वाघोबा म्हंटलं तरी खातोच!
..वाघोबा म्हंटल तरी खातोच!
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"
crossorigin="anonymous"></script>
©®गीता गरुड.
शरयूच्या घरी तिची नणंद,मोहिनी आली होती. शरयूने मोहिनीताई येणार म्हणून चारीठाव स्वैंपाक केला होता. वरणभात, लाल माठाची भाजी, वटाण्याची उसळ, आमरस सगळा स्वैंपाक तयार होता नि शरयू तिच्या सासूला नि मोहिनीताईंना गरमागरम पुऱ्या वाढत होती. दोघीतल्या एकीनेही तिने केलेल्या एकाही पदार्थाचं कौतुक केलं नव्हतं. या घरात आल्यापासनं निमुटपणे काम करायचं, कौतुकाची अपेक्षा मुळीच करायची नाही हे शरयुला चांगलं ज्ञात झालं होतं. शरयूच्या नवऱ्याला शरयूचं कौतुक असायचं पण आईबहिणीसमोर त्याने नव्या नवलाईच्या वेळी केलेल्या शरयूच्या स्तुतीवरून त्या दोघींची त्याला खूप बोलणी खावी लागली होती त्यामुळे तोही शरयूशी जेवढ्यास तेवढं वागायचा.
दोन भाकऱ्या खाऊन होताच "भात वाढ गे शssरे." मोहिनीताई म्हणाल्या तसं तिने वाफाळता भात त्यांच्या पानात वाढला. वरती पिवळंधम्मक वरण वाढलं.
"काय ह्या पातळ पानी. कसा बाय खातास!" वरणभात चिवडीत मोहिनीताई म्हणाल्या.
"आता काय कमी वरसा झाली लगीन जाव्न. किती नि काय म्हनान शिकवायचा. आपला ता खरा करता." शरयूची आई लेकीपुढे सुनेची नालस्ती करू लागली.
शरयूच्या खरंतर कंबरेतनं सारखी कळ येत होती तरी तिने एकटीने सगळा स्वैंपाक केला होता नि तिच्या मेहनतीची दोन शब्दांनी प्रशंसा करण्याचीही दानत त्या मायलेकींकडे नव्हती.
जेवणं, मागची आवराआवर झाल्यावर शरयूही जरा चटईवर लवंडली. मोहिनीताई नि शरयूच्या सासूची हळू आवाजात बोलणी चालू होती.
"गो काव्या गेला काय सासरवाडेक?"
"नाय गे. नायच जावचय म्हनताहा."
"दोन मह्यने होईत इले न्हय. जावयांचो काय फोनबिन?"
"करतत ते फोन. दोन पावटी व्हरूक पन इलले पन हेचा याकच नणंदबाय आपल्या घराकडे गेल्याशिवाय जावचय नाय म्हनता. णंदेक चवथो चालू असतलो. पानयाचो तांबयो देखूल उचलुचो नाय म्हनान सांगल्यानी डाक्टरांनी. तिच्या सेवेक काय माझा चेडू दासी म्हनान रवतला! पयलो झिल तिचो घरात निसतो किल्लेश करीत रव्हता. मामी कवटाची पोळी दी, मामी मेगी कर, मामी चाय नि बटर दी. तेची आजी भायरची कामा करता नि ह्यो कुतरो माझ्या चेडवाक पिडता. नको जीव केल्यानी समाजलस, म्हनान इली माझी काव्या नायतर आपला घर सोडून माह्यराक येऊन कित्या रव्हात!"
"म्हंजे आजून साताठ मह्यने काव्या तुझ्याहारीच रव्हतली. लोकांनी, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी इचारला तर सांग तिच्या जीवाक बरा नाय हा नि घराकडे लय कामाक लावतत. दुसरी खोली बघुचा चललाहा मगे नया घरात जाव्ची असा."
आईच्या ह्या बोलण्यावर मोहिनीताई पुरक हसल्या."व्हय तर असाच सांगलय मिया. तवा खय चवकशी करनाऱ्यांची तोंडा बंद झाली."
शरयूला ती लग्न करून या घरात नांदायला आली तेंव्हाचे दिवस आठवले. नवऱ्याशी भांडण झालं की मोहिनीताई गळा काढत माहेरी यायची. मायलेकी मग मोहिनीताईंच्या सासरच्यांच्या कुचाळक्या करत बसायच्या. त्यांच्या दिमतीला शरयू होतीच. घरातली धुणी,भांडी, केरवारा,स्वैंपाकपाणी करेस्तोवर दमून जायची बिचारी. मोहिनीताई एखादं बसकीचं काम घेऊन तासनतास बसून रहायच्या. काही काम सांगायला गेलं की वसकन अंगावर यायच्या,"माका कामा सांगतस! माजा मायार असा ह्या. सासरी कामाच करतय. हयसर वायच जीवाक आराम करूक येतय समाजला." मोहिनीताई चारचार महिने माहेराला येऊन रहायच्या. शरयूच्या कामातील चुका काढत बसायच्या. शरयूला मनापासनं त्या कधी आपल्याशा वाटल्याच नाहीत.
काव्या शाळेत जाऊ लागल्यावर मात्र त्यांचं माहेरी येऊन रहाणं कमी झालं होतं तरी उन्हाळ्यात दोन महिने मुक्काम ठोकायच्या. आता काव्याला काही महिने आजोळी ठेवायचं त्यांच्या मनात होतं म्हणून त्या आईची मनधरणी करत होत्या म्हणजे कसं लोकांच्या चौकश्याही बंद झाल्या असत्या नि काव्याला सासरी कराव्या लागणाऱ्या कामातून तिची सुटका झाली असती. एका दगडात दोन पक्षी मारायची ही मोहिनीताईंची जुनी सवय शरयूला चांगलीच ठाऊक होती पण आदल्यादिवशी शरयू देवळात गेली असता तिथे तिला काव्याचे सासरे, दिनकरदादा भेटले होते. ते शरयूच्या भावाचे मित्र होते. शरयूने त्यांना घरी येण्याचा आग्रह केला पण ते म्हणाले,"पुन्हा कधी इलय हे वाटेन काय नक्की येतलय तुमच्या घराकडे. आमची सूनबाय माह्यराक जाऊन रव्हलीहा. काय सांगा तुका, माजा चेडू दोन जीवांचा आसा, तेचे जीवाक बरा नाय, तडे तेका बघूक कोन नाय म्हनान मिया घराकडे घेऊन इलय तर घरवालनीचो दमो चाळावलो. भांड्याकुंड्याक बाई आसा पन रांधनावाढना करूचा टाकून सूनबाय माह्यराक जाऊन रव्हाक लागली. तुज्या णंदेचा चेडू ना ता. वायच णंदेक चार समजुतीचे गोष्टी सांग म्हनावा काव्याक तिच्या सासरची ओढ लागाक व्हयी झाल्या तेचो पाय सासरी टिकाक व्हयो. उठताबसता माह्यराक गेला तर कसा होतला."
शरयू म्हणाली,"दादानू, समजावून सांगून आयकनाऱ्यातली नाय ओ माझी नणंदबाय. तरी बघतय. वाघ म्हतलो तरी खातलो नि वाघोबा म्हतलो तरी खातलोच. आपन मानसा घरातले वाद भायर जाव नये म्हनान ओगी रवतव पन ही लोका तेचो गैरफायदो घेतत. तुमी नका काळजी करू. वैनीक जपा नि चेडवाक सांभाळा. मिया बघतय हे दोघींचा कसा काय ता."
सकाळी आंघोळपांघोळ झाल्यावर शरयूने चहाला आधण ठेवलं. आंबोळ्यांचं पीठ फुगून मस्त गरगरीत आलं होतं. चुलीवर बिडाचा तवा ठेवून ती आंबोळ्या काढायला बसली.
मोहिनीताई चहा प्यायला येऊन बसल्या. शरयूने नवऱ्याला व मोहिनीताईंना चहा कपात ओतून दिला. गरगरम लुसलुशीत पावासारख्या झालेल्या आंबोळ्यांची ताटली त्यांच्या पुढ्यात ठेवली. भाऊबहीण दोघंही चहाआंबोळी खात होती. शरयूची सासूही तिथे येऊन बसली. शरयूने तिला प्यायला गरम पाणी दिलं. मोहिनीताईने कालचा विषय काढला. काव्या, नणंद गेल्याशिवाय घरी जायचं नाय म्हणतेय नि इकडे लोकं काव्या माहेरी किती दिवस रहाणार विचारतात ही सगळी कहाणी सांगितली.
"मगे पाठव तेका सासरवाडीक." भाऊ म्हणाला.
"नाय रे बाबा. तेका इतक्या कामाची सवय नाय. तेचो जीव तो केदो. हाली कामान शापच हेलपाटलाहा."
"मगे ताई तुझा म्हनना तरी काय? डाक्टराक देखवुया काय. गोड बातमीबितमी.."
"तसला काय नाय रे. कलच न्हाला न्हय. डाक्टराकडे न्हेऊची गरज नाय. तेका हडे आजवाळाक पाठवतय. आजीच्या देखरेखीखाली रव्हांदेत. मामी काय व्हया नको ता करून घालीत भाचीक. मामीच्या हातची सागोती, सार आवाडता माझ्या काव्याक."
"तसा म्हनतस तर दि पाठवून. ही थोडीच नाय म्हनतली." शरयूचा नवरा कपात उरलेला चहा पीत म्हणाला.
शरयूचे हात कामं करत असले तरी कान या बहीणभावांच्या बोलण्याकडे लागले होते. दिनकरदादांचा दीनवाळा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. तिने चुलीतली आग सारखी केली व मोहिनीताईंना म्हणाली,"मोहिनीताई न्हान तोंडी मोठो घास घेतय. रागवू नुकोसा. काव्याक हयसर पाठवलास तर लयच लय तर चार दिस पाठवा पन जोड्यान येयत तर लय बरा. काय व्हया ता करून घालीन तेंका पन जावयबापू घराकडे बोलवतहत नि तुमी तेका पाठीशी घालतहास ह्यो परकार काय माका पटना नाय. तुमीव पयले अशीच येऊन रव्हा हुतास तवा मिया नईन होतय. आता हे घराक मिया जुना झालय. मनातला मनातच झिरवण्यापरीस बोलून मन मोकळा करूक शिकलय.चार दिसाचे वर मिया काव्याक हडे ठिवून घेवचय नाय. हा तेचो घोव इलो नि रव्हांदे म्हनलो तर गोष्ट येगळी."
शरयूचं बोलणं ऐकून मोहिनीताई भलतीच तापली,"काय बोलतहस काय. ह्या जितका तुझा घर आसा ना तितक्याच माझा नि माज्या लेकीचाव घर असा. लक्षात ठेय शरयू."
"बरा तर मगे तुमच्या घरात तुमी दोघीव मायलेकी रवा नि रानून खावा. मिया जातय माज्या माहेराक. दादा किती दिस झाले रव्हाक बोलवताहा."
"लय शानी झाली रे तुझी बायको आता. आता तिका णंदेची अडचण वाटाक लागली. मिया जातय माज्या घराक." म्हणत मोहिनीताई वाटेला लागली.
शरयू शांतपणे बिड्यावर आंबोळीचं पीठ ओतून चमच्याने गोल फिरवत होती. तिचा नवरा नि तिची सासू तिच्या करारी मुद्रेकडे पहात बसले. चुलीतल्या आगीने तिचा निग्रही चेहरा अधिकच तेजस्वी दिसत होता.
समाप्त

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा