नातवाची माया


 #नातवाची_माया


गावात थंडी वाढाक लागली. फाटेतर कवलातसून थंडी इली. तेना बाबूक जोराचा मुताक झाला.  बाबू भायर इलो. खळ्याच्या पेळेरसून वायच पुढे गेलो नी जासनीक पानी घाली हुतो तर तेका फटाके उडवल्याचो आवाज ऐकाक इलो. थय फडतरीर तेची आऊस तमाखूची काळी मशेरी दातांवयनी भोवंडीत बसलली.  चुळ भरुक तांबयात पानी घितलला. 


बाबू आयेजवळ गेलो.


"गे आये दिवाळी सोपली ना."


"होय तर देवदिवाळीव झाली."


" मग गे फटाके कसे वाजतहत?"


"अरे तो तुझो मित्र असा ना सचलो नह्यजवळचो..तेची आजी वारली."


"कशान गे आई?"


"म्हातारा मानूस. थंडी लागली आसतली.  हातपाय धरतत.  लाकडासारे हुतत मगे गचाकतत."


बाबू हात धुवून तेचे आजयेचे खोलीत गेलो. आजी 'आये गे' करीत हुती.


"आजी ए आजी"


"काय रे माज्या वासरा?"


"तुका बरा नाय वाटत हा काय?"


"अरे लेकरा, हे थंडीन आंगमास निसता फुटताहा. हातापायान वडी येतहत."


"आजी तुझा बुरनूस फाटलाहा.  तेतुरसून थंडी आत घुसत असतली."


"होय रे.  झाली मोप वरसा ते बुरनुसाक. तुझ्या बाबाचे जन्माअगुदरचाहा ता. तेचाव आयुक्स सरत इला आता."


" आजी तुझा सिवेटर खय हा?आयेक धुवून देऊक सांगतय."


"रे माजे सोन्या,तेतूर काय धुतहस!  हुंदरांनी चाळण केली हा तेची.मरांदे माझेव आता असे कितीसे दिस रवले हत."


बाबूक लय वाईट वाटला.  आजी म्हंजी बाबूचो जीव की परान होतो. आयेची साद इली तसो बाबू थयसून उठलो नी न्हाऊक गेलो.


बाबू कडकडीत पानयान न्हालो नी चुलीजवळ जाऊन धगाक बसलो. दोन माजरा थय धगाक बसलली. बाबून तेंका मांडयेर घेतल्यान.  आयेन चाय नी घावणे दिल्यान बाबूक. आये भिड्यार घावन्याच्या पीठाचा पाढराधोप पानी घाली तसो चुर चुर आवाज येय.  बाबू काय खानाहा नायसा दिसल्यार आये तेका करवादली. "बाबू बेगिन खा रे शाळत जाऊक व्हया मा." 


बाबून आयेक इचारल्यानच.


"आये त्या सचल्याच्या आजयेसारी माझी आजीव जातली?"


"नाय रे झीला नाय जावूची इतक्या बेगिन. पयली माका पोचवतेली मगे जातली.  कायच तिच्या मनाक येना नाय आजकल. चाय न्हेऊन दिलय ती लय गॉड झाली तिका. खाल्यान नाय. चटनी वाटूक सांगताहा आंब्याची."


बाबून दप्तार घितल्यान नी शाळेत गेलो.  शाळेत बाईंनी तेच्या चित्रकलेचा कौतुक केल्यानी. शाळेतसून येताना नह्यच्या कडेन बाबू नी बाबूचे मित्र चललले . बाबून दहावीतल्या अज्यादादाक इचारल्यान.


"अज्यादादा माका माझ्या आजयेसाठी येक बुरनूस नी येक गरम अंगातला घेवचा हा. किती पैसं लागतील रे?"


"अरे बुरनुसाक तीनशे नी गरम अंगातल्याक तीनशेतरी व्हये.  आयेक हाडूक सांग मरे तुझ्या."


"तसा नाय रे दादा.  माझी आजी म्हातारी होयत इली हा म्हनान माझ्या कष्टाच्या पैशान माका तिच्यासाठी हे दोन वस्तू तरी घेवचे आसत."


" मग तिया आसा कर बाबू.  तुका चित्रकला चांगली येता.  तुया हयसरले गुळगुळीत गुंडे दप्तरात भरुन घिऊन जा नी स्वच्छ धुवून सुकव.  मगे एक्रेलिक रंग हाड. ब्रशतर तुझ्याजवळ आसतच.   गुंड्यांवयनी पयलो पांढरो रंग दी. त्यो सुकलो काय पेन्सनने तेच्यार चित्र काढ नी रंगव.तसाच प्लायवुडाकव चाकलेटी रंग मार नी तेच्यार वारली चित्रा काढून सफेद रंगान रंगव."


अज्यादादान बाबूक तेच्या घराकडे न्हिल्यान नी स्टोन पेंटींगचो, वारली पेंटींगचो व्हिडीओ देखवल्यान तेची गणपतीची भित रंगवूक हाडलली एक्रेलिकची रंगपेटीव तेका दिली  पन बाबू नको म्हनलो. 


बाबून न्हयवयले गुंडे दप्तरात भरून घराकडे न्हिले. तेंका शाप धुवून खळ्याच्या पेळेर सुकवत ठेयले. आजीवांगडा मोरीचा मटान नी भात जेवलो. 


बाबूक मामान गणपतीचे टायमाक इललो तवा दोनशे रुपये दिलले. ते त्याना गल्ल्यातसून भायर काढले नी सायकल घिऊन बाजारात गेलो. रमेश स्टेशनरीवालो दुकान बंद करुचे तयारीत हुतो. बाबून तेका पैसे दिले नी नईकोरी एक्रेलिक रंगपेटी इकत घितली. पेटी पिशीत टाकल्यान. पिशी हँडलाक लावल्यान नी सायकल दामटीत घराकडे इलो. मगे आजयेचे कुशीतच रंगपेटी नी गुंडे घिऊन बसलो नी तीसेक गुंडे रंगवल्यान.

 फुला,कारटून,तेच्या मनात येईत त्या नक्षीन दगडांका नईन रुप दिल्यान.


दुसऱ्यादिशी बाबू जगल्या मेस्त्र्याथय गेलो. थय प्लायवूडचे नकु आसलले तुकडे पडलले हुते.बाबून जगल्याक इचारुन तेव घराकडे व्हरले.  प्लायवुडाक चाकलेटी रंग काढून तेच्यार पेन्सिलीन वारली चित्रा काढल्यान. गोल फेर धरून नाचनारी मानसा,माड,घर,बैल,बाव,श्यात,शेतकरी..अशी बरीच बारकी बारकी चितरा काढल्यान नी सफेद रंगान रंगवल्यान.


 अज्यादादा वांगडाक हा सांगल्यार बाबूची आऊस तेका डोळे ढापून खयव पाठवी. इतको तिचो अज्यादादार इस्वास हुतो.  


आयेकडसून जुनी चटय घिऊन अज्यादादा नी बाबून काजरोबाजवळ हाथरल्यानी नी तेच्यार हे रंगवलले नक्षीदार गुंडे नी वारली पेंटींग ठेऊन इकूक बसले.  काजरोबाक नमस्कार करुक येनाऱ्या लोकांनी बाबूच्या कलेचा कौतुक केल्यानी नी बाबूकडसून गुंडे नी पेंटींग इकतव घितल्यानी पैशाचो येवहार अज्यादादा करीत हुतो.  


दुसरे दिशी गुरवारी कसलीतरी सूटी हुती शाळेक. 

आयेची परमिशन घिऊन बाबू नी अज्यादादाची जोडगोळी कसालचे बाजारात बांदेकराच्या दुकानासमोर चटय हाथरून  आपले वस्तू इकूक बसले. 

 धैकाल्याक इलल्या चाकरमान्यांनी बाबूचे कलेचा कौतुक केल्यानी नी तेच्याकडसून नक्षीदार गुंडे नी 'वारली' पेंटींग इकत घेतल्यानी.


बाबू रोज दोपारी शाळतसून येताना गुंडे घिऊन येऊक लागलो नी तेंका रंगवूक लागलो.

शनिवारचे ते दोघे सुकळवाडच्या बाजारात बसले तर रविवारचे ओरोसीच्या बाजारात. रानबांबुळीच्या धैकाल्यात तर जास्तच इक्री झाली. 


 दोपारचे गुंडे,पलायवुड घिऊन येवचा, तेंका धुवून , वाळवून रंगवायचे..परत बाजारात जाऊन इकायचे..लय खटपट हुती.  पन बाबूची आवडती कला हुती तेकारनान तेका कटाळो कसलो तो नाय इलो. आठवड्याभरात बाबूकडे नवशेइस रुपये गोळा झाले.


 बुधवारी दोघावजना शाळा सुटल्याबरुबर कुडाळाक गेले. थय चांगलासा बुरनूस नी दोन गरम आंगातली घितल्यानी मगे बाळकृष्ण हाटलात कॉकटेल पिल्यानी नी घराकडची एसटी पकडल्यानी. बाबू अज्यादादाक थेंक्यू बोललो. अज्यादादा मगे तेचे घराकडे गेलो नी बाबू आपले घराकडे इलो.


बाबून आईक नी आजयेक गरम अंगातली दिली. आजयेक बुरनूस दिल्यान. आजयेचे डोळ्यातसून गरम टिपा पडली. आजी म्हनली,"माझो नातू  लय हुशार हा" नी बाबूचे मुके घेऊक लागली.


 बाबूच्या आजीक आत्ता थंडी वाजनार नव्हती. बाबूची आजी आत्ता जास्त दिस जगणार हुती म्हनान बाबू लय खूष झालो.


--------गीता गजानन गरुड,आंब्रड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट