तर्हेवाईक माणसे
तर्हेवाईक माणसं
©®गीता गरुड.
काही वर्षांपूर्वी, आमच्या पोस्ट ऑफिसच्या काऊंटरला एक गोऱ्यापान बाई बसायच्या. त्या काऊंटरला रजिस्टर, मनि ऑर्डर अशी दोनतीन कामांची लाईन लागलेली असायची, बाहेर माणसं ताटकळत उभी. लायनीतल्या माणसांना आत काय चाललय ते पहाण्याची कोण उत्कंठा, उत्सुकता असते. असेच एकदोघे खिडकीतनं आत बघत असता, बाई जोरात ओरडल्या, रा़ग कडेला सरकवा, माझ्यासमोर नको, माझं थोबाड बघू नका. माझं थोबाड बघायला घरात माझा नवरा आहे. बाहेरच्या ग्राहकांची थोबाडे खाडकन उतरली, अगदी पहाण्यासारखी झाली. उपमर्द कसा करावा ते ह्या काऊंटरच्या आत असणाऱ्यांकडून शिकावं.
यावरून आठवलं, एकदा दाढ लयच ठणकत होती, काय तो सोक्षमोक्ष लावायचा..दाढेचा म्हणून डेंटिस्टकडे गेले. डेंटिस्ट सत्तरीकडे झुकलेले. त्यांचं आत एका पेशंटला तपासणं चालू होतं. सिमेंट, खडीबिडी भरत होते असतील दातात, घ्रु घ्रु मशीनचा आवाजही येत होता. तो आवाज वगैरे बंद झाला तशा माझ्यासमोर बसलेल्या बाई ज्या अंबरनाथवरून ट्रेनने आल्या होत्या त्या पुढचा नंबर त्यांचा असल्या कारणाने दारजवळ उभ्या राहिल्या नि अजून एकदोघे तिथे काही कामासाठी उभे राहिले. डॉक्टरांनी खस्सकन दरवाजा उघडला व भस्सकन अंगावरच आले..दारात का गर्दी चला बाजूला व्हा नि त्या बाईंना विचारू लागले..तुम्ही का अशा उभ्या, तुम्हाला काय माझ्याशी लग्न करायचय? त्या बिचाऱ्या विधवा बाई त्यांना मेल्याहून मेल्यासारं झालं, त्या नकारार्थी मान हलवत मागे सरल्या मग थोडक्या वेळात डॉक्टरांनाच काय वाटलं कोण जाणे स्वतः त्यांना तपासायला आत बोलवून घेतलं. मला लै म्हणजे लैच हसू येत होतं डॉक्टरांच्या त्या अवताराचं. नंतर माझा नं. आला, मी खुर्चीवर आरूढ झाले. बोटाने नेमकी दाढ दाखवू लागले तर दोनदा माझ्यावर डोळे वटारले..तोंडात बोट घालू नको..अरे पण दाखवायचा कसा, बोटानेच दाखवायचा ना, मला परत हसू येऊ लागलं. दुसऱ्या दिवशी बोलावलं..मी गेलेच नै, एका नवशिक्या, उमद्या डेंटिस्टकडे जाऊन दाढेची डागडुजी अगदी खणणे, भरणे, टोपी घालणे सारं आरामात करून घेतल.
एकदा मी स्टेशनला यायला नि समोर लोकल सुटायच्या पवित्र्यात उभी, मी धावत जाऊन पकडली खरी, पण एका जाडगुल्या ललनेला पकडता नाही आली, तिने उद्वेगाने माझ्या पाठीत एक जोराचा रट्टा हाणला, मी भांबावून, बावरून, कळवळून तिच्याकडे पाहिलं तर रागात म्हणते कशी..गाडीत चढायला पाहिजे नं तुला..आता काय बोलणार यावर माझा पामर जीव.
अशी तर्हेवाईक माणसं वाटेत कुठे ना कुठे भेटत असतात आणि कुठचं बरं पाणी पितात ही असा विचार मनात येत रहातो. आपण बारकाईने निरीक्षण केलं की बरेच असे वल्ली आपल्या आजुबाजूस वावरताना दिसतात. अगदी सकाळीच छान शुचिर्भूत होऊन, पावडर गंध लावून काही काकू बाहेर पडतात, हातात प्लास्टीकची पिशवी असते, सोसायटीतल्या, बंगल्यांच्या जाळीबाहेर डोकावणाऱ्या जास्वंदीच्या, गुलाबाच्या अर्धोन्मिलीत कळ्या अगदी अधाशीपणे तोडतात. दहावीस रुपयांना बाजारात फुलं मिळत असताना सकाळीच सकाळी हे चौर्यकर्म का..बरं ते कोणाच्या नजरेत भरू नये म्हणून अंधारात करताना, एखादी उंचावरली कळी, उंचावून काढताना दगडधोंड्यांवरनं पाय सरकला नि बुड खाली झेजरलं, पाय लचकला तर कितीला पडावं.अशा किती काकवा पडल्याही असतील सांगतात कोणाला! पुरुषही कमी नाहीत कळी वरची अलगद काढण्यासाठी काठीचा वापर करतात.
काहीजणं तर स्वत:चं घर अगदी आरशाहून लख्ख करतात पण रस्त्यावर येताच त्यांच्या पोटात मळमळ सुरू होते नि वाटभर थुंकत जातात.
यावरून आठवलं, एकदा मी खाली उतरले, गेट उघडलं तर बाहेर एक गब्दुल काळा कुत्रा डावीउजवीकडे कायतरी शोधीत, हुंगीत होता. मला कळेना आपण कोणत्या वाटेने जावं, तिथे उभ्या असणाऱ्या माणसाकडे मी सहेतुक पहाताच तो डॉगओनर म्हणाला..तुम्ही तुमच्या वाटेने जा. माझा डॉगी त्याचं पोट मोकळं करायला हवी तशी जागा शोधतोय. हवी तशी जागा..सिलेक्ट करणार मग तो आपला कार्यभाग उरकणार ..मी मुग,मटकी, वटाणे, फुटाणे गिळून वाटेला लागले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा