जीव लावावा लागतो.


 #जीव_लावावा_लागतो!


विजय व मायाने फ्लेट घेतला व तिथे रहायला गेली. नवीनच लग्न झालेलं त्यांच. 


मायाला लालबागच्या गजबजाटात रहायची सवय होती. वन रुम किचनचं माहेर तीचं पण शेजाऱ्यांचा सदा राबता असायचा. चहाचं आदण तर दिवसभर गेसवर असायचं. जोडीला लाडू,गप्पा. विजयचे आईवडील गावी शेती करायचे. गावी छान माडीचं घर होतं त्यांच. विजयचं मायाशी लग्न झाल्यानंतर पहिले सहा महिने माया सासुसासऱ्यांसोबत गावी राहिली. मग विजयने नवी मुंबईत घर घेतलं व मायाला सोबत घेऊन आला.


त्यावेळी नवी मुंबई नव्याने निर्माण होत होती. मोठेच्या मोठे, लांबरुंद रस्ते. दुपारचं तर रस्त्यांवरती चिटपाखरु देखील नसायचं. आत्तासारखे मोबाईलही नव्हते तेंव्हा. मायाचा वेळच जात नसे. 


 विजय ऑफिसला गेल्यावर दुपार तिला अंगावर येत असे. माया मग दरवाज्याच्या लुप होलमधून बाहेर बघायची. समोरच्या फ्लेटमधून एक आजोबा बाहेर पडायचे,चार वाजता. बिल्डींगच्याखाली छोटसं पोळीभाजी केंद्र होतं. तिथून ते प्लेस्टीकच्या पिशवीतून चहा घेऊन यायचे. परत साडे सहाला जाऊन भाजीपोळी घेऊन यायचे.


मायाने पोळीभाजीवाल्या काकूंकडे त्यांच्याबद्ल चौकशी केली. त्या म्हणाल्या,"साठे आजीआजोबा रहातात तुमच्या मजल्यावर . बाकीचे दोन ब्लॉक बंद आहेत. त्या आजी जिन्यातून पडल्या. तेंव्हापासून आजोबा माझ्याकडून जेवण,चहा,नाश्ता घेऊन जातात. त्यांनाही चढउतार झेपत नाही.  दुकानात मिस्टर असले की मीच वरती नेऊन देते पण रोज नाही जमत मला."


दुसऱ्यादिवशी सकाळी आजोबांनीच मायाच्या घराची बेल दाबली. विजयही घरातच होता.


" अहो, आमची ही पडली हो बाथरूमात. जरा येता का प्लीज."


विजय व माया लगेच गेले. त्यांच्या हॉलमधून पेसेजमध्ये गेले. तिथे आजी पडलेली होती. विजय व माया दोघांनी मिळून तिला उचललं व बेडवर झोपवलं. 


आजोबा थँक्यू म्हणू लागले. 

 

विजय म्हणाला," अहो आजोबा थँक्यू कसलं. काही लागलं तर माझ्या बायकोला,मायाला हक्काने सांगा."


तितक्यात माया चहा करुन घेऊन आली.


छान वाफाळता,आलं ठेचून घातलेला,वेलचीयुक्त चहा.


चहाच्या सुवासानेच आजोबांची कळी खुलली.


आजीच्या डोळ्यांत समाधान तरळलं.


माया म्हणाली,"आजीआजोबा, आजपासून तुमचा स्वैंपाक मी आणून देत जाईन. चहा,नाश्ता,जेवण,सारं. तुम्ही उगा धावपळ करायची नाही. मला इथे माझ्या आजीआजोबांची, आईवडलांची आठवण येत असते. घर नुसतं खायला उठतं. तेवढाच माझा वेळही जाईल व आजींकडून नवीननवीन पदार्थ शिकून घेता येतील."


आजोबा आजीच्या तोंडाकडे बघू लागले.


मग आजीच म्हणाली,"पैशाचं काय. पैसे घेत असशील तरच दे गं. उभ्या जन्मात यांनी कधी कुणाकडून काही फुकट घेतलं नाही गं."


"अहो,आजी द्या हो तुम्हाला द्यायचे तेवढे पैसे द्या. मी कुठे नको म्हणतेय. पण आजोबांची तंगडतोड वाचेल जराशी."


तेंव्हापासून रोज माया आजीआजोबांना वेळेवर नाश्ता,जेवण नेऊन देऊ लागली. दुपारची आपलं ताटही त्यांच्याकडे घेऊन जाऊ लागली. मायाच्या प्रेमळ सोबतीमुळे साठे आजींच्या तब्येतीतही सुधारणा होऊ लागली.


साठे आजींची मुलगी व मुलगा दोघे साठे आजीआजोबांच्या वाढदिवसासाठी येणार होते. दोन दिवस आधी आले दोघंही. सोबत दोघांची कुटुंब. साठे आजीने मायाशी त्यांची ओळख करुन दिली व माया त्यांना रोज कसं गरमगरम खाऊ  घालते हेही सांगितलं. 


आजीआजोबांचा वाढदिवसाला बरीच नातेवाईक मंडळी जमली होती.  सारं जेवण बाहेरून मागवलेलं. विजय व मायानेही आजींना छानसा कपसेट गीफ्ट केला. आजोबांनी त्या दोघांना त्यांच्यासोबत जेवायला बसवलं. साठे आजीच्या सुनेला यात काही काळंबेरं दिसत होतं.


 मायाचं जेवण होताच तिने तिला आत बोलावलं व सरळ विचारलंच,"माया,आजकाल कोणी कोणासाठी एवढं करत नाही. खरं खरं सांग मला. आमच्या इस्टेटीवर तुझा डोळा आहे नं."


आजी कौतुकाने मायाची ओटी भरण्यासाठी साडीचोळी,श्रीफळ सुपात घेऊन येत होत्या. त्यांनी ते शब्द ऐकले. सुनेला म्हणाल्या,"सुनबाई,मान मागून मिळत नाही. तो मिळवावा लागतो. एखाद्यावर जीव लावावा लागतो. तुझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली. तू आम्हाला कधी आपलं मानलंच नाहीस. कधी तुमच्या घरी बोलवलं नाहीस. सहा महिन्यातून एकदा कर्तव्य म्हणून फोन करता आणि ही पोरगी, ही आमची ना नात्याची ना गोत्याची. प्रेमाची भुकेली बिचारी. तिने आम्हाला जरा प्रेम दिलं. आमच्या वाळवंटी आयुष्यात जरा प्रेमाची फुलं फुलवली तर तू तिच्याकडे संशयाने पहातेस. कावीळ झालेल्याला सगळं जगच पिवळं दिसत म्हणतात ते खरंच.  तुझी संपत्ती तुला लखलाभ.  तुझ्या संपत्तीतला मला एक छदामही नको पण माझं हे घर,दागिने,गुंतवणुकी साऱ्यावर माझा व ह्यांचा हक्क आहे. तेंव्हा याच्यापुढे बोलताना नीट विचार करुन बोल हो." सुनबाई तोंड फिरवून निघून गेली.


आजीने मात्र मायाला कुशीत घेतलं व तिची आसवं पुसली. आजी म्हणाली," माया,देवानेच पाठवलेय गं तुला आमच्यासाठी. बाकीच्यांची बोलणी नको मनाला लावून घेऊस. हस बघू आत्ता तुझ्या आजीसाठी."


-----------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट