आली माझ्या घरी ही दिवाळी

 आली माझ्या घरी ही दिवाळी


©® गीता गरुड.



इंदुक्काने आज नथुबाईकडून सगळी भांडी लख्ख घासून घेतली होती. भांडी बाहेर खाटीवर ठेवून त्यांची राखण करण्यासाठी अण्णांना तिथेच खुर्ची घालून दिली होती. उन्हाची कोवळी किरणं हळूहळू जून होऊ लागली होती नं  स्टेनलेस स्टीलाच्या, पितळेच्या भांड्यांवरनं परावर्तीत होत होती. इंदुक्काची जहागिरच जणू ती. 


"हां घेवा यादी लिवूक." इंदुक्का अण्णांपुढ्यात वाणसामानाची डायरी नि पेन सरसावीत म्हणाली. 


"कोडा सोडवतय मिया नि तुजा काय ह्या भलताच. मोप टाईम आसा आजून दिवाळेक. मगे सावशीत लिवया. आता जा घरातली कामा आटप." अण्णांनी पेपरात डोकं घालत इंदुक्काची मागणी जवळजवळ धुडकावूनच लावली. इंदुक्का थोडीच ऐकायला. "सांगलय तेवढा करूचा. हां लिवा एक किलो चणे."


"गो खेका इतके!"


"शिरा घालूक! चाळीत ताटा देऊक व्हयी. आपले पीठाचे करंजे सगळ्यांका आवाडतत. चारचार तरी परतेकाक देऊक व्हये नि वायच उकडे तांदूळ घालून पीठाचे लाडूव वळीन. तुमका लय आवाडतत ते ठाऊक असा माका."


"गो पन त्यो डायबिटीस.."


"तेकाव समाजता वर्षातलो मोठो सण हा. गोडधोड खाऊक नको मानसान! वाढलीच साखार तर गुळये घेवा मगे पुन खाव्ची इच्छा मारू नका सणादिशी तरी. गुळ घालतय तोव मर्जीमाफ घालतलय. माकाव काळजी असाच ओ तुमच्या तब्येतीची."


"बरा तर फुढचा सांग काय ता."


"हां. गुळ लिवा दोनेक किलो. भाऊ इलो तर तेका पुरणपोळये करून घालीन. सुठ, येलची, जायफळ लिवा. चकलीची भाजणी लिवा दोन किलोची. वाणीनबाय बरी करता. तीच हाडू. माका काय भाजणी करूक झेपाचा नाय. शंकरपाळे करूक व्हये. डालडो लिवा, मैदो किलोभर लिवा, साखार दोन किलो आणि पातळ फॉव.."


"गो हे पावसाक येतहत वडी. फॉव सुकतले कसे. न्हिमार हा खय तेंका देखवूक."


"ओ चार नंबर खोलयेतल्या रसाळणीन ओव्हन हाडलो हा. तेतूर कुरकुरीत होतत. मागे एक पावटी गेललय गजालिक तवा तिच्या सुनेन पावसात चिवडो दिलल्यान माका बशीभर. मियाव बघितच रवलय तर लागली हसाक मगे माका ती मिशीन देखवल्यान. काचेच्या भांड्यात..बावल्या का काय म्हनता ती तेतूर फॉव वतता नि भुतूर ठेवता. कुरकुरीत होवन येतत. तेतूरच दाणे, डाळी भाजता. फोडणीव गरम करता."


"बरा बरा. पुरे तुजा किर्तान. लिवलय समदा. जा आता कुकर लाव जा."


"वाण्याचे दुकानात हाताबरूबर न्हेऊन देवा ना. मिया ताकाची कढी बनवतय लसणाची नि कडीलिंबाची चुरचुरीत फोडनी घालून. इल्याबरूबर जेवूक बसा." इंदुक्का अगदी मध पाडू लागली तसं अण्णा आरामखुर्चीतनं उठले नि वाण्याकडे निघाले.


इंदुक्काने नथुबाईच्या मदतीने सगळं घर साफ करून घेतलं होतं. भंगारवाला आला तसं तिने नको त्या बाटल्या, डबे त्याला देऊन टाकले. मापाचा काटा नीट न्याहाळला व त्याने दिलेली पन्नासाची नोट कनवटीला लावली. दुपारी अण्णांना ताकाची कढी नि मऊसूत पोळ्या, वालीची भाजी करून वाढली. अण्णा मनसोक्त जेवले. झोपायला गेले. काही सेकंदातच मस्त सुरात घोरू लागले. 


इंदुक्काने तिच्या सासरी गेलेल्या लेकीला, निरजाला फोन लावला."निरे, किती दिसांची सुट्टी घेऊन येतलस गो!"


"इतक्यात नाय गे आई सांगुचय.मगे सांगतय तुका. पोरांचे परीक्षा चललेहत. अभ्यास घेवचो लागताहा. लय कठीन पेपर घालतत. माका तर वाटता मीच परीक्षा दितय."


"आमी कवा घेतलो तुजो अभ्यास तरी येका इयत्तेतसून दुसऱ्या इयत्तेत जाईत व्हतस मा."


"आये तवाचा शिक्षान येगळा नि ह्या येगळा. पोट फुटसर धावतत तसो अभ्यास करूचो लागता. नि तेंचे प्रोजेक्ट आसतत, तेव येळेर देव्चे लागतत. इटमना हा निसती." इंदुक्काला निरजा लग्नानंतर पंधरा वर्षांनी झाली होती त्यामुळे इंदुक्का नि अण्णांचं वयोमान बघता ती फारच लहान वाटायची.


"बरा बाय तुका जमात, फुरसत होयत तशी ये, मग झाला." असं बोलून इंदुक्काने फोन ठेवला. चहा करायला आधण ठेवणार तोच रांगोळीची गाडीवाला आला. इंदुक्काने दोन ग्लास भरुन पांढरीशुभ्र रांगोळी घेतली. लाल, पिवळा, मोरपिसी, गुलाबी, शेंदरी, हिरवा, पोपटी,..कितीक रंग घेतले. चमकीची डबीही घेतली. ठिपक्यांचा खाकी कागद घेतला. लालेलाल गेरू घेतला. ते सगळं सामान हातात धरून घरात आणताना तिने त्या रंगांचा, रांगोळीचा मनभरून वास घेतला. दिवाळीचा परिमळ तिच्या नसानसांत भिनला.  


प्रत्येक रंगात माफक रांगोळी मिसळून तिने कप्प्यांच्या डब्यातील कप्प्यांत रंग ओतले. रांगोळीचा डबा कसा रंगाने सजलाधजला. इंदुक्काचं मनही तसंच रंगाने मोहून गेलं. तिने खोरणातल्या पणत्या काढून त्या स्वच्छ केल्या. वाती करून ठेवल्या. अण्णा नुकतेच उठलेले. इंदुक्काची गडबड पहात होते. लग्न झाल्यापासनं प्रत्येक वर्षी दिवाळीला इंदुक्काची अशीच लगबग असायची.

इंदुक्काच्या कुडीत आता  पुर्वीइतकी ताकद राहिली नव्हती, कंबर ठुसठुसत होती, गुडघे धरले होते पण उत्साह काही उणावला नव्हता इंदुक्काचा.


दुसऱ्या दिवशीपासनं तिचं दिवाळीचे पदार्थ करणं सुरू झालं. जातं मांडून अण्णांना जोडीला घेऊन तिने भाजलेले चणे भरडले, पाखडले, पुन्हा दळले. त्या पीठातलं  थोडं करंज्यांना काढून ठेवलं. बाकीच्याचे लाडू वळले. 


करंज्या करायला आजूबाजूच्या शेजारणींना दोन दिवस आधीच बोलावणं धाडलं होतनं. त्यांच्यासाठी नि त्यांच्या पोरासोरांसाठी तोंडली घातलेला मसालेभात नि काकडीची कोशिंबीर केली होती. टोपभरून भात..काय दरवळ सुटला होता. सगळ्या शेजारणी हक्काने मागून घेऊन  भरपेट जेवल्या. अण्णांनी आणलेली पेठेंकडची जिलबीही लाजबाब होती.


थोडेसे आढे घेऊन इंदुक्काच्या हातच्या जायफळ लावलेल्या कॉफीचे घोट घेत त्या करंज्या करायला बसल्या. अण्णांनी स्वतः पीठ चेचून दिलं. चारसहाजणी भराभर पाती लाटू लागल्या. दोघीतिघी पात्यांत सारण भरू लागल्या. मुरड मात्र इंदुक्काच्या हातचीच. अतिशय सुबक वेलबुट्टीसारखी, बघत रहावी अशी. नथुबाईने तेवढं ते तळण बोलताबोलता पुरं केलन.


दुसऱ्या दिवशी शंकरपाळ्या इंदुक्काने व अण्णांनी मिळून केल्या. चकल्यांसाठी मात्र दोघीतिघींना बोलावलं. त्यांना लोणी नि थालिपीठं खाऊ घातली. अण्णा स्वतः चकल्या गाळून देत होते. इंदुक्का चकल्या तळता तळता जुन्या आठवणींत रमली होती. कितीकदा तिच्या चकल्या मऊ पडायच्या, कधी तेलात घालताच विरघळायच्या तरी प्रयत्न सोडले नाहीत. आताच्या पोरींना सांगत होती. त्याही कौतुकाने ऐकत होत्या.


चकलीला फार छान काटे आले होते. तोंडात घालताच विरघळत होती. खुसखुशीत आणि खमंग अगदी तुझ्यासारखी.. अण्णा चकलीचा तुकडा खात बोटांचा मोर नाचवत म्हणाले तशी इंदुक्का चक्क लाजली. पोरींना आयतच हसू फुटलं.


पहिल्या आंघोळीसाठी इंदुक्काने मसूर डाळीच्या पीठात  वाळा, नागरमोथा, सुगंधी कचोरा, तुळशीची पावडर इ.सुगंधी सुवासिक द्रव्ये मिसळून स्वतःच्या  हाताने उटणं बनवलंन. पहाटे उठून न्हाणं झाल्यावर पणत्या लावल्या. रांगोळीची बोटं फिरवली. अण्णांना पाटावर बसवून त्यांच्या सर्वांगाला सुवासिक तेल, उटणं लावलं व ऊन ऊन पाण्याने त्यांना न्हाऊमाखू घातलं. 


अण्णांनी कारेटं फोडून देव पूजल्यानंतर इंदुक्काने देवाला गुळपोह्याचा, नि लाडू,करंजी,चिवडा,चकली, शंकरपाळीचा नैवेद्य दाखवला.  


अण्णांना फराळ खायला दिला नि पुड्या बांधू लागली, शेजारघरी फराळ पोचतं करण्यासाठी.  "तूव बस माज्यावांगडा फराळा करूक," अण्णा म्हणाले.


"होय इलय एवढे पुडे बांधून. चाय उकळत ठेवली हा तीव घेऊन येतय," असं म्हणत तिने चहा पातळ फडक्याने दोन कपांत गाळून घेतला नं चहाचे कप घेऊन उठणार तोच अचानक तिला गरगरल्यासारखं होऊ लागलं, सबंध घरच गोलगोल फिरतयसं वाटू लागलं. बघताबघता इंदुक्काची शुद्धच हरपली. 


अण्णा पुरते घाबरले. "इंदु, इंदे..असा गो काय करतस! पानी देव काय तुका!" अण्णा लहान लेकरासारखे भांबावून काहीबाही बोलत होते. त्यांच्या इंदुला उठवायचा यत्न करत होते. 


शेजारचा बाळू इंदुक्काने बांधलेल्या पुड्या शेजाऱ्यांना देण्यासाठी म्हणून आला होता, त्याने बाजूच्यांना सांगितलं. इंदुक्काला इस्पितळात भरती केलं.  तिचा रक्तदाब वाढला होता. अगदी दोनशेच्यावर उसळला होता. दोन दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं.


लेकही मुलांना घेऊन धावत आली. आपण जरा आळशीपणाच केला..थोडं लवकर येऊन आईला मदत करायला हवी होती..तिला बिचारीला चुटपूट लागली. 


डॉक्टरांनी जास्त दगदग करायची नाही, वेळेवर गोळी घ्यायची असा खाक्या दम देऊनच इंदुक्काला सोडलं.


तीनेक दिवस शेजारणींनी इंदुक्काला डबा देण्याची व्यवस्था केली होती. तिच्या ओटीवर रांगोळी, पणत्या लावल्या होत्या. बाळूने स्वतः शेंदरी रंगाचा आकाश कंदील बनवून इंदूक्काच्या घराच्या ओटीवरील कठड्याला काठी बांधून तीवर चढवला होता. टिमटिमत्या दिव्यांची माळ लावली होती. अण्णा निरजाला म्हणाले,"ही मानसा कमावली हत बग तुज्या आवशीन. हेतूर माझा काय नाय. इतका आपलेपान तिकाच देऊक जमता म्हनान वक्ताक धावान येतत." निरजाला पटलं अण्णांचं म्हणणं. तिची आई होतीच तशी मायेची सावली. इंदुक्काने आपपरभाव कधी म्हणून केला नव्हता.


चौथ्या दिवशी मात्र इंदुक्का स्वतः बसली रांगोळी काढायला. बारा उभे नं बारा आढवे ठिपके काढलेन. रांगोळीच्या रेघा काढत सुंदर रंगावली काढलीन. त्यात तिच्या मनाजोगी रंगसंगती लेकीकडून भरून घेतलीन. वरती स्वतःच्या हाताने चमकी भुरभुरलीन. चोहोबाजूंनी पणत्या उजळल्या नं त्यांचा मंद उजेड इंदुक्काच्या प्रसन्न चेहऱ्यावर पडला.


नातवंडांसोबत फुलबाजी हातात धरून इंदुक्का गुणगुणु लागली..आली माझ्या घरी ही दिवाळी..सप्त रंगात न्हाऊन आली..आली माझ्या घरी ही दिवाळी."

इंदुक्काच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं तेज पाहून अण्णांच्या डोळ्यांतून  आनंदाश्रु पाझरत होते. 


घरात घराची लक्ष्मी असली तरच दसरा नं दिवाळी..अण्णा स्वत:शीच पुटपुटले. आयुष्यभर संसाराच्या रांगोळीचे ठिपके अलवार जोडून त्यात आनंदाचे, समर्पणाचे, त्यागाचे, कित्येक रंग भरले होते इंदुक्काने. इंदुक्काला लवकर बरं केल्याबद्दल अण्णांनी देवाचे हात जोडून आभार मानले.


समाप्त

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट