बाईंची मुलं
बाईंची मुलं
©®गीता गरुड.
पत्ता शोधत शोधत बकुळा डोंगरेबाईंच्या खोलीवर पोहोचली. डोंगरेबाई घराच्या व्हरांड्याच्या खांबाला लगडलेल्या मोगरीच्या वेलीवरची फुलं काढत होत्या. पांढराशुभ्र चिकनकारीचा पंजाबीड्रेस, सप्तरंगी ओढणी नि त्यावर खुलून दिसणारं बकुळेचं मुखकमल.
"वळखलात बाईंनू?"
बाईंचा हात आपल्या हातांनी गच्च धरत बकुळीने बाईंच्या डोळ्यांत पाहिलं. डोंगरेबाई साठीच्या आसपास आल्या होत्या. वयाच्या खुणा देहावर दिसत होत्या. कंबरेला लावलेल्या गच्च पठ्ठ्याने त्यांच्या कंबरदुखीची जाणीव समोरच्यालाही होत होती.
"बाईंनू, मी बकुळ..मराठी शाळा, तुळस गाव, वेंगुर्ले."
क्षणात बाईंच मन पार मागे गेलं.बाईंना बकुळ आठवली..अगदी सुस्पष्ट.
तुळस गावात बाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक झाली तेंव्हा तिथल्या ग्रामसेवकाच्या ओळखीने त्या शिवलकरांच्या घरी भाडोत्री म्हणून राहू लागल्या. शिवलकरांना मोठे दोन मुलगे होते आणि त्यांच्या पाठीवरची बकुळ. झाडावरून अलगद जमिनीवर पडलेल्या बकुळफुलासारखं रुप होतं तिचं. त्यावेळी सहावीत असावी.
बकुळाचं घर छान ऐसपैस होतं. आजुबाजूला झाडंपेडं होती. बकुळाच्या आईने डोंगरेबाईंना त्यांचा जम बसवायला सर्वतोपरी मदत केली. गावातले इतर लोकही बाईंना काय लागेल ती मदत करायचे. डोंगरेबाईंना एकटीलाच तिथे रहावं लागणार होतं कारण त्यांचे यजमान राजापुरात नोकरीला होते तरी शनिवाररविवार ते बाईंकडे फेरी मारायचे. बाईंना मुलबाळ नव्हतं त्यामुळे त्यांची आठवण येण्याचा, त्यांची गैरसोय होण्याचा प्रश्नच नव्हता. शनिवार रविवार सोडून इतर वारी शाळेतून आलं की बाई एकट्याच असायच्या. बरेचदा बकुळची आई त्यांना आमटी, भाजी द्यायची. बाईंनी नको म्हणलं तरी द्यायची.
बाईंच्या लक्षात येत होतं की बकुळचे दोन्ही भाऊ सकाळी उठून अभ्यासाला बसतात तेंव्हा बकुळ गोठा झाडत असायची, खळ्यात झाडू मारी, चुलीत आग घाली, कोंबड्यांचं घुड साफ करी.
बाईंनी एकदा बकुळला विचारलंच,"बकुळ, व्हयती कामा करीत रव्हतस. अभ्यासाचा काय?"
बकुळ हसली, म्हणाली,"बाईंनू, कामा नाय केली तर आये करवादतली."
"गो पन तुझे भाव कशे अभ्यासाक बसतत. तुका नाय वाटत बसिनसाऱ्या." बकुळ यावर काहीच बोलली नाही. गुरांना वैरण घालत राहिली.
सहामाईचा निकाल लागला. बकुळच्या दोन्ही भावांना खूप छान मार्क्स पडले होते, नंबरात आली होती पण बकुळचा चेहरा उतरला होता.
"बकुळ, तुझा प्रगतीपुस्तक दाखव माका." असं डोंगरेबाई म्हणताच बकुळने मान खाली घातली.
"बाईंनू, गणितात नि शास्त्रात फेल झाली हा बकुळ. प्रगतीपुस्तक देखवूक लाज वाटता तिका."बकुळचा दोन नंबर भाऊ मधेच बोलला.
बाईंनी बकुळच्या हातातलं प्रगतीपुस्तक काढून घेतलं. भाषा, समाजशास्त्र विषयांत प्रगती बरी होती पण गणित व विज्ञानाचं काय!" बाई चिंतेत पडल्या. तेवढ्यात बकुळची आई पुढे आली,"ह्या बकुळ, म्हशी राखुच्याच कामाचा. भाव येद्या चांगल्या मार्कांनी पास होतत म्हनान तेंका आजुबाजूची नावाजतत. हेचो निकाल बघून काय म्हनतीत! झाला, कशी बशी धावी पार पडांदेत मगे हेचे टकलेर तांदूळ टाकूक सांगतलय."
बकुळ काहीच न बोलता गुपचूप पाटपाणी घेऊ लागली. बाईंना मात्र बकुळच्या आईचं वागणं खटकलं. बकुळचे वडील घरी आले तसं त्यांनीही आपल्या दोन्ही मुलांच कौतुक केलं नि बकुळेचं प्रगतीपुस्तक बघून म्हणाले,"बरोबरीची भावंडा बघ कशी चांगल्या मार्कान पास होतत. नंबर मिळवतत. तुयाव तेंचेवांगडा शाळत जातस. तेंका शिकीवनारे शिक्षक तुकाव शिकीवतत तरी तुका पास देखूल होऊक जमना नाय. आवशीबापाशीचे जीवार फकस्त खावचा पिवचा नि निजायचा."
आता मात्र डोंगरेबाई पुढे सरसावल्या. बकुळच्या आईवडिलांना उद्देशून म्हणाल्या,"दादावैनी, तुमी माका हय रवाक जागा दिलास. घरातल्यांसारी वागणूक दितास. त्या नात्यान बोलतय. बकुळचे बाई म्हनतत, बकुळचो अभ्यास पुरो नसता. पुरो करुक तेका तुमी येळ खय दितास! ही तुमची झील मानसाची पोरा सकाळी उठान अभ्यासाक बसतत. तेंका न्हाऊक पानी बकुळ गरम करता, तेंचा चायपानी बकुळ बघता. आयेक जेवनाक मदत करता. पाट्यार चटणी वाटून दिता, भाकरे थापता."
यावर बकुळचे वडील म्हणाले,"बाईंनू, ही कामा तिका येव्कच व्हईत. उद्या सकाळी लगीन होऊन नवऱ्याच्या घराकडे गेली नि काम ईला नाय तर आवशीबापाशीचो उद्धार करतले. अभ्यास नि घरकाम दोनीव जमाकच व्हया."
"मग ता जसा बकुळेक जमाक व्हया तसा तिच्या भावास्नीव जमाक व्हया. माफ करा भाऊंनू जरा स्पष्टच बोलतय. वाड्यातली कामा,न्हानयेत आग घालना ही कामा बकुळच्या भावांका करूक सांगा. कामा वाटून देवया तिघांकाव. दोन मह्यने असा करूनतरी बघा. माजा वायच आयका."
"बरा होऊंदे तुमच्या मनासारा." बकुळचे वडील म्हणाले. बाईंनी बकुळच्या भावांना समजावलं,"तुमच्या भैनीक कोनी ढ म्हतला तर चलात तुमका! तीव तुमच्यासारी शिकान मोठी जावक व्हयी काय नुको सांगा!"
बकुळच्या भावांना बाईंचं म्हणणं पटलं. बाईंनी कामाची वाटणी करून दिली. वाड्याची साफसफाई, घुडाची साफसफाई थोरल्यावर सोपवली,ल्हानग्याला झाडलोट करायला सांगितलं नि आईला घरकामात मदत करायची जबाबदारी बकुळवर सोपवली. आत्ता बकुळलाही मोकळा वेळ मिळू लागला. शाळेतल्या वर्गशिक्षिका व डोंगरेबाई दोघींनी मिळून बकुळच्या कच्च्या विषयांवर मेहनत घेतली. नऊमाईत बकुळ सगळ्या विषयांत पास झाली होती.
भावांनीच मग वडिलांना सांगितलं,"आम्ही आमची कामा बाईंनी नेमून दिल्यापरमान करत जाऊ. येकल्या बकुळवर भार नुको."
वार्षिक परीक्षेत बकुळचा पहिल्या दहात नंबर आला. बकुळने धावत येऊन बाईंना प्रगतीपुस्तक दाखवलं. बाई जवळजवळ दोन वर्ष त्या गावात होत्या. बाईंचा परीसस्पर्श बकुळच्या आयुष्यात जादू करून गेला.
डोंगरेबाईंनी बकुळला मायेने जवळ घेतलं. सोफ्यावर बसवलं. तिला चहा करून दिला. जेवूनच जायचं म्हणाल्या. बाईंनी बकुळसाठी डाळिंब्यांची उसळ केली, ताकाची कढी, भात केला.
बकुळ, बाईंना त्या दुसऱ्या गावी बदली होऊन गेल्यानंतरची कहाणी सांगत होती. "बाईंनू, तुमी माजे, माज्या घरातल्यांचे डोळे उघडलात. स्त्रीशिक्षणाचा महत्त्व घरातल्यांका पटवून दिलास म्हणान मिया डबल ग्रेज्युएट झालय. बेंकेत नोकरेक लागलय. माझा लगीन जमलाहा. तेव चांगले शिकलले आसत. इंजिनिअर आसत. बाईंनू, तुमच्यापाय ह्या शक्य झाला. तुमचे उपकार कसे मानू!" बाईंनी प्रेमाने तिच्या पाठीवरनं हात फिरवला. बाईंना स्वत:चं अपत्य नव्हतं पण अशी कित्येक मुलं त्यांनी त्यांच्या अध्यापनकाळात घडवली होती आणि त्यांनी आपलं स्मरण ठेवणं याऊपर बाईंची त्यांकडून काहीच अपेक्षा नव्हती.
दोघी मिळून गप्पा मारत, पुर्वीच्या आठवणी जागवत जेवल्या. बाईंनी बागेतल्या वेलचीकेळींचा घड बकुळला भेट दिला, तिच्या वेणीत आपण स्वतः गुंफलेला गजरा माळला, बकुळने दिलेल्या पत्रिकेतील अक्षरांवर त्यांनी मायेने बोटं फिरवली व नक्की येईन तुझ्या लग्नाला असं तिला आश्वासन दिलं.
बकुळ नजरेच्या टप्प्याआड होईस्तोवर बाई व्हरांड्यात उभ्या राहिल्या होत्या. मुलं नसलेलं त्यांचं घर त्यांना मुळीचं रिकामं वाटत नव्हतं. 'कोण म्हणतं, मुलं नाहीएत मला. माझ्या संस्कारांनी घडलेली मुलं, देशाच्या, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत.' डोंगरेबाईंनी असं म्हणत स्वतःलाच शाबासकी दिली.
समाप्त

👌👌💖💖💖💖💖💖
उत्तर द्याहटवा