सावध हरिणी सावध गं!
#सावध_हरिणी_सावध_गं!
फेसबुक,व्हॉट्सऍप चाळणं हा निलांबरीचा दुपारचा उद्योग. पहाटे उठणं,मुलांच्या डब्यासाठी पोळ्या करणं,भाजी करणं,मुलांना स्कुलबसपर्यंत नेऊन सोडणं..एक का दोन कामं! घरी आलं की नवऱ्याचा डबा..त्याचा नाश्ता,न्याहारी..मग त्याला बाय केलं की बाजारात जाऊन उद्यासाठी भाजी,फळं,खाऊ घेऊन येई. परत आल्यावर ती भाजी निवडून फ्रीजमध्ये ठेवे. मग कपडे धुवायला घेई. कपडे तरी किती..वेगवेगळ्या डेला वेगवेगळे युनिफॉर्म. त्यात व्हाइट युनिफॉर्मवर व्हाइट शूज. ते एक डबल काम. तेवढे ते कपडे वाळत घाले. सावकाश फरशी पुसून मुलांसाठी त्यांच्या आवडीचं काहीतरी..कधी वरणभात बटाट्याची भजी तर कधी वेज पुलाव तर कधी पुरणपोळी..बनवे.
दुपारी मुलांची स्कुलबस येईपर्यंत तिच्याकडे एकदिड तास मोकळा असे. हा वेळ निलांबरीचा स्वतःसाठीचा खास असे. या वेळात कधी मग मैत्रिणींशी गप्पा रंगत,कधी टिव्हीवरील आवडती सिरियल तर कधी फेसबुक चाळणं. आताशा फेसबुकवर तिचे फ्रेंड्सही वाढले होते. म्हणजे रिक्वेस्ट भरमसाठ यायच्या पण त्यातल्या त्यात अगदी जवळच्यांच्या रिक्वेस्ट ती एक्सेप्ट करत असे.
फेसबुकवर तीला छान छान कथा,कविता वाचायला मिळत. तिच्या आवडत्या कवींपैकी कवी गौरेश हा एक होता. गौरेश त्याच्या कवितेतून कधी निसर्गाची किमया रेखाटायचा तर कधी नात्यांचे बंध अलवारपणे उलगडायचा. त्याचं हळवं मन प्रत्येक कवितेत प्रतिबिंबित व्हायचं. विशेषतः त्याच्या मनातला व्रुध्द माणसांविषयीचा,स्त्रियांविषयीचा आदरही त्याच्या काही कवितांमधून प्रकट व्हायचा. बऱ्याचजणांना कवी गौरेश व त्याच्या कविता आवडू लागल्या होत्या. निलांबरीही त्यांतलीच एक होती.
फेसबुक चाळताना तिला एक छान आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या आवडत्या कवीची,कवी गौरेशची तिला फ्रेंडरिक्वेस्ट आली होती. एवढ्या मोठ्या,प्रसिद्ध कवीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीय म्हंटल्यावर निलांबरी फार खूष झाली. तिने त्याची मैत्रविनंती स्विकारली. लगेचच मेसेंजरवर तिला कवी गौरेशचा मेसेज आला.
"हाय"
"हेलो"
"तुमचा डिपी फार छान आहे."
"ओह! थँक्यू सो मच. कवीवर्य मला तुमच्या सगळ्या कविता आवडतात. इन फ्याक्ट आय एम ए बीग फ्यान ऑफ युवर्स."
"ओ थँक्स. मला अहोजाहो करु नका प्लीज. गौरेशच म्हणा."
"ओके गौरेश."
अशातर्हेने गौरेश व निलांबरीचा परिचय झाला. सुरुवातीला दर चारपाच दिवसांनी होणारे मेसेज हळूहळू दरदिवशी होऊ लागले. निलांबरीला कवी गौरेश हा मित्र वाटू लागला.
निलांबरीच्या नवऱ्याला त्याच्या व्यापातून निलांबरीकडे बघायला फारसा वेळ मिळत नसे. चारचारतास गर्दीतला प्रवास,चौथी सीट, नाहीतर वरच्या हँडलना लोंबकळणं,ऑफिसमध्ये बॉसचे वर्मी बसणारे घाव झेलणे,शिवाय वाढते हफ्ते..अनेक चिंता यात तो घरी आला,जेवला की पाठ टेकताच झोपून जायचा. अधिक काम असलं की रविवारीही ऑफीसला जायचा.
साहजिकच निलांबरीच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होत होती. त्याचाच फायदा गौरेशने घेतला. तिच्याकडून त्याने तिच्या घरी कोण असतं,तिचं रुटीन सारं विचारुन घेतलं. तिला न भेटत असलेला पतीचा सहवास,पतीचं कौतुक त्याने अचूक हेरलं. गौरेश तिला रात्रीअपरात्रीही मेसेज करुन तिची स्तुती करु लागला. तिच्या रुपगुणांची,कलागुणांची स्तुती करता करता हळूहळू तो तिच्या इतर अवयवांचीही स्तुती करु लागला तेंव्हा मात्र निलांबरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिला फारच अनसेफ वाटू लागलं.
निलांबरीने तिची मैत्रिण आसावरी हिला फोन करुन गौरेशबाबत सांगितलं तेंव्हा आसावरी म्हणाली,"अगं मीदेखील पाचेक महिन्यापुर्वी याच्या मधाळ बोलण्याला फसले होते. तो जेंव्हा खाजगी अवयवांबाबत चर्चा करु लागला तेंव्हाच ब्लॉक केला मी त्याला. छे पण माझं चुकलच मी तुला याची कल्पना आधी दिली असती तर बरं झालं असतं. निलू अगं आपण दोघीच नाही तर शरयू,आकांक्षा,दिप्ती अशा कित्येकजणींना हा इसम फोन करुन जाळ्यात ओढू पहात होता. कधीही मेला रात्रीअपरात्री मेसेज करुन काहीही टाईपतो."
"हो गं आसावरी,मला फार उशिरा लक्षात आलं याचं हे विक्रुत रुप. मीसुध्दा ब्लॉकते त्याला."
"निलू,मी माझ्या नवऱ्याला याच्याविषयी सांगितलं तर मलाच ओरडला की तुच आधी त्याला का रिस्पॉन्स दिलास म्हणून. आत्ता एवढा मोठा सह्रदय कवी आपल्याशी बोलतोय,आपल्या दिसण्याचं,फोटोंच कौतुक करतोय हे कोणाला आवडणार नाही!"
"अगं आसावरी,तिथेच आपण गंडलो नं. या कवी गौरेशला बायकांचीही नाजूक मेख बरोबर माहित आहे व त्याचाच त्याने गैरफायदा घेतला. त्याच्या काव्यरचनेवरून आपण त्याच्या स्वभावाबद्दल जे आराखडे बांधले ते तद्द्न खोटे ठरले. आत्ता तरी आपण सावध होऊया व आपल्या ओळखीच्या इतर मैत्रिणींनाही सावध करुया."
निलांबरीने पहिलं त्या कवी गौरेशला ब्लॉक केलं. घरी आल्यावर छान शॉवर घेतला व मग भरुन कॉफी घेऊन ग्यालरीत जाऊन उभी राहिली. सभोवतालचं आकाश तिला अगदी निरभ्र वाटलं,तिच्या मनासारखं.
अवचितपणे आलेलं एक काळसं मळभ आत्ता विरुन गेलं होतं. तिने मग स्वतःलाच बजावलं,'निलू,अशा अनेक टक्क्याटोणप्यातूनच शिकायचं आहे. असे अनुभव येतच रहाणार. यातून सजग व्हायचंय तुला व इतरांनाही सजग करायचंय.'
----सौ.गीता गजानन गरुड.

अगदी बरोबर
उत्तर द्याहटवा