वंशव्रुक्ष

   वंशव्रुक्ष



वंशव्रुक्ष ही डॉ. भैरप्पा यांची कादंबरी. डॉ. भैरप्पा हे कन्नड लेखक आहेत. वंशव्रुक्ष या कादंबरीचा अनेक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे.मराठीत उमा कुलकर्णी यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. 


ग्रंथ लिहिणारे सदाशिवराव यांनी एक मोठा पाच खंडांचा ग्रंथ लिहिण्याचा ध्यास घेतला आहे. सदाशिव व राज हे दोघे भाऊ, आईवडिलांच्या म्रुत्युपश्चात मामाच्या घरी वाढतात. मामाची मुलगी नागलक्ष्मी हिच्याशी सदाशिवचं लग्न होतं. राज काही काळ उच्चशिक्षणासाठी परदेशात स्थायिक असतो. त्याचं व नागलक्ष्मीचं ट्युनिंग छान आहे. ती दोघं मामेभावंड आहेत शिवाय बालपणीचे सवंगडी त्यामुळे त्यांच्या गप्पा रंगतात. सदाशिवरावांना मात्र ग्रंथाच्या वेडाने झपाटले आहे. नागलक्ष्मीला एक मुलगा होतो, प्रुथ्वी. दरम्यान सदाशिवरावांची भेट एका पीएचडी विद्यार्थिनीशी होते. करुणारत्ने त्यांनी दिलेल्या माहितीचं टिपण काढण्यात मदत करते, त्यांच्याशी ग्रंथासंबंधी चर्चा करते..यातूनच पुढे ती दोघं लग्न करण्याचा निर्णय घेतात. नागलक्ष्मीला हे कळताच ती सदाशिवरावांशी बोलणं बंद करते. शेवटी सदाशिवराव करुणाला घेऊन वेगळं बिर्हाड थाटतात.

श्रीनिवास श्रोत्री हे सदाशिवरावांचे गुरु. या श्रोत्रींचा मुलगा नदीत वाहून जातो. त्याची पत्नी कात्यायनी व अगदी लहान मुलगा चिनी आहे. श्रीनिवास श्रोत्री त्यांची पत्नी भगिरथीम्मा सुनेचं केशवपन पकरण्याचा आग्रह धरते त्यास विरोध करतात. सुनेस पुढे शिकायलाही पाठवतात. श्रीनिवास यांचाही भूतकाळ आहे. भगिरथीम्मांना पहिल्या मुलानंतर फार आजारपण येतं व डॉ. श्रीनिवास यांना पत्नीशी शरीरसंबंध टाळा असे डॉक्टर सांगतात. श्रीनिवास यांचं शरीरसुखापासून वंचित होणं पाहून बायकोचा जीव तुटतो. श्रीनिवास यांच्या पाठीमागच्या खोपटात त्यांचा गडी रहायचा. त्याची मुलगी लक्ष्मी हिचा नवरा हयात नसतो. ती वडिलांच्या खोपटात रहात असते. भगिरथम्मा तिला श्रीनिवास यांना स्त्रीसुख देण्यास आर्जवते खरी पण स्त्रीसुखाच्या ओढीने लक्ष्मीकडे जात असलेले श्रीनिवास त्यांच्या संयमाने पाठी फिरतात. ते स्वतःला अधिकाधिक वाचनलेखनात गुंतवून घेतात. पहिला पती गेलेली लक्ष्मी हिला श्रीनिवास यांच्या पत्नीनेच पुन्हा नव्याने शरीरसुखाबद्दल जाग्रुत केल्याने श्रीनिवास तिला स्वप्नातही दिसू लागतात. ती झुरू लागते. शेवटी श्रीनिवास स्वतः लक्ष्मीची समजूत काढतात. तिला सांगतात मी तुला कधीही या घरापासून वेगळं करणार नाही. लक्ष्मीही आपलं चंचल मन देवपूजेत गुंतवून घेते.

श्रीनिवास यांची सून कात्यायनी हिचा प्रा. राजशी परिचय वाढत जातो. आपल्या मुलाला घेऊन ती राजसोबत संसार थाटायचा निर्णय घेते पण श्रोत्री तिला समजवतात की चिनी हा त्यांचाही कोणतरी आहे पण निर्णय तिच्या हाती सोपवतात. शेवटी कात्यायनी चिनीला सोडून राजकडे जाते. चिनीला दोन आज्या व आजोबा सांभाळतात. कात्यायनीला राजपासून मुल होत नाही. तिला आता चिनीची आठव येऊ लागते.तिला राजही हवा असतो व चिनीही हवा असतो. 

सदाशिवराव आजारी पडतात तेंव्हा नागलक्ष्मी अबोला सोडून त्यांच्याकडे जाते. त्यांची काळजी घेते. त्यांच्या अंगाला तेल लावून त्यांना आंघोळ घालते. आपल्या हातचं खाऊ घालते. शेवटी ते तिच्याच मांडीवर प्राण सोडतात. रेणुका आपल्या भावासोबत श्रीलंकेस निघून जाते.

श्रीनिवास श्रोत्रींना एका पत्रातून कळतं की त्यांचे वडील हे त्यांचे खरे जन्मदाते नव्हते. एक कोणीतरी त्यांच्याकडे रहायला आलेला मास्तर त्यांच्या जन्मास कारणीभूत होता. श्रोत्रींच्या वडिलांना मुल नव्हतं.ते दिवाणाचा धंदा करत. त्यांनी भरपूर माया गोळा केली होती शिवाय भाऊ कटिप्पा यांची संपत्तीही हडपली होती. श्रीनिवास कटिप्पा व त्याच्या पुत्रांचा शोध घेतात पण थांगपत्ता लागत नाही. शेवटी ते ती सारी संपत्ती गोरगरीबांना दान करतात. नातवाला घेऊन राजकडे येतात. कात्यायनी शेवटच्या घटका मोजत असते. कात्यायनीचा मुलगा चिनी आजोबांच्या सांगण्यावरून तिचा हात हाती घेतो. कात्यायनी शेवटचा निरोप घेते.

श्रीनिवास राजशी बोलत असतात, त्यावेळी त्यांना नागलक्ष्मीकडून कळतं की राज व सदाशिवराव हे दोघे भाऊ कटिप्पा श्रोत्री यांच्या दुसऱ्या मुलाचे चिरंजीव. पण ते कळून आता उपयोग नसतो कारण ती संपत्ती श्रीनिवास यांनी आधीच दान केलेली असते. ते संन्यास घेण्यासाठी मार्गस्थ होतात तेंव्हा चिनी धावत जाऊन त्यांना विचारतो की माझ्या आईचे शेवटचे विधी मी करू शकतो का त्यावर श्रीनिवास त्याला जरूर कर म्हणून सांगतात.

ही कादंबरी म्हणजे एक जाळं आहे. ठिकठिकाणी नात्यांचे तंतू एकमेकांना जोडले गेलेले आहेत. काही ठिकाणी अतिशयोक्तीही जरूर वाटते कारण श्रीनिवास श्रोत्रींच्या आईचे विवाहबाह्य संबंध, कात्यायनीचं दुसरं लग्न करणं, सदाशिवरावांचं पहिली पत्नी असताना केवळ ग्रंथलेखनाच्या कामास गती यावी म्हणून केलेलं दुसरं लग्न..सारंच ओव्हरडोस वाटत जातं.

डॉ. भैरप्पा यांचं विविध आचारांतलं ज्ञान वाचताना प्रत्ययास येतं. वडील असताना वडिलांपासून दुरावलेला प्रुथ्वी व आई असताना आईपासून दुरावलेला चिनी हे आईवडीलांचं आपल्या बालविश्वातील स्थान किती महत्वपुर्ण असतं याची जाणीव करून देतात.


–©®गीता गरुड.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट