आज्जीसासू
या पावसात आजीसासू आठवते, पाठीमागच्या खोलीत निजणारी. ही आजीसासू म्हणजे माझ्या सासूची आई. एका छोट्याशा आयतासारखी खोली होती तिची त्यात भिंतीला लागून भाताच्या मुडी एकावर एक रचून ठेवलेल्या असायच्या. त्याबाजूला जरा अंतर ठेवून तिच्या बऱ्याच गोधड्या एकावर एक ठेवलेल्या असायच्या.
एका तरटावर तिची चादर, त्यावर कांबळं, गोधडी असं अंथरुन ती निजायची, पांघरायला गोधडी घ्यायची. बाजुला आयोडेक्स नि अम्रुतांजन बामाची डबी असायची.
ती डबी नातवांनी आणून दिली की ती नातवांच कौतुक करायची.माझो नातू माका बामाची डबी हाडून दिता असं येणाऱ्याजाणाऱ्यांना सांगायची.
भिंतीला खोरण होतं. त्यात तिची फणी, खोबरेल तेलाची बाटली असायची. आज्जी, चार केसांना तेल लावून मधोमध भांग पाडून ते दोन्ही बाजुंना पुढे घेऊन विंचरत बसे मग त्यांची इवलिशी अंबाडी बांधे, ती अगदी खेळातल्या गोटीसारखी दिसे. आजीचे हात सुरकुत्यांनी भरलेले असायचे, त्यांत रक्त असेल का अशी शंका यायची मला.
छोट्याशा पितळेच्या खलबत्त्यात आज्जी चंचीतलं पान, सुपारी एकत्र करून कुटे व ते हिरड्यांनी चघळत बसे. बाहेर रानहळदीला फुलं आलेली असत. हिरव्यागार रानहळदींवरील जांभुळकी फुलं आज्जी बघत बसायची, बरसणाऱ्या पाऊससरींसारखीच सतत बोलत बसायची. पाऊस जास्त पडू लागला नि कुणी बाहेर गेलेलं आलं नसलं तर तिचा जीव खालीवर होई. ती नुसती इलो काय गो, इलो काय गो? कोन बेटरी घिऊन गेलो हा काय हाडूक? असे सतरा प्रश्न विचारत बसे.
आज्जीचे यजमान फार लवकर गेले, तेंव्हा तिच्या पदरात एक मुलगी होती मग तिला घेऊन ती काही दिवस आपल्या भावाकडे मुंबईला राहिली परत गावी आली. गावी एका भल्या माणसाच्या पडवीला रहायची. तो आज्जीला मानायचा कारण आज्जी सुईण होती. पंचक्रोशीतल्या बायकांची कितीही अवघड बाळंतपणं ती सुरळीत पार पाडायची,शिवाय गोधड्या शिवायला जायची. मग मात्र आज्जी लेकीच्या शेतीला मदत म्हणून लेकीच्या घरी राहू लागली. आज्जीच्या हाताला अप्रतिम चव होती. नातवांना घावणे,आंबोळ्या करून खाऊ घालायची, मग तिच्या डोळ्यांत काचबिंदू झाला. तिला नीटसं दिसत नव्हतं त्यामुळे हालचालींवर मर्यादा आल्या पण बोलणं तसंच होतं पावसासारखं.
पुढे मात्र ती दोन वर्षतरी जाग्यावरच होती, बरीच वर्ष झाली जाऊन पण मनात बसतात अशी माणसं आणि निवांतवेळी बैलाने खाल्लेलं गवत रवंथ करत रहावं तसं मी तिची सोबत, तिचं बोळकं हसणं, तिची चंची, छोटी अंबाड्याची गोटी, तिचा दांडा आठवत रहाते. त्या दांड्यांने ती आतमधे येणाऱ्या कोंबड्याकुत्र्यांना बाहेर पिटकावून लावायची.
माझ्या दिराच्या लग्नात कुणी तिच्या हाती माईक दिला होता, काय सुरात गीतं गायली होती तिने आणि न अडखळता..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा