नातवाची माया

 नातवाची माया



©®गीता गरुड.


गावात थंडी वाढू लागली. पहाटे तर कौलातसून थंडी आली. त्यामुळे बाबूला जोराची शू लागली.  बाबू बाहेर आला. खळ्याच्या पेळेवरून थोडा पुढे गेला नी जासनीला पाणी घालत होता तर त्याला फटाके उडवल्याचा आवाज ऐकू आला. तिथे फडतरीवर बाबूची आई तंबाखूची काळी मशेरी दातांवर चोळीत बसली होती.  चुळ भरायला तांब्यात पानी घेतलं होतं. 


बाबू आयेजवळ गेला.


"गे आये दिवाळी सोपली ना."


"होय तर देवदिवाळीव झाली."


" मग गे फटाके कसे वाजतहत?"


"अरे तो तुझो मित्र असा ना सचलो नह्यजवळचो..तेची आजी वारली."


"कशान गे आये?"


"म्हातारा मानूस. थंडी लागली आसतली.  हातपाय धरतत.  लाकडासारे हुतत मगे गचाकतत."


बाबू हात धुवून त्याच्या आजीच्या खोलीत गेला. आजी 'आये गे' करीत होती.


"आजी ए आजी"


"काय रे माज्या वासरा?"


"तुका बरा नाय वाटत हा काय?"


"अरे लेकरा, हे थंडीन आंगमास निसता फुटताहा. हातापायान वडी येतहत."


"आजी तुझा बुरनूस फाटलाहा.  तेतुरसून थंडी आत घुसत असतली."


"होय रे.  झाली मोप वरसा ते बुरनुसाक. तुझ्या बाबाचे जन्माअगुदरचाहा ता. तेचाव आयुक्स सरत इला आता."


" आजी तुझा सिवेटर खय हा?आयेक धुवून देऊक सांगतय."


"रे माजे सोन्या,तेतूर काय धुतहस!  हुंदरांनी चाळण केली हा तेची.मरांदे माझेव आता असे कितीसे दिस रवले हत."


बाबूला फार वाईट वाटलं.  आजी म्हणजे बाबूचा जीव की प्राण होता. आयेची साद आली तसा बाबू तिथून उठला नी न्हायला गेला.


बाबू कडकडीत पाण्याने न्हाला नी चुलीजवळ जाऊन धगाला बसला. दोन मांजरं तिथे धगाक बसली होती. बाबूने त्यांना मांडीवर घेतलं.  आयेने बाबूला चहा नी घावणे दिले. बाबूची आये भिड्यावर घावण्याच्या पीठाचं पांढरंधोप पाणी घाली तस चुर्र चुर्र आवाज येई.  बाबू काहीच खात नाहीसा दिसल्यावर आये त्याच्यावर करवादली. "बाबू बेगिन खा रे शाळत जाऊक व्हया मा." 


बाबूने आयेला विचारलं.


"आये त्या सचल्याच्या आजयेसारी माझी आजीव जातली?"


"नाय रे झीला नाय जावूची इतक्या बेगिन. पयली माका पोचवतेली मगे जातली.  कायच तिच्या मनाक येना नाय आजकल. चाय न्हेऊन दिलय ती लय गॉड झाली तिका. खाल्यान नाय. चटनी वाटूक सांगताहा आंब्याची."


बाबूने दप्तर घेतलं नि शाळेत गेला.  शाळेत बाईंनी बाबूच्या चित्रकलेचं कौतुक केलं. शाळेतून येताना नदीच्या कडेने बाबू नी बाबूचे मित्र चालले होते . बाबूने दहावीतल्या अज्यादादाला विचारलं.


"अज्यादादा माका माझ्या आजयेसाठी येक बुरनूस नी येक गरम अंगातला घेवचा हा. किती पैसं लागतील रे?"


"अरे बुरनुसाक तीनशे नी गरम अंगातल्याक तीनशेतरी व्हये.  आयेक हाडूक सांग मरे तुझ्या."


"तसा नाय रे दादा.  माझी आजी म्हातारी होयत इली हा म्हनान माझ्या कष्टाच्या पैशान माका तिच्यासाठी हे दोन वस्तू तरी घेवचे आसत."


" मग तिया आसा कर बाबू.  तुका चित्रकला चांगली येता.  तुया हयसरले गुळगुळीत गुंडे दप्तरात भरुन घिऊन जा नी स्वच्छ धुवून सुकव.  मगे एक्रेलिक रंग हाड. ब्रशतर तुझ्याजवळ आसतच.   गुंड्यांवयनी पयलो पांढरो रंग दी. त्यो सुकलो काय पेन्सनने तेच्यार चित्र काढ नी रंगव.तसाच प्लायवुडाकव चाकलेटी रंग मार नी तेच्यार वारली चित्रा काढून सफेद रंगान रंगव."


अज्यादादाने बाबूला त्याच्या घराकडे न्हेलं नी त्याला स्टोन पेंटींगचा, वारली पेंटींगचा व्हिडीओ दाखवला. आपली गणपतीची भींत रंगवायला आणलेली एक्रेलिकची रंगपेटीही  अज्यादादाने बाबूला दिली  पण बाबू ती पेटी घेईना. 


बाबूने नदीवरचे गुळगुळीत गोटे म्हणजे गुंडे दप्तरात भरून घराकडे न्हेले. त्यांना स्वच्छ धुवून खळ्याच्या पेळेर वाळत ठेवले. मग तो आजीसोबत मोरीचा मटण नी भात जेवला. 


बाबूला मामाने गणपतीच्या टायमाला आला होता तेंव्हा  दोनशे रुपये दिले होते. ते त्याने गल्ल्यातून बाहेर काढले नी सायकल घेऊन बाजारात गेला. रमेश स्टेशनरीवाला दुकान बंद करायच्या तयारीत होता. बाबूने त्याला पैसे दिले व नवीकोरी एक्रेलिक रंगपेटी विकत घेतली. पेटी पिशवीत टाकली. पिशवी हँडलला लावली नी सायकल दामटीत तो घराकडे आला. मग आजीच्या कुशीतच रंगपेटी नी गुंडे घेऊन बसला. त्याने अगदी मन लावून तीसेक गुंडे रंगवले.

फुलं,पानं,कारटून,त्याच्या मनात आलेल्या  नक्षीने दगडांना साजिरं रुप दिलंन.


दुसऱ्या दिवशी बाबू जगल्या मेस्त्र्याकडे गेला. तिथे प्लायवूडचे नको असलले तुकडे पडलेले होते.बाबूने जगल्याला विचारुन तेही घरी आणले.  प्लायवुडला चॉकलेटी रंग देऊन त्यावर पेन्सिलीने वारली चित्रं काढली. गोल फेर धरून नाचणारी माणसं, माड, घर, बैल, विहीर, शेत, शेतकरी..अशी बरीच बारकी बारकी चित्रं काढली नी सफेद रंगाने रंगवली.


अज्यादादा सोबतीला आहे सांगितल्यावर बाबूची आये बाबूला डोळे झाकून कुठेही पाठवी. इतका तिचा अज्यादादावर विश्वास होता.  


आयेकडून जुनी चटई घेऊन अज्यादादा व बाबूने काजरोबा देवस्थानाजवळ अंथरली व तीवर हे रंगवलेले नक्षीदार गुंडे, वारली पेंटींग ठेऊन विकावयास बसले.  काजरोबाला नमस्कार करायला येणाऱ्या भाविकांनी बाबूच्या कलेचं कौतुक केलं. त्यांनी बाबूकडून गुंडे व पेंटींग विकत घेतले. पैशाचा व्यवहार अज्यादादा करीत होता.  


दुसऱ्या दिवशी गुरुवारी कसलीतरी सूट्टी होती, शाळेस. 

आयेची परवानगी घेऊन बाबू व अज्यादादाची जोडगोळी कसालच्या बाजारात बांदेकराच्या दुकानासमोर चटई अंथरून  आपल्या वस्तू विकावयास बसले. 

दहीकाल्यासाठी आलेल्या चाकरमान्यांनी बाबूच्या कलेचं कौतुक केलं व त्याच्याकडून नक्षीदार गुंडे नी 'वारली' पेंटींग विकत घेतली.


बाबू रोज दुपारी शाळेतून येताना गुंडे घेऊन येऊ लागला नी त्यांना धुवून, वाळवून त्यांवर बारीक नक्षीकाम करू लागला. 

शनिवारचे ते दोघे सुकळवाडच्या बाजारात बसले तर रविवारचे ओरोसीच्या बाजारात. रानबांबुळीच्या दहीकाल्यात तर जास्तच विक्री झाली. 


दुपारचे गुंडे,प्लायवुड घेऊन यायचं, त्यांना धुवून , वाळवून रंगवायचं..परत बाजारात जाऊन विकायचं..खूपच खटपट होती.  पण ती बाबूची आवडती कला होती त्याकारणाने त्याला कंटाळा कसला तो आला नाही. आठवड्याभरात बाबूकडे नवशेवीस रुपये गोळा झाले.


बुधवारी दोघंहीजणं शाळा सुटल्यावर कुडाळला गेले. तिथे त्यांनी चांगलेसे ऊबदार कांबळे व दोन गरम स्वेटर विकत घेतले, मग बाळकृष्ण हॉटेलात कॉकटेल प्याले नि घराकडची एसटी पकडली. बाबू अज्यादादाला थेंक्यू म्हणाला. अज्यादादा मग त्याच्या घराकडे गेला तर बाबू आपल्या घराकडे आला.


बाबूने आयेला व आजीला गरम अंगातली दिली. आजीला ऊबदार कांबळं दिलं. आजीच्या डोळ्यातून गरम टिपं ओघळली. आजी म्हणाली,"माझो नातू  लय हुशार हा" नी बाबूचे मुके घेऊ लागली.


बाबूच्या आजीला आत्ता थंडी वाजणार नव्हती. बाबूची आजी आत्ता जास्त दिवस जगणार होती म्हणून बाबू खूप खूष होता.


समाप्त

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट