दूध बनवून तिने बाळाला छोट्याशा चमचाने भरवलं. बाळालाही त्याची आई आजारी आहे हे बहुधा कळलं असावं तोही न कुरकुरता चुटूचूटू दुधू पित होता. नेमकी रिमाच्या आईची तब्येतही बिघडल्यामुळे या दोघांचीही जवाबदारी रिमावरच पडली. 


दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लूला शुद्ध आली तेव्हा रिमाने डॉक्टरांच्या सुचनेनुसार पल्लूला उठून बसवलं व बाळाला तिच्या दूधाला लावलं. बाळ आईचं दूध पिऊ लागला. पल्लू बघत होती..विचार करत होती..तिच्यामुळे

 भांडून गेलेली तिची नणंद रिमा हीच का..रिमा मात्र काहीच न घडल्यासारखी वावरत होती. पल्लूसाठी मेथीची भाजी चपाती आणून तिला खाऊ घालत होती. तिला हळूहळू उभं करणं,बाथरुमला नेणं..सगळं करत होती..बाळाशी गप्पा मारत होती, रात्री बाळ जागा राही मग रिमा पल्लूला झोपू देई व स्वतः त्याला सांभाळे,त्याच्यासोबत खेळे. 


पल्लूची आई पल्लूला पहायला आली तेंव्हा रिमा तिच्या लेकीची घेत असलेली काळजी पाहून त्या माऊलीला फार समाधान वाटलं. खरंच कोणताही माणूस मनापासून वाईट नसतो. काही गैरसमज असतात. ते गैरसमजाचं शेवाळ बाजूला झालं की नातं नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाहू लागतं. वहिनी आल्यावर रिमाच्या मनात एक असुरक्षिततेची भावना तयार झाली होती त्यामुळे ती आक्रस्ताळेपणे वागली व घर सोडून हट्टाने बाहेर राहू लागली होती पण जेंव्हा कुटुंबावर संकट आलं तेंव्हा सगळा हट्टीपणा विसरुन आपल्या वहिनीच्या मदतीला धावली.


इस्पितळातून पल्लूला व बाळाला डिस्चार्ज मिळाला. सामान भरताना रिमाचे डोळे भरुन येत होते. बाळाला सोडून जावं लागणार या कल्पनेने ती व्याकूळ झाली होती. तिने वहिनीला येते म्हणून सांगितलं तसं पल्लू बाळाकडे पहात म्हणाली,"आत्तू ,आशं काय गं करतेस. चलं ना ग घरी माझ्यासोबत खेळायला. मला न्हाऊमाखू घालायला. " 


वहिनीचे हे बोल ऐकताच रिमाने रडतच वहिनीला मिठी मारली व तिला सॉरी बोलली,म्हणाली,"नाही रे बाळा तुझी आत्तू तुला सोडून कुठ्ठे जाणार नाही. "


------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट