नातसून
नातसून
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"
crossorigin="anonymous"></script>
©®गीता गरुड.
"ए मयंक, तुझ्या आजोळी मला दिवसभर साडीत रहावं लागणार का रे?"
"कोणी सांगितलं तुला? असं काहीही नसतं गं.पंजाबी ड्रेस, ट्रेकसुट..तुला ज्यात सुटसुटीत वाटेल ते घाल. देवळात जाताना मात्र साडी नेस."
"बरं. ए पण आपण कुठेतरी ट्रीपला गेलो असतो की. तिथुनच गोवा जवळ आहे ना. गोव्याला तरी जाऊ दोन दिवस."
"बरं. बघू.आधी पोहोचू तरी वेंगुर्ल्यात. पुढचं पुढे."
"मग थोडंच ऐकणार तू माझं, तिथे गेलं की. आधी प्रॉमिस दे गोवा ट्रीपचं तरच जाऊ आपण तुझ्या आजोळी." ज्योत्स्ना हट्टाने म्हणाली.
"बरं बाई देतो प्रॉमिस. गोवाच काय, तिथून पुढं केरळातही जाऊ."
"नको उगा हवेत बाण उडवूस.आणि काय रे तिथे अहोजाहो करावं लागेल का तुला?"
यावर मात्र मयंक हसू लागला.
"तुला काय जातय हसायला. तुम्हा पोरांचं बरं असतं. सासरमाहेर वगैरे नसतं. आम्हा मुलींनाच सगळीकडे एडजस्ट करावं लागतं." असं बडबडत ज्योने ब्यागा भरल्या. आज्जीसाठी नववारी पातळ, मामीआईसाठी सहावारी साडी, मामीआईच्या पिंकीसाठी चुडीदार, मिठाई असं सारं ब्यागेत भरलं होतं.
रात्रभर प्रवास करून दोघे गावी पोहोचले. मयंकच्या आईबाबांनीही तिथेच जवळ घर बांधलं होतं. तेही मामीआईकडे रहायला आले होते. मामीआईने भाकरतुकडा ओवाळून नवीन जोडप्याचं स्वागत केलं. शेणाने सारवलेलं कौलारू घर अगदी मनात भरावं असं. मामीआईने ज्योला न्हायला कढत पाणी काढून दिलं. दोघांच्याही आंघोळी झाल्यावर चुलीकडे येऊन बसले. मामीआई घावणे काढत होती तर मयंकची आई नारळाचा रस बनवत होती. मयंकची आज्जी सगळ्यांना वाढण्याचं काम करत होती.
घावण्याचं पाणी बिड्यावर ओतताच कसा चुर्रचुर्र आवाज येत होता. खात नाही, भूकच नाही म्हणणाऱ्याचीही भूक चाळवावी असा गंध, असा आपलेपणा. ज्योला गोड आवडत नाही हे माहीत असल्याने तिच्यासाठी पिंकीने आंबोशी घालून ओल्या नारळाची चटणी पाट्यावर वाटून आणली.
"किती छान लागतेय ही चटणी. अशी चव येत नाही मिक्सीवर वाटलेल्या चटणीला." ज्यो मनापासनं म्हणाली तशी आज्जी खुदकन हसली. आज्जीचं बोळकं हसताना फार गोड दिसत होतं. मयंकज्योच्या लग्नाला तब्येतीच्या तक्रारींमुळे आज्जीला जाता आलं नव्हतं पण आता मात्र ती आपली नातसून डोळे भरून पहात होती. सुखावत होती.
मयंक केंव्हाच मामांसोबत शेतावर गेला होता. ज्योला सासू म्हणाली,"चल तुका श्यात देखवतय."
ज्योला मालवणी बऱ्यापैकी कळत होतं नि सासू बोलायची ते ऐकायलाही आवडायचं. शेतात जायला जवळजवळ अर्धातास लागला. ऊन्ह हा हा म्हणत होती. ज्योचा चेहरा उन्हाने लालगुलाबी झाला होता.
"दमलस?" सासूने विचारलं तसं ज्यो.. नं नाही म्हणाली.
"तुका हय हाडलय हुंजे शेतीवाडी बघशीत वायच. माजे सासूसासरे लय लवकर गेले मगे काय जमीनजागा हुती ती चुलत्यांनी हडापल्यानी नि आमका घराभायर काढल्यानी. मिया पोटुशी हौतय तवा. हेंका घेऊन मायेराची वाट धरलय. मयंक मामीक मामीआई म्हनता ता ओगीच नाय गो. तिना लय केल्यानहा तेचेसाठी."
"म्हणजे? मयंक आय मीन हे तुमच्यासोबत रहात नव्हते?"
"म्हन गो मयंक. चलता तसा काय नाय. तुझोच घो तो. हां तर काय सांगी हुतय, हेंचे आव्सबापूस एके वर्षात गेले तसे आमी घराकडे इलाव कार्य करूक. थय वीसेक दिस रव्हलाव पुन येके राती हेंचे चुलत्यान ह्या भांडान केल्यान. चौघांचा घर तरी हेंका रवाक देयना. हेव भेदरलले. आमी रातीच हडे इलाव.
वहिनी माझी लाख गुनाची. कवा माका येक शब्द उलटान बोलली नाय. आमी मुमयत गेलाव. हेंका कामार तर जावचा लागनार होता. मयंकाक हयलो लळो लागलो तो हयसरच रवलो अगदी आठवीतागद हयसर हुतो म्हनान मामीआई म्हनता तो मामीक. मामीचो थोरलो झील वरुण देवाच्या गुणाचो होतो, खय पायाबुडी झाला नि दगावलो तवापासून आमी लक्ष्मीपूजन झाला काय चारदिसतरी हडे येताव रव्हक. मयंकाक ते आपलो झील मानतत. तेच्यात तेंका तेंचो वरुण दिसता. आपुन घर बांधलाहा ता बांधताना जास्ती ती मदत माझ्या भावाशीन नि भावजयीन केली हा."
"मामीआईच्या मुलाबद्दल असं मला खरंच ठाऊक नव्हतं आई. किती वाईट ना."
"गो जो तो आपला आयुक्स लिवान घेऊन येता. परमेश्वराच्या हातीतली कळसुत्री भावली आपुन. कितीव नाचलव तरी आपले दोरये तेचे हातीत."
एव्हाना शेत जवळ आलं होतं. मामाच्या शेतात अक्षरशः सोनं पिकलं होतं. गर्भारबाई दिवस भरत आले की वाकावी तशा सोनपिवळ्या लोंब्या भाराने वाकल्या होत्या. इतर माणसांसोबत मयंकही कोयती हातीत घेऊन भात कापत होता. गडीमाणसं भाताच्या पेंड्या घेऊन शेतात असलेल्या मांगरातलया खळ्यात टाकत होते. तिथल्या खळ्यात भात झोडणं, वारा देणं सगळी कामं सुरू होती.
"सूनबाई ह्या श्यात आपला. तुका आवडला मा!" मामांनी विचारलं.
"हो मामा. खरंच मी शेती एवढी जवळून कधी पाहिली नव्हती. मीपण येऊ भात कापायला?"
"नको गे बाय. खाज खातली अंगाक. येकारदो कुसरुंडो चावलो तर आग होतली. मयंक हयलोच आसा. आता हाफिसर झालो असलो तरी तेची नाळ गावाशी जुळलली हा. चल तुका पिऊक पानी दितय. दमलं आसशीत इतक्या चलान."
मामा त्या दोघींना थोडं पुढे घेऊन गेले. आंब्याची दोनचार झाडं, बांबुची बेटं याने भर उन्हात तिथे कसं गार वाटत होतं. पानांच्या सळसळीने हवेची झुळुक येजा करत होती.
मध्यभागी भलीमोठी विहीर होती. मामांनी कळशी विहिरीत सोडली नि पाणी काढलं. खाली वाकून ओंजळीने ज्यो पाणी प्यायली. पाण्याची चव अप्रतिम होती. तिने तोंडांवरही पाण्याचे सपकारे मारले. मामांनी आपल्या खांद्यावरचा पंचा तिला तोंड पुसायला दिला.
मग ते मांगरापाशी आले. थोडावेळ पडवीतल्या बाजेवर बसले. सारवलेल्या जमिनीवर, एका कोपऱ्यात नुकत्याच वारवलेल्या भाताची रास होती. मामांनी तिला कोपऱ्यातल्या केळीच्या घडातली सोनकेळी दिली. चालूनचालून भूक चाळवलीच होती. ज्योने न संकोचता पाचसहा केळी खाल्ली. सगळीच मग जेवायला घरी आली.
संध्याकाळी देवीची ओटी भरून आली. रात्री आज्जीची तब्येत जरा चाळवली तसे सगळेच घाबरे झाले. मयंकने मित्रासोबत जाऊन डॉक्टरांना आणलं. डॉक्टरांनी तपासून इंजेक्शन, गोळ्या दिल्या.
आजी डॉक्टरांना म्हणाली,"डाग्दरांनू, नातसून बघुची इच्छा होती. तीव पुरी झाली माझी. आता कधीव डोळै मिटांदेत."
डॉक्टर हसत म्हणाले,"काययेक जाव्चा नाय तुमका. आता दोनेक पतवंडा येयतागद तरी आरामात टिकशात."
डॉक्टरांच्या या बोलण्यावर सगळीच मनापासून हसली.
पिंकी बारावीला असल्याने आतल्या खोलीत तिचा अभ्यास सुरू होता. मयंक व ज्योच्या निजण्याची व्यवस्था उजव्या बाजूच्या खोलीत मामीआईने केली होती कारण तिथे पलंग होता. पलंगपोस, अभ्रे अगदी नवीन घातले होते. बाजुला एका डिशमधे मालीची केसरं ठेवली होती.
"किती मदहोष करणारा सुगंध आहे रे या केसरांचा." ज्यो ती केसरं हुंगत म्हणाली.
"हो अगं, हितल्या बायका सगळ्याच सुगंधवेड्या, फुलवेड्या."
"ते पाहिलं मी. एवढे मोठे आंबाडे नं त्यांवर फुलांच्या वेण्या, गुलाबं. किती ती हौस! अगदी शेतातली कामं करतानाही केसांत वेणी हवीच."
"भारीच गं लक्ष तुझं. पण थँक्यू, कंटाळली नाहीस इथल्या वातावरणाला. उद्या संध्याकाळी निघू आपण गोव्याला.रुम बुक करतो."
"नको रे. मला इथेच बरं वाटतय.आज्जीला त्यांची नातसून आवडलेय ना तशीच मलाही आज्जी खूप आवडलेय. इन फ्याक्ट ही सगळी माणसं आवडलीत."
"खरंच!"
"अगदी खरं! त्या समोर दिसणाऱ्या चंद्राशपथ."
मयंकने तिला मिठीत ओढलं."चल मग आज्जी एवढी आवडलेय तर तिच्या पतवंडासाठी तयारी करू."
"तुझं काहीतरीच. नीट झोप शहाण्या बाळासारखं."
दोघं एकमेकांच्या साखरमिठीत सामावली. आज्जीच्या पावसासारख्या गप्पा सुरुच होत्या. पिंकीचा अभ्यास, मामांच्या घोरण्याची सुरावट, मयंक व ज्योचा प्रेमालाप यात रात्र सरून गेली. रात्रीचं पांघरुण बाजूला करत उषा आली. मयंक मामांसोबत भात कापायला गेला. ज्योने स्वतः पाट्यावर माशांच्या सारांसाठी चटणी वाटली. हात थोडे भगभगले पण सासूने त्यावर खोबरेल तेल लावून दिलं. पिंकीने कुंदाच्या फुलांचा गजरा ओवून ज्योच्या वेणीत माळला. पिंकीसोबत ज्योने विहिरीवरून पाणी आणलं.
दुपारी मामा नि मयंक शेतातलं डोबकं उपसून मासे घेऊन आले. आमसुलं घालून केलेलं माशांचं तिखलं, तांदळाच्या टम्म फुगलेल्या भाकऱ्या नि उकड्या तांदळाचा भात, मयंक अगदी भरपेट जेवला. ज्योलाही जेवण फार आवडलं. तिने मुद्दाम मामीसोबत राहून मयंकच्या आवडीचा हा स्वैंपाक शिकून घेतला.
मयंक म्हणाला"मामीआई तुला शिकवेल गं ज्यो पण इथल्या पाण्याची, मातीची, नि मामीआईच्या हातांची चव जी आहे ना ती इथे येऊन राहिल्याशिवाय नाही मिळायची."
"हे मात्र अगदी खरं." ज्योने पुस्ती जोडली.
चार दिवस अगदी मजेत गेले. पिंकी अभ्यासात अगदी हुशार होती. तिची बारावी झाली की तिला पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला पाठवायचा मामाचा विचार होता पण विचारायचं कसं या विचारात असतानाच ज्यो म्हणाली,"मामीआई, पिंकीच्या अभ्यासाची तुम्ही एवढी काळजी घेता. तीही मनापासनं अभ्यास करतेय. पण मयंकचीही दादा म्हणून काही जबाबदारी आहे. तिची बारावीची परीक्षा झाली की आम्ही तिला घेऊन जाऊ मग तिच्या शिक्षणाची जबाबदारी आम्हा दोघांची. तिला किती शिकायचं ते शिकुंदेत. तिचा भाऊ आहे तिच्या पाठीशी."
ज्यो हे बोलली नि मामा,मामीआईच्या डोळ्यांत पाणी तरळलं,"ज्यो, सुने भरून पावलो बघ तुझ्या शब्दांनी." मामा सदगदित होत म्हणाले.
"मग, नातसून कुणाचीए!" आज्जी तिच्या बोळक्यातनं गोड हसत म्हणाली.









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा