मैत्रिणी मैत्रिणी जावा जावा झाल्या.
मैत्रिणी मैत्रिणी जावा जावा झाल्या
©®गीता गरुड.
सायली भाजी आणायला बाजाराच्या दिशेने वळली. भरतासाठी वांगी, नवऱ्याला आवडतात म्हणून त्याच्यासाठी भेंडी, सफरचंद, केळी हे सारं घेताघेता हातातली पिशवी भरून गेली. बँकेत एकदोन कामं होती, तीही तिने हातावेगळी केली.
एव्हाना उन्हाने आपले हातपाय चांगलेच पसरले होते. सायलीच्या घशाला कोरड पडली. तहान लागली म्हणून विकतचं पाणी घेऊन पिणं तिला आवडत नसे. वळणावरच्या कानिफनाथ रसवंतीग्रुहाकडे तिची पावलं वळली.
"काका, एक फुल ऊसाचा रस द्या. बर्फ नका घालू." अशी ऑर्डर देत ती बाकावर बसली.
'माकाव एक फुल रस दी बाबा. भुतूर बरफ नको टाकूस,' कोणाचा बरं आवाज. ओळखीचा वाटतो खरा.. असा मनाशी विचार करत तिने बाजूला पाहिलं. एक वयस्कर व्यक्ती आपला घामेजलेला चेहरा पुसत होती.
"जीजींनू तुमी हय! माका वळाखलास .."
सायली जवळजवळ चित्कारलीच. तसं जीजींनी सायलीला निरखून पाहिलं.
"नाय गे बाय वळखाक."
"ओ जीजींनू, मिया सायली. तुमच्या बायग्याची मैत्रन. मिया यैय बायग्यावांगडा तुमच्या घराकडे. बायग्यान जिद केल्यान काय तुमी आमका पेरनीवयले गोल गोल पेरू काढून दिय व्हतास."
जीजींनी भूतकाळाची पानं पलटली. 'सायग्या..व्हय सायग्याच ह्या. पाचवीपातूर येय होता खरा घराहारी..मग काय तेच्या वडलांची बदली झाली नि ता म्हमयक गेला ता म्हमयचा झाला.' काका सायग्याकडे बघून हसले.
"सायग्या..गो पोरा मोठा झालंस आता तुया. आता तुका सायग्या कसा म्हनुचा."
"नाय जीजींनू सायग्याच म्हना.माका बरा वाटता. बायग्याचा नाव प्रितीलता ठेवलास ता तरी कवा घेतलास. आठावता तरी तुमका ता नाव. जीजींनू ओ ही बायग्या, सायग्या नावा म्हंजे दुधावयली साय. वडिलधाऱ्यांच्या तोंडान अशी साद आयकली काय मन अगदी भरून पावता. न्हानपन सरला नाय आजून ह्या भावनेन लय भारी वाटता."
"ह्या मातर खरा बोललस. आनि म्हमयक इलस तरी आपली गावची भाषा बोलतस ह्या आयकान काळीज सुपाएदा झाला म्हायती हा." सायग्याच्या गळ्यातल्या मंगळसुत्राकडे बघत जीजींनी विचारलं,"सायग्या, गो पोरा लगीन कधी झाला तुजा?"
"गेल्या गीमान स म्हयने होयत इले लग्नाक." सायग्या लाजत लाजत बोलला.
"असा काय. बेस झाला. सुखान र्हावा. काय करतत काय जावयबापू?"
"मुन्सिपालटीत क्लार्क आसत. कधी येवा आमच्याकडे. हयसून जवळच असा आमची बिल्डींग. जीजींनू बायग्याचा कसा चललाहा ओ."
"काय सांगू पोरा. तेच्या लग्नाचोच घोर लागलोहा माका. "
"कित्याक ओ. दिसाक तर गोरागोमटा आसा बायग्या. तेच्या लग्नाचा टेंशन कित्या?"
"तुका ठाव्क नाय. नववीत हुता बायग्या. कलासावरसूनयेय होता. माझी सायकल घेऊन जाय कलासाक ता. थोरल्या आंब्याहारी येका म्हसीन पाठसून तिका ठोकल्यान. बायग्या पडला नि घळणीरसून घसरीत गेला. तवा उजवो पाय चरेत आडाकलो. जखमा बरे झाले पन बायेक सडसडावून चलाक येयनासा झाला. बरेच डाग्दर, वैद झाले पन पाय रेटीतच चलता. कोन करतला माज्या लुळ्या पोरीवांगडा लगीन!" असं म्हणत चष्मा काढून जीजींनी आपले डोळे पुसले."
बायग्याबद्दल ऐकून सायलीला फार वाईट वाटलं. ती दुसऱ्या दिवशी जीजींनी सांगितलेल्या पत्त्यावर गेली. ते घर जीजींच्या बहिणीचं होतं. बायग्याच्या पायावर इलाज करायला व तिच्यासाठी स्थळं बघायला, जीजी बायग्याला मुंबईला घेऊन आले होते.
बायग्याला तिच्या बालमैत्रिणीला पाहून खूप आनंंद झाला. तिने पाय रेटत येत सायलीला मिठीत घेतलंं. बायग्याशी सायलीने खूप गप्पा मारल्या. बायग्याची आई मधल्या काळात देवाघरी गेली होती. बायग्याच्या पायावर शस्त्रक्रिया केल्यास तिच्या पायातलं व्यंग जाणार होतं पण खर्च बराच होता.
सायली त्या दोघा बापलेकींचा निरोप घेऊन घरी आली. रात्री डोळा लागताच ती स्वप्नाच्या वाटेवरनं गावाकडे गेली. तिला दिसलं बायग्याचं नळ्यांचं घर. शेणाने सारवलेल्या जमिनी. बायग्याची आई क्षयाने आजारी असायची त्यामुळे लहानपणापासनंच बायग्याला घरातलं सारवण करावं लागे. चुलीपुढे बसून भाकऱ्या थापाव्या लागत. बायग्यासोबत बसून सायलीलाही काही दिवसांत गोल गोल भाकरी थापता येऊ लागली होती आणि सायलीने ती बायग्याच्या वडिलांना दाखवताच त्यांनी सायलीला शाबासकी देत ती सतरा चिरा पडलेली भाकरी कोरडीच खाल्ली होती.
बायग्यासोबत राहून सायली बरीच कामं शिकली होती. कठीण प्रसंगी न डगमगता कसं उभं रहावं, संकटांशी कसे दोन हात करावेत, पैसे वाचवून कसे मडकीत घालून ठेवावेत ते बरंच काही बायग्याच्या वागण्याबोलण्यातून सायलीच्या मनात रुजलं होतं.
मैत्रिणीची ही शिस्त सायलीला सासरी आल्यावरही उपयोगी पडत होती. या आपल्या गोड मैत्रिणीचे ऋण काही अंशी तरी फेडायचे, पण कसे!
सायली बायग्याला अस्थिरोगतज्ञांकडे घेऊन गेली. बायग्याच्या वडिलांची हलाखीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना काही स्वयंसेवी संस्थांचा पत्ता दिला. तिथून आर्थिक मदत मिळवणं वगैरे सगळं सायलीने स्वतः केलं, या कामी आपल्या नवऱ्याचीही मदत घेतली. शस्त्रक्रियेनंतर महिनाभर सायलीने बायग्याची अगदी लहान लेकराची करतात तशी सेवा केली.
बायग्या म्हणालीही,"सायग्या, आता तुझ्यात माका माझी आये गमता गो."
बायग्याचे वडील म्हणाले,"सायग्या पोरा, ह्या तुजा रिण खयल्या जन्मी फेडतलय मिया!" माका याकच चेडू हुता पन आता माजी दोन चेडवा आसत. आता कसलाव संकट येवंदेत मिया भियाचय नाय."
त्यानंतर चारेक महिन्यात बायग्याचं लग्न जमलं.. नव्हे सायलीने जमवलं, आपल्या धाकट्या दिराशी. आता मैत्रिणी मैत्रिणी, जावाजावा झाल्या.
सायलीला नोकरी लागली. घरातलं काय, कसं.. प्रश्न उभे राहिले पण बायग्या म्हणाली,"सायग्या,मिया आसताना कित्याक काळजी करतस. तू नोकरेक जाव्क लाग. घराकडला मिया बघतय."
सायग्या, बायग्याची दोस्ती नि तिचं नात्यात झालेलं परिवर्तन व दोघींनी मिळून सासरचं केलेलं नंदनवन जुन्याजाणत्या बाया रंगवून सांगतात.
समाप्त


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा