गंध


 #गंध


त्याचं झालं असं,मी नारळवाल्या आजोबांजवळ उभी होते.म्हंटलं, आजोबा च्युईंगमचा गंध आला ओ.आजोबापण इकडेतिकडे पाहू लागले.तर आमच्या पाठमोरा जो माणूस उभा होता त्याने तो च्युईंगमरुपी सेंट कपड्यांवर फवारला होता.आजोबा खुदकन हसले.


मी घरी आले. मला माझे आवडते गंध आठवू लागले.मला तसे बरेच गंध आवडतात.क्रुत्रिम नव्हे हा.


आमच्या घरासमोर आईने बरीच फुलझाडं लावलेली.  सकाळी फुलं वेचतानाचा पारिजातकाचा येणारा मंद गंध हा पावित्र्याकडे घेऊन जातो. देवकेळीचा/कर्दळीचा गंधही तसाच.  ती कर्दळी माझ्या जवळपास नाही तरी तो गंध अजुनही  स्मरणात आहे.  गडद लाल रंगाची देवकेळीची फुलं,मोठ्या पिवळ्या पाकळ्यांची वरती लाल ठिपके असणारी देवकेळीची फुलं यांचा सुगंध मंद असायचा.


इतकंच काय. आमच्या समोर रानभेंडीचं झाड होतं. त्या रातभेंडीची फुलं पिवळीधम्मक व आतमध्ये मरून रंगाची  ..फारच मोहक दिसायची. आम्ही ती फुलं व त्याची पानं भातुकलीच्या खेळात वापरायचो. पिंपळपानासारखीच पानं असायची ती. थंड्याच्या बाटल्यांची पत्र्याची बुचं असतात नं ती बुचं मी त्या पानांवर दाबायचे व वडे तयार करायचे.सोबत फुलांची भाजी. पहिला घास बाबांना. त्यांच 'वा वा' असं प्रशस्तीपत्रक मिळालं की स्वैंपाक चांगला जमला असं समाधान मिळे.


साधारण संध्याकाळी सहा वाजता गुलबक्षीची फुलं फुलत. राणीकलरची,पिवळी गुलबक्षी छान पसरली होती. या फुलझाडाची काही निगा राखावी लागत नाही. आपणच पसरत जातं. पण काटछाक करावी लागते. नाहीतर इतर झाडं खराब होतात. पिवळे पुंकेसर व राणीकलरची फुलं फार मोहक दिसायची. मी शाळेतून आले की ती फुलं काढायचे. सोबत थोड्या काळ्या बियासुद्धा.मग असंच खेळणं सुरु व्हायचं.


शेगलाची/शेवग्याची फुलंही खाली पडायची. ती मातीत पडू नये म्हणून आम्ही खाली जुनी चटई अंथरायचो. ही फुलं सुकवून तिखट डाळीत घातली की तिखटडाळ भन्नाट लागायची. 


तिन्हीसांजेला  रातराणीचे गुच्छ बहरु लागत. नाजूक हिरव्या लांब देठाची ती इवलाली पांढरी फुलं. तिथला सारा परिसर त्या रातराणीच्या गंधाने भरुन ज


आईने लाल गावठी गुलाबही लावले होते. अगदी नाजूक पाकळ्या. पण सुगंध काय वर्णावा!


 गावी मागीलदारी गावठी गुलाबी गुलाब आहे. फार काटे असतात फांद्यांना पण मागीलदारचा सगळा परिसर पहाटे त्या गुलाबाच्या गंधाने मोहरतो.


आजोबा सकाळीच फुलं काढून आणायचे व आजीला माळायला द्यायचे. त्यांचं ते अव्यक्त प्रेम फार सुंदर होतं.


निशिगंधाच्या फुलांचा हार,मुकुट माझी सातव्या महिन्याची ओटी भरताना फुलवाल्याकडून बनवून घेतलेला. 

त्या फुलांचा सुगंध दोन तीन दिवस तरी घरभर पसरला होता. ही फुलं उमलू लागली की काय धुंद सुगंध येतो या फुलांचा.हिंदीत या फुलांना रजनीगंधा म्हणतात.ते गाणं आठवतंय नं..

रजनीगंधा फूल तुम्हारे

महेके यूँही जीवन में

यूँही महेके प्रीत पिया की

मेरे अनुरागी मन में


अनंताच्या झुपकेदार फुलांचा सुगंधही फार दूरवर पसरतो.  रुईच्या जांभळसर फुलांनाही एक वेगळा गंध असायचा. घाणेरीची इटुकली गुलाबी,पिवळी फुलं फार सुंदर दिसायची पण गंध नसतो त्यांना.


  जुईचा वेल लावलेला बाजुच्या मामींनी.त्यांच्या दारावर मांडवासारखा पसरलेला.काय सुवास यायचा ती फुलं उमलली की! तसंच चमेलीच्या लांब दांड्याच्या फुलानाही एक धुंद सुगंध असायचा.

शुभ्र फुले वेचीत रचिला चांद तू जुईचा

म्हणालीस चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा

फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे.. कवीवर्य मंगेश पाडगावकरांनाही मोह सुटला नाही या इवल्याशा जुईला त्यांच्या गाण्यात गुंफण्याचा.


सुरुंगीच्या फुलांचा सुगंध मोहक असतो. आदल्यादिवशी संध्याकाळी सुरुंगीच्या झाडावर चढून दुसऱ्या दिवशी उमलणारे कळे तोडून आणतात व त्याचे गजरे करुन ठेवतात.सकाळी ते गजरे माळतात. सुरुंगाचे गजरे वाळले तरी सुगंध टिकून रहातो.


 एखाददोन बकुळफुलं ओंजळीत घ्यावीत व त्यांचा मंद सुगंध घेत चालावं. 

बकुळीच्या झाडाखाली

निळ्या चांदण्यात

ह्रदयांची ओळख पटली 

सुगंधी क्षणात

त्या सगळ्या बकुळफुलांची 

शपथ तुला आहे..अरुण दातेंच्या आवाजातलं हे गाणं कितीही गुणगुणलं तरी हौस फिटत नाही.त्यांनी बकुळफुलांना एका वेगळ्याच उंचीवर न्हेऊन ठेवलं.


आजोळला घराच्या बाजूला,पांढरा देवचाफा व कण्हेरी होती.लालसर देठवाली देवचाफ्याची फुलं व पिवळसर उभट अशी कण्हेरीची फुलं आम्ही तुळशीला वहायचो. कोणाचा वाढदिवस असला की त्याच्या गळ्यात,हातात या फुलांच्या माळा घातल्या की ती मुलं फार छान दिसायची.


गोकर्णाची गडद जांभळी,पांढरी फुलं.. यांनाही एक हलकासा सुगंध असतो.


संक्रांतीला आई दादरवरुन लांब देठाच्या गुलाबी,सफेद,जांभळ्या अस्टरांच्या जुड्या आणायची.  त्या फुलांचा सुगंध आला की संक्रांतीच्या आगमनाची चाहूल लागायची.


  मोगऱ्याचे तर किती प्रकार!

वेलीवरचा सिंगल मोगरा, झुडपांतला डबल मोगरा,हजारी मोगरा.पानासकट मोगऱ्याचं एक फुल माळलं तरी कसं छान वाटतं. 

मोगरा फुलला मोगरा फुलला

मोगरा फुलला मोगरा फुलला

फुले वेचिता बहरू कळियासी आला 

मोगरा फुलला मोगरा फुलला

इवलेसे रोप लावियले द्वारी

तयाचा वेलू गेला गगनावरी

मोगरा फुलला मोगरा फुलला..लता मंगेशकरांच्या आवाजातल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील या ओव्या ह्रदयाच्या अगदी जवळच्या. ज्ञानोबा माऊलींनी त्यांच्या मनाच्या आनंदाला मोगऱ्याच्या वेलाची उपमा दिली आहे.


 नाजूक सोनटक्कयाची पहाटेचं दव पडलेली पांढरीशुभ्र फुलंही किती छान दिसतात नं!  आमच्या बागेत सोनटक्क्याचं बेटच तयार झालेलं. शाळेजवळच्या फुलवाल्या काकांच्या टोपलीतपण सोनटक्क्याच्या जुड्या असायच्या. मुली त्या विकत घेऊन रिबिनीच्या फुलांत गुंफत.


अबोलीला गंध नसतो म्हणतात पण असतो तिलाही एक हलकासा सुगंध. अबोलीची फुलं खुटून ताटात ठेवताना येतो तो.


सहाणेवर उगाळलेल्या वेखंडाचा सुवास,चंदनाचा सुवास किती मोहक असतो नं!आईच्या कुशीचाही एक वेगळाच सुवास असतो.


अगदी लहान बाळाला आपण जेंव्हा जवळ घेतो ना तेंव्हा त्याच्यातून येणारा धुरीचा,आईच्या दुधाचा सुवास..तो अनुभव..लहान बाळांच्या दुपट्यांतून येणारा सुवास..काय वर्णावा!


पिवळ्या व पांढऱ्या शेवंतीची तर आई व मामी परडीच घेऊन यायच्या. भरपूर गजरे,वेण्या बनवायच्या. दोघीही फुलवेड्या.  मालीचा सुवासही मादक असतो. सदाफुलीही स्वत:चा असा सुगंध मिरवते बरं का. माझ्या खेळात सदाफुलीची फुलंही असायची.


चाफ्याचं झाडंच आहे आमच्या समोरच्या बिल्डींगीत. घरातून सोनचाफ्याची फुललेली फुलं दिसतात.पण फार उंचावर असतात ती. ती लोकं टेरेसवर जाऊन काठीने काढतात. एक जरी चाफ्याचं फुल घरात ठेवलं तरी घरातील वातावरण चाफामय होतं.

चाफा बोलेना चाफा चालेना

चाफा खंत करी काही केल्या फुलेना..चेतनगुणोक्ती अलंकारातलं हे गाणं शाळेच्या पुस्तकात होतं.मजा यायची अशा कविता म्हणायला त्या अडनिड्या वयात.

हिरवे हिरवे गार गालिचे हरितत्रुणांच्या मखमालीचे ही कविताही म्हणायला फार आवडायचं.


फुलांचा गंधच नाही तर इतर सुगंधही मला तितकेच आकर्षित करतात.


पाऊसधारा पडून ग्रीष्माने तापलेली धरती ओलीचिंब झाली की तिच्यातून येणारा सुगंध न आवडणारा विरळच.


नवीन पुस्तक उघडलं की त्यातून येणारा एक विशिष्ट गंधही लहानपणी फार हवाहवासा वाटायचा.आत्ता नवीन पुस्तकातून तसा गंध येत नाही


केळफुलाचा एक वेगळा गंध असतो. केळफुल चिरताना तो गंध जाणवतो.


तसंच फणस, चिकू,पेरु पिकले की त्यातून येणारे वेगवेगळे सुवास,आडीत आंबे पिकायला ठेवले की त्यांचा सुटणारा घमघमाट काय वर्णावा!


चुलीवरच्या तापवलेल्या पाण्याचा सुवास..त्या पाण्याने केवळ अंघोळच होत नाही तर पोटही भरते. तसंच भाजलेल्या मडक्यातल्या पाण्याला येणारा सुवास शब्दात मांडता येत नाही.


हळदीच्या पानात उकडलेल्या मोदकांचा,पातोळ्यांचा सुवास घरभर पसरतो.


चुलीत भाजलेल्या सुकटाच्या सुवासाने अंमळ दोन घास जास्तच जेवले जातात.


असे हे गंध आपलं जगणंच गंधित करुन जातात नं.


वेड्या मना रे

तुज वेड सुगंधाचे

हिरेमाणकेही

फोल त्याच्या पुढे रे


------गीता गजानन गरुड,आंब्रड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट