केला तुका नि झाला माका
केला तुका नि झाला माका
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"
crossorigin="anonymous"></script>
©®गीता गरुड.
बबन्या एसटीची वाट बघत भरडावर थांबला होता. सकाळचं कोवळं ऊन मागे सरून निब्बर ऊन जाणवू लागलं होतं. आपल्या आक्काच्या गावाला जायचं म्हणून तो खूष होता. या आक्काची मुलगी आत्ता लग्नाच्या वयाची झाली होती नि तिच्यासाठी स्थळ पहा असा आक्काने बबन्यामागे घोषा लावला होता.
बरं जावयासाठी आक्काच्या अटीही बऱ्याच होत्या..उंचापुरा, देखणा, सरकारी नोकर, शहरातली नोकरी,गावी घरदार, मुंबईला स्वतःच्या नावावरची खोली..अशी मारुतीच्या शेपटीप्रमाणे आक्काची जावयाबाबतीतच्या अपेक्षांची यादी होती.
बबन्याने गावातलीच दोनचार स्थळं पाहिली होती पण आक्काच्या पसंतीस ती मुलं उतरली नव्हती. आक्काची बेबी बीए पास होती. सरकारी जावई केला की तो बेबीला कुठेतरी सरकारी खात्यात नोकरीला चिकटवेलच असा आक्काचा ठाम विश्वास होता.
बाकी काही असो, बबन्याचा आपल्या भाचीवर फार जीव होता. त्याच्या एकुलत्या एका बहिणीची ती एकुलती एक मुलगी होती. बबन्यालाही लग्नाला दहा वर्ष झाली तरी मुलबाळ झालं नव्हतं. बबन्याने आपली सारी माया जणू आपल्या भाचीवर ओतली होती. भाचीचाही मामावर भारी जीव होता.
"काय रे बबन्या खय चललस खय न्हिमराचो?" तिथून जाणाऱ्या सदाभाऊने त्याला विचारलं. "आक्काहारी चललय साळगावाक. वायच काम आसा."
"बरा बरा. भैनभावातनी आपुलकी रव्हता, भेटत रव्हायचा."
"तुमी हडे कोनाहारी इलास?"
"आमची मंदा आसा ना लग्नाची. हिच्या भैनीन पालयांच्या विजयचा नाव सुचवल्यान. मुंबयतल्या बँकेत रिलेशनशिप मेनेजर आसा. ठाण्यात ब्लॉक आसा स्वत:च्या नावार. आव्सबापूस झिलावांगडा ठाण्यात रवतत. झिलाचा लगीन लावून दिल्यानी काय गावची वाट धरतीत. हडेव स्लेबचा घर बांधल्यानी हा. सगळा काय ता बरा हा. विजयची थोरली भैन डिगवळ्यात दिलली असा. तीव थय घोडबंदराक रव्हता. ठाण्याच्या सायटीकच इला ता. विजय यात्रेक इललो असा चार दिस रव्हतलो म्हनान तेका बघूक इलय. माका पसंद पडलो तर घराकडे बोलवतलय. चार मानसा शेजारपाजारची बोलवून बघुचो कार्यक्रम करून घेतलय. सगळा घाईत करूक व्हया. तुका पोरगो कसो वाटता? नाय म्हंजे तुज्या शेजारच्या गावचो आसा म्हनान तुका इचारतय. तुज्यार इस्वास आसा माझो, तुया खरा ताच सांगतलस."
बबन्या काही वेळ गप्पच बसला. मग एक उसासा टाकून म्हणाला,"पोरग्यात नाव ठेवन्यासारख्या काय नाय. रुपान देखणो आसा, उच आसा, नोकरीवर आसा, सवताचा घर आसा ठाण्यात पन.."
बबन्याच्या या पॉझवर सदाभाऊ अस्वस्थ झाला. म्हणाला,"बबन्या,"माझा चेडू ता तुझा चेडू. तुका काय इपरित आढाळला तर माका सांग."
बबन्या म्हणाला,"त्या विजयचा कायतरी लफडा चललाहा, असा कानार इललला. ही घरची लोका तेचेसाठी सोरगत शोधतहत पन मुंबयत तेची तेना शोधल्यान हा.कोनतरी सिंधीन हा म्हनतत. दोन वरसा झाली एकमेकांका भेटतत. हातीत हात धरून भटकतत. थयव आपली मानसा आसत. विज्याक समजाक व्हया. त्याका वाटत असतला हय कायव केला तर चलता. मिया आपला कानार इला ता सांगलय."
सदाभाऊ म्हणाला,"विज्याचा आसा काय असात कल्पनाच नव्हती रे बबन्या. बरा झाला देवासारो भेटलस. मिया माझ्या मंदाक आगीत नाय ढकलुचय. पोर जड नाय झालीहा माका. जावय नोकरदार नसलो तरी चलात पन मंदार पिरेम करनारो सज्जन गुनाचो व्हयो. कोन बघन्यात इलो तर सांग माका. आता इलय हयसर वसरगावाक तर मटान नि वजरी घेऊन जातय घराकडे."
सदाभाऊला कसा झक्कास गुंडाळला या विचारात आपल्याच हुशारीवर बबन्या मस्त हसला. डबीतली तंबाखू घेऊन त्याने तळहातावर मळली व दाढकानात भरली, तेवढ्यात धुरळा उडवीत लाल परी आली. बबन्या गाडीत चढला नि अर्ध्या तासात बहिणीच्या घरी पोहोचला. तिथे त्याने बहिणीला विजयच्या स्थळाविषयी सांगितलं. बहिणीलाही ही सोयरीक पसंत पडली. बबन्याने सगळी बोलाचाली केली. विजय, विजयचे आईवडील, काका,मामा बेबीला बघायला आले. ठराव झाला. साखरपुड्याचा, लग्नाचा मुहूर्त ठरवला नि दोनेक महिन्यात लग्न होऊन बेबी विजयसोबत सासरी रहायला गेली.
बबनचा व त्याच्या पत्नीचा भाचीच्या लग्नात यथोचित मानपान झाला. साधारण सहाएक महिने झाले असतील बेबीचं लग्न होऊन, बबनला आक्काचा फोन आला,"आसशीत तिथना, आसशीत तस्सो निघून ये. बेबी परत इलाहा."
बबन्याला काही कळेना. चहाचा घोट घेऊन तो आक्काच्या घरी जायला निघाला. आक्काच्या घरी पोहोचला तर नेहमी हसतमुखाने स्वागत करणारी आक्का एकदम अंगावरच आली. "बबन्या, व्हयता काय ता निस्तर आता. बेबी परत इलाहा. जावचा नाय म्हनताहा सासरवाडीक."
"बेबी, घोवावांगडा भांडान इलस? गो घोबायलेची भांडना व्हईतच आसतत. तेतूर नया ता काय?"
बेबी स्फुंदू लागली,"मामा,तेंका फकस्त मोलकरीण व्हयी होती. दिसभर कामाक जुपून ठेवतत. काय केलला तेंचे मनाक येयत नाय नि आवाशीबापाशीवरना शियीगाळ करतत. मिया नाय जावचय थय. शेजाऱ्यांवांगडाव बोलासारा नाय. पयले बोललले नोकरी करूक हरकत नाय तुका. आता माका मैतरणीच्या वळखीर जॉब गावा हुतो ठाण्यात तर बोलाक लागले, घराकडे दुर्लक्ष होतला तुझा. तुका नोकरी नि घरकाम दोनीव करूक जमाचा नाय. पिंजऱ्यातल्या पोपटासारी माझी दशा झाली थय. माका नुको तेंचो सोन्याचो दानो. भाजीभाकरी दोन येळची नि शिपीभर माया, येवडीच अपेक्षा होती रे मामा माझी."
"बेबी आपुनव जरा स्वैन घेऊक व्हया," बबन्या म्हणाला तशी बेबी अजूनच रडू लागली,"मामा, तुका काय वाटता माका नांदूची हौस नाय! सगळा सहन केलं आसतय रे पन हेंचा भायर प्रकरन असा. व्हॉट्सेपवर कुना जानुचे फोन येतत. इचारलय तर तसला काय नाय म्हनान सांगतत. चार दिस गप रवतत. पुना येरे माज्या मागल्या."
आता बेबीचे वडीलही पुढे आले,"बबन्या तुज्या शब्दार भरवसो ठेवलय नि ह्या काय होऊन बसला! एकुलत्या एका चेडवाच्या माथी हे हालवनयास इले. चार पैसे मह्यन्याक कमी कमावनारोव जावय चललो आसतो पन माज्या पोरार हात उचलल्यान त्याना. शियीगाळ करता नि ह्या जानुचा प्रकरन.. कसा नि काय म्हनान सहन करीत!"
बबन्याने बहिणीला, भाऊजींना कसाबसा समजवण्याचा प्रयत्न केला. विजयकडे मुंबयला जाऊन येतो म्हणाला. चार जाणती माणसं जमवून त्याला सुनवतो म्हणाला पण आता त्याच्या या शब्दांवर ना आक्काला भरवसा होता ना भाऊजींना.
बेबीचे भरलेले डोळे पाहून बबनचं काळीज गलबलत होतं. त्याची लाडाची भाची होती ती. नारळ भुतुरसून कसो निघात ता सांगाक येत नाय..तो एक उसासा टाकून स्वत:शीच पुटपुटला नि वाटेला लागला.
बबन गाडी पकडण्यासाठी झाडाखाली थांबला असता तिथनं सदाभाऊ जात होता. सदाभाऊने त्याला नमस्कार केला. त्याचे हात धरत म्हणाला,"बबनभाऊ, खरातर तुमचे पाय धरूक व्हये. तुमचा आयकान मिया ता घोडबंदरवाला स्थळ नकारलय. चला आज तुमका पार्टी दितय बुंदीची. माझ्या चेडवाक साळगावच्या शिक्षकाचा मागना इलाहा. आता माझा चेडू सुखात रव्हतला नि डोळ्यासमोरव रव्हतला. ते माज्या चेडवाक फुढे शिकवूकव राजी आसत."
गरमगरम बुंदी पुढ्यात आली पण एवढी गोड, रसाळ बुंदी बबन्याला गोड लागेना. त्याच्या तोंडात ती फिरत राहिली. बबन्याची करणी त्याच्यावरच नि पर्यायाने त्याच्या लाडक्या भाचीवर उलटली होती.
समाप्त

👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा