अजय यास..

 


अजय यास,
नमस्कार
आज बरोबर सात वर्ष होतील. याच तारखेला आपला घटस्फोट झाला होता. आपण दोघं वेगळे झालो होतो कायमचे.

खरंतर हा दिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस. किती स्वप्नं सजवलेली मी माझ्या भावी जोडीदाराबद्दल!  कॉलेजमध्ये असताना बरेचजण मागे होते माझ्या. माझा गोरा वर्ण,कुरळे केस,माझं तारुण्य बघताक्षणी नजरेत भरायचं.

कॉलेजकट्ट्यावर आपली ओळख झाली.  तू तर आमदाराचा मुलगा होतास. तुझा रुबाब मोठा होता. काळसावळा वर्ण,व्यायामाने कमावलेलं शरीर,तुझी मिशी..सारं मनात भरण्यासारखं.  कितीतरी मुली तुझ्या भोवताली घोटाळायच्या. पण..पण..तू मात्र त्यांची डाळ कधीच शिजू दिली नाहीस. त्यांना एका अंतरावरच ठेवलस.

माझ्याशी मात्र तुझे प्रेमसंबंध दिवसेंदिवस द्रुढ होऊ लागले. आठवतं तुला,आपण दोघं कॉलेज बुडवून बरेचदा समुद्रकिनारी जाऊन बसायचो. हातात हात गुंफून वाळूत तासनतास नि:शब्द चालायचो.  मावळतीचा सुर्य एकटक पहात बसायचो. त्याच्या साक्षीने प्रीतीच्या आणाभाका घ्यायचो.  भविष्याची स्वप्नं रंगवायचो.

तुझ्या घरातून तर आपल्या लग्नाला कडाडून विरोध होता.  माझे आईबाबाही मला परत नीट विचार कर म्हणून विनवत होते. साऱ्यांनी शेवटी आपल्या लग्नाला अनुमती दिली.  किती थाटमाट होता आपल्या लग्नात! पांढऱ्या घोड्यावरुन वरात काढलेली आपली. राजकारणातल्या कितीतरी बड्या आसामींनी हजेरी लावली होती लग्नाला. माझे तर डोळेच दिपले होते,ती श्रीमंती पाहून. मधुचंद्राचे ते दहाबारा दिवस तर अजुनही मनाच्या कुपीत बंदिस्त आहेत.

पुढे आपला संसार सुरु झाला. मला बाळ होणार,तू बाबा होणार हे ऐकताच किती खूष झाला होतास तू! अगदी फुलासारखं जपत होतास मला.  पहिली मुलगी झाली तेंव्हा आभाळ ठेंगण झालं तुला. तीचं सारं आवडीने करत होतास.  माझी,आपल्या आईवडिलांची नीट काळजी घेत होतास.

पण हळूहळू बदलत गेलास. माझं परपुरुषाशी बोलणं तुला आवडेनासं झालं. अगदी नातलगांशी बोलले तरी तुझ्या कपाळावर संशयाच जाळ उमटू लागलं.  मला घराबाहेर पडू देईनासा झालास. मी रियाला शाळेत सोडायला गेले की माझा पाठलाग करायचास. कुणाशी बोलत थांबले की घरी येऊन माझी हजेरी घ्यायचास. कॉलेजमध्ये असतानाही मी कुणाशी बोललेलं तुला विशेष आवडायचं नाही.  तू लगेच नाराज व्हायचास. खरंतर तेंव्हा मी या तुझ्या स्वभावाचा विचार करायला हवा होता पण तेंव्हा त्या तुझ्या पझेसिव्हनेसचं कौतुक वाटायचं मला. प्रेम आंधळ असतं म्हणतात ते पटलय मला.  तुझा पझेसिव्हनेस लग्नानंतर वाढतच गेला.

मला माहेरी पाठवायचा बंद झालास का तर मी तिथे जुन्या मित्रांशी बोलेन वगैरे.  घरात नी घरात बसून मीही कंटाळू लागले. अजय,तू मला नखशिखांत सोन्याने मढवलस. राणीहार,लक्ष्मीहार,पाटल्या,तोडे,गोफ,कमरपट्टा, बाजूबंद,पैंजण,..तशाच ढीगभर साड्या..हव्याहव्या त्या रंगाच्या,प्रकारच्या.  घरात स्वैंपाकाला बाई,कपड्याभांड्याला बाई,फरशी पुसायला बाई..मला कोणतच काम नव्हतं. कुठचा कोर्स करेन म्हंटल तर करू देत नव्हतास.

अजय, अरे माझी तर्हा अक्षरश: पिंजऱ्यातल्या पोपटासारखी झाली होती. दिवसरात्र तुला हवा तेंव्हा हवा तसा प्रणय करायचास. तो प्रणय होता?  मला तर तो शुद्ध बलात्कार वाटायचा. कणभरही सुख मिळत नव्हतं मला त्यातून.

तुझ्या संशयी स्वभावापायी तुझे आईवडीलही आपल्याकडे यायचे बंद झाले. त्यांनी खूप समज दिली तुला पण शेवटी त्यांनीही हात टेकले रे तुझ्यापुढे. माझ्यावर संशय घेऊन जेंव्हा तू मला मारायचास तेंव्हा रिया घाबरुन कोनाड्यात लपायची. तिचा तो भेदरलेला चेहरा पाहुनच मी निश्चय केला की माझ्यासाठी नाही तरी रियासाठी तरी मला तुझ्यापासून फारकत घ्यायला हवी.
मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. केसचा निकाल माझ्या बाजूने लागला.

लेकीला घेऊन मी त्या तुझ्या कैदखान्यातून निघाले. थोडे दिवस माहेरी राहिले. नोकरी शोधली. नोकरीत जम बसल्यावर भाड्याने का होईना माझं घर घेतलं. रिया इथे खूप खूष आहे.

तिच्यासाठी नवीन बाबा आणणार आहे मी. हो खरंच.. माझ्या ऑफिसमध्ये क्लार्क आहे,विशाल. तुझ्यासारखं कमवलेलं पीळदार शरीर नाही त्याचं पण मला समजून घेणारं मन आहे त्याच्याकडे.  तुझ्यासारख्या गाड्या,बंगला,धनदौलत नाही त्याच्याकडे पण दोन वेळचं पोटभर खाऊ शकू इतकं नक्कीच आहे. आठ दिवस रिया इस्पितळात होती तेंव्हाही अहोरात्र आमच्यासोबत होता तो. माझी कोणतीही अडचण मी विशालला सांगते व विशाल त्यातून मार्ग काढतो.

मंगळ दोषामुळे वयाची चाळीशी होऊनही विशालचं लग्न जुळत नव्हतं.  अजय,आपले तर चौतीस गुण जुळले होते तरी आपलं कुठे पटलं. मीच विशालला लग्नाबद्दल विचारलं.  तो म्हणाला,"मी गरीब आहे." मीच मग त्याला समजावलं,"प्रेम हे गरीबीश्रीमंतीच्या तराजूतून मोजायचं नसतं. तुझा स्वभाव,तुझ्या मनातला स्त्रियांविषयीचा आदर..या साऱ्या गुणांनी माझं प्रेम जडलय तुझ्यावर. रियाचही पान हलत नाही तुझ्याशिवाय. बघ,विचार कर. मी तुला बळजबरी करणार नाही." विशाललाही खरंतर मी आवडू लागले होते. त्याने माझ्याशी लग्न करायला होकार दिला.

या गुढीपाडव्याला आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केलं. तुला कळवावसं वाटलं. पाच वर्ष का होईना माझा पती होतास. सुरुवातीच्या काळात माझा मित्र होतास. अजय,त्या तुझ्यातल्या माझ्या मित्राशी मी हे शेअर करतेय.

अजय,तुला पुढील जीवनप्रवासासाठी आमच्या कुटुंबाकडून शुभेच्छा.

   कळावे,

                                         सौ.सारिका विशाल विचारे.
(काल्पनिक)

---सौ.गीता गजानन गरुड,डोंबिवली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट