खरी गोम
खरी गोम
©®गीता गरुड.
छाया सासरी आल्यापासनं बघत होती. नणंद रजनी कामाच्यावेळी बरोबर पसार व्हायची. काम म्हंटलं की तिचं डोकं धरायचं. छायाची सासूही लेकीचे अति लाड करायची. लेकीला जरा बरं नसलं तरी अस्वस्थ व्हायची. रजनी आपल्या आईच्या हळवेपणाचा नेमका फायदा घ्यायची.
छायाच्या सासूला आमवाताचा त्रास होऊ लागला. तिच्या हातापायाची बोटं आखडू लागली. मरणाची थंडी, त्यात छाया घराबाहेरल्या मोरीत एकटीच भांडी घासत बसायची. रात्रीची झाकपाक होऊन खोलीत जाईस्तोवर खूप उशीर झालेला असायचा. छायाचा नवरा विश्वास मग तिच्यावरच चिडायचा. "छाया, गो वाजले किती? बारा वाजेतागद भांडी घासीत रव्ह. पटापटा कामा आटपूक व्हता काय तुका! आता निजाचा कवा नि कामार जाव्चा कवा?"
"तुमका काय वाटता, मिया आस्ते आस्ते कामा करतय. गोगलगाय असा काय मिया. भाकरी केलय, मासे सुटी केलय, भाजलय, सार केलय. टाईम लागताच नाय ओ समदा करूक. तेतूर लायटीर धाड भरली ती वाटुचाव लागला."
"तवाच सार भारी झाललो. मिक्सरार अशी चव येना नाय."
"सगळा खरा पन माकाव इतकी कामा करुची सवय नाय ओ. तुमच्या भयनीक रजनीक वायच हातबॉट लावूक सांगलास तर बरा होयत."
"बरा, सकाळी बोलून बघतय. तू येवच्या अदुगर ती कामा करी पन आताच कशी बंद झाली कामा करुची! बोलूक गेलय तर बायकोच्या ताटाबुडलो माजुर बोलतली माका.
हळूहळू काळोखाचं साम्राज्य ओसरलं. भिनभिनताना कोंबड्याने बांग दिली. ठराविक वेळाने त्याचं आरवणं सुरू होतं. गजराला कोणीही बोटाने बंद करेल. ह्या महाशयाला कोण आवरतं घ्यायला सांगणार. त्याचं कामच ते, लोकांना उठा उठा सांगणं. कौलांतून उजेड आत आला तसा विश्वास उठला. छाया अजुनही उठलीच नव्हती. त्याने तिच्या गालावरची बट अलगद कानामागे सरकवली. कानाची पाळी त्याला अगदी गरम लागली. त्याने उठून तिच्या गालांना हात लावला. अंग चांगलच कढत लागत होतं. तिच्या डोळ्यांतून दोन आसवं गळून वाळली होती. विश्वासला अगदी गलबलून आलं.
"आये, गे आये," आईला हाक मारतच विश्वास बाहेर आला. दोघीहीजणी मस्त गोधडी अंगावर पांघरून निजल्या होत्या.
"आये वायच चाय बनवूक सांग रज्जूक. उठव तिका." ब्रशवर कोलगेट पिळता पिळता त्याने आईला रज्जूला उठवायचा आग्रह केला.
"कित्या रे. छाया उठला नाय! डबो कवा करतली? बरी बाय निजान रव्हता. मिया फाटफटी उठान भाकरी,भाजी, चाय करीत हुतय. आताशी कमार धरलीहा म्हनान..हाय गे बाय." ती कंबरेला हात लावत कंबर दाबू लागली.
"अगे, छाया रोजच उठता. आज तेका लय ताप भरलो हा. तेका गोळये देऊन जातय. आजचे दिस तेका पानयातबिनयात हात घालूक देव नका. दिस बरे नाय हत. तापसरी इलीहा जयथय. येक करता दोन नुको होव्क. आपल्याकडे काय पुडक्या नाय आसा आज्यापंज्यान ठिवलला की बाबा मोडला नि केली दवेखान्याची भर"
"उठ गे बाय रज्जू, हे तुझे भावाशीक बायलेचो लयच पुळको इलो हा." विश्वासची आई निजलेल्या जागेवरसूनच लेकीला हलवू लागली. शेवटी रजनी कशीबशी उठली. तोंड धुवून आली. तिने चुलीत आग केली. चहासाठी आधण ठेवलं. एकीकडे पिठाचा डबा मांडलीवरनं काढला. परातीत पीठ घेऊन त्यात कणीभर मीठ नि पाणी टाकून पीठ मळता मळता तिने चहाचा टोप उतरवून तवा ठेवला. भावाला चहा नि भाकरी दिली. आईसाठी, स्वत:साठीही चार भाकऱ्या केल्या. टमाट्याची भाजी केली.भावाचा डबा भरून दिला.
विश्वासने निघताना छायाच्या गालावरनं हात फिरवला. "छाया, नाश्ता करून गोळ्या घे हा. तिनसानापातूर ताप ओसरलो नाय तर डॉक्टरकडे घेऊन जाईन तुका. तुका असा टाकून जाव्क मन येना नाय गो पन हाफिसात मोठे साहेब येव्चे आसत. जाव्चा तर लागतलाच. बेगिन येवचो यत्न करतय रानी."
छाया ग्लानीत असुनही नवऱ्याच्या धीराच्या,काळजीयुक्त स्वरांनी मंद हसली.
सुर्याची किरणं आता ओसरीतून माजघरात प्रवेशली. छायाच्या खिडकीतूनही सोनपिवळी किरणं तिच्या गोधडीवर पसरली. ही गोधडी तिला आईने स्वतः शिवून दिली होती. गोधडीला घातलेलं साडीचं पाल तिने हाताच्या बोटांनी चाचपडलं. त्यातनं आईची सुखद ऊब गवसली तिला. असा कधी ताप आला की आई तिच्या कपाळावर वेखंडाचा लेप काढायची, तिला काढा करून द्यायची . तिच्या आवडीचा मऊभात, मुगाचं वरण नि लसणीची चटणी खाऊ घालायची मग ताप कुठल्याकुठे छुमंतर व्हायचा.
"आमचे नव्हते बाय आसले लाड कोनी केले. कितीव ताप आसलो तरी कामा काय पाठीमागची सुटली नायत. सुनेच्या राज्यात सुख गावात अशी आशा केललय पन कसला काय करुचा ता करुकच व्हया. आमका कोनाची आशा करीसारी नाय."
सासूचा आवाज ऐकून छाया कशीबशी उठली नि बाहेर आली. बघते तर काय सासूने टोपलीभर शेण आणून ठेवलय माजघरात नि सारवतेय. छायाला अपराधी वाटलं. ती न्हाणीतल्या पाण्याने तोंड धुवून आली. तापाने तोंड अगदी कडूजार झालं होतं. ती स्वैंपाकघरात गेली. कोरा चहा जरा गरम करून घेतला व दोन घोट प्यायली. रज्जू भाकरी नि भाजी खात होती पण छायाला तुला हवी का म्हणून विचारलं नाही. छाया तिथली उठली माजघरात आली. सासूसोबत जमीन सारवू लागली तशी सासू म्हणाली,"तुया नको गे बाय. तुका थंडी भरतली. आमी काय दगडाच्या जीवाची. आमका काययेक होना नाय. तू जा निज जा. तुका ताप भरलो तर तुझो घोव घरात धुमशान करीत."
छाया काही न बोलता जमीन सारवू लागली,थरथरत्या हातांनी हिरवीगार अर्धवर्तुळाकार रिंगणं जमिनीवर उमटू लागली.
"आता करतस तर तुझ्या खोलीतव घे वायच सारवून. कंबरेर शिरा पडली ती. आये गे बाय." करत सासू उठली. हात धुवून न्याहारीला जाऊन बसली. तिनेही दोन भाकऱ्या व भाजी खाल्ली.
तासाभरात छायाचं सारवण झालं. तिने कढत पाणी अंगावर घेतलं. न्हायल्यावर तिला थोडं बरं वाटलं. तुळशीला पाणी घालून ती स्वैंपाकघरात आली. सासू व रजनी दोघी बाहेर गाबतीनीकडनं मासे विकत घेत होत्या. पातेल्यात पेज होती. छायाने ग्लासभर निवळ घेतली त्यात मीठाची कणी टाकली नि फुंकून फुंकून प्याली. पेजेचा निवळ पोटात गेल्यावर तिला जरा अजून बरं वाटलं पण अशक्तपणा काही केल्या जाईना. मागिलदारी सासू मासे सुटी करत होती. रज्जूने नारळ किसायला घेतला होता. छाया स्वैंपाकात मदत करते बोलली नाही म्हणून रजनी तिच्याशी न बोलता कामं करत होती. अधनंमधनं भांडी आपटत होती.
छाया मग आपल्या खोलीत गेली नि पुस्तक वाचत बसली. दुपारचे दोन वाजले तशी तिला भूक लागली. तिने आत जाऊन पाहिलं तर मायलेकी जेवायला बसलेल्या.
"तुका ताप भरलो हा न्हय. आमका वाटला निजलस म्हनान बोलावलव नाय नायतर घोवाक सांगशित माका टाकून जेयली. बस जेवूक वाढतय तुका काय घेशीत आपल्या हातान?"
छायाचे डोळे उगाचच भरून आले. भुकेच्या आगीपोटी तिने ताटात थोडा भात, सार नि माश्याचा तुकडा घेतला. दोन घास कसेबसे गिळले तशी रज्जू म्हणाली,"आमका बाय शीक आसलव काय पेजव खाऊक झेपना नाय. कायकाय मानसांची खानीच मजबूत."
छायाला जेववेना. तिने ताटातला भात न्हेऊन कुत्र्याला घातला, चुळ भरली नि गादीवर येऊन लवंडली. तिचं लक्ष खाटीच्या पायापाशी गेलं. विश्वास डबा विसरून गेला होता. तिने डबा उघडला नि भाजीभाकरी खाल्ली. डब्यात चिठ्ठी होती..डबो घासूक न्हेव नको. हयच रव्हांदेत.
छायाला भरून आलं. संध्याकाळी विश्वास लवकरच आला. छायाला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टर म्हणाल्या,"तुम्ही दोघं आईबाबा होणार आता. जबाबदारीने वागा. मिसेसच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष ठेवा आता."
विश्वासला ट्रेनिंगसाठी महिनाभर मलंगगडला जायचं होतं. त्याने घरी येताच दोघांच्याही सुटकेसी भरल्या.
आईला म्हणाला,"छायाला तिच्या माहेरी सोडून येतो महिनाभर." आई काहीच म्हणाली नाही.
छायाला माहेरी सोडून विश्वासने महिनाभरात भाड्याने घर घेतले नि कचेरीच्या जवळच दोघांचे घरकुल थाटले. गावात विश्वासची आई व बहीण सांगत होत्या,"विश्वासान आमका वाऱ्यार सोडल्यान. येगळेतार केलो. तेच्या बायलेक राजारानीचो सौंसार व्हयो झालो."
खरी गोम गावातल्या लोकांनाही ठाऊक होती पण दुसऱ्याचे दोष कुणी तोंडावर बोलवून दाखवून विनाकारण शत्रुत्व ओढवून घेत नाहीत त्यामुळे विश्वासच्या आईच्या म्हणण्याला दुजोरा देऊन, सहानुभूतीचे चार शब्द त्यांच्या झोळीत टाकत होती.
छाया नि विश्वासला इच्छा नसताना वेगळेतार करावा लागला होता.
समाप्त

💖💖💖💖
उत्तर द्याहटवा