आठवणीतली दिवाळी
#आठवणीतली_दिवाळी
रोजच येतो दिवाळीदसरा असं असलं तरी आत्ताच्या दिवाळीला लहानपणीच्या दिवाळीची यत्किंचितही सर नाही.
मन हळूच मागं मागं जाऊ लागतं अन् ते हरवलेले क्षण आठवू लागतं,ओंजळीत घेऊ पहातं.ते शाळेतले सहामाहीचे दुपारच्या सत्रातले पेपर.काही बरे जायचे काही कठीण..पण घरी आल्यावर पेपर सोप्पा गेला सांगितलं की काम झालेलं असायचं.पुढचं पुढे.आत्तासारखं नाही.आत्ताच्या मातोश्री एकेका मार्काचा किस काढत्यात.आपसूकच मग मुलं कॉपीचा आश्रय घेऊ पहातात.आमच्यावेळी मार्कांची जाचक बंधनं नव्हती त्यामुळे कॉपी वगैरे करुन गुण फुगवायचे.हे आमच्या गावीही नव्हतं.
त्या अमक्याचपेक्षा तुला जास्त गुण पडलेच पाहिजेत.त्या सोम्यागोम्याला मिळतात,तु तर त्यांच्यापेक्षा चांगलंचुंगलं खातेस मग तुला का नाही त्यांच्यासारखे गुण मिळत हे आत्ताचे संवाद तेंव्हा अस्तित्वात आलेच नव्हते.
उलट आम्हांला बाबा नेहमी सांगत,पेपर झाला की त्या पेपरचा विचार डोक्यातून काढून टाकायचा.त्या पेपराची
चर्चा मुळी करायचीच नाही.पुढच्या पेपराकडे लक्ष केंद्रित करायचं.दुर्दैवाने आत्ताच्या मुलांना पालक असं नाही सांगत.
असो तर परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मोठी पोरं एकमेकांच्या अंगावर पाणी,शाई..मिळेल ते द्रवपदार्थ ओतून आनंद साजरा करायची.घरात दिवाळीची पुर्वतयारी सुरु व्हायची.आई पूर्ण घर झाडून काढायची.मग आम्ही सोसायटीचं म्हणून एक दुकान होतं लालबागमध्ये तिथं जायचो.सेल्फ सर्विस असायची हल्लीच्या डिमार्टचं छोटसं रुप..तिथे आई सगळे जिन्नस खरेदी करायची.एकदा आई खरेदी करताना मला गरगरल्यासारं वाटलं.समोर अचानक अंधार झाला.मी त्या दुकानाच्या पायरीवर बसले. दुकानदाराचं लक्ष गेलं.त्याने दुकानातल्या बायांना विचारलं असता आईच्या लक्षात आलं मग पाणी वगैरे पाजून आईने मला व भावाला टेक्सीतून घरी नेलेलं.मग मात्र सडकून ताप भरलेला तो दिवाळीची सुट्टी संपल्यावरच गेला.मुक्कामाला आलेला.दर चार दिवसाने ढुंगणाला सुया..अरारा नको ती आठवण.
सगळी भांडी घासून चकचकीत करुन बाहेर खाटीवर उन्हात वाळवायला ठेवली जात.मग या डब्यांत दिवाळीचं राशन जाऊन बसे.चणाडाळ खमंग भाजल्याचे सुगंध नासिकेत जात.तर कुठून रवा भाजल्याचा सुवास येई.वासावरुन आम्ही ओळखू कोणा घरी कोणता पदार्थ होणार ते.लाडवांसाठी पीठ आई घरीच जातं मांडून दळे.बेसनाचे लाडू,रव्याचे लाडू यांची ताटच्याताट तयार होत.दिसायला फार देखणी दिसत.
पोहे उन्हाला ठेवले जात,खोबर्याची कापं,मिरच्यांचे बारीक तुकडे,खूप सारा कडिपत्ता.त्या चिवड्याच्या फोडणीचा सुवास चाळभर दरवळे.
करंज्या करताना आधीच आजुबाजूच्यांना सांगितले जाई.आई चारोळी,मनुका पीठीसाखर,भाजलेला रवा यांचं सारण करुन ठेवे.मैदा मळून पाट्यावर चेचून ठेवे.मग एकेकजणी आपापलं पोळपाट लाटणं घेऊन येत.आई गोळ्या करुन देई.पटापट पात्या केल्या जात.अगदी पारदर्शक. समोरचा माणूस दिसेल अशा.. त्यासोबत ढिगभर गजाली.एकदोन दादा सारण भरायला बसत.त्यांना जास्तीत जास्त पुरणं भरण्याची सुचना दिली जाई.
एकदा एका दादाने तर बोलता बोलता साचात आपला अंगठाही दाबला होता.किती रक्त गेलेलं त्याचा पत्ताच नाय.करंज्या भरुन झाल्या की आई वातीच्या स्टोव्हवर कढईत तेल तापत ठेवायची व दोन दोन करंज्या तळून घ्यायची.तिथून मग टेस्टींग सुरु व्हायचं.क्वचित कुणी रंगीत तर कुणी साठ्याच्या वगैरे करायचं.
चकल्या गाळायचं काम आम्ही लहान मुलं करायचो.वाफवलेल्या मुगडाळीच्या,मैदयाच्या चकल्या,भाजणीच्या चकल्या असे वेगवेगळे घाणे निघत.रेसिपींची एकमेकींत देवाणघेवाण होई.युट्युब वगैरे प्रकार नव्हता.प्रत्येकीचे अनुभव शेअर व्हायचे.त्यानुसार सुधारणा केल्या जायच्या.कुणाच्या चकल्या तेलात विरघळत तर कुणाच्या दगडासारख्या कड्डक ..पण त्यातच मजा होती.चुकांतून कसं शिकायचं असतं हे लहान मुलांनाही या आयांच्या प्रयोगांतून कळे.
आम्ही तेंव्हा केरम जास्त खेळायचो.भावाने बाबांकडे हट्ट करुन मागून घेतलेला.चाळीतली लहान मुलं मिळून खेळत बसायचो.मला कोण जास्त घेत नसे कारण मी तो स्ट्रायकर टिचकी मारण्याऐवजी घसटायचे.मग मी जुन्या वह्यांचे पुठ्ठे फाडे.त्यांना नंबर टाके व पुठ्ठ्यांचा बंगला बनवे.मस्त दिसायचा पुठ्ठयांचा बंगला.तीन,चार मजली व्हायचा.नाजूक काम असे.जरा बोट लागलं की सपाट मग पुन्हा नव्याने सुरु.
दुपारी आईस कँडीवाला येई.त्याच्याकडून रंगीत लाल, पिवळ्या आईसकँडी घ्यायचो.चार वाजता पाववाले आजोबा यायचे.ते विठ्ठलभक्त होते.डोक्यावर तसं गंध ,गळ्यात तुळसीची माळ ..खारी,केक,नानकटाई, बटर..असं बरंच काही.आई आम्हाला प्रत्येकाला पस्तीस पैसे देई.मग त्यातून आपल्याला आवडेल ती वस्तू घ्यायची.मी बहुदा केक घ्यायचे.मुलांच्या हातात पैसे द्यावेत.त्यांना पैसे कसे,किती वापरावे हे कळतं.आम्हांला अकरावीत युटीलिटी म्हणून कंसेप्ट होता.आपल्याजवळ असणारे पैसे एका बाजूला ठेवायचे तर दुसऱ्या बाजूला आपल्या गरजा.मग त्या गरजांचा उतरता क्रम..कोणती महत्त्वाची ती पहिली..अशाप्रकारे लावत जायच्या.हे सर्व अर्थशास्त्र आम्हाला त्या छोट्याशा खाऊच्या पैशांतून,आईच्या घरातील व्यवहारांतून कळायचं.
बाजूच्या मामी खारी शंकरपाळी,रव्याची नानकटाई बनवत.मला टेस्टींगला बोलवत.मी खाऊन छान झालेय म्हंटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधानाचं तेज..त्याची सर विकतच्या फराळाला नाही.बरं नानकटाई तर अशी तोंडात घातल्यावर थेट मेंदूला त्रुप्त करणारी..हळूहळू विरघळत जाणारी.खरपूस भाजलेली,सगळं अगदी प्रमाणात पडलं की संसार कसा छान रमतो हेच जणू सांगायची ती इवलीशी नानकटाई. खाऱ्या शंकरपाळ्या तर मस्त कुरकुरीत लागत.
एक बाजूच्या काकी दिवाळीच्या आदल्यादिवशी फराळ बनवायल्या घेत.त्या व त्यांच्या लेकी मग दोन दिवस नाईट मारून फराळ बनवत.हाताच्या पंजाएवढी त्यांची चकली लय भारी लागे.त्यांच्या हातची दाट दुधाची कॉफीपण..मी कधीकधी रात्री त्यांच्या लेकीबरोबर अभ्यासाला बसले की मला वाफाळलेली कॉफी देत.
रात्री बाबा व भाऊ बुद्धिबळ खेळत.बूद्धिबळाचा खेळ बराच वेळ रंगे.चेकमेट झाल्याशिवाय उठत नसत. मला आपली सापशिडी,ल्युडो हेच आवडे.उगा डोसक्याचा भुगा .
दादर किंवा परेल ब्रीजखाली एक मोठं दुकान आहे .बाबा तिथे आमची फलटण घेऊन जात.मला व ताईला फ्रॉक,आईला साड्या,भावाला शर्टपँट..भावाला त्यात रस नसे त्याला दहिवडा खायचा असल्याने आमची खरेदी होईपर्यत तो पायरीवर बसून राही.दहीवडा,आईसक्रीम खाऊन झालं की गडी खूश व्हायचा.
दिवाळीचा अभ्यासपण असायचा..भेंडीचे देठ रंगात बुडवून त्या ठशांचा नेकलेस,धान्यांची रांगोळी,काडेपेटीच्या काड्यांच घर..असलं कायकाय असायचं.अभ्यास पुर्ण झाला की त्या वहीला आधी खाकी कव्हर मग वरती रंगीत पिवळे,लाल कलरचे प्लास्टिक घालून नटवायचो.
सगळ्या चाळभर एकाच प्रकारचे आकाशकंदील लावले जायचे.चाळीतली मुलं रात्ररात्र जागून हा कंदील बनवायचे केशरी,आकाशी,लाल,सोनेरी पट्ट्यांवाल्या कंदिलांनी चाळ शोभून दिसायची.एक मोठा कंदील सामायिक असा चाळीच्या प्रवेशद्वारावर लावला जायचा.
सगळी चाळ दिवाळीमय व्हायची.रंगीत दिव्यांच्या रोषणाईंनी झगमगायची.त्यासोबत कर्ण्यांवरची जुनी हिंदी मराठी गाणी..
पहिल्या पहाटेदिवशी पहाटे चारला नळाला पाणी येई.त्या कडाक्याच्या थंडीत सर्वांगाला तेल लावून,उटणं लावून केलेलं ते अभ्यंग स्नान.दातावर दात आपटायचे.ती खरी थंडी.पहाटेपासूनच आईची लगबग सुरु होई.दारात छोटीसी रांगोळी,दिवा लावी. प्रत्येकजण न्हाणं झालं की दिव्यासमोर गोविंदा गोपाळा म्हणत पावलाने कारेटे फोडी, व त्यातल्या बिया कपाळाला लावे.जरासं चाखल्यासारखं करीत.मी माझ्या बोटांना ते कारेट्यातलं पाणी लावून घ्यायचे व घरातल्यांच्या पाठी उभं राहून
हळूच ते कडू बोट त्यांच्या तोंडात घाले.मज्जा यायची.आत्ताही करते तसंच.
आन्हिकं आवरल्यावर आई दुध साखर पोहे बनवी.सगळे फराळाचे डबे बाहेर काढी.प्रत्येक कागदावर दोन बेसनाचे,दोन रव्याचे लाडू,दोन करंज्या,चकल्या,शेव व चिवड्यांच्या लहान पुड्या असं ठेवून फराळाचे पुडे बनवले जायचे.मग दोन मोठ्या पिशव्यांत ते रचून ठेवायची.मला नवीन फ्रॉक घालायची,मेचिंग बांगड्या,टिकली,विको क्रीम त्यावर पावडर,केसांचा बॉबकट जरा तेल लावून विंचरायची,त्याला रंगीत पीन लावायची.अशा प्रकारे नटूनथटून दोन पिशव्या दोन हातात घेऊन माझी स्वारी फराळ वाटायला बाहेर पडायची.
प्रत्येक घरी काका नायतर काकूकडे फराळ द्यायचं पाया पडायचं.हेप्पी दिवाली म्हणतात ते माझ्या गावी नसायचे.आम्ही जिथे खेळायचो त्यासमोर एक छोटं घर होतं.आजीआजोबा रहायचे.ती आजी खेळताना ओरडायची म्हणून जरा दबक्या पावलांनी तिच्याकडे फराळ न्हेऊन द्यायचे.शेणाने सारवलेलं अंधारं घर होतं. बिचाऱ्यांना मुलबाळ नव्हतं.मग आम्ही चाळकऱ्यांनी दिलेला फराळच ती दोघं खायची.आई कुठे बाहेर जायची झाली की त्या आजीला आमच्या ओट्यावर बसवून जायची.मग ती आजी आई येईपर्यंत आमची राखण करायची व आईला सांगायची,तुया घरात असतानाच पोरा मस्ती करतत तुया भायर गेलंस काय लोण्यासारी थंड आसतत.
बरीच जण आपली बिऱ्हाडं गावी ठेवून मुंबईत रहात.ते सगळे काकामामा आमच्याकडे फराळाला यायचे.आई त्या सगळ्यांची हक्काची बहीण होती.मी फक्त तिखट पदार्थ खाई..चकली,चिवडा,पोहे..लाडू करंज्या नाही.त्या मी आंब्रडात आल्यावर खायला शिकले.कारण इकडे चण्याच्या पीठाचे लाडू व त्याच पीठाच्या करंज्या जाम भारी लागतात.रव्याच्या अजाबात आवडत नाहीत.
चार दिवस चाळीत वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या.चमचालिंबू स्पर्धा..हिच्यात कितीही एकाग्रता ठेवली तरी मेलं माझं लिंबू सांडायचं.
बटाटेशर्यत..गोलामध्ये बटाटे ठेवले जायचे व शिटी वाजली की ते उचलतं जायचे व परत धावत यायचं.यात एकदा नंबर आलेला.
संगीतखुर्ची.. यात लय मजा यायची.महिलांची,पुरुषांची व लहानग्यांची अशी असायची.यातही एकदा दुसरा नंबर आलेला.
जिलेबीस्पर्धा..दोराने वर जिलेब्या लटकवतात व स्पर्धकांचे हात पाठून बांधतात.आपण उडी मारत रहायचं.ती जिलेबी काय मिळायची नाही.मग मोठी मुलं आम्हांला उचलून ती जिलेबी खायला लावत.
रांगोळी स्पर्धा..यात बायका खरंच दोन तीन तास बसून सुरेख गालिचा रांगोळ्या रेखाटत.रंगसंगती बघण्यासारखी असे.
मेणबत्ती स्पर्धा,पाककला स्पर्धा,स्मरणशक्ती स्पर्धा, निबंध स्पर्धा, कवितावाचन स्पर्धा होत.
वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्याने एवढ्या मोठ्या समुहासमोर कसं बोलायचं याचं बाळकडू मिळे.
पीठपैसा अशी एक मोठ्या मुलांची स्पर्धा असायची.मुलांचे हात पाठी बांधलेले..बशीत पीठ..त्यात नाणं..पोरांनी तोंडाने नाणं शोधायचं..भारी दिसायचे..पीठवाल्या भैयासारखे.
मडकेफोडी स्पर्धा..यात डोळे बांधायचे..हातात दांडा मधोमध मडकं.. लोक लांबवर उभं रहायची.तो मडकं फोडणारा दांड्याने रापायचा..लय मजा यायची बघायला.
शेवटी फेन्सी ड्रेस स्पर्धा.पोरं रावण,क्रिष्णा ,राम,मारुती बनायची..सगळं रामायण,महाभारत मैदानावर उतरायचं..कोळीडान्सही असायचे.रोज रात्री मोठ्या पांढऱ्या पडद्यावर मराठी हिंदी सिनेमे..
दारात मोठ्या ताया रांगोळ्या काढत. मग आम्ही चाळभर फिरुन प्रत्येकाची रांगोळी पहायचो.बहुतेक रांगोळ्या वीस ठिपक्यांवरच्या असायच्या.
चाळीत बक्षीस समारंभ व्हायचा.कायकाय मिळायचं.
लवंगी,फुलबाजे,चक्री,नागगोळ्या,पाऊस,रंगीत काडेपेटी,तडतडे फुलबाजे..असे फटाके बाबा घेऊन यायचे.मी फक्त फुलबाजे व गुलाबी टिकल्यांचे रोल घ्यायची.त्या टिकल्या दगडाने फोडायची.बाकीच्या फटाक्यांच्या आवाजाची मला भितीच वाटायची.
आमच्या चाळीत किल्ले बनवत नसत.किल्ले बनवणं मी बदलापूरला रहायला आल्यावर पाहिलं..मुलं कुठूनकुठून दगडविटा शोधून आणतात,माती खणून आणतात.एक विशिष्ट किल्ला मनात ठरवून त्याप्रमाणे बांधत जातात.सलाईनची बाटली वरती लावून ठेवतात,मोहरी पेरतात..किल्याला रेखीव पायऱ्या काढतात.पाठीमागे विहीर,शेतं दाखवतात.चिरा पडू नये म्हणून ओली बारदानं ठेवतात मग ठिकठिकाणी मातीचे मावळे व प्राणी ठेवतात.अगदी वरती सिंहासनावर शिवाजी महाराज बसतात.या किल्ल्याला लायटींगही केली जाते.किल्ल्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात.
भाऊबीजेदिवशी वडेमटण असायचं.मामा यायचे.काका,आत्या,त्यांची मुलं..ती भाऊबीज..जाम मजा यायची..बारसीपर्यंत दिवाळीचा फराळ व उत्साह असायचा.तुळशीचं लग्न लागलं की शाळा सुरु व्हायच्या.
अशी ही आठवणीतली दिवाळीची सुट्टी.
माझं लग्न होऊन मी गावी गेले तेंव्हा तिथली दिवाळी अनुभवली.यासुमारास इमच्या कोकणात भातकापणीची कामं जोरात सुरु असतात.ते भात कापून मांगरात आणलं जातं.तिथे ते झोडतात. मग एका मडक्याचं खापर चुलीवर ठेवून त्यात भाताचे गोटे भाजतात.ते भाजलेलं भात वाईणात मुसळाने कुठलं जातं व मग ते आसडतात.अशा रितीने बनवलेले नवीन भाताचे पोहे.त्यात दूध व गुळ मिक्स करुन ठेवतित.भल्या पहाटे तुळशीसमोर दिवा लावतात.रांगोळी काढतात.मग नारळाचं दूध व उटणं अंगाला लावून पाटावर बसून कडाक्याच्या थंडीत स्नान होते.कारेट्याची फळ तिथं रिनात सहज मिळतात.ती आदल्या दिवशी आणून ठेवलेली असतात.आंघोळ झाली कीतुळशीसमोर गोविंदा गोपाळा म्हणत पायाने कारेटं फोडतात.मग आजीने कडुलिंबाची चटणी वाटलेली असते.ती जरातरी खावीच लागते.त्यानंतर सगळीजणं बसून दूधगुळपोहे खातात.हल्लीहल्ली गावीही मुंबईसारखा दिवाळीचा फराळ बनवतात.
ब्लंकमध्येही दिवाळी ब्लॉकी सिस्टीममध्ये साजरी खरतोच.कारण मनं शेवटी तीच नं.आमच्या समोर गोव्याचे गवस रहातात.त्यांच्या सुनेला रांगोळी येत नाही.मग त्यांची छोटी मला सांगते,काकी तुझं झिलं की माझ्याकडेपण रांगोळी काढ.आत्ता ही छोटी बघताबघता मोठी होईल व आपली रांगोळी काढेलच व आमचीही कआढून देईल.दिवस भुर्र कन उडून जातात नाही.आमच्या मजल्यावर एक तमिळ कुटुंब रहाते.त्यांची रांगोळी म्हणजे मला लहानपणी चंपकमध्ये असायचं तसं वेटोळ्यावेटोळ्यांचं कोडं वाठतं.कसं काय बुवा काढतात.
आमच्या बाजूला दोघी बहीणी आहेत.त्यातली मोठी छान रांगोळी काढते व छोटी पेसेजभर फुलं,फुलपाखरू असं कायकाय काढून ठेवते.मीही लहान असताना मला रांगोळीत कोण घेत नसे.त्या ताया वर्तमानपत्रावर बरोबर पट्टी ने रेषा आखत व अगरबत्तीने भोकं पाडत.मग ओटा पुसून त्यावर गेरु सारवत.गेरु वाळला की तो भोकांवाला पेपर त्यावर ठेवून रांगोळीने ठीपके भरत.मग अलगद तो कागद बाजूला करत.खडूने रंगोलीपुस्तकातली मोठ्ठी सत्तावीस अठ्ठावीस ठिपकेंवाली रांगोळी आखून घेत.मग रंग भरत.बाजूने पांढऱ्या रांगोळीची बारीक किनार काढत.मीपण मग हळूच थोडे रंग घेऊन कोपऱ्यात हत्ती, ससा काढत बसे.ताई सासरी गेल्यावर मात्र रांगोळीचे प्रस्थ वारसाहक्काने माझ्याकडे आले.मला पानाफुलांच्या रांगोळ्या जास्त भावत.मग मी त्या कआढत असे.बाजूच्या जोशीकाकूंचे बघून मी गुलाबाची रा़गोळी काढायला शिकले.त्या जोशीकाकू माझ्या रांगोळीचं कौतुक करायच्या.त्यामुळे मला अजून हुरुप यायचा.
मग बाळ लहान असतिना पानाफुलांच्या रांगोळीची जागा कारटूनच्या रांगोळीने घेतली.पीकाचू,नोविता..असे बरेच केरेक्ट्र्स रांगोळीत येऊ लागले.एकदा मला मुलाने एवेंजरचं चित्र काढून दिलेलं गेरूवर.मी त्यात रंग भरले होते.
शेजारीपण छान रांगोळी काढत असेल तर आपल्याला रिंगोळी काढायला अजून हुरूप येतो.आताशा दोनतीन वर्ष झाली पानाफुलांच्या रांगोळीची जागा निसर्गचित्राने घेतली आहे.दिवाळीत दिवसभर घाईगडबडीत मला रांगोळी काढायला वेळ मिळत नाही.मग मी सगळं आवरलं की एका पुठँठ्यावर छान निसर्गचित्र रेखाटते व त्यात रंग भरते.सुर्योदय,सुर्यास्त, रात्र यावेळचं विविध छटांचं आकाश दाखवताना मी अक्षरशः त्यात दंग होऊन जाते.मी काही प्रोफेशनल रांगोळीकार नाही पण मला रांगोळी माझ्या खूप जवळची वाटते.तीन चार तास बसून रांगोळी काढली तरी मग मला तहानभूक लागत नाही.एवढी मला रांगोळी आवडते.
छायाचित्र सौजन्य : हर्षद दळवी
----------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा