पाठचं भावंड

 

पाठचं भावंड




©®गीता गरुड.

दिवाळी झाली तशी पाचसहा दिवस अजून सुट्टी असल्याने सासूबाईंनीच पल्लूला आईकडे तळकोकणात जाऊन ये म्हणून सुचवलं. "आम्ही दोघं करू दोन वेळचं आमच्या पुरतं जेवण, खालच्या पोळीभाजी केंद्रातून पोळ्या घेऊन येऊ,श फिरून येताना, पण तू जाऊन ये चार दिवस. माहेरसूख उपभोगून ये बाई." सासूचं असं समजुतीचं बोलणं ऐकून पल्लूनेही जायचं नक्की केलं. नेहमीची ऑफीसची कटकट, लेकीच्या शाळेतला तिला न पेलवलणारा अभ्यास, मोठाले प्रोजेक्ट्स जे आयांनीच करायचे म्हणून की काय दिले जातात या सगळ्या धबडग्यात सासूच्या समजुतीच्या शब्दांची शाल तिच्या अंगाखांद्यावर रुळायची, ऊब द्यायची. तेवढं एक सुख होतं खरं.

पल्लू लेकीला रेशमला घेऊन गाडीत बसली. रेशम नाव खरंतर शाळेपुरतं. इकडची आज्जी तिला गोदाबाई म्हणायची. गोदाबाई म्हणजे इकडच्या आज्जीची सासू जी फार कडक होती. आपलं तेच खरं करायची. चार वर्षाच्या रेशमचा कारभारही तसाच होता म्हणून लाडाने आज्जी म्हणायची,"जीवंत असताना गोदाबाईंनी सासूरवास केला तो कमी की काय म्हणून नातीच्या रुपात पुन्हा प्रकटल्यात. हात धुवून मागे लागल्यात जणू..रामा रामा परमेश्वरा..असं बोललं की रेशमही कमरेवर दोन्ही हात धरत किंचीत वाकत रामा रामा परमेश्वरा म्हणायची नं तोंडावर हाताचा तळवा ठेवत खुदूक खुदूक हसायची.

गाडीत बसताच रेशमने मामाला फोन लावला. "मामा,आमी येतोय तुमच्याकडे, आज्जीला सांग. सगळ्यांना सांग. सकाळी न्यायला ये स्टेशनवर."फर्मानच सोडलं नं मामाही नाटकीपणाचा आव आणत,"जशी आज्ञा भाचीसरकार,"म्हणाला तशी रेशम पुन्हा खुदूक हसली.

खिडकीतनं येणारी थंड हवा लागताच ती झोपी गेली ते थेट,"गो छबुकडे, मामाचो गाव इलो. उठ मा गो,"अशी मामाची हाळी ऐकू येताच तिने डोळे किलकिले केले. मामाच्या गाडीतनं ती केंव्हाची आली होती नं आता आज्जीच्या मांडीवर विसावली होती.

"आई गं, आपण ट्रेनमधे होतो ना. कुठे गेली ट्रेन?" असं म्हणताच तात्याआजोबांसह सगळे एकसाथ हसू लागले. मग तिला आईने ती कशी उठत नव्हती नं मामाने तिला खांद्यावर उचलून घेऊन कसं गाडीतनं उतरवलं, मामाच्या गाडीतही ती कशी कुंभकर्णासारखी झोपून होती हे सांगितलं तसे तिने डोळे मिचकावले. मामाने रेशमला नं तिच्या गणुदादाला घंगाळात ओतलेल्या ऊन ऊन पाण्याने न्हाऊ घातलं.

शेजारपाजारची सारी येऊन पल्लू कवा इलस? जावयबापू बरे आसत मा? चेडू मोठा झाला गो? कितयेत जाता? असे प्रश्न विचारून जात होती.

"छबुकडे ये गो दादाक घेऊन. बसा हय चुलीजवळ. चाय नि फॉव खावा." असं आज्जीने बोलवताच रेशम उर्फ छबुकडी दादासोबत चुलीजवळ जाऊन बसली. बशीतल्या पोह्यांवर आज्जीने गरम गरम चहा ओतला. थोड्याच वेळात ते मऊ झाले. गणुदादाचं बघून छबुकडीही गोडगोड मऊमऊ लालपोहे खाऊ लागली.
"बघ गं आई, तिकडे घराकडे कित्ती नखरे हिचे! केलॉग्सच पाहिजे नं ब्रेडबटर पाहिजे. त्या आज्जीला सतवते नुसती. नि इथे शहाणाबाईसारखी घुसुघुसू पोटात ढकलतेय पोहे."

"गो कित्या त्याची कळ काढतहस. पॉर ता पॉरावांगडा खातलाच. थय एकटा आसता म्हनान नखरे करून देखवता वायच." आज्जीने नातीची बाजू घेतली.

गणुदादा म्हणाला,"छबुकडी, माझ्यासोबत नदीवर चल. मी पोहायला शिकलोय. तुला दाखवतो." छबु खुदकन हसली.

मामा त्या दोघांना मग नदीवर घेऊन गेला. तिथे गणुदादाचे सहासात मित्रही होते. सगळे मिळून नदीत सूर मारत होते. कोण उताणं पोहत होतं तर कोण मधेच पाण्यात डुबकी मारून गायब होत होतं. छबुने त्या जागी पहावं तर दुसरीकडूनच वरती येत होतं.

तिने धीर करून पाण्यात पावलं टेकवली. इवलेइवले मासे तिच्या पायापाशी गोळा झाले नं तिला हुळहुळल्यासारखं वाटू लागलं. मज्जाही वाटत होती. काहीतरी वेगळंचसं. ती तशीच बसून राहिली. मामा कुठे कुठे जाऊन खेकडे पकडत होता.

उन्हं वर चढली तशी सगळीजणं  घरी आली.
मागल्यादारी छबुची आई केळीखाली असलेल्या पाथरीवर कपडे धुवत होती. मागल्यादारच्या ओट्यावर आज्जी मसाला वाटत होती.

मामाने ते खेकडे एका टोपात घेतले. एक खेकडा असाच सोडला. तो इकडेतिकडे फिरू लागला तसं त्याच्यामागून छबु नं गणुदादा दोघं हिंडू लागले.
"ताई पोरगी लय डेंजर हा तुझी. असा एवढुशी पावलीएदी पण भिना नाय कोनाक." असं ताईला सांगत मामा खेकडे साफ करू लागला. डेंग्यांचे दात बघून छबुला आश्चर्य वाटलं.

आज्जी ते सगळं मटेरियल फोडणीला टाकेस्तोवर छबु तिथेच बसली. तिच्यासोबत गणुदादाही. गणुदादाच्या हातात मांजर होती, मऊमऊ. छबुनेही तिच्या मऊशार कातडीवर हात फिरवायचं धाडस केलं.
"लाव बिनधास्त हात तू. आपलीचै. चावतबिवत नै." असं म्हणल्यावर छबुने तिला आणखी जवळ घेतलं. तिही अगदी जुनी ओळख असल्यासारखी छबुच्या जवळ बसली.

आज्जीने खेकड्यांचा रस्सा एका वाडग्यात काढला नि छबुला म्हणाली,"छबु ये. मामीकडे जावया चल."
नेहमी आल्याबरोबर मिठीत घेणार मामी अजूनतागायत छबुला दिसलीच नव्हती. तिही फ्रॉकचं टोक एका हाताने धरत आज्जीसोबत उजव्या बाजूच्या खोलीत गेली.

आज्जीने मामीला उठून बसवलं.
"काय झालंय मामीला?" छबुने विचारलं तसं मामी खुदकन हसली.
"अगो, गणुदादासाठी बहीण हाडली हा मामीन." रस्स्याचं वाडगं सुनेकडे देत आज्जीने लाकडी पाळण्यातलं इवलुसं बोचकं उचलून घेतलं.
"हे कुणी आणलं? कोणाचंय हे?" छबुला काही कळेना. गुलाबी गुलाबी गाल, इवलेसे मिचमिचे डोळे, काडीसारखे हात तसेच पाय, गुलाबी गुलाबी पावलं. छबु तिच्याकडे बघतच राहिली. गणुदादाने बाळीला मांडीवर घेतलं. आज्जीने तिचं दुपटं बदललं.

"छबु अशी बघतेस काय. अगं आपली लहान बहीण आहे ही."गणुदादाने पुस्ती जोडली. गणुदादाने छबुचं बोट बाळीसमोर धरलं तसं बाळीने हुकार देत आपल्या इवल्या पंज्याने ते गच्च पकडलं. छबुला सगळी गंमतच वाटत होती. गेल्या वर्षी मामी तिला उचलून घेऊन कुठे कुठे फिरवत होती, दळण दळीत होती, सारवण करत होती, पाणी शेंदत होती आणि आता मात्र मामी बसून होती आणि तिच्या बाजूला एक अजून नवंकोरं बाळ? हे आणलं कोणी? विचारायचं कोणाला? कुठे मिळतात अशी नवीकोरी बाळं? नाना प्रश्न इवल्याशा डोक्यात फिरू लागले.

दुपारी उन्हं उतरल्यावर गणुदादा, छबुची आई सगळे आज्जीसोबत मागिलदारी गेले. मामी तिथे बाळाला घेऊन आली. बाळीची तेलाने चांगलीच चंपी केली होती. आज्जीने साडी वर खोचून घेतली नं आंबेहळद, बेसनाचं ओलं पीठ बाळीच्या गालाला,पोटावर,छातीवर रगडलं. ऊन ऊन पाण्याने तिला न्हाऊ न्हाऊ घातलं. बाळी अगदी लालभडक झाली. मधेच झोपून जायची मग आज्जी तिला गोग्गोड बोलून उठवायची.

मामीने तिला आज्जीच्या साडीच्या फडक्यात घेतलं. मग मामाने बाळीला ओव्याधुपाच्या धुरीवर उलटंपालटं धरलं. किती सुरेख तो गंध! छबुला खूपच आवडला. बाळीला एका लांबशा फडक्यावर ठेवून तिचे हात आतील बाजूस घेऊन मस्त गुंडाळून बांधलं, छानसं टोपरं डोक्याला बांधलं नं मामीने तिला आईदुधू दिलं म्हणजे बाळीला वाटीने दूध पिता येत नाही तर..बरंच काही छबुला नव्याने समजत होतं.


बाळी थोडा वेळ गाई करून उठली तसं मग मामीने तिला पाऊ लावली. त्या पाऊचा गंधही किती सुरेख,हवाहवासा. मामीने काजळाची तीठ तिच्या कपाळावर, गालावर लावली. तिला छानसं झबलं घातलं. छबुला बाळी खूपच आवडली. दोन दिवसांनी बाळीचा नामकरण विधी होता.
छबु नि गणुदादा आमंत्रण द्यायला गावभर फिरले. मामाने तालुक्याच्या मोठ्या दुकानात छबुच्या आईला, मामीला, आज्जीला साड्या घेतल्या. गणुदादासाठी झब्बा, लेंगा घेतला. छबुसाठी फुलाफुलांचा चुणीदार फ्रॉक घेतला. आजोबांसाठी नं त्याच्यासाठी एकाच रंगाचे झब्बे घेतले. घराला रंगीत दिव्यांनी फुलांनी सजवलं. दारात रांगोळी काढली. बर्फ्यांचे खूप सारे पुडे आणले, पोह्यांचा चिवडा आणला. सगळी पाहुणेमंडळी जमली.

छबुचे सारीजणं लाड करत होती."छबुचे पाठीरव याक भावांड जाव्क व्हया,"असं छबुच्या आईला सुचवत होती. जिलबीचं जेवण, बर्फी, चिवडा, मधेच मामासोबत जाऊन आईसकँडी खाणं अगदी धमाल चालली होती. बाळीचं नाव सोनम ठेवलं.." रेशम नं सोनम माझ्या दोनदोन बहिणी, जशा अंगणात फुलल्या जाईजुई" कुणीतरी सुचवलेलं गाणं गणुदादा सुरात गात होता.

रात्री बाळीला आलेल्या लाल वेष्टणातल्या भेटवस्तू बघणं चालू होतं. चांदीचे नाजूक पैंजण, सोन्याची चेन,  इवल्याइवल्या रिंगा..किती छान छान सगळं. एक बाहुली पण आलेली, जांभळ्या फ्रॉकाची, लालचुटूक ओठांची, निळ्या डोळ्यांची. मामीने ती उचलून छबुच्या फ्रॉकात ठेवली."
छबु, ही तुझ्यासाठी." छबु बघतच राहिली.
"अगो खरंच घे. बाळीला अजून बाहुली वगैरे कळतय कुठे! ती मोठी झाली  तुझ्याएवढी की तुम्ही आणा तिच्यासाठी अशीच बाहुली."

"मामी तू किती चांगलीएस,"असं म्हणत छबुने तिचा गोड पापा घेतला.

छबुचे बाबा त्या दोघींना न्यायला आले. छबुचं तोंड एवढुसं झालं. बाळीला सोडून तिला खरंच जायचं नव्हतं.

ती मामीजवळ गेली."मामी ही भावली ठेव तुझ्याकडे. मी तुझी बाळी घेऊन जाते. तिला मुळीच रडू देणार नाही. प्रॉमिस." छबुच्या या अजब मागणीवर मामीला हसावं की रडावं तेच कळेना. मामीचे डोळे भरून आले.

"तसं नाही गं करता येत सोन्या. बाळीला आईदुधू लागतं ना. ती कशी राहील मला सोडून."

"मग तू पण चलतेस का?"

"गणुदादाची शाळा आहे ना. मी येऊन कसं बरं चालेल!"

आता मात्र छबु रडवेली झाली. तिने शेवटचा पत्ता टाकला,"अगं मग मामी कुठून आणलंस बाळीला त्या दुकानाचं नाव तरी सांग. मी सांगते आईबाबांना माझ्यासाठीपण आणायला एक भावंड."

तिथे छबुचे आजोबा, बाबा, मामा सगळेच उपस्थित होते. छबुच्या या गुगलीवर मामीला कुठे तोंड लपवूसं झालं.
शेवटी छबुच्या आज्जीने छबुला जवळ घेतलं नं म्हणाली,"छबुकडे माझा वायच आयक्शीत,मिया तुझ्या आईबाबांच्या कानात दुकानाचा नाव सांगून ठेईन पण पैसे देऊन बाळी गावत नाय. बाप्पाचा दुकान असता ता. नंबर लागूक येळ लागता तवा शान्या बाळासारा वागुचा. तुया शान्या बाळासारा वागलस तर तुका बेगिन भावंड गावतला."

छबुने बरचसं समजल्याच्या आविर्भावात मान हलवली व आजोळच्यांना टाटा केला. घरी आल्यावर छबु उर्फ रेशम उर्फ गोदाबाईची प्रश्नमंजुषा पल्लूने सासूला सांगताच सासूची हसूनहसून मुरकुंडी वळली.

छबुने मात्र शाण्या मुलीसारखं वागायचं ठरवलं. पाठचं भावंड पायजेल तर बाप्पाच्या दुकानात लवकर नंबर लागला पाहिजे म्हणून.

--समाप्त


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट