निरगाठ
निरगाठ
जयूची मैत्रीण नंदा तिच्याकडे नातीला घेऊन आली.
जयू: ये ये अगं बैस ना. किती दिवसांनी..नव्हे तब्बल दिड वर्षांनी आलीस आणि ही नात का तुझी. छोट्याची की मोठ्याची?
नंदा: ही मोठ्याची. छोट्याला कंपनीतर्फे घर मिळालय बँगलोरला. तिथे कुंटुबाला घेऊन गेला तो. एक मुलगा आहे छोट्याला.
जयूने आत जाऊन पाणी आणून दिलं. पंखा लावला नि नंदासोबत गप्पांना बसली.
जयू: तुझी धाकटी सून बँकेत मेनेजर आहे ना मग बाळाचं कसं काय करतात गं?
नंदा(नाक मुरडत): ठेवलाय पाळणाघरात.
(इतक्यात एक बाई तिच्या दोन मुलींना घेऊन आली.)
बाई: काकू, ही पाण्याची बाटली, डबे आणि या दोघींना घ्या. आज मला जरा उशीरच होईल हं काकू. ऑफिसमधून सुटल्यावर डॉक्टरकडं जायचय.
जया: का गं? बरं वाटत नाही का?
बाई: हो काकू. केस गळताहेत फार.
जया: बरं जा तू. यांची काळजी करु नकोस. यांना संध्याकाळी गोडाचा शिरा करुन देते आणि बागेत खेळायला घेऊन जाईन. तुला हवी असल्यास माझ्या कुंडीतली कोरफड घेऊन जा आणि केस धुवायच्या आधी केसांना लाव कोरफडीचा घर. गळती कमी होईल. छान लुकलुकीत होतील बघ केस.
बाई: बरं काकू. नक्की न्हेईन. अच्छा बच्चा त्रास नका हां देऊ आजीला. (ती मुलींना टाटा करुन निघाली. मुलींनी एवढुसं तोंड केलं पण जयाने मुलींचं लक्ष दुसरीकडे वळवलं. त्यांच्या पुढ्यात रंगीत ब्लॉक्स ठेवले. मुली ब्लॉक्स एकावर एक रचण्यात मग्न झाल्या. नंदाची नातही त्यांच्यासोबत खेळायला बसली.
नंदा: हे गं काय जयू? तू कशाला ठेवून घेतेस लोकांच्या मुली? नातेवाईक आहे का ती?
जया: अगं थांब. आधी चहा पिऊ मग बोलू सविस्तर.
(जया चहा घेऊन आली. तिन्ही मुलींना एका डीशमधे कुरमुरे,चणे दिले. मुली खेळतानि खेळता ते चणेकुरमुरे खाऊ लागल्या.)
जया: अगं नंदू, सहा महिने झाले. या दोघींना सांभाळायला घेतलय मी. पाळणाघराची सुरुवात समज.
नंदा: काय म्हणतेस काय जयू. पाळणाघर नि आता या वयात! झेपणार आहे का तुला? आजारी पडशील. विकतचं दुखणं.
जया: सौमित्र दिल्लीला रहायला गेल्यापासनं घरात एकटीच तर असते मी. वेळ जाता जात नव्हता. रिकाम्या मनात नाही नाही ते विचार यायचे. सौमित्रची मुलं वर्षातनं एकदा येतात. आली की चांगली महिनाभर मायेची पखरण करते नातवंडांवर. आजीपण पुरेपूर उपभोगते मी पण मग शाळा सुरु व्हायच्याआधी सौमित्र येऊन घेऊन जातो त्यांना.
ही प्रार्थना आता मुली ठेवून गेली ती. एक वर्षभरापूर्वी आई कोमात गेलीय तिची. सासू सासरे दोघे डॉक्टर आहेत. कोल्हापुरात नर्सिंग होम आहे त्यांचं. प्रार्थनाला सरकारी नोकरी लागली पण प्रश्न होता मुलींचा. सुरुवातीला तिने घरीच सांभाळण्यासाठी एक नात्यातली स्त्री बघितली पण तीही दोनेक महिन्यात आपल्या गावाला परतली. ही अगदी नोकरी सोडून द्यायच्या विचारात होती. हिची आई ग्रंथपाल होती तेंव्हाची ओळख आमची. मी मग ठरवलं, काय हरकत आहे आपला फावला वेळ या मुलींत घालवायला. तसा त्यांचा जास्त त्रासही नाही. शीशू झाली तर सांगतात आधी.
नंदा: हे बाकी बरं केलंस.तुझा विरंगुळाही होतो मुलींसोबत. चल जयू,बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही बघ. निघतो आत्ता.
नंदाने नातीला निघायचं म्हंटलं पण नात खेळात रंगून गेली होती.
नंदा: अगं चल गं गुड्डी. झालं ना खेळून तुझं.
गुड्डी: नाही मला अजून खेळायचय. मला या जाई जुई खूपच आवडल्यात.
नंदा: तुला भरवून झोपवायला हवं बाई नाहीतर संध्याकाळी चिडचिड करतेस.
गुड्डी: नाही चिडचिड करणार. अजून थोडा वेळ आजी..इल्लूशा.
जयू: मी कुकर लावते गं नंदे. इतके दिवसांनी आलैस ते जेवूनच जा. ताकाची कढी केलीय. वालाचं बिरडं आहे. भात लावला की झालंच बघ.
गुड्डी: हो आजी. तू लाव कुकर. मला मजा येईल जाईजुई़सोबत खेळायला.
कुकर थंड होताच जयाने सगळ्यांची पानं वाढली. जाईजुईचं पाहून गुड्डीही न किरकिर करता स्वतःच्या हाताने जेवली. त्यांच्यासोबत झोपलीही. जया व नंदा नंतर गप्पा मारत पसरल्या.
नंदा: जया तुझी नणंद, केतकी..कुठे असते गं हल्ली? लेकाकडे की एकटीच रहाते?
जया: सुनेचं नि तिचं पटत नाही फारसं. एकटीच रहाते.
नंदा: तशी कजागच होती ती. तुला का कमी छळलं तिने..पेरलं तसं उगवतं म्हणतात ना.
जया: असतो एकेकाचा स्वभाव गं पण यांच्या आजारपणात केतकीच होती माझ्या सोबतीला. हे गेल्यानंतर चार महिने तरी सोबत राहिली माझ्या. चांगल्या गोष्टी आठवाव्यात गं नंदे. वाईट गुण दुर्लक्षित करावेत.
जयाने चहा केला. दोघीही मग बालकनीत बसून चहा पियाल्या.
आजी मी तुझ्याकडे परत येणार जाईजुईसोबत खेळायला..असं सांगून गुड्डीने जयाआजीचा निरोप घेतला व नंदाआजीचं बोट धरलं.
दोघी रिक्षात बसल्या. वाटेत नंदा विचार करत होती..या जयासारखं वागता आलं तर..थोरल्या सुनेशी पटतं कारण ती भाची. कशीही वागली तरी रक्ताचं नातं म्हणून नेहमीच सांभाळून घेत आले थोरलीला. पण धाकटी..तिच्याशी मात्र नकळत का होईना, दुजाभाव झाला खरा.
किती तुटक वागते मी धाकट्या सुनेशी..का तर तिने मुलाला पाळणाघरात ठेवलं म्हणून पण तिला का आनंद होत असेल त्याच्यापासून दूर जाण्याचा..तडजोडच ती..करावीच लागते प्रत्येकाला. गेल्या दिवाळीत धाकटा दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या घरी बोलवत होता पण माझ्या मनातली अढी कुरवाळत बसले. तिचेही मम्मीपप्पा येणार तिथे म्हणून नाक मुरडलं..जमणार नाही म्हणून सांगितलं. एरवी परक्यांशी जुळवून घेणारी मी सुनेशीच असं का बरं वागले..चुकलंच माझं..नकळत पडलेली ही सुरगाठ अलगद सोडवायला हवी..निरगाठ होण्याआधी.
आंटी, यहाँपे ही उतरना है ना..रिक्षावाल्याच्या आवाजाने नंदा भानावर आली.
रिक्षावाल्याला भाडं देऊन तिने घराचं गेट उघडलं. गुड्डी आईकडे धावली. नंदाने फोन हाती घेतला..धाकट्या सुनेशी बोलायला..नकळत पडलेल्या गाठी पक्क्या व्हायच्या आधी सोडवायला..
--सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा