अलक

 




इटुकल्या गोष्टी



©®गीता गरुड.

१.भूक

तो न चुकता दरवर्षी वारीला जायचा,सगळयांना तो विठ्ठलाचा परम भक्त वाटायचा, होता ही तो पण परम दरिद्री.

आषाढीला पंढरपूरला विठ्ठलाजवळ जाऊन तो त्याला मनातलं सांगायचा, "विठुराया..तुझ्यावर भक्ती आहे खूप.. पण पोटाची भूक...मग काही दिवस का होईना सोय होऊन जाते रे वारी मध्ये या पोटाची.. हा माझा स्वार्थ ही  असतो रे तुला भेटण्यामागे ...समजून घेशील  ना पामराला.."

२.काकू

ती कोपऱ्यावरच्या भाजीवालीकडे गेली . 

आज भाजीवालीचा नवरा बसला होता.

 तिने भाजीवाल्या बेबीच्या तब्येतीची चौकशी वगैरे केली व अर्धा किलो वांगी,अर्धा किलो फ्लॉवर, मिरचीकोथिंबीर,गाजर,काकडी,शेवग्याच्या शेंगा एवढी भाजी निवडून त्याला वजन करण्यास स़ागितलं.

एकशेचाळीस रुपये झाले काकू एकशेवीसच द्या काssकू असं त्या भाजीवाल्याने म्हणताच तिने रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला व भाजी न घेताच तिथून चालू पडली.

३.अंग

रीक्षात दोन बाजुला दोन बाया नं मधे तो बसला होता, अगदी पाय फाकवून. 

जरासुद्धा अंग आकसून बसावसं वाटत नव्हतं त्याला.

 त्या दोन्ही कडांना बसलेल्या कसाबसा जीव चोरून त्याची ती घसट सहन करीत होत्या. 




कालचक्र सुरूच होतं. 

आता त्याची मुलगी कॉलेजला जाऊ लागली.

 मुलगी तिसऱ्या सीटवर बसणार तोच त्याला पाय फाकवणारा त्याच्या रुपातला दुसरा कुणी दिसला.

 सिंगल रीक्षा पकड, तो मुलीला जोरात ओरडला.

४.पास

एवढा वीआयपी पास मिळूनही राजाच्या दर्शनाला गेला नाहीस, काय म्हणायचं तुला. आम्ही आरामात दर्शन घेऊन आलो.

 गेले आठ दिवस सासरे आजारी होते रे माझे. एकटेच रहातात, म्हणून मी नि हिने त्यांना आमच्याकडे आणलय.त्यांच्या सेवाशुश्रुतेत ते अकरा दिवस कधी गेले कळलंच नाही.

कदाचित तुला विविआयपी पास मिळाला. तू खरा भाग्यवंत.

५.सासू

विजेचा कडकडाट झाला नं नव्या सुनबाईच्या अंगावर भितीने काटा आला. 

सासू अंगणात पारय ठेवून माजघरात आली. सुनबाईस म्हणाली,"ये बाळा, इथे माझ्या शेजारी बसून रहा. तुझ्या आईने सांगितलय तुला विजेच्या कडकडाटाची भिती वाटते ते. मी आहे नं."

६.दु:ख

तो बघितलास सकाळीच टाईट. कसं काय जगतात ना हे लोक!

अगं, वयात आलेल्या सख्ख्या मुलीने एका कागदावर सॉरी म्हणत जीव दिल्यावर जीवंत तरी असतो का तो बाप!

ज्याची त्याची दु:ख वेगळी.

७.आवराआवर

"कसं काय नानी. आवरली कामं!" वर्हांड्यात बसलेल्या सावरीच्या केसांच्या नानीस तिने सहज जाताजाता विचारलं.

नानीने केसांवरून हात फिरवत म्हंटलं,"अशी आवराआवर होते थोडीच! पसारा असतोच सोबत तरी जाणं आहेच नि मागे परतून पहाणंही आहेच."

८.कौतुक

कामवाल्या मावशीने मालकिणीच्या घरी  सगळ्याना पेढे वाटले. 

मुलगा दहावी पास झाला म्हणून किती आनंदात होती ती!

सारखं मुलाचं कौतुक करत होती, "गुणाचा ओ माझा लेक..पहिल्याच प्रयत्नात दहावी  क्लिअर पास झाला." असं बोलत होती.

मालकिणीला मात्र स्वतःची लाज वाटली.

मुलाने  दहावीत ९०टक्के आणले तरी  तिने त्याच्यावर खूप रागे भरले होती आणि स्वतः तोंड फुगवून बसली होती.

९.भातकापणी

पिवळाधम्म तो पिकांतून सरसरत गेला नं तिच्या अंगावर सर्कन काटा आला. तिची हळदीची काया घामाने डवरली. "अगे बाय, राखणदार तो, गेलो तेच्या वाटेन. तेका घाबरून कसा चलात. हात जोडून नमस्कार कर तेका नि चालव कोयती खसाखसा." थोरली जाव बोलली तशी तिनेही धीर गोळा केला. तो गेला त्या दिशेला हात जोडून तिची कोयती पुन्हा भातकापणी करू लागली.




१०.चेहरा

लाले, आटपलं की नाही तुझं?

 बघायला आलेले पाहुणे ताटकळताहेत सोफ्यावर. येतंच होते पण सतरा जणांनी नाकारलेल्या या निरस चेहऱ्यावर नक्की कोणत्या रंगाचं फाऊंडेशन लावायचं तेच कळत नाहीय गं आई.

११.बोळा

रंग रंग कोणता! बाहेर चिमुकल्यांनी कल्ला केला नि राखाडी ऐकू येताच सगळी मुलं, बरेच दिवस न धुतल्याने राखाडी दिसणाऱ्या चहावाल्या पोऱ्याच्या बनियनला हात लावायला धावली. तो बापडा,त्यांच्याच वयाचा पण जीवाच्या पलिकडे चहाच्या ग्लासांतील चहा सांभाळत होता. जणू त्या बनियनच्या राखाडी रंगाने त्याच्या बालपणाच्या  रंगविश्वावर बोळा फिरवला होता.

१२.शेंदरी

शेंदरी रंग तिच्या फार आवडीचा पण तो ती नेसल्यावर तो अगदी आक्रसून जायचा. तिला फार राग यायचा त्याच्या वागण्याचा. तिला कुठे ठाऊक होतं, लहानपणी समोरच्या झोपडपट्टीत लागलेली आग,त्या आगीच्या हवेला चाटणाऱ्या शेंदरी ज्वाळा त्याच्या मनावर कोरल्या गेल्या होत्या.

१३. खाजगी

आकाशी रंगाचा कुर्ता घातलेला हसतमुख तरुण तिच्यासमोर उभा राहिला. हाय! मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल, तो म्हणाला. तिनेही हात पुढे केला. फ्रेंड रिक्वेस्ट..एक्सेप्ट..वगैरे.  रात्री त्याचाच मेसेज..फार गोड दिसतेस, तुझ्याशी खाजगी बोलायचय वगैरे. त्याच्या मनाच्या आकाशाची व्याप्ती तिला कळली नि तिने त्याला मैत्रयादीतून हाकलला.

१४.माय

तिची सुकन्या आजकाल मित्रमंडळींत आधुनिकतेच्या,बरोबरीच्या नावाखाली सिगारेट फुंकायची, मद्य प्यायची. ती बोलू गेली तर "मम्मा,आता स्त्रीपुरुष दोघं समान आहेत..असं कोणतंच काम नाही जे बाई करु शकत नाही..असं काहीबाही बरळायची..आणि आज महिला दिन म्हणून सुकन्येने तिच्याकडून टोपपदराचं लुगडं नेसवून घेतलं. दोन भुवयांमधे किंचीत वर ठसठशीत चंद्रकोर लावली. कुठल्याशा नाटकात जीजाऊची भूमिका करणार होती म्हणे तिची सुकन्या, सुकन्येची माय विषण्ण हसली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट