गीता गजानन गरुड.
आंब्रड.
लाजो
अनय व आभाला एक मुलगी असते.इशा तिचं नाव.
अनय बिझनेसमन असतो.रोज सकाळी नऊ वाजता इशा तिच्या बाबांच्या गाडीतून शाळेत जायला निघायची.
हल्ली अनय बिजनेसमध्ये खूप व्यस्त असायचा.
स्पर्धा वाढली होती.
जीवघेणी स्पर्धा.. कुठे थांबायचं हे माहित नसलेली..
कोसनकोस पैशाच्या हव्यासापोटी पळणारी श्वापदं..
अनय त्यातलाचं एक झाला होता.
रात्री फार उशिरा घरी येई.
सकाळी काय तो इशाला तिचा बाबा पहायला मिळे.
सण्डेलाही ओफिसात जाऊन फायलीत डोकं घालून बसे.
अतिकामामुळे त्याचा स्वभावही तुसडा होत चाललेला.
पैशाची हवा डोक्यात गेल्याने मनातला हळवेपणा जाऊन मनही कोर्पोरेट कल्चरचं बनत चाललेलं.
कार्यालयात तर त्याला सगळे खडुसचंद म्हणायचे.
साहजिकच अनयचे शत्रू बरेच तयार झाले.
एके दिवशी सिग्नलला गाडी थांबली असताना लाजो(त्रुतीयपंथी) त्यांच्या गाडीच्या काचेसमोर वाकून टाळी वाजवते.
अनयने तिला दहा रुपये दिले.
इशाने तिला गुड माँर्निंग केलं.
लगेच अनय लाजोसमोर तिच्यावर उखडला.
वेडी आहेस का?ही माणसं नसतात.
दे आर ट्रान्सजेंडर.
अनयचे शब्द लाजोच्या मनाला घायाळ करतात.
ती दहा रुपयाची नोट त्याच्या गाडीत फेकते.
मोठ्याने त्याच्या तोंडासमोर टाळी वाजवते व तिथून निघून जाते.
तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात.
काय दोष असतो लाजोचा की समाजाने तिला अव्हेरावं?
ती जवळचं समुद्रकिनार्यावर जाऊन बसते.
समुद्राच्या लाटांबरोबर तिचा भुतकाळ तिला आठवतो.
ती जन्माला आली तेंव्हा मुलगा झाला या आनंदात आईवडलांनी गावभर पेढे वाटलेले.
ललित नाव ठेवलं होतं तिचं.
पण ललित मोठा होऊ लागला तसं त्याचं वेगळेपण आईवडलांच्या लक्षात येऊ लागलं.
त्यांनी परोपरीने ते झाकायचा प्रयत्न केला.
एकटा घरात असला की तो बहिणीचा ड्रेस घाली.लाली पावडर लावे.
कसाबसा तो बारावी पास झाला.
कोंबडं झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायच्या वेळेला उगवतोच.
तसं शेजार्यांना ही कुणकुण लागली.
त्रुतियपंथांच्या गुरुला या मुलाबद्दल कळले.
ते याला आपल्या मोहल्ल्यात घेऊन आले.
ललित आत्ता लाजो झाली..
तिच्या गुरुने तिला खूप सांभाळलं.
रात्रीच्या कोलेजात पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलं.
त्यानंतर रोज सिग्नलला इतर गाडीवाल्यांपूढे लाजो हात पसरी.
अनयची गाडी तिला माहित होती.
तिने त्याच्यापुढे कधीच हात पसरला नाही.
इशा मात्र आतून तिला गोड गोड स्माइल द्यायची.
तिचं ते गोजिरं रुप लाजोला फार आवडे.
दोन दिवसांसाठी अनय टुरवर गेला होता.
इशाला तिच्या आईने स्कुटीवरुन शाळेत सोडलं व ती तिच्या पार्लरमध्ये गेली.
पाऊस धो धो कोसळत होता.
थांबायचं नावच घेत नव्हता.
शाळा अर्ध्या दिवसाने सोडली.
स्कुलबस येऊन थांबल्या.
भराभरा मुलं कोंबली नी घेऊन गेल्या.
इशाच्या आईला टिचरने फोन करुन कळवलेलं.
तिला तिथे पोहोचायला दिड दोन तास तरी लागणार होते.
नेहमीचा वीस मिनटाचा रस्ता.
पण पाणी तुंबल्याने ट्रेफिक जाम झालं होतं.
टिचरने इशाला आईचा निरोप दिला व आई येईपर्यंत
बेसमेंटमध्ये बसायला सांगितलं.
शिपाईमामा थोडावेळ तिच्याबरोबर बसला.
पावसामुळे शिपाईमामाला जोराची लागली.
तो इशाला तिथून हलू नकोस असं बजावून शौचालयाच्या
दिशेने गेला.
आताशा पाऊसही थोडा ओसरला होता.
शाळेच्या कुंपणाच्या तारांवर मोत्यांसारखे थेंब लटकले होते.
इशा ते कुतुहलाने बघू लागली.
इतक्यात चंदर व पक्या तिथे आले.
त्यांनी इशाला सांगितलं की तिच्या आईचा स्कुटी चालवताना अपघात झाला आहे.
तेंव्हा त्यांना तिला आणण्यासाठी पाठवलयं.
इशाला याबद्दल पालकांनी कधी काही सांगितलं नसल्याने तिने चटकन त्या गुंडांवर विश्वास ठेवला.
चंदर व पक्या तिला गाडीने घेऊन जातात.
एका जुन्या पडक्या घरात इशाच्या तोंडात बोळा कोंबून
तिचे हातपाय बांधून तिला ठेवतात.
मग ते आगाऊ मिळालेल्या पैशातून दारु,तंदूरी,नान,बिरयानी आणून खातात.
इशाच्या तोंडातला बोळा व हाताची दोरी काढून तिला
डबा खायला लावतात.
इशा बिचारी भूक लागल्याने रडतरडत डब्यातली पोळीभाजी खाते.
आजुबाजुला बर्याच लांबवर चिटपाखरूही नसल्याने तिचे रडणे कोणालाही ऐकू जात नाही.
जेवण झाल्यावर ते बोसने सांगितल्याप्रमाणे अनयला फोन लावतात व इशाकडे देतात.
इशा 'बाबा बाबा' करताच ते इशाकडून फोन हिसकावून घेतात व अनयला इशा त्यांच्या ताब्यात आहे व ती सुखरुप हवी असेल तर एक कोटी रुपये घेऊन उद्या संध्याकाळी आठच्या सुमारास दादरच्या स्मशानभूमीत यायला सांगतात.
अनयची चांगलीच टरकते.
त्याचा कार्पोरेटनेस गळून पडतो,
नी उरतो तो एक हतबल,कासावीस बाप..
इकडे इशाची आई,आभा तिच्या शाळेजवळ पोहोचते.
पाणी तुडुंब भरल्याकारणाने तिला पोहोचायला उशीर झालेला असतो.
बेसमेंटमध्ये तिला इशा कुठेच दिसत नाही.
आभाला पहाताच शिपाईमामा तिच्याजवळ येतो.
आभा त्याच्याजवळ इशाची चौकशी करते.
तो म्हणतो,"मी जरा बाथरुमला गेलेलो तर मुख्याध्यापकांनी मला बोलवून घेतलं.त्यांची फाईल शोधायची होती.ती शोधून देईपर्यंत वेळ लागला.
मीही आत्ताच खाली आलो."
आत्ता मात्र आभाच्या पायातलं त्राण जातं.
ती तिथेच खाली बसते.
तिला ब्रम्हांड आठवतं.
शिपाईमामा आभाला पाणी देतात व धीर धरा सगळं ठीक होईल असं सांगतात.
आभा तिच्या भावाला फोन लावते.
शिपाईमामाने कळवल्याप्रमाणे पोलिस तिथे येतात.
पोलिस आभाला व शिपाईमामाला चौकीत घेऊन जातात.
इतक्यात तिला अनयचा फोन येतो की पोलिसांत तक्रार करु नकोस.मी काय ते बघतो.
पण आभाचा भाऊ तिला धीर देतो व तक्रार नोंदवायला लावतो.
संध्याकाळ होते.
आत्ता चंदर व पक्याला इशाला तिच्या बाबांच्या दुष्मनाकडे,लालवानीकडे सोडायचे असते.
ते तिला एका गाडीत घालतात व गाडी सुरु होते.
आज ते जाम खूश असतात.
बर्याच महिन्यांची कडकी लालवानी दूर करणार असतो.
पावसामुळे परत मदिरापान करायची त्यांना हुकी येते.
ते गाडी रस्त्याच्या कडेला उभी करतात.
व दारुच्या अड्ड्याकडे जातात.
एव्हाना इशा झोपेतून उठते.
तोंडात कोंबलेला बोळा लाळेने आकुंचन पावला असतो.
इशा तो बोळा फेकून देते व मुसमुसू रडू लागते.
मोठ्याने रडण्याचे त्राणही त्या नाजूक कळीत उरले नव्हते.
लाजो त्याच वाटेने जात असते.
तीला गाडीतून केविलवाणं रडण्याचा आवाज ऐकू येतो.
गाडीच्या काचा उघड्या असतात.
ती आत डोकावून पहाते.
लाजो इशाला लगेच ओळखते.
ती इशाला कारचा दरवाजा उघडायला सांगते.
इतक्यात तिथे चंदर व पक्या परत येतात.
लाजोच्या हातात इशाला पाहून घाबरतात.
लाजोने दोन तीन नको तिथे लगावल्यावर ते आधीच प्यायलेले काकुळतीला येतात.
तिची माफी मागतात.
लाजोचा,तिच्या गुरुचा त्या एरियात तेवढा दरारा असतो.
तिच्याशी पंगा घेण्याची ताकद या बेवड्यांत नसते.
लाजो इशाला घेऊन तिच्या घरी जाते.
गुरुला सगळी स्टोरी सांगते.
लाजो इशाला गरम पाण्याने आंघोळ घालते.
स्वच्छ पुसते.
कपडे घालते.मग ती इशाला वरणभात भरवते व तिला आपण उद्या तुझ्या आईकडे जाऊ म्हणून सांगते.
छान परीची गोष्ट सांगते.
गोष्ट ऐकता ऐकता इशा तिच्या कुशीत तिच्या पोटावर हात ठेवून झोपून जाते.
असा मायेचा हात लाजोला पहिल्यांदा मिळालेला असतो.
तिच्या मनात क्षणभर विचार येतो की ठेवून घ्यावं का इशाला आपल्याजवळ.आईची माया देता येईल पोटभरुन.
पण दुसर्याच क्षणी ती तो विचार झटकते.
तिची तिलाच घ्रुणा वाटते.
तिचं मन तिला सांगतं, दुसर्याचं सुख ओरबाडून घ्यायचा
आपल्याला काय अधिकार आहे.
ती पूर्ण रात्र लाजो निरागस इशाच्या चेहर्याला आपल्या ह्रदयात साठवून घेते.
सकाळी ती इशाला शिरा करुन खायला देते.
दूध प्यायला लावते.
मग गुरुच्या पाया पडून इशाला घेऊन पोलिसचौकीवर जाते.
तिथे सकाळीच अनय व आभा येऊन बसलेले असतात.
आभा अक्षरश: धावत जाऊन इशाला पोटूशी घेते.
तो क्षण पाहून चौकीतल्या सगळ्यांचेच डोळे पाणावतात.
मग इशाच सगळी घटना क्रमाने इन्स्पेक्टरकाकांना व आईबाबांना सांगते.
इन्स्पेक्टर उठून उभे रहातात व लाजोला सेल्यूट ठोकतात.
अनय लाजोला ओळखतो.
अनयला त्याने लाजोला ट्रान्सजेंडर म्हणून हिणवल्याचे आठवते.
तो लाजोच्या पाया पडतो व धाय मोकलून रडू लागतो.
लाजो त्याच्या खांद्याला धरुन त्याला उभं करते व त्याला शांत करते.
आभा तिला कोरा चेक देऊ करते.
लाजो त्यांना नमस्कार करते
व सांगते या दुनियेत सगळंच पैशाने खरेदी करता येत नाही.
शक्य असेल तर आम्हाला थोडा आदर,प्रेम,माया द्या.
आमच्याकडे तुच्छतेने पाहू नका.
तुमच्या मुलांमध्ये आमच्याबद्दल द्वेष पसरवू नका.
परिस्थितीमुळे आम्हाला भीक मागावी लागते.आम्हाला काम दिलात तर आम्ही कशाला टाळ्या वाजवत फिरु?
अनय लाजोला आपल्या कार्यालयात त्याच्या असिस्टंटच्या पदावर रुजू करतो..
अशा बर्याच लाजो या समाजात आहेत.
आपण त्यांना निदान आदराने तरी वागवूया.💐💐

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा