दिदूला कावळा शिवला!
दिदूला कावळा शिवला!
©® गीता गरुड.
कुंदा इयत्ता आठवीतली मुलगी. सगळ्या विषयांत अगदी हुशार. शास्त्र विषय तर अगदी आवडीचा. सातवीची स्कॉलरशीपही मिळवली पठ्ठीने.
घाटपांडे बाई व मुख्याध्यापक सावंत सर स्वतः तिच्या घरी पुष्पगुच्छ व पेढे घेऊन गेले. घरात पाहुणेमंडळींची वर्दळ होती. हो, सण होता घरात.. गौरीगणपती विराजमान होते. किती रोषणाई केलेली! शिवाय आजुबाजूला रेती पसरुन त्यात मेथी पेरली होती. त्या मेथीचे कोवळे हिरवेगार रोप बाप्पाच्या सजावटीत भर घालत होते. बाप्पाच्या मागील बाजूस कमळाचे चित्र रेखाटले होते.
सर व बाईंनी हातपाय धुवून गणपतीला व गौराईला नमस्कार केला. कालच सत्यनारायणाची पूजा झाली होती. कुंदाच्या वडिलांनी दोघांनाही तीर्थप्रसाद दिला. सर बाई दोघंही स्थानापन्न झाले.
कुंदाच्या वडिलांनी कुंदाच्या आजीस, सरांची व बाईंची ओळख करुन दिली. घाटपांडे बाईंनी कुंदाचे कौतुक केले. "तुमची कुंदा म्हणजे कोहिनूर हिरा आहे हो. अगदी प्रांजळ,सालस,मनमिळावू विद्यार्थिनी..साऱ्या स्टाफची लाडकी. अक्षर तर मोत्याला लाजवेल असं. भाषण,न्रुत्य..सगळ्यात पुढे. शिष्यवृत्ती मिळवून आपल्या शाळेची पत वाढवली बेटीने"
आजी म्हणाली,"व्हय तर असाच माझी नात गुणाची. घरातलीव सगळी कामा करता. निसती पुस्तका घिऊन बसीत नाय. चपात्या काय लाटता सटासटा. चार नाल बसलल्या जाग्यार किसता, कपडेव येकदम लख्ख धुता, कपडे सुकत घातल्यान तर चार लोका बगित रवतीतसे, येकदुखूल चुनी दिसूची नाय. पोरीच्या जातीनं तसाच आसला पायजे मग सासरी गेल्यार बापाशीच्या कुळाचो उद्धार व्हईत नाय."
तेवढ्यात कुंदाची आई करंज्या,लाडू,सरबत घेऊन आली. तिने सरांना व बाईंना नमस्कार केला. बाईंनी कुंदाच्या आईस कुंदा शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल आल्याचं सांगितलं. त्या माऊलीने गणरायापुढे हात जोडून नमस्कार केला.
"तुमच्यासारख्या शिक्षकांपाय आमच्या मुलांका शिक्षनाची गोडी लागली. नाय तर आमका खय फुरसत हा तेंका शिकवूक. ढोरा, शेती..हे याप सांभाळता सांभाळता दिस कवा उजवाडता नि कवा मावळता कळनाच नाय. पन पोरा मातर शाळेतना आल्याबरुबर वायच चायबटर खाल्यानी काय धडे वाचूक बसतत. आमचो देवेनव ताईसारो स्कालरशीप मिळवतलो. व्हय ना रे देवेन."
देवेनने मान डोलवून आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
"हो. आमचं लक्ष आहेच शिवाय तुमचे संस्कारही तितकेच महत्त्वाचे. तुम्ही दोन्ही मुलांना छान वळण लावलय." घाटपांडे बाई चहाचे कप कुंदाच्या आईकडे देता देता म्हणाल्या.
"अहो,पण आहे कुठे कुंदा," सरांनी विचारलं त्याबरोबर
आजी म्हणाली,"कालपासना बायची तब्येत बिघाडली हा म्हनान वायच निजली हा. नायतर गप बसनारी हा काय. नुसतो चिवचिवाट करीत रव्हना आसती. पोटात कशी चावरी करताहा माझ्या नातीच्या. सानच्याक डाग्दराकडना ओषेद हाडूक सांगतय, तिच्या बापाशीक."
आजी सरांपासून व बाईंपासून नेमकं काय लपवतेय हे देवेनच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कुणाशीच खोटं बोलायचं नाही हे सांगणारी आईही मुग गिळून गप्प राहिल्याचं त्याला आश्चर्य वाटलं. सर, बाई एवढ्या लांबनं दिदूचा सत्कार करावयास आले. त्यांना दिदूच्या वळईत नसण्यामागचं खरं कारण कळलंच पाहिजे असं त्याचं मन त्याला पुन्हा पुन्हा सांगू लागलं.
देवेन पुढे झाला व म्हणाला,"नाही सर आजी खोटं बोलत आहे. कुंदा दिदीने एवढं सगळं डेकोरेशन केलं. रात्ररात्र जागली यासाठी. ही हिरवीगार रोपंसुद्धा तिला पहायला मिळाली नाहीत. आजीने मागीलदारच्या खोलीत ठेवलय तिला. आम्हालाही हात लावू देत नाही. दिदूला म्हणे कावळा शिवला. असा कसा शिवेल कावळा? कावळ्याची नि दिदूची छान मैत्री आहे. ती रोज त्याला चपातीचे तुकडे करुन घालते. कावळ्यांशी बोलतेही ती. ती बऱ्याच पक्ष्यांशी बोलते. कावळा तर ग्रीलमधे येऊन दिदूला साद घालत होता पोळीसाठी.. आणि म्हणे दिदूला कावळा शिवला."
देवेनकडे आई,आजी रागाने बघत होत्या पण देवेनने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही.
सरांनी देवेनला जवळ घेतलं व म्हणाले,"चल बरं तुझ्या दिदूकडे."
आता मात्र आजी,आई इरेस पेटल्या,"नको ओ तडे जाव. देव बसलो हा घरात. घरभर आपड होतली. उगा अनर्थ होतलो. भ्रष्टकार जाईत तर मगे निस्तरूक भारी जायत आमका."
घाटपांडे बाई म्हणाल्या,"आजी असं काही होत नाही हो. तिला खेळूबागडू द्या. नका बरं असं कोंडून ठेवू. शाळेतल्या विज्ञानात मुलगी एवढी हुशार आणि घरी मात्र सणादिवशी अडगळीच्या खोलीत का तर तिला पाळी आली म्हणून! मग उपयोगच काय त्या पुस्तकी शिक्षणाचा. आपले आचारविचारही बदलले पाहिजेत."
आता मात्र कुंदाचे वडील पुढे आले व म्हणाले,"हे दोनीव बायका आयकत नायत ओ. दर्शनाच्या आवशीनव मेडीकलमदल्या गोळ्या खाऊन पाळी फुढे ढकलल्यान. कुंदाची ही पहिलीच येळ म्हनान तेका गोळयो देव्क हेंका जमला नाय नायतर तेकाव हेंनी त्ये गोळये चालू केले आसते."
घाटपांडे बाई कुंदाच्या आईजवळ गेल्या. त्यांचा हात हातात धरत म्हणाल्या,"कुंदाची आई,परत असं करु नका. पाळी पुढेमागे करायच्या गोळ्या घेऊन निसर्गदेवतेच्या विरुद्ध जाऊन स्वतःच्या जीवाची वाताहात करुन घेऊ नका. तुम्हाला या दिवसात पाळी आली म्हणून देव तुमच्यावर रागे भरणार नाही. शिवाय दर्शनालाही असं वेगळं पाडू नका. आजी,अहो देवानेच निर्मिली मुलीची जात. तिला मात्रुत्वाचं वरदान देवानेच दिलं आणि तुम्ही तिला पाळी आली की घराच्या कोपऱ्यात बसवून ठेवलात व देवाला,गौराईला कितीही छानछान नैवेद्य करुन घातलात तरी देवाला,गौरीला ते गोड लागतील का? बघा विचार करा. अजुनही वेळ गेली नाही",सरांनी सुनावले.
सरांचे बोलणे कुंदाच्या आईस पटले. कुंदाची आई कुंदाला बाहेर घेऊन आली व गणरायाला नमस्कार करायला सांगितले. कुंदा खूपच आनंदी झाली. कालपासून तिने तिच्या गणोबाचं दर्शन घेतलं नव्हतं. ही बारीक,लुसलुशीत हिरवीगार मेथी पाहिली नव्हती. अनिमिष नेत्राने ती गणरायाकडे,गौराईकडे पहात राहिली. हळव्या रोपांवर सायीचा हात फिरवू लागली.
सर म्हणाले,"कुंदाचे बाबा, कुंदाला कालचा तीर्थप्रसाद द्या."
कुंदाच्या वडिलांनी कुंदाला तीर्थप्रसाद दिला. सरांनी तिला पुष्पगुच्छ दिला व तिचं अभिनंदन केलं. घाटपांडे बाईंनी तिला पेढा भरवला.
तेवढ्यात खिडकीत कुंदाचा कावळा काव काव करु लागला. ताटातली करंजी कुंदीने त्याला नेऊन दिली.
देवेन म्हणाला,"अगं दिदू,लांबून दे. तो कावळा शिवला तर परत तुला एकटीला कोपऱ्यातल्या खोलीत बसावं लागेल."
देवेनच्या या बोलण्यावर सारेच हसले.
********
खरंच गरज आहे काही जुन्या रिती बदलण्याची,स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्याची.
---समाप्त

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा