बयोआज्जी
बयोआज्जी
©®गीता गरुड.
आजुबाजूला गर्द वनराई, त्यात वसलेलं टुमदार कौलारू घर. या घरात रहात होती, बयोआज्जी. बयोआज्जीची मुलगा नं मुलगी इथेच शिकून लहानाचे मोठे झाले होते. पंख फुटल्यावर पिल्लं कशी उडून जातात तसे मुलगी तिच्या सासरी व मुलगा दूर तिकडे औरगांबादला स्थायिक झाला होता.
बयोआज्जीलाही न्हेलं होतनं तिकडे. बयोआज्जी तिची नातवंड दहाबारा वर्षाची होईस्तर तिथे होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत सून नातवंडांना घेऊन माहेरी गेली की बयोआज्जी आपलं गाठोडं घेऊन मुळ मुक्कामी यायची.
अंगण, परसदार झाडून लख्ख करायची. बाजूच्या शुभाला आपल्याकडली मिठाई देऊन तिच्याकडनं तांब्यापितळेची भांडी लख्ख घासून घ्यायची. शुभाचा आमसूल, रखा नि नारळाची किशी धरलेला हात घसाघसा पातेल्यांवरनं,तपिलावरनं नि हंडे,कळशांवरनं फिरला की भांडी कशी नव्या नवरीसारखी चमकू लागत.
शुभा जेमतेम चौदाएक वर्षांची होती पण पोर कामाला हुशार. बाप दारुडा असल्याने घरी अठराविश्व दारिद्र्य होतं पण शुभाच्या अंगावरला परकरपोलका अगदी स्वच्छ धुतलेला असे. शुभाला स्वच्छतेची आवड होती. साबण नसला तर रिठा पाण्यात भिजत घालून त्या पाण्याने ती सुबकून सुबकून कपडे धुवायची.
बयोआज्जीला शुभेचं भारी कौतुक वाटे. ती निघताना शुभाच्या आईकडे शुभासाठी परकरपोलक्याचं कापड नि शिलाईसाठीचे पैसे देई, शुभाच्या आईच्या तोंडून नको कशाला! आलं तरी ती तिच्या मुठीत पैसे ठेवून आश्वासक हात मुठीवर दाबे.
शुभाचं लग्न झाल्याची खबर बयोआज्जीला कळली तेंव्हा ती अस्वस्थ झाली. अवघ्या एकोणीसाव्या वर्षी पोरीचं लग्न लावून दिलं होतं नि सासरही जेमतेम हातातोंडाशी गाठ पडण्याएवढंच सक्षम होतं.
बयोआज्जी मग पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गेली तेंव्हा पितळेच्या, तांब्यांच्या भांड्यांकडे पाहून तिचं मन भरून आलं.
"माझी लेक गेली सासरवाडीक. हयसर होती तवा कशी तुमची रुपा उजळवून जाय. शिरा पडलीहा हातापायांनी वडी येतहत. हातीत जोर कसलो तो नाय. कोन बाय आता ही भांडी घासतला!"दुखऱ्या कंबरेला हाताने दाबीत आज्जी म्हणाली. शुभा तिला दोन दुडी पाणी आणून द्यायची. "आता पानी कोन हाडतला नि माज्यावांगडा बोलतला कोन?" आज्जी विचार करत बसली होती तर मागीलदारातनं शुभाची आई दुड घेऊन आली. आज्जीची हंडा, कळशी स्वच्छ धुऊन तिने त्यात आणलेलं पाणी भरलं.
"बयोकाकी, माका बाय शुभेसारो लखलखीत हात मारुक येवचो नाय. भंगलो फोंडेलिसीस का काय तो झालोहा. कदवा कदवा तर चार चार दिस निजान आसतय. मान धरता. हातीक फुटाफुटी लागता."
बयोआज्जीने तिच्यापुढ्यात चहाचा पेला ठेवला नं तिच्याजवळ बसली. तिच्या पाठीवरनं हात फिरवीत म्हणाली,"मोप कष्ट काढलस म्हनान हाडा झिजली हत ती. आता शुभाव नाय घरात. तुया निजलस तर घरातला गो कोन करता ?"
चहाचा घोट घेत शुभाची आई म्हणाली,"कर्माची काणी आसा ती. गपचीप निजान रवतय. घरवाल्याक दारयेशिवाय दुसरा काय नुको. दारु पिली काय झाला. माका कोन पेज घालतला! मियाच उठतय मगे पोटात आग पडली काय नि चुलीत आग घालतय. भोग आसतत ते बाकी काय. माझे झाले ते झाले माझ्या पोरीचे हालवनयास नुको म्हनान लगीन लावन दिलय. जावय खयतरी कंपनीत असा कामाक. पगार काय जास्ती नाय पन निरयसनी असा. बोलाचालाक बरो हा. शुभेक जपता. शुभा इलला तवा बघानच पोट भरला माझा. माझ्या पोरीचे वनयास सोपले बघा."
बयोआज्जीला हे ऐकून खूपसं बरं वाटलं. मधे चारेक वर्ष बयोआज्जी गावी यायची पण तिचं मन आधीसारखं रमत नव्हतं तिथे.
यावर्षी पुन्हा बयोआज्जी गावी आली ती मात्र कायम इथेच रहाण्यासाठी. आता बयोआज्जीची नातवंड मोठी झाली होती. घरातल्यांना तिची गरज उरली नव्हती. कुणी तिच्याशी चार शब्द बोलत नव्हते म्हणून मग बयोज्जीनेच लेकाला सांगून आपलं चंबूगबाळं गुंडाळलं होतं नि परत आपल्या वनराईतल्या घरी आली होती. पण यावेळी मात्र तिला अंगण चक्क सारवलेलं दिसलं. तुळसही हिरवीगार होती. बयोआज्जीने दाराचं कुलुप उघडलं. ती आत आली नं पडवीत बसली, इतक्यात एक चिमुकली धावत येऊन तिच्या जवळ बसली.
"कोनाची गो तू?" आज्जीने विचारताच खुदकन हसली.
इतक्यात बांगड्यांची किणकिण आत आली. फुलाफुलांची साडी, फिटिंगचं ब्लाऊज घातलेली ती दुसरी तिसरी कुणी नसून बयोआज्जीची शुभा होती.
"बयोआज्जी, किती गे वाळलस! तुका बघिनसारा वाटलला बघ." म्हणत शुभाने आज्जीला घट्ट मिठी मारली.
"शिरीदादा, वैनी नि तुजी नातवंडा खुशाल मा." शुभाने विचारलं.
"व्हय, सगळी देवाच्या दयेन खुशाल आसत. माकाच थयसर करमना म्हनान हडे रव्हाक इलय." आज्जी आपलं दु:ख झाकत म्हणाली तरी आज्जीचे पाण्याने भरलेले डोळे पाहून शुभाला सगळी कल्पना आली.
शुभाने मांडणीवरचे पितळी डबे, हंडे, सगळी भांडी काढून लख्ख घासून दिली. आज्जीने दिलेल्या पैशातनं वाण्याकडनं किराणा घेऊन आली नि डब्बे वाळताच किराणा त्यांत भरून ठेवला.
शुभाच्या छबीला कळतच नव्हतं आपली आई आज्जीचं एवढं काम का करते ते.
"काय गं आई, आज्जीला बरं नाही म्हणून तिला मदत करायला आलीस. आता ही बयोआज्जी आली तिला मदत करतेस. सारखं काम काम. मला गोष्ट कोण बरं सांगणार?" छबी फुरंगटून म्हणाली.
शुभाने तिला मांडीवर घेतलं व समजावलं,"छबु, मी लहान होते नं तेंव्हा ही बयोआज्जी माझ्यासाठी मुंबईहून खाऊ आणायची. कधी दप्तर, कंपासपेटीही आणून द्यायची. मला कपडे घ्यायला पैसे द्यायची. आता बयोआज्जी म्हातारी झाली नं, मग आपण निदान इथं आहोत तेवढे दिवस तरी तिची मदत नको का करायला! बयोआज्जीने फार केलय गं माझ्यासाठी. तुला ठाऊकै, बयोआज्जी मी लहान असताना मला गोष्टीही सांगायची, परीराणीच्या ढेरपोट्या माणसाच्या.."
छबुला आईने सांगितलेलं थोडं फार कळालं, उमजलं नि मग ती बयोआज्जीच्या घरी धावत सुटली, वाऱ्यासारखी. तिने मिटलेलं दार बाजूला सारलं. गोधडीवर लवंडलेल्या बयोआज्जीने क्षीण आवाजात विचारलं? "कोन आसा?"
बयोआज्जीच्या गोधडीवर आपले गुडघे टेकवत छबुने बयोआज्जीला गोड पापी दिली नि मग लकडा लावलान,"बयोआज्जी, बयोआज्जी..गोष्ट सांग ना ढेरपोट्या माणसाची!"
वेळ जात नाही म्हणून उगीचच लवंडलेली बयोआज्जी उमेदीने उठून बसली. आपल्या चंचीतला खडीसाखरेचा खडा छबुच्या हातावर ठेवत ती तिला ढेरपोट्या गंपुची गोष्ट सांगू लागली.. अगदी हातवारे करत होती, आवाजात चढउतार करत आपली गोष्ट खुलवून खुलवून सांगत होती. एक लहानगा ऐकणारा कान बयोआज्जीला काही दिवसांकरता का होईना मिळाला होता त्यामुळे ती खूप खूष झाली होती.
समाप्त

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा