मायेचे ऋण

 

मायेचं ऋण



©®गीता गरुड.

अगला स्टेशन विठ्ठ्लवाडी..पुढील स्थानक विठ्ठलवाडी अशी डब्यात सूचना ऐकू आली नि कैवल्यने जीजीला  उतरायचंय म्हंटलं. जीजीने काळ्यापांढऱ्या  केसांवरनं रीतसर हात फिरवला. डोकीवरचा पदर उगीचच अधिकच आवरूनसावरून घेतला. तिची उभ्या सळ्यांवाली प्लास्टीकची पिशवी कैवल्यने आपल्या हातीत घेतली व उतरताना तिला अगदी आपल्या पुढे घेतलं.

हिरव्याकंच काकणांनी भरलेले गोंदीव हात, कपाळाला ठसठशीत लाल चिरी,  नाकात मोत्याची नथ, डोळ्यांवर चष्मा असुनही जीजीच्या डोळ्यांतील भांबावलेले, निस्पृह; निरागस भाव सहजच कळत होते. कैवल्यने तिचा हात घट्ट धरला. रेल्वेस्टेशनचा जीना उतरून रस्ता क्रॉस करून बाजारात आल्यावर तिला साडीच्या दुकानात घेऊन गेला.

"हयसर कित्याक रे?

"तुझ्यासाठी लुगडी घेवया दोन."

"खेका व्हयी! हत ती बस झाली."

"जीजी, मिया म्हनतय म्हनान घी."

दुकानात गाद्यांवर पांढऱ्या बेडशीट अंथरल्या होत्या. त्यांवर कैवल्यने जीजीला बसवलं. दुकानदाराने बारीक नक्षीची सुती लुगडी आणून तिच्यासमोर ठेवली. हिरवा, लाल, पिवळा, जांभळा, मोरपंखी..नानाविध रंगांतली लुगडी पाहून जीजी सुखावली. नवरा अचानक गायब झाल्यापासनं तिने रंगीत लुगडी नेसली की बाया तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पहायच्या. जीजीला फार वाईट वाटायचं. आता मात्र तिने जांभळ्या रंगावर पिवळी खडी असलेलं व डाळींबी रंगावर पांढरे ठिपके असलेलं अशी दोन लुगडी घेतली.

कैवल्यने पैसे दिले नि रीक्षा करून तिला घरी आणलं. दोनच खोल्यांचं घर पण कसं प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवली होती.

कैवल्यने स्टोव्हवर पाणी गरम केलं व जीजीला आंघोळीसाठी ओतून दिलं. त्याने तोवर चहाला आधण ठेवलं.

तो भूतकाळात रमला. नजरेसमोर पुर्वीचे दिवस आले. आईबापाविना तो मामाकडे वैभववाडीत रहायचा खरा पण मामाच्या चार पोरांत अडचणच ठरला होता.

जीजीचे यजमान तात्या, कैवल्यच्या मामाकडे काही कामाकरता गेले असता त्यांना कैवल्य भांडी घासताना दिसला. त्यांना दया आली त्याची नि मामांना विचारून करीरोडच्या आपल्या खोलीवर घेऊन आले.

अरूंदशी खोली, वरती माळा, बाहेर सारवलेला ओटा त्यापुढे अरूंद बोळ, त्या बोळातून सतत लोकांचा राबता. मामाच्या ऐसपेस घरापेक्षा जीजी नि तात्यांच हे इवलसं घरकुल त्या बालजीवाला आवडलं. आईच्या मायेला पारख्या झालेल्या त्या निष्पाप जीवाला जीजीने आपल्या पदराखाली घेतलं. त्याला शाळेत घातलं.

तात्या मिलमधे कामाला होते. तुटपुंज्या कमाईत जीजी संसार चालवीत होती. ध्यानीमनी नसताना, कोरड्या कुशीच्या जीजीला कैवल्यच्या निमित्ताने मात्रुसुख उपभोगता येऊ लागलं. कैवल्यसोबत पालकसभेला जाताना जीजीला कोण आनंद होई. कधी शाळेची पायरीही न चढलेल्या तिला शाळेचं कोण अप्रुप! कैवल्य येण्याआधी कुणा शाळकरी मुलाकडे ती बघत राहिली की त्याची आई संशयाने तिच्याकडे पाही. शाळेजवळ जाऊन उभी राहिली तर वॉचमन हाकलवे पण आता कैवल्यच्या धर्माने तिला उजळ माथ्यानं शाळेत जाता यायचं. बाकीच्या आयांसोबत आपल्या मुलासंबंधी  बोलता यायचं.

कैवल्य एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जात होता. सर सर उंच होत होता. वयाच्या मानाने मोठाच दिसायचा. समजही लवकर आली होती त्याला. जीजीला वाणसामान आणून देणं, हिरवा मसाला आणून देणं, घरात केर काढणं, कपबश्या विसळणं अशी कामं न सांगता करायचा. सगळं आलबेल चाललं होतं पण कैवल्य दहावी झाला नि तात्यांचे पुतणे खोलीवर येऊ लागले. येताना तात्यांसाठी फळं, कपडे घेऊन यायचे. "हयसर काय ठेवलाहा तात्यांनू. गावाक चला. आमचो बापूस गेलो. आता तुमीच आमका तेंचेजागी. आमच्या पाठीशी उभे रव्हा." पुतण्यांनी तात्यांवर मायेचं जाळं फेकलं नि तात्या त्यात पुरते अडकले. जीजीने लाख समजावूनही ऐकेनात. पुतण्यांच्या नादाला लागून मिलमधली नोकरी सोडली. जीजीला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती पण त्याहूनही जास्त काळजी तिला कैवल्यची वाटत होती. तात्या, खोली विकून जीजीला घेऊन गावी निघून गेले. वडिलोपार्जित घराची डागडुजी केली व सख्ख्या पुतण्यांसोबत राहू लागले, शेती करू लागले.

कैवल्यला सोडून येताना जीजी जणू आपलं काळीजच सोडून आली होती. कैवल्य पुढे छोटी मोठी कामं करत शिकला. चाळीत कुणाच्याही ओट्यावर पथारी पसरून झोपे. कॉलेज नि उरलेल्या वेळात एका वकीलाकडे मदतनीस म्हणून जात असे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली त्याने वकीलीची परीक्षा दिली नि काही वर्ष त्यांच्या हाताखाली काम करून आता स्वतंत्र प्रेक्टीस करत होता.

तात्यांकडे पैसे असेपर्यंत पुतण्यांनी त्यांना जेऊखाऊ घातलं. बैलजोडी घ्यायची झाली..तात्यांनू पैसे व्हये, मुलांचा जन्मदिवस साजरा करायचा झाला..तात्यांनू पैसे व्हये. तात्याही सढळ हस्ते हाती असलेली पुंजी खर्च करत होते. "म्हातारपणात पुतणेच बघतले. तेंका खूष ठेवूक व्हया," तात्या म्हणायचे पण हळूहळू तात्यांकडची गंगाजळी लयास जाऊ लागली आणि तात्यांना पुतण्यांचं खरं रुप दिसू लागलं.

पुतण्यांनी सुकलेल्या जखमेवरची खपली ओढून काढावी तसं कधीचं जुनं भांडण उकरून काढलं. तात्यांना पडवीत जाऊन रहा म्हणून सांगितलं. तात्यांना अरेला कारे करता येत नव्हतं. आपणच डागडुजी केलेल्या घराच्या पडवीत त्यांना संसार थाटावा लागला. पुतणे ते पुतणे, त्यांची आईही तात्या नि जीजीला नजरेने बघिनासी झाली. पुतण्यांच्या बायका जीजीला दोन दुडी पाणी आणून देईनात झाल्या.

ज्या पुतण्यांसाठी ते घरदार विकून गावी आले होते त्यांनी असा दगा दिल्याने तात्या पुरते ढासळले. ते स्वत:शीच बोलत बसत. जीजी त्यांना समजवे,"आपुन दोघा आसव एकामेकाक. आपलो कैवल्य असा. तेका पत्र धाडा. त्यो येऊन घेऊन जाईत आपनाक." पण तात्या एक नाही की दोन नाही.

एकदा जीजी उठायच्या आधीच तात्या कुठे निघून गेले. जीजी सैरभैर झाली. जीजीने पुतण्यांकडे अजिजी केली,"तुमचो चुलतो रे तो. रक्ताचा नाता. शोधा तेंका,उपकार होतीत माज्यार." पण पुतण्यांनी हात वर केले. "शोधूक जाव्चा म्हंजे पैशे व्हये ते खयसून हाडुचे. आमची कामा कोन करतलो. आमका प्रपंच चालवुचो हा. पोराटोरांवाली मानसा आमी. काम नाय केला, तात्यांका हुडकीत गाव मारत बसलाव तर पोटा कशी भरतली घरातल्यांची.." अशी कारणं देऊ लागले. जीजी बिचारी हवालदिल झाली. तात्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली. कसेतरी दिवस ढकलत होती. तात्या कसे आसतीत, काय खातपीत आसतीत, काय दशा झाली आसतली तेंची..विचाराने तिच्या मुखात घास जाईना.

जीजीने शेवटी गावाकडे आलेल्या एका चाकरमान्याकडे कैवल्यला निरोप पाठवला,"आसशीत तसो ये." नि कैवल्य एका हाकेसरशी हातातली कामं टाकून जीजीच्या गावी हजर झाला होता. तात्यांचं अचानक गायब होणं, जीजीचं खचून जाणं पाहून त्याचा जीव हळहळला नि तो जीजीला  विठ्ठलवाडीला आपल्या घरी घेऊन आला.

जीजी न्हाऊन, नवीकोरी साडी नेसून बाहेर आली. तिने अंगभर पदर घेतला. आपली लाकडी फणेरी उघडून तिनं आरशात बघत केस विंसरले.  कुंकवाची चिरी रेखली कपाळावर . कैवल्य बघत होता, जीजीचा ठाम विश्वास.

तिच्या मते तात्या नक्की होते कुठेतरी आणि नक्की तिला भेटणार होते. जीजीला चहा देत कैवल्यने मनाशी खूणगाठ बांधली, जीजीच्या हक्काच्या माणसाला जिथे कुठे असतील तिथून शोधून आणायचं नि या दोघांना जीवापाड जपायचं. पैसा काय आयुष्यभर कमवायचाच आहे पण ही मायेची माणसं, पैशाहून लाख मोलाची यांना जपायचं. तात्यांवर राग धरण्याचा प्रश्नच नव्हता कारण लहान असताना मायेच्या सुखाला वंचित झालेल्या त्याला तात्यांनी रहायला ऊबदार छप्पर दिलं होतं.

काही निर्णय त्यांनी भावनेच्या भरात घेतले नि बिचारे आपल्याच भाऊबंदांकडून फसवले गेले पण फसलेल्या, आत्मविश्वास हरवेल्या तात्यांना परत आणून जीजीच्या स्वाधीन करून त्या दोघांच्या मायेचं ऋण त्याला चुकतं करायचं होतं.

गेलं एक वर्षभर तो पोलीसचौकीत खेपा घालत होता. विविध वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन तात्यांना शोधत होता. तात्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.

कैवल्य तात्यांना शोधून थकला पण जीजी मात्र कैवल्यच्या घरी आल्यापासनं व्यवस्थित राहू लागली होती. रोज सकाळी न्हाऊन आपली फणेरी घेऊन बसे. कंगव्याने भांग पाडून दोन्ही खांद्यांवर केस पुढे घेई. गुंता सोडवून सगळे केस मागे घेऊन आरशात बघत विंचरत राही. अगदी घट्टसा अंबाडा बांधून होईतो चाळीतलीच शेजाऱ्यांची मनिषा तिला गजरा आणून देई. जीजी गजरा डोईत माळेस्तोवर तिच्याकडे बघत राही.

मनिषाचं कैवल्यवर प्रेम होतं पण कैवल्य जाणूनबुजून तिच्याकडे दुर्लक्ष करी. त्याला आधी तात्यांचा शोध घ्यायचा होता आणि तो लागत नसल्याने मनिषा दिसली की तो आपली चिडचिड तिच्यावर काढी. उगाचच तिला डाफरे पण ती कैवल्यचं मन जाणत होती. कैवल्य कितीही फटकून वागला तरी तो यायच्या वेळेला हजर व्हायची. कैवल्यकडे बघत म्हणायची,"जीजी, तुझ्यासाठी गोलमोकांदो नि भाकरी हाडलय गे. आवाडता ना तुका."

जीजी म्हणे,"माज्या बाय गळ्याक खेपता गोलमो.  ओट्यार ठिव. कैवल्य खाईत जेवताना."जीजी असं म्हणताच मनिषा खुदकन हसे. हसली की तिच्या गालावर एखादं नाणं रुताव एवढी खोल खळी पडे. 

जीजीला चाळीत सगळे मानत होते. एक ना एक दिवस जीजींना त्यांचे कारभारी नक्की भेटणार, चाळीतल्या बाया म्हणायच्या ते ऐकून जीजीचं काळीज सुपाएवढं व्हायचं.

चाळीतील एक शेजारी पंढरपुरला विठुमाऊलीच्या दर्शनाला गेला असता त्याला तात्या दिसले, ते जीजीने त्यांच्यासाठी विणलेली गुलाबी, जांभळ्या फुलांची शाल त्यांनी पांघरली होती म्हणून ओखळता आलं.

तात्यांची अगदी रया गेली होती. खोल गेलेले डोळे, विटकी पैरण, खाकी चड्डी नि हातात भिक्षापात्र..शेजाऱ्याने कैवल्यला फोन लावला. कैवल्य  जीजीला घेऊन निघाला. जीजीचा जीव नुसता धाकधुक होत होता आणि गाडी थांबताच समोर आपल्या माणसाला बघताच 'माजो पांडुरंग भेटलो', म्हणत जीजीने तात्यांचे पाय धरले. तात्यांनी ओळखलं जीजीला, आपल्या कारभारणीला नि त्यांच्या गालांवरनं आसवं वाहू लागली.

कैवल्यने विश्रामगृहात न्हेऊन तात्यांना न्हाऊ घातलं, त्यांची दाढी केली, त्यांना नवाकोरा सदरालेंगा घातला. जीजीने हौसेने शेवंतीची वेणी मागवली व अंबाड्यावर माळली. दोघांनी जोडीने विठोबारखमाईचं दर्शन घेतलं कैवल्यने विठोबारखमाईला साष्टांग नमस्कार केला. तात्या व जीजींच्या हस्ते भाविकांना व तेथील तात्यांच्या सोबतीला होते त्या सर्व मंडळींना कैवल्यने जेवू घातलं.

आपल्या हक्काच्या, मायेच्या माणसांना घेऊन कैवल्य घराच्या वाटेने निघाला. मनिषा त्यांची वाट पहात होती, डोळ्यात प्राण आणून. कैवल्यने स्वत:हून मनिषाला फोन लावला. "मनिषा, जेवान करून ठेव तात्या सापडले. तेंच्या आवडीची सोजी कर नि डाळभात, बटाट्याची भाजी आणि.."त्याचं वाक्य पुरं करत जीजी म्हणाली"आणि चार पुरये काढूक सांग मनषाक. हेन्का आवाडतत. होनाऱ्या सुनबायच्या हातचे लयच भारी लागतले."

मनिषा हे ऐकून कशी लाजली असणार हे कैवल्यच्या मन:चक्षूंनी अनुभवलं व तो गालाल्या गालात हसला. तात्या व जीजींची सूनबाई आता लवकरच घरी येणार होती. कैवल्यलाही मनिषाचे वेध लागले होते. मायेच्या माणसांनी, मायेचा माणूस आपलं कुटुंब साकारणार होता.

समाप्त


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट