जुनी झाडा
#जुनी_झाडा
©® गीता गरुड.
शेरलेकारीन,चव्हानीन नी हेळेकारीन दोपारी जेवुनखाऊन झाल्यार गजालीक बसतत.
शेरलेकारीन : आज बाय वायच दह्य हुता तेची ताकाची कढी केलय.नी कारलेचे भेसी करुन भाजलय.सदीची कसली भाजी करुची?
चव्हानीन: मिया आज पिठी केललय गे नी तोंडाक चुरनाची कापा.
हेळेकारीन: कायव करा तडे.वायच वाटीभर माका तिनसाना हाडून देवा.ते सुनेन कसलो पालक पनीर केलोहो.शेवळासारा दिसता नी भुतुर कसले नासक्या दुधाचे पांढरे फोडी.तेंनी ता आवडीन खाला.मिया याक ढोमा भाजलय नी चटणीवांगडा भात खालय.तेंचा ता पनील खाऊन पोटात ढवाळला बिवाळला तर आता सणव जवळ इलो हा.ओगीच सगळ्यांची धावपळ होईत.
शेरलेकारीन: गे आज आवारना.आताशी सगळ्यांची कोब्याची,लादीची घरा.पयले दिस आठवतत गे.आवारण्यादिशी मासे रांदायचाव.मगे जेवान झाल्यार भांडाकुंडा करुन, पुरा घर शेणान सारवायचाव..भायरली पडवी,वळय,होवर्या,माजघर,माजघरातला चुलीचा पाटान,पाटलाहार....नी मगे शँण वायच सुकत इला काय करटेत पांढरो चुनो कालवून ते ओले जमनीर बोटांनी काढलली ती चकरा..सगळा आठावता गे बाय..ह्या सिमेंटच्या घरानी ती मजा रवली नाय.
हेळेकारीन: होय तर,आता ता रंगीत मोठाचा मोठा छत हाडून लावतत.पन ते रंगीत पताके दोर्यांका डकवून वरती लावल्यार घर कसा दिसा ना ता आजून नजरेसमूर येता...रातीक कायतरी मासोकाटो करान ठेऊक व्हयो आवारन्याचो.माझो रवी नी तेचा बिर्हाड येवचा हा.माझ्या हातचे भाकरी नी माश्याची चटणीचा तेंका लय अपरुप.हातपाय धड असातागत मिया माझ्या पोरांका व्हया ता करुन घालतलय.
चव्हाणीन: माझो झिल जावचो हा सुकळवाडच्या बाजाराक.तेका सारासाठी करली नी भाजुचेसाठी सरंगो नायतर इसवण हाडूक सांगतलय.सुनबाईच्या सरावनाच्या फेडान तोंडाची सगळी चवच गेली हा बघ.कधी एकदा माश्याच्या साराचो थेंबो तोंडात पडतोहा असा झालाहा माका.
शेरलेकारीन: तुझी बाय सून सुगरण असा.माझी सून काय रानता तेका अजाबात चव,रव नसता.काटे येगळे नी मास येगळा असा काय ता खिमाट करुन ठेवता.सांगाक गेला तर नाक मुराडता.मुराडलला येक दिस तसाच रव्हात तर भिती.हेचा काय नाय,माझ्या झिलाक उद्या सकाळी भायरभुतूर ताँड देखवूक लाज.बरा माकाव काय करुक देना नाय.मिया कराक गेलय काय आये मिया करतय म्हनीत पुढे पुढे नाचता.मिया बाय तिका कायेक बोलत नाय.उगा आपला पादर्याक पावट्याचा निमित नुको.
चव्हाणीन: तळेकारनीची जागमाग नाय खय.कल तिचा नी तिच्या दोन नंबर सुनेचा, ह्या जुपलला.सासू म्हनी नेवरे पीठाचे करूया नी सून मुंबयची, तिका रव्याचे करुचे व्हते.शेवटाक भांडान भांडान दोघीव फुगान बसले.रव्याचेव नाय नी पीठाचेव नाय.
शेरलेकारीन: तेंचा काय सांगा नको बाय.खेकट्याक मेकटा आसत ती.जातायेता पायलीभर पीठाचे करंजे लाडू करुन ठेवतीत.आज घोड्यार तर उद्या पाड्यार तशातली गत.तेंचे भांडनात शान्या मानसान पडता कामा नये.
हेळेकारीन : माझा लता नी जावय येतले चवथ्या दिसी.तेंका शेतातल्या माशांची लयच आवड.खून लावूक सांगतलय बाबग्याक आदलेदिशी राती.मांगरात रानतलय.मगे सावशीत राती कंदिलाच्या परकाशात बसान जेवतीत. मांगरातले खोलये सारवूक व्हये.कोनाची किसपाटाच्या काडयेची मदत नाय.सगळी इली काय निसती मोबाईल ढवळीत बसतली हत.
चव्हाणीन : सगळा करुचा मनात हा गे बाय.पन भंगली ती कंबार पुवासारी दुखताहा.अंगाचो निसतो गोळो जसो झालो हा.बसाउठाक घोपान नाय रवलाहा.
शेरलेकारीन: माझाव तसाच हा बाय.कोनाक सांगायचा?ता म्हनतत ना सदी मरे तेका कोन रडे, तशातली गत.हातापायान निसते वाती येतहत.डोक्या धरलाहा,शेवूळ झालो हा.निसती रातभर खोकल्याची ढास येत रव्हता.डोळ्याक डोळो लागना नाय.नी आपल्याकारनान दुसर्याकव तरास.आज जाऊन याक वातावरचा इंजिक्शन नी सर्दीखोकल्याचा लाल ओषध मोहित्याकडना घेऊन येतलय.
चव्हाणीन : माझी सून कल फोनवर सांगा हुती,आई पाळी जवळ इलीहा काय करु.मिया सांगलय तिका काययेक पाळी पुढे करुचे गुळये घेवचे नाय.मिया खमकी आसय कामा करुक.माझ्या नातीक वडे,खापरोळे,घावणे लय आवाडतत.सगळा काय ता करुन घालतलय.तो पकलो मेलो सगळ्यांच्या आड्यांवयल्या जासनेची फुला फाटफटी चाराक उठान काढून नेता.अरे तुया काढ पन चार काढ.आमकाव घरात पुजेसाठी फुला लागतत ना.पयला महत्तव हा जासनीच्या फुलांका.गणपतीच्या आवडीची असतत ती.
हेवर्षी येऊदेच तो फुलाचोर.खाजकुयलीच घालतलय तेका.
चव्हाणीन: माझी नात मेंदीचो कोन हाडता नी माझे हातार मेंदी काढता.माझ्या नखांका नखपालिश लावता.येक न्हानसो पोळपाट घितलय तेचेसाठी.बघल्यार लय खूश होईत नी चपाते लाटूक बसीत.आळू काढून सुकत घालूक व्हया गाठयेसिठी..लाल भाजीची मुळा बघूक व्हयी.चतुर्थीक गाठयेंचे भाजीक लय चव येता.
शेरलेकारीन: गे बाय ह्यो पाऊस निसतो वतताहा.ही मुंबयकारा इली काय तेंचे कपडे सुकतले कसे?गेल्यावरसाक येकीन उतवार सगळ्यांचे चड्डे ठेवलले सुकाक.तेतुरली बाळूची अंडरवेर पडली चुलीत.तिना ती तशीच उचलल्यान नी परत उतवार ठेवल्यान. बाळून सामान भरताना आपली अंडवेर भरल्यान.मुंबयीक परत गेल्यार बायकोन कपडे धुवूचेसाठी बेग उघाडली.अंडरवेर बघितल्यान तर पाठलेकडसून यदो मोठो भोगदो🤦😂

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा