माळ्यावरचं भूत
माळ्यावरचं भूत
©® गीता गरुड.
थोडसं नाकात बोलायचा म्हणून त्याचं नाव गेंगाण्या पडलं. गेंगाण्याला बायकोही अगदी चारचौघात उठून दिसणारी मिळाली होती. आजुबाजूच्या शेजारी मित्रांना, गेंगाण्याला लाभलेलं हे दुर्मिळ स्त्रीरत्न पाहून गेंगाण्याची ईर्षा वाटे. इतक्या साध्याभोळ्या माणसाला कशी काय अशी रुपवती लाभली असे विचार शेजाऱ्यांच्या मनात येत . या विषयावर रात्रभर मित्रांच्या ओल्या पार्टीसोबत चर्चा रंगत.
गेंगाण्याचं मात्र दुरून डोंगर साजरे असं झालंं होतं. बायको दिसायला रुपवान होतीच पण तितकीच खाष्ट होती. पहिली दोनेक वर्ष मवाळ वागली पण दोन मुलं होताच तिचा प्रेमळपणा लोप पावू लागला. दिवसेंदिवस ती अधिकाधिक हिंसक बनत होती.
आधीचाच श्यामळू गेंगाण्या बायकोच्या तापट स्वभावाने अगदीच मलूल झाला. बायको सांगेल ती कामे तो करत होता, अगदी मुकाट करायचा.
रेशनच्या लायनीत उभं रहाणे, बाजारहाट करणे इतकंच काय घरातली लादी पुसणे, बायकोची कंबर धरली असताना कपडे धुणे, भांडी घासणे, तिच्या कंबरेला रगडून देणे किती नि काय काय करायचा तरी बायको त्याला या ना त्या कारणाने फुलं वहायचीच.
गेंगाण्याची बायको दरवर्षी श्रावण पाळायची पण गेंगाण्या व त्याचा मुलगा मात्र घरीच अंड, सुकी मासळी करून खायचे. त्यासाठी गेंगाण्याच्या बायकोने त्यांना वेगळी भांडी व वेगळा स्टोव्ह देखील दिला होता. मासे,मटण आणून रांधून खाऊन झालं की ती दोघं आपली भांडी घासूनपुसून ठेवत असत .
अगदी मच्छीचे काटे, चिकनची हाडंही स्वतः कचऱ्यात न्हेऊन टाकत. शाकाहारी ओल्या कचऱ्यात ते काटे,हाडं टाकण्यास मनाई होती कारण डस्टबीन धुताना त्यांचा संपर्क गेंगाण्याच्या बायकोच्या हातांना होऊन तिचा श्रावण बाद झाला असता. पाळलेला श्रावण सुटू नये म्हणून ती फारच दक्ष असायची.
यावर्षी तिला कुणी सांगितलं की श्रावण पाळायचा तर घरातल्या सर्व सदस्यांनी तरच इच्छित फलप्राप्ती होते. झालं, गेंगाण्याच्या बायकोने वटहुकूम काढला की घरात अंडी, सुकी मासळी काहीच बनवता येणार नाही अगदी गणपतीला फुल वाहेस्तोवर श्रावण पाळायचा आहे.
गेंगाण्या रोज पालेभाज्या, कडधान्याची आमटी, सपक वरण खाऊन खाऊन कंटाळला. त्याला खुणावू लागले तव्यातले तळलेले भोंबील, सुरमई,हलव्याच्या तुकड्या, मांदेली नि कोलंबीची चक्र. गेंगाण्या दिवसेंदिवस खंगत चालला तशी बायको त्याला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेली. हे दोनतीन सुया टोचून रक्त काढलं, टेस्ट झाल्या.
सगळे रिपोर्ट नॉर्मल आले तरी पेशंटच्या बायकोच्या समाधानासाठी डॉक्टरांनी दुधात घालून प्यायची पावडर लिहून दिली. तसलं ते पावडर मिश्रित दूध पिऊन गेंगाण्याचं पोट भोपळ्यासारखं फुगू लागलं. चारचार दिवस परसाकडला होईना झालं.
कुणीतरी सुचवल्यानुसार गेंगाण्याची बायको त्याला एरंडेल ढोसू लागली. गेंगाण्या ते बायकोच्या भितीने कसंबसं गिळू लागला. एरंडेल पिल्याच्या दुसऱ्या दिवशी गेंगाण्या शौचालयात गेला की बाहेर रांगेत उभी असणारी आपापली टमरेलं टाकून दूर पळायची. चाळीतली लोकं त्याला हसू लागली, नावं ठेवू लागली
गेंगाण्याचा बालमित्र बबन याला त्याची दया आली. त्याने गेंगाण्यास माळ्यावर पत्ते खेळायला बोलावले. गेंगाण्याच्या हाती दोर दिला. त्या दोराला स्टीलचा काटाचमचा बांधलेला होता. माळ्याच्या फळीतनं तो दोर बरोबर तव्यात जायचा.
बबन्याची बायको मच्छी भाजून बाहेर गेली की तिथल्या एकदोन तुकड्या परागंदा होऊ लागल्या आणि हळूहळू गेंगाण्याची तब्येतही सुधरू लागली . त्याचं पावडरचं दूध बंद झालं, पोटाची तक्रार दूर झाली. गेंगाण्याला शाकाहार मानवला म्हणून त्याची बायको खूष. सगळं कसं आलबेल चाललं होतं.
इकडे सतत मासे गायब व्हायला लागताच बबन्याच्या बायकोनं लेकीच्या पाठीत धपाटा घातला. लेक म्हणाली,"आई तुझी शपथ घेते. मी नाय खाल्ले मासे." नवऱ्यावर तर तिचा विश्वास होता मग तळलेले गरमागरम,हुनहुनीत मासे जातात तरी कुठे? भूतचेष्टा तर नव्हे!
बबन्याजवळ तिने विषय काढला. बायकोची उडालेली भंबेरी पाहून बबन्याला लय हसू येत होतं. बबन्याची बायको सारखी त्याच्या पँटीतले पैसे काढायची.
वाहत्या गंगेत हात धुवून घेतात तसं बबन्याने या भूतचेष्टेचा फायदा घ्यायचं ठरवलं. रात्री कामावरनं येताना त्याने खाडीजवळची एक कुर्ली पकडली. तिच्या पोटात ही बारकीबारकी पिल्लं होती. बबन्याने तिचे डेंगे बांधले नि ती खिशात ठेवली. वरती रुमालाच्या घडीने झाकलं.
सकाळच्याला बबन्या उठून कामावर गेला. बबन्याच्या बायकोने कपडे धुवायसाठी खुंटीला लावलेली पँट काढली. नेहमीप्रमाणे दहावीस रुपये मिळतील म्हणून पँटीत हात घातला.
रुमालाच्या घडीसोबत कुर्ली बाहेर आली. तिचे बटबटीत डोळे बघून बबन्याच्या बायकोला फेफरं सुटलं. तिने मोठ्यानं कालवा करत कुर्ली (खेकडा) खाली फेकली. कुर्लीला बांधलेल्या दोरीची गाठ सैल होऊन कुर्ली फिरू लागली तशी घरभर तिची बारकी बारकी पिलावळ पसरली.
"काय बाय हे आक्रित घडलं! आता काय करू गं बया! कुनी करनी केली गं ही!" बबन्याची बायको गळा काढून रडू लागली. बाजूच्या दोघातीघांनी ती पिलावळ नि कुर्ली सुपलीत भरून गटारात न्हेऊन टाकली.
बबन्याच्या बायकोचं काळीज चरकलं ते चरकलंच. शेजारणींनीबी अग बया बया म्हणत तोंडावर हात घेतले.
दोन शाण्यासुरत्या गड्यांनी परश्या भगताला बोलवून आणलं. त्याने खोलीत धूप केला. 'कोण आहेस ते कळलय मला..चल भायर निंघ नैतर मिरचीची धुनी घालीन बघ,' असं मोठमोठ्याने हातवारे करत भगत ओरडू लागला.
शेवटी बबन्याच्या बायकोला म्हणाला," गेल्यावर्षी वरच्या आळीतला तो जाड्या गचाकला त्याचं भूत हाये हे."
जाड्याला मासळी जाम आवडायची. वर्षाचे बारा महिने म्हणजे तीनशेपासष्ट दिवस तो मच्छी मटण हाणायचा. त्यामुळे राहिली आसलं त्याची एकांदी इच्छा अधुरी असा सगळ्यांचा समज झाला. बुधवारला बाजारात जाऊन भगताच्या सांगण्याप्रमाणे एक लांबडी सुरमय नि एक आरवता कोंबडा,दोन नारळ,बारा लिंब बबन्याची बायको घेऊन आली.
बबन्याने ती तिच्या आदेशानुसार गावच्या सीमेला लागून असलेल्या मोठ्या झाडापाठी न्हेली नि बबन्या नि गेंगाण्या दबा धरून झाडकीत बसले.
परश्या भगत ताजी मासळी नि कोंबड्याचा रस्सा खायला मिळणार म्हणून सुरीला धार काढतात तसे दात पाजळीत आला. तो अगदी बेसावध असताना बबन्या नि गेंगाण्याने त्याचे हात पाठीमागनं धरले. अगं आये गं, मेलो गं मेलो..भूतान धरलं..लागला परश्या आरडायला. डोळेपण उघडीना एवढा भित्रट.
बबन्यामोठा विचित्र आवाज काढत त्याला म्हणाला," तुला सोडीन पण एका अटीवर. तुझा लेंगा इथे सोडून डोळे बंद करून पाठल्यापाठी पळायचं."
परश्याची तर बोबडी वळलेली. त्यात लेंग्याच्या नाडीची गाठ सुटता सुटेना. त्या भितीत त्याने लेंगा ओला केला. कशीबशी गाठ सुठली. लेंगा पायातसून काढून टाकून परश्या भगत भेलकांडत, झाडांना आपटतधोपटत पळाला. इकडे बबन्या नि गेंगाण्या ती सुरमय नि कोंबडा ओळखीच्या खानावळीत घेऊन गेले. तिथे ओलंसुकं बनवून घेऊन त्यांनी सुरमयचा, सागोतीचा चट्टामट्टा केला. या कानाची त्या कानाला खबर झाली नाही.
परश्याचा लेंगा जाड्याच्या भूतान फेडला ही आवय मात्र गावभर पसरली. लहानगी लेकरं काय दांडगीबी रात्रीची हगायमुतायला जायला घाबरायला लागली. चुकून जाड्याने गाठलं नं लेंगा, साडी फेडून घेतली तर ..सगळीकडे भीतीची छाया पसरली.
रामा न्हावी रात्रीचा सिनेमा बघून येत होता. त्याचा लेंगा झाडकीत अडकला. झालं, जाड्याचं भूत ..त्यानेच पकडलय पाठनं रामा न्हाव्याला वाटलं. तो 'ए सोड जाड्या सोड बाबा' म्हणत पळू लागला तर लेंगा पाठलेकडनं टर्रकन फाटला. रामा गावात आला तर पाठलेकडून फाटलेला लेंगा नि त्याची चटेरीपटेरी चड्डी बघून पोरं जाम हसू लागली. राम्यानं मात्र तेंव्हापासनं अंथरूण धरलं.
माहेरवाशणीबी माहेराला यायच्या बंद झाल्या नि सासरवासणींना घेऊन जायला त्यांचे भाऊ येईना झाले. त्यांच्या वांगडाला जाड्याचं भूत येईलबिईल ही भीती. प्रकरण महिनाभर चांगलच तापलं.
एके दिवशी बबन्याची धाकटी मुलगी क्लास लवकर सुटल्याने लवकर घरी आली. ती माठातलं पाणी प्यायला घेत होती तोच तिला माळ्याच्या फटीतनं खाली येत असलेला दोर दिसला. बबन्याच्या मुलीने दोराला लावलेला काटाचमचा हाताने पकडला आणि आईस साद घातली,"आई गं, मासे तळलेले आपसूक कमी होतात. भूतचेष्टा झाली म्हणतेस नि माळ्यावरचं भूत खातय हो मासळी."
बबन्याच्या बायकोने वर जाऊन बघितलं तर गेंगाण्याच्या तोंडात म्हावरं.
झालं बबन्याची बायको रागाने लालेलाल झाली. आधीच ती भांडकुदळ. त्यात तिचा नि गेंगाण्याच्या बायकोचा छत्तीसचा आकडा होता. तिने बाहेर येऊन गेंगाण्याच्या बायकोला शिव्या द्यायला सुरुवात केली. म्हणे धरलाय श्रावण, झालीय भक्तीण नि नवरा चोरून खातोय लोकांच्या तव्यातील मासळी..सगळी डोकी बाहेर येऊन पाहू लागली. गेंगाण्याची बायकोही भांडायला आली. माझा नवरा कधीच असं करणार नाही छाती ठोकून सांगू लागली.
"बये, आमच्या माळ्यावर बघ कोणय ते." असं म्हणताच गेंगाण्याची बायको भांडतच माळ्यावर चढली. माळ्याच्या एका कोपऱ्यात भेदरलेल्या वासरासारखा गेंगाण्या पोटाकडे पाय दुमडून बसला होता.
गेंगाण्याच्या बायकोला गेंगाण्याचा भयंकर राग आला. त्याच्यामुळे आज तिची नाचक्की झाली होती. तिने खेचून गेंगाण्याला खाली आणलं. त्याच्या डोईवरले असलेनसलेले चार केस खेचत, ढुंगणावर काठीने मारत ती त्याला घराकडे न्हेऊ लागली. बबन्याची बायको विजयी मुद्रेने तिच्याकडे बघत होती तर गेंगाण्याची बायको गेंगाण्याला खाऊ की गिळू हा विचार करत त्याला जोरजोरात ओढत होती.
गेंगाण्याचा चेहरा कुर्बानीसाठी ओढत न्हेणाऱ्या बकऱ्यागत दिसत होता.
समाप्त. <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"
crossorigin="anonymous"></script>

मस्त खुसखुशीत लिखाण गीता, हसुन हसुन मी पण टिंब टिंब! 🤣🤣
उत्तर द्याहटवा