लेकीचे प्रश्नोपनिषद
लेकीचे प्रश्नोपनिषद
डॉ. लीला पाटील यांची 'लेकीचे प्रश्नोपनिषद' ही बापलेकी या कथासंग्रहातली कथा आज म्हणजे थोड्याच वेळापुर्वी वाचली. प्रसिद्ध लेखक ना. सी. फडके हे लीला पाटील यांचे वडील. लीला पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. बी.एड, एम.एडसाठी तसेच इतरही शैक्षणिक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. बऱ्याच पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. २०२० मधे त्यांचे निधन झाले.
लीला यांनी कथेत तिच्या बालपणीच्या, वडिलांच्या सहवासातल्या सह्रद्य आठवणी सांगितल्या आहेत. नंबरापाठी पळू न लावणारे बाबा, धाकात न ठेवणारे बाबा,फिरायला घेऊन जाणारे बाबा, भाषणांना घेऊन जाणारे बाबा अशी किती प्रेमळ छबी होती लेकीच्या मनात बाबांची नि हेच बाबा दौऱ्याला म्हणून गेले नि दुसरं लग्न करून आले..काय आघात झाला असेल त्या कोवळ्या मनावर! लीला तेंव्हा अडनिड्या वयाची होती.
बाबा दुसऱ्या बायकोसोबत दुसऱ्या घरी रहायला गेले, त्यांनी नवा संसार थाटला तरी ते दिवसातनं दहाएक मिनटं पहिल्या संसारात जाऊन बसायचे तेंव्हा लेकीचा संताप अनावर व्हायचा, दुसरं लग्न केलत नं इथे कशासाठी येता..लोकांना मी आधीच्या बायकोचीही काळजी घेतो दाखवण्यासाठी? तिला बरंच बोलायचं असायचं पण आईच्या धाकामुळे शब्द ओठांतच रहायचे. तिची प्रचंड घुसमट व्हायची.
दुसऱ्या बायकोला नवऱ्याने पहिल्या बायकोशी अगर तिच्या मुलांशी संबंध ठेवलेला मुळीच मंजूर नव्हता. लीला म्हणते, पाटीवरची अक्षरं पुसण्याएवढं नाती पुसणं सोप्पं असतं असं या एम. ए. शिकलेल्या बाईला वाटतं का!
फडक्यांनी मी पगारातला निम्मा हिस्सा पहिल्या पत्नीला द्यायचो लिहिलय त्यावर लेक म्हणते दुसरा संसार दोन माणसांचा नि पहिल्या संसारात बायको नि पाच शिकणारी मुलं..कशी म्हणून त्या पगाराची समान वाटणी केली असेल! याचे धक्के मुलांनी सोसले,कसले लाड म्हणून झाले नाहीत, क्रमिक पुस्तकंही मिळण्याची वानवा होती. बऱ्याचदा आईला दागिन्यांच्या डब्यातील ठेव गहाण ठेवावी लागे किंवा विकावी लागे पण लीला वडलांना काही बोलू शकत नव्हती कारण आईचं म्हणजे मनोरमाबाईंच म्हणणं होतं की आपल्यामुळे त्यांना दुसऱ्या संसारात काही त्रास होता कामा नये.
नाव मोठं नि लक्षण खोटं असं वाटतं. फडक्यांच्या कांदबऱ्या गोडगुलाबी म्हणतात खऱ्या पण मी काही त्या वाचल्या नाहीत. लिखाणावरून, अभिनयावरून माणूस जड्ज करणं खरंच चुकीचं ठरेल. चांगला लेखक,कवी अगर अभिनेता त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातही तसाच असेल असा समज सर्वसामान्य माणसांचा, चाहत्यांचा होतो पण त्या गोड गैरसमजापलिकडचं खरं स्वरूप पचवणं बरेचदा अवघड जातं, हो ना.
©®गीता गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा