स्वागत

 स्वागत



वेणू मोबाईलवर भावाशी बोलत होती. ती आत पडवीत आली तशी सासूने विचारलं, "काय गो. वयनीची सुटका झाली? सिझर झाला काय नार्मल.. ता मरांदे , झिल झालो काय चेडू ता सांग."


वेणूच्या वहिनीला पहिली मुलगी होती. आता मुलगाच होणर अशी सगळ्यांचीच आशा होती. वेणूने वहिनीला मुलगी झाली असं सांगताच तिची सासू नाराज झाली तरीही आपली नाराजी लपवत म्हणाली,"फुढच्या टायमाक बाळकृष्णाच येतलो बग तुझ्या वयनीच्या पोटी." 

सासूच्या या आशीर्वादाबद्दल काय बोलावं तिचं तिला कळेना. या नवीन अंकुरासाठी दोन मायेचे शब्द सासूच्या तोंडून बाहेर पडेनात, स्वतः स्त्री असूनही स्त्रीजन्माविषयी एवढी अढी का , तिचं मन उद्विग्न झालं. 


तिने आपल्या उभारल्या पोटावरनं हलकेच हात फिरवला. आत आकारत असललेल्या चिमुकल्या जीवाची चाहूल बोटांनी घेतली. 'कोन आसतला माझो बाळ..झिल काय चेडू? झिल झालो काय सासूबाय हत्तीवरना पेढेव वाटाक कमी येऊची नाय.'


तिला खरंच दिसली सासू हत्तीवर अंबारीत बसून गावात फिरतेय नि गावकऱ्यांना पेढे वाटतेयसी. पण माका चेडू झाला तर..चेडवाचा स्वागत करीत काय ही काय दुसऱ्या टायमाक झिल होतलो म्हनान माका धीर देयत. असलो धीर माका नुको. माझा बाळ झिल आसांदे काय चेडू तेचा स्वागतच होऊक व्हया, कोन ताँड पाडून रव्हला तर माका ता पटाचा नाय, सहन होवचा नाय, माजा डोसक्या आऊट होतला." कितीतरी विचार तिच्या मनात येऊ लागले.


"गो वेणू, खय हरावलस. माह्यराक जातलस मा. नाल सोललय बग दोन, हालीम भिजत घातलय. माका नाल कातून दी. लाडू बनवतय हालिम, गुळ नि नारळाचा चुन घालून."


वेणूने ताटाळ्याखालची विळी नि वेळणी घेतली नि नारळाची कवड हातात धरून किसू लागली. वहिनीची पहिली मुलगी जाई तिच्या डोळ्यासमोर आली..आई घरात नाही म्हणता रडून हैदोस घातला असेल. एवढुशा चार वर्षाच्या जाईलाही तुझ्या पाठीवर भाऊ येतलो असं शिकवून ठेवलय मोठ्या माणसांनी. ' जाईक चलात न्हानी भैन, ता करीत भैनीचे लाड, घेईत तेचे पापे? काय मारीत तेका भाऊ म्हनान जन्माक इली नाय हे कारनान.'


विचारांच्या तंद्रीत दोन्ही नारळ किसून झाले. वेणूने ब्याग भरायला घेतली. वहिनीसोबत पंधराएक दिवस रहायचं म्हणून जास्तीचे ड्रेस, बाळासाठी शिवलेल्या कुंच्या, झबली, लाळेरी, लंगोट, दुपटी किती नं काय काय तिने मैत्रिणीकडून शिवून घेतलं होतं. स्वतः अवघडल्या अवस्थेत नसती तर स्वत:च शिवलं असतंन. 


दुपारी जरा पडली तोवर सासूने लाडू वळून ठेवले होते. सासूने लाडवाचा डबा वेणूकडे दिला. थोड्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या नि खारकाही बांधून दिल्या.


वेणूला सासूचं मायाळूपण भावलं. " बेगिन येतय. जास्त दिस नाय रव्हाचय," म्हणत ती सासूच्या पाया पडायला वाकणार तोच सासूने तिला छातीशी धरलं. 


सासूलाही वेणू नसताना घरात करमणार नव्हतं. वेणूच्या पायरवाची सवय जी झाली होती.


वेणू माहेरी पोचेस्तोवर उजाडलं होतं. तिची आई खळ्याच्या पेळेवर दात घासत बसली होती. वडील खळ्यात पेपर वाचत आरामखुर्चीत बसले होते. 

"आई, जाई खय गो?"


"वेणू एकटा इलस? जावयबापू?"


"ते दोऱ्यार गेले हत. आमच्याच गावचो वांगड हुतो म्हनान इलय. माका थारो होयना भाचयेक बघीनसारा वाटाक लागला."


वेणूच्या आईने तोंड पदराने पुसलं नि माजघरात आली. 

"आई, नाराज कित्या तू? झिलाक दुसराव बाईलमानसाचा पॉर झाला म्हनान?"


वेणूच्या या अकस्मात प्रश्नाने वेणूची आई दचकली. "तसा नाय गो पण माका येकच झिल, तेका दोनवली चेडवा झाली आता तिसऱ्याची वाट बघना होतय, तेव आशेर पानी फिरवल्यानी." वेणूच्या आईने पदराने डोळे टिपले.

"म्हणजे?"


" कुटुम नियोजनाचा आपरेशन करून घेवची आसत. आमच्या दोघांचाव आयकाक तयार नाय. काय हेंच्यापुढे डोसक्या आपटुचा का काय!"


आईचं बोलणं ऐकून वेणू मनापासून हसली. शांत झोपल्या जाईच्या गालावर तिने आपले ओठ टेकवले. 


"तू तरी सांगून बघ भावाशीक नि वैनीक,"वेणूची आई आशेने म्हणाली.


"हे बघ आये, दादा नि वैनी जा काय करतहत ता माका पटताहा. झिलाचेसाठी चेडवांची साखळी लावची काययेक गरज नाय. समजा दादाक दोनीव झिल आसते तर तू नातीसाठी आपरेशन करु नुको आसा बोललं आसतस? नाय मा. आये, अगे देवान दिलला फळ ता, झिल काय नि चेडू काय जन्माक इललल्याचा ताँड भरून स्वागत करूक व्हया. तुझ्या भावाशीचाच उदाहरण घे डोळ्यासमोर. आजयेक नजरेन बघना नाय, कसले वंशाचे दिये घेऊन बसलस. माका सांग, तुम्ही हास्पिटलात गेललास काय नया पावणीक बघूक?"


यावर वेणूची आई काहीच बोलेना. थोड्या वेळाने म्हणाली,"चुकलाच माझा. सुनेसाठी मेथी भिजत घातलय, गुळ, काजीचे घर घालून पेज करतय.  वायच गरम पोटात गेला काय दूध सुटतला."


"माझी आव्स गे ती,"म्हणत वेणूने आईला मिठी मारली.


आईबाबा व जाईला घेऊन वेणू वहिनीला पहायला गेली. सासूसासरे, नणंद नि लेक सगळे आल्याने वेणूच्या वहिनीला अगदी भरून आलं. जाई बाळीच्या लालगुलाबी हातांची इवलीशी बोटं बघण्यात मग्न होती.


"आवडलं ना बाळ!,"असं आईने विचारताच जाईने बाळाच्या गालावर गोड पप्पी दिली.


" बघलस आये,असा स्वागत होऊक व्हया नया बाळाचा मगे तो झिल असांदे काय चेडू. माज्या जाईक समाजता ता तुमका कसा गे समाजना नाय!"


"व्हय गे बाय. माझ्या इचारातच रव्हलय मिया. सुनेक बघुक देखूल इलय नाय. तुया मातर बरे डोळे उघाडलस माजे." असं म्हणत वेणूच्या आईने सुनेला बसतं केलं व तिच्या हाती पेजेची कितली व चमचा दिला. सून पेज खाताना आपण तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत राहिली.


खाटीलगतच्या पाळण्यातली बाळी किलकिल्या डोळ्यांनी आपल्या स्वागताला आलेली आपली माणसं पहात होती. 


©®गीता गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट