जावईबापू

 

जावईबापू



©®गीता गरुड.

वैशाखात कुसुम व आशुतोषचं लग्न झालं होतं. आशुतोषसोबत ती घाटकोपरला रहायला आली होती.

कुसुमला दिवाळीसणासाठी माहेरी घेऊन जायला तिचे अण्णा जायचे होते खरे पण कुसुमनेच फोन करून कळवलं,"अण्णांनु, हे दिवाळेक माका घराकडे येऊक जमाचा नाय."

"तुझी आव्स लय आठव काढताहा तुझी."

"तुमचा म्हनना बरोबर असा अण्णांनु पन हयसर सासूबाईचो संधिवात चाळावलो हा. हातीन तांबयोदेखूल उचलूक गावना नाय तेंका."

"मग बाये काय सांगतलय मिया. सासयेची सेवा कर. सावकाश ये.  कवा येतलस ती तारीख सांग. रिजर्वेशन करुक गावात."

"नको अण्णांनु, रिझर्वेशन नको. ह्यांका सुट्टी घेऊक लावतय नि जोड्यान येतव."

"बरा तर मगे फोन ठिवतय. तुझी आव्स शेजाऱ्यांथय गेली हा गजाली करूक, इली काय सांगतय तिका."

अण्णांनी फोन ठेवला. इतक्यात चेडू येणार नाही या विचाराने थोडे नाराज झाले आणि मग स्वतःच्याच मनाची समजूत घालत खळ्यात फेऱ्या मारू लागले.

अण्णांना दोन मुलं. थोरला मुलगा दिपक, वर्ष झालं गोव्यात नोकरीला होता.  कुसुम दिपकपेक्षा दोन वर्षांनी लहान पण मुलीची जात म्हणून नि नेटकं स्थळ चालून आलं म्हणून अण्णांनी चोवीस वर्षांच्या कुसुमचं दिपकच्या आधी लग्न लावून दिलं होतं. कुसुमचा स्वभाव मुळातच कष्टाळू. माहेरी असताना रोज सकाळी उठल्यावर तिचा साजिरा हात फिरला की घर रात्रीची मरगळ टाकून ताजंतवानं होई. अण्णा गावातल्या शाळेत शिपाई होते. थोडी वडिलोपार्जित शेती होती. मागीलदारच्या गोठ्यात जोताचे बैल राजा नं सर्जा, दोन म्हशी रंभा नं मेनका, अशी संपदा होती. आईवडिलांप्रमाणेच कुसुमचाही ढोरावासरांवर जीव होता.

मुंबईतलं सासर नको अशी इष्टदेवास प्रार्थना करूनही कुसुमला मुंबईतलंच सासर मिळालं होतं. जीवावर दगड ठेवून तिने गाव सोडला होता. मुंबईत रुळायला कठीण जाणार असं तिच्या हळव्या जीवाला वाटलेलं खरं पण आजुबाजूचा शेजार अस्सल मालवणी होता. इमारतीतले बहुतांशी सदनिकाधारक एकमेकांशी मालवणीतच बोलत. मोजक्याजणी अजुनही काष्टी साडी नेसणाऱ्या, केसांना गंगावण लावून जाळीचा अंबाडा घालणाऱ्या होत्या. त्यांच्यासाठीच की काय गजरे, वेण्या घेऊन फुलवाला रोज सकाळी हजर व्हायचा. बाया मग फुलांत रमायच्या. वेण्या, गजरे घेताना एकमेकींची ख्यालीखुशाली घ्यायच्या. कुसुमही त्यांच्यात दूधात साखर मिसळावी तशी बेमालूमपणे मिसळत होती.

कुसुमच्या सासूचा स्वभाव तसा भीडस्त, अबोल पण बोलघेवड्या कुसुममुळे शेजाऱ्यांचा राबता त्यांच्या घरी वाढू लागला.

बुधवारचे बांगडे भाजले की ओटवणेकर काकू कुसुमसाठी तांदळाची भाकरी नि बांगड्याचं शेजारपाळं आणून देत तर कुणी गावी गेलं की आवर्जून कुसुमसाठी उकडे तांदूळ,गावठी पोहे घेऊन येई.

कुसुमने शेजारणींच्या मदतीने व सासूच्या निदर्शनाखाली चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, पातळ पोह्यांचा, मक्याचा चिवडा असा दिवाळीचा फर्मास फराळ केला. सासूची फिजीओथेरपी चालू होती. तिच्या तब्येतीत सुधारणा होत होती. कुसुमवर थोडं वाढीव काम पडलं खरं पण कुसुम ते हसतमुखाने करत होती.

तिच्या करण्यासवरण्यात आपलेपणा होता तोच माणसांना तिच्याजवळ आणायचा. अगदी दोन इमारती सोडून तिसऱ्या इमारतीत रहाणारा आशुतोषचा मामाही कुसुमच्या आग्रहाखातर नि तिच्या हातचा गवतीपातीचा चहा पिण्यासाठी, गावाकडच्या गजाली ऐकण्यासाठी चारेक दिवसांनी हजेरी लावायचा. सूनबाई असावी तर गावडेंच्या कुसुमसारखी, बिल्डींगीतली माणसं कुसुमला नावाजत.

भाऊबीजेच्या आदल्या दिवशी कुसुम, नणंदेसाठी व तिच्या चार वर्षाच्या मुलासाठी कपडे घेऊन आली. नणंदेसाठी तिच्या आवडीची छोलेपुरी व गुलाबजाम केले. त्या रात्री बराच वेळ नणंदेच्या व कुसुमच्या गप्पा चालल्या होत्या. नणंदभावजय एकत्र जमल्यात का सख्ख्या बहिणी.. आशुतोष त्यांची थट्टामस्करी करत होता.

दुसऱ्या दिवशी रात्रीच्या गाडीने आशुतोष व कुसुम निघाले. सकाळी तिठ्यावर जेंव्हा गाडी थांबली तेंव्हा कुसुमचे अण्णा तिला घेण्यासाठी कधीचे येऊन बसलेले  त्यांना दिसले. अण्णा बेगा उचलू पहात होते पण आशुतोषने हात लावू दिला नाही.

कुसुम तर अगदी हरखून गेली होती. अण्णांनी तिला मायेने जवळ घेतली. अण्णांचा हात हाती धरून ती पाणंदीतून लगबगीने चालत होती. आडा बाजूला करून खळ्यात येताच नुकतच न्हाऊन ओलेत्या केसांना पंचा गुंडाळलेली तिची आई दारात आली. तिने लेकीजावयाची द्रुष्ट काढली.

कुसुम सगळ्या होवऱ्यांतनं फिरली, मागिलदारी गेली. तिने लावलेला मोगरीचा वेल बराच पसरला होता. गोकर्णाची जांभळी फुलं तिनं मायेनं कुरवाळली, कृष्णकमळांनी तिला जणू विचारलं, आलीस लेकी! तिनेही नजरेने अनुमोदन दिलं. आड्यातल्या जास्वंदीजवळ ती उभी राहिली नं एकवार अख्खं माहेर डोळ्यांत भरून घेतलं. सासर कितीही गडगंज श्रीमंत असलं तरी माहेरचा वारा, माहेराची ऊब त्याचं अप्रुप ते माहेरवाशीणीलाच. कुसुम तेच अनुभवत होती. आई स्वैंपाक करता करता खिडकीतनं लेकीचं वावरणं डोळे भरून पहात होती. एक मन म्हणत होतं,' कुसुम इलस ती रव्ह गो मह्यनोभर.' दुसरं मन तिचं, तिलाच दटावीत होतं,.'असा गो काय सावित्रे, तुझी लेक आसली तरी ती  दुसऱ्याच्या घरची सून. पावणी बनान इलीहा. चार दिसाचो पावणेचार घिऊन जातली आपल्या घराक. खुळी आशा लावू नुको मनाक.'

दुपारची जेवणं मस्त गप्पा मारत झाली. रसखापरोळ्यांचा बेत होता, लेकीच्या आवडीचा. संध्याकाळी जावईबापूंसाठी गावठी कोंबड्याचं सुकं, रस्सा, सोलकढी नि वडे असा चारीठाव बेत होता.

चार दिवस कसे पाखरासारखे उडून गेले. दिवाळसण म्हणून अण्णांनी जावयासाठी शर्टपँटपीस घेतलं. लेकीसाठी आकाशी रंगाची साडी घेतली. जावयाला नि लेकीला तिच्या मामाच्या घरी न्हेऊन आणली, ग्रामदेवतेची ओटी भरून घेतली लेकीकडून.

दुपारी कासारीण आली होती तेंव्हा कुसुमने हौसेनं चारचार बांगड्या भरून घेतल्या.
"ल्हानी व्हतीस तवा कितीसी काकनांची हौस व्हती तुका. नयीन नयीन फेशनची लागायची तुका. हे माका सांगीत तुजी गजाल. आताशी तेंच्या जीवाक बरा नसता ना म्हनान मिया झेपात तसो धंदो करतय. हीच आपली दोनचार आवाटातली घरा घितय. घरातलाव करुचा लागता ना."

कुसुमने कासारीणकाकूला नमस्कार केला. "आता रव्हतलस मा. आयेचा आपरेशन जायतागद."

"म्हंजे. मिया नाय समाजलय काय ता. कसला आपरेशन?"

"गे बाय. तुका सांगल्यानी नाय वाटता. कसले गाठी इले हत न्हय तुज्या आव्शीच्या गर्भपिशीत. मह्यन्यापुर्वी तर जास्तच झालला. आता जिल्ह्याच्या डाग्दराहारी जातत. तेच्या गोळयेन उभ्या रव्हाक लागली तुझी आव्स तरी आपरेशन करुचाच लागतला. तुळशीचा लगीन, शेतीची कामा झाली काय एडमीट होवची हा. तुया भियातलस म्हनान बोलली नसतीत."

कुसुम घरात आली. आई जातं मांडून कुळीथ भरडत बसली होती. "एवढं परकं केलंस मला आई! तुला बरं नाहीए पण एका शब्दाने बोलली नाहीस." काळजातनं आलेले शब्द कुसुमने ओठांतून बाहेर पडू दिले नाहीत.

"कुसुम, जावयबापू बोलवतहत बघ वायच. बेगेबिगे भरा नीट नायतर हडेच कपडे ठेवून जाशात." अंगठ्याच्या नखाने पानाला चुना लावत अण्णा म्हणाले.

कपड्यांच्या घड्या बेगेत भरताना आशुतोषला कुसुमचा रडवा चेहरा पहावेना."कुसुम, अगं वेडे असं काय करतेस! पुन्हा सुट्टी काढून येऊच की आपण किंवा आईअण्णांना तिकडे बोलावून घेऊ काही दिवस. ही शेतीची कामं होऊदेत त्यांची. गुरांकडे बघायला कोणी तरी माणूस ठेवू."आशुतोष तिची समजूत घालत म्हणाला.

"तसं नाहीए आशु. फक्त इथून निघावं लागतय म्हणून मी रडत नाही आहे."

"मग का रडतेस! काय झालंय!" तिच्या गालांवर ओघळलेली आसवं निरपत आशुतोषने विचारलं.

कुसुमने कसेबसे आतून येणारे हुंदक्यांचे कढ आवरले व म्हणाली,"आशू, अरे आईला बरं नाहीए. तिचं ऑपरेशन करायचंय. तिला मासिकपाळीचा जास्त त्रास होतो म्हणून पण याबद्दल ती दोघंही मला काहीच बोलली नाहीत. आशु, आईअण्णांना मी एवढी परकी झाले का? आपण आलो तर भातकापणी चालू असतानाही आपल्याला चांगलंचुगलं करून खाऊ घातलं. दिवाळसण साजरा केला आपला पण मग हे एवढं मोठं आजारपण, तिला होणारा अतिरक्तस्राव, तिचं पांढुरकं पडणं याबद्दल काहीच सांगितलं नाही मला..फोनवरनंनाही की आतासुद्धा नाही!"

"तुला कोणी सांगितलं याबद्दल?

"मघा कासारीणकाकी आली होती. तिच्याकडून कळलं. गेले चार महिने आईला महिन्यातनं दहा दिवस होणारा रक्तस्त्राव, अण्णांची डॉक्टरांकडे धावपळ, घरातली आर्थिक चणचण याबाबत सांगत होती.

कुळदाचं पीठ बेगेत भरण्यासाठी द्यायला आलेल्या कुसुमच्या आईने लेकीचं नं जावयाचं आपल्या आजाराविषयी चाललेलं बोलणं ऐकलं नं पिठीचं गाठोडं जावयाकडे देत तिने लेकीला मिठीच मारली.

"कुसुम, बाय तुया ओगीत गैरसमज करून घेव नकोस हा. मिया बरा आसय. असा रडा नको गे बाय जाताना."आई तिच्या केसांतून बोटं फिरवून तिची समजूत घालत होती.

आतल्या होवरीतली गडबड ऐकून अण्णाही तिथे आले. कुसुम नि तिच्या आईचं बोलणं ऐकून त्यांनाही अगदी भरून आलं तरी उसनं अवसान आणून लेकीला म्हणाले,"अगो बाय, वायचसा किरकोळ आपरेशन असा ता. दोन दिसात सोडतले. तुया ओगीच काळजी करीत रव्हतलस म्हनान तुका कळवूक नाय नि आता चार दिस रव्हाक इललस ता आमचाच रडगाराना कित्याक उगळीत रव्हाचा. तू काय हयली काळजी करू नुको. सुखात रव्ह थय. सासूक जप, घोवाची नि आपली तब्येत सांभाळ. सुखात नांदा. हयली चिंता करू नुको. मिया खमक्या आसय तुझ्या आव्शीक सांभाळूक."

आता मात्र आशुतोषला रहावलं नाही. अण्णांशी तो मालवणीतच बोली. अण्णांना म्हणाला,"अण्णांनु, ह्या तुमचा माका आवाडला नाय. जावय माझो झिलासारो म्हनान अख्ख्या गावाक सांगतास नि दुखलाखुपला तर आमच्यापासून दडवून ठेवतास! आमका परके करतास. अण्णांनु, अवो नाती आसतत कशासाठी? वक्ताक येकामेकाच्या उपेगाक इली नाय तर ती नाती काय कामाची! तुमच्या चेडवान लगीन झाल्यापासना माझ्या आवशीक सवताची आव्स मानून तिची सेवा केल्यान, करताहा. तिच्या धर्मान माझी आव्स संधिवाताच्या दुखण्यातसून भायर येताहा. कोनाचो आधार घितल्याशिवाय चलताहा. आता कुसुमच्या आव्शीक म्हंजे माझ्या सासयेक बरा नाय तर तुमी कुसुमाक घराकडे जा म्हनान सांगतास! तिचा काळीज हडे ठेवून निघात ती माझ्यावांगडा! ता काय नाय, कुसुम आयेक बरा वाटतागद हयसर रव्हतली, हक्कान रव्हतली. अगदी  आईचा आपरेशन झाल्यार एकदीड मह्यनो तिका जोवर आई आता बरी झाली असा वाटात तवसर रव्हतली. आपरेशनची तारीख कळवा माका. दिपकची नयीन नोकरी. तेका सुटी नाय गावाची. मिया येतलय. आपरेशनचा बीलव मिया भरतलय. माझो हक्क असा तो. कुसुम हे कपडे काढून ठेवतो तुझे."

आशुतोषचं बोलणं ऐकून कुसुम, अण्णा, आई तिघांचेही डोळे भरून आले. अण्णांना इतकं भरून आलं की त्यांच्या तोंडून शब्दच फुटेनात. "जावयबापू" एवढेच अस्पष्ट उच्चारत त्यांनी आशुतोषला घट्ट मिठी मारली.

समाप्त


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट