खरा तो एकचि धर्म..


 गीता गजानन गरुड.

आंब्रड.


खरा तो एकचि धर्म..


प्रिया, तीन भावांची एकुलती एक बहीण.

सगळ्यांत धाकटी.

भावांनी अगदी फुलासारखं जपलं तिला.

आई तिला कधी मारू लागली तर एकतरी भाऊ मध्ये पडायचा.

आपण मार खायचा पण तिला आईच्या मारापासून वाचवायचा.


अभ्यासातही बर्यापैकी प्रगती होती पियुची.

मोठे भाऊ लाडीगोडी लावून तिच्याकडून अभ्यास करुन घेत.

तिला चांगले गुण मिळाले तर तिचं कौतुक करीत.

कमी गुण मिळाले तर पुढच्या वेळी अजून प्रयत्न करुया असं सांगून तिला धीर देत.


बाबाची तर काजूकतली होती पियू.

बाबा दाढी करायला गेले की त्यांचं ब्रश,पेस्ट,रेझर,तुरटी जसं लागेल तसं बाहेर काढून देई व स्वत: स्टुलावर उभं राहून गालावर हात ठेवून बाबांकडे बघत राही.

त्यांची दाढी करुन तोंड धुवून झालं की प्रिया त्यांच्या गालावर गोड पापा देई व म्हणे कसं दिसतयं माझं गोड्डुलं ते!


सुट्टी असली की प्रिया सर्वांचे बुट पोलिश करून ठेवी.

आईच्या निगराणीत पियु आत्ता स्वैंपाकातही तरबेज झाली होती.

छान छान पदार्थ बनवे व सर्वांना खाऊ घाले.

दहावीच्या परिक्षेतही पियुला उत्तम गुण मिळाले.

पियुने तिच्या आवडत्या वाणिज्यशाखेत प्रवेश घेतला.

कोलेजात यायला जायला बाबांनी तिला स्कुटी घेऊन दिली.

तिच्या महाविद्यालयात जाणार्या एका मुलीला , विद्याला ती लिफ्ट देऊ लागली.

दोघीही एकाच वर्गात ,त्यामुळे मैत्री वाढत गेली.

विद्याचे वडील तिच्या आईला सोडून गेलेले कायमचे.

विद्याची आई शिवणकाम करुन आपल्या दोन मुलांना वाढवत होती.

तिचा भाऊ प्रितम कोलेजच्या शेवटच्या वर्षाला होता.

त्याला आईच्या कष्टांची जाण होती.प्रितम सकाळी एका सायबर केफेमध्ये काम करी व रात्री नाईटस्कुलमध्ये जात असे.

विद्याचीही जवाबदारी आपल्यावर आहे,याची त्याला पूर्ण कल्पना होती.


प्रितम सुट्टीच्या दिवशी घरी असला की विद्याला अकाऊंट्सचे प्रोब्लेम्स सोडवायला मदत करी.

प्रियाच्या घरी मात्र तिघेही भाऊ सायन्सवाले होते.आईबाबा बारावी पास.

पहिलं पहिलं कोलेजच्या सरांनी छान शिकवलं पण त्यांना कावीळ झाली व त्यांनी मोठी सुट्टी घेतली.

नवीन सरांचं शिकवणं काही प्रियाच्या डोक्यात शिरेना.

विद्यालाही तिला नीट समजावून सांगता येईना.

शेवटी विद्याने तिला आपल्या घरी बोलावलं


आईची परवानगी घेऊन एका शनिवारी प्रिया विद्याच्या घरी गेली.

विद्याच्या भावाने तिला अगदी बेसिकपासून शिकवलं.

प्रियाला त्याचं शिकवणं खूप आवडलं.

आत्ता ती नेहमी शनिवार,रविवार विद्याच्या दादाकडे शिकायला जाऊ लागली.

प्रितमला सततच्या सहवासाने प्रिया आवडू लागली.

तिचं ते लाडिक बोलणं,आरसपानी सौंदर्य, गालावरची खळी..प्रितमची पुरी विकेट पडली.

उठता बसता जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रितमला त्याची प्रिया दिसू लागली.

कधी एखाद्या सुट्टीला ती आली नाही तर तो अस्वस्थ होई.येरझाऱ्या घालू लागे.

एकदा तर खाटेवर गाढ झोपेत असताना प्रिया मला तु किती आवडतेस असं बरळत होता.त्याची आई गाढ झोपली होती पण विद्या अभ्यास करत होती टेबललेंपच्या प्रकाशात.

तिच्या कानावर तिच्या दादाचा हा प्रेमालाप पडला.

ती आपली जीवश्चकंठश्च मैत्रीण आपली वहिनी होणार म्हणून फार खूश झाली.


आई सकाळी बाजारात गेल्यावर विद्या दादाला काल रात्रीच्या त्याच्या स्वप्नाबद्दल विचारलं

प्रितमने तिला हे सर्व खरं असल्याचं सांगितलं.

विदया कँटीनमध्ये प्रियाला तिच्या दादाच्या मनातले तिच्याबद्दलचे विचार सांगते.

प्रियालाही प्रितम आवडू लागला असतो.

ती हो म्हणते.

आत्ता अभ्यासाव्यतिरिक्त या दोघांच्या भेटीगाठी होऊ लागतात.

एकमेकांशी प्रेमाच्या आणाभाका घेतात.

कधी पावसात चिंब भिजतात तर कधी समुद्रकिनारी रेतीत हातात हात गुंफून चालत रहातात.

वाळूत आपले नाव कोरतात.


या सर्वाची कुणकुण काही मित्रांकडून तिच्या भावांना लागते.

प्रीतम बौद्ध धर्माचा तर प्रियाचे कुटुंब हिंदु धर्माचे असल्याकारणाने ते या प्रेमाला कडाडून विरोध करतात.

प्रिया भावांना म्हणते,"धर्मनिरपक्षेबाबत तुम्हीच व्याख्यानं देताना? तुमच्याच आचारविचारांचा प्रभाव आहे माझ्यावर."

मोठा भाऊ म्हणतो,"ती सगळी बोलाची कढी नी बोलाचाच भात असतो.तु त्याला सत्य समजू नकोस."

प्रिया आईवडलांना तिचा निर्णय ठाम असल्याचे व ती मानवता हा एकच धर्म पाळत असल्याचे निक्षून सांगते.

तिचे भाऊ तिला बाहेरचा रस्ता दाखवतात.


नेसत्या वस्त्रानिशी प्रिया घरातून बाहेर पडते व प्रीतमकडे जाते.

प्रितमची आई प्रीतम व प्रियाला घेऊन प्रियाच्या भावांची समजूत काढायला जाते पण ते तिला नाही नाही ते बोलतात.

तिचा अपमान करतात.

प्रिया त्या घरातून जिथे तिच्या सासूला जिव्हारी लागेलं असं बोललं गेलं, तिथून परत तिथे न जाण्यासाठी बाहेर पडते.

प्रियाच्या आईवडलांचं ह्रदय लेकीसाठी तुटत असतं पण ती मुलांपुढे असहाय्य असतात.


प्रिया व प्रितमचा मंगल परिणय होतो.

प्रिया घरात असलेली बाबासाहेबांची पुस्तकं वाचू लागते.त्यांचे समता,महानायक व्रुत्तपत्र,बहिष्कृत हितकारणी सभा,अस्पृश्यतेविरुद्ध 1927 मध्ये सुरु केलेली जाग्रुत चळवळ,पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू मंदिरात प्रवेशासाठी काढलेले मोर्चे याबद्दल वाचते.

सनातन्यांच्या अमानवी व्रुत्तींना कंटाळून त्यांनी हिंदू धर्मत्याग म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दिक्षा घेतली.

तिला बाबासाहेबांचे हे विचार फार आवडतात.

त्यांच्या विचारांचा प्रियावर प्रभाव पडतो.


प्रिया डिगरी पूर्ण करते व एलएलबीला एडमिशन घेते. ती एलएलबीची पदवी मिळवते.

एका नामवंत वकीलाच्या हाताखाली कामाला लागते.

प्रितमचा व त्याच्या घरच्यांचा तिला पुर्ण पाठिंबा असतो.

विद्याचेही लग्न होऊन विद्या तिच्या सासरी जाते.

प्रिया व प्रितमला  कन्यारत्न प्राप्त होतं.तिचं नाव प्राजक्ता ठेवतात.


बौद्ध समाजातील महिलांच्या विकासासाठी प्रिया

 प्रबोधनाचे कार्य करते. 

आंबेडकरांची स्त्रियांच्या विकासाबद्दलची तळमळ ती तिथल्या स्त्रियांना समजावून सांगते.

इकडे यथावकाश तीनही भावांची लग्नं होतात.

सुना लावालावी करणार्या मिळतात.

भावाभावांत दरी निर्माण होते.

तिच्या म्हातार्या आईवडलांची फार हेळसांड होते.

त्यांना व्रुद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो.

प्रिया व प्रितमला जेंव्हा हे समजते तेंव्हा ते प्रियाच्या आईवडलांना मानाने आपल्या घरी घेऊन येतात.


प्रिया आपले आईवडील,सासू, नवरा यांचे मदतीने व्रुद्धाश्रम काढते.तो मात्र सर्व धर्मांसाठी खुला असतो.

मानवता असं ती त्या व्रुद्धाश्रमाचं नाव ठेवते.

यथावकाश तिचे आईवडील,सासू देवाकडे निघून जातात.

प्रियाची मुलगी प्रितीही आत्ता मोठी होते.

इकडे तिचे भाऊ एकेक करुन मुलं सांभाळत नसल्याने मानवता व्रुद्धाश्रमात येतात.


तिथल्या एका कार्यक्रमाला प्रिया व प्रितम अध्यक्ष या नात्याने स्टेजवर जातात,तेंव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो.

खाली खुर्चीत बसलेले तिचे भाऊ,भावजया तिला ओळखतात व शरमेने मान खाली घालतात.


भाषण देताना प्रियाचे लक्ष तिच्या भावांकडे जाते.

तिला सर्व परिस्थिती लक्षात येते.

भाषण झाल्यावर प्रिया शिपायाला आपल्या भावांना केबिनमध्ये पाठवावयास सांगते.

भाऊ व भावजया तिच्या केबिनमध्ये जातात.भावांना तिची माफी मागायची असते.

पण प्रिया त्या सर्वांना नमस्कार करते व तिच्या घरी रहायला येण्याचा आग्रह करते.


पण भाऊ म्हणतात,आयुष्यभर जातिभेदाला चिकटून राहिलो.

शेवटी म्हातारपणी या मानवता  व्रुद्धाश्रमाने आम्हाला आश्रय दिला.

आत्ता उर्वरित आयुष्य आम्ही इथल्या लोकांशी समरस होण्यात,त्यांची सेवा करण्यात घालवतो.

प्रिया भावांना मिठी मारते.

हीच तिला खरी रक्षाबंधनाची भेट असते.

आश्रमात साने गुरुजींची प्रार्थना सुरु होते..

खरा तो एकची धर्म 

जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हिन अतिपतीत

जगी जे दिनपददलित

तया जाऊन उठवावे

जगाला प्रेम अर्पावे.।💐💐

----गीता गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट