पुस्तक समिक्षा 'ब्र'
#ब्र
कविता महाजन
राजहंस प्रकाशन, पुणे
तोंडातनं ब्र काढायची हिंमत नव्हती..अशा प्रकारची वाक्य आपण ऐकत आलो, उच्चारत आलो पण हा ब्र म्हणजे नेमकं काय तर स्वत:चं म्हणणं मांडण्याची हिंमत.
कथेतील नायिका प्रफुल्ला हिचं व्यक्तीगत जीवन व तिचं सामाजिक जीवन या दोन समांतर रस्त्यांवरनं कादंबरी वेग घेते. प्रफुल्लाला दोन बहिणी व एक भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. प्रफुल्ला एका कंपनीत टायपिस्ट म्हणून काम करते, तिथले साहेब तिला मागणी घालतात नि प्रफुल्लाचं त्यांच्याशी लग्न होतं. पुढे तिला बिट्टू होतो.
ती नवऱ्याला घरीही साहेबच म्हणते हा साहेबरुपी, नवरारुपी पुरुष तिला नेहमी शिव्यांची लाखोली वहातो, लाथाखोटांनी मारतो इतकंच काय तर मुलाच्या मनावरही तुझी आई अडाणी, बावळट, व्यवहारशून्य आहे असं बिंबवत रहातो.
हा साहेब दुसरीशी सूत जुळवतो. ओढूनताणून संबंध टिकवण्यापेक्षा प्रफुल्ला त्याला सोडचिठ्ठी देते. मुलगाही वडिलांसोबत निघून जातो. माहेरून भावाचा अजिबात पाठिंबा नाही, उलट आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा उपदेश. प्रफुल्ला मित्राच्या सामाजिक संस्थेत सर्व्हे करून अहवाल लिहिण्याचं काम स्वीकारते, कितीक गावांत, वाड्यांत, डोंगरकपारींतून तिथल्या स्वयंसेवकांसोबत फिरते. आदिवासी, कातकरी,..अशा कितीक महिलांशी तिचा संपर्क होतो. बाईला राजकारणात दिल्या गेलेल्या राखीव जागा आणि या बायांनी फक्त कोऱ्या पानावर सह्या कराव्या, फक्त खुर्चीवर बसावं निमुटंपंणे, सगळे निर्णय पुरुष घेणार हा पुरुषांचा
अट्टाहास.. या बायांच्या समस्यांना त्यांच्या तोंडून वाचा फोडते, लिहून घेते.
राखीव जागातनं बाया निवडून येऊ लागल्या. आदिवासी विकास संघटनेच्या सभांना, शिबीरांना जाऊ लागल्या. सरकारी योजना, त्यांचा आपल्या गावाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे, लाईटसाठी अर्जं करणे, विहिरीसाठी अर्ज करणे, रस्त्यांसाठी तालुक्याच्या वाऱ्या करणे, काही ठिकाणी श्रमदानातून कच्चे रस्ते करून घेणे ही कामं निस्पृहपणे करू लागल्या. बचतगट स्थापन केले, महिला एकीकरण होऊ लागलं. या बाया कातकरी, वारली..अशा समाजांतील आहेत. दहातली एखादीच शिकलेली, बाकीच्या तिच्या साथीने जाणाऱ्या.
विवाहित स्त्रीने परपुरुषाशी अनैतिक संबंध ठेवले म्हणून जातपंचायतीने तिची कापडं फेडून, तिला नग्न करून तिच्या डोक्यावर पाथर ठेवून तिला वाडीतनं फिरायला लावणे, तिचा लिलाव करणे..
एकीला साताठ जळत्या झोपड्यांतून धावत जायला लावणे..अशा अमानुष शिक्षा या बाया भोगत होत्या. यांच्यातल्याच काही पुढे येऊन ब्र काढायला शिकल्या, आपला आवाज उमटवायला, आपल्या हक्कांसाठी लढा देणं शिकल्या. अहवालासाठी मुलाखती घेताना अशा अनेक हिरकण्यांच्या संपर्कात प्रफुल्ला येते, घडत जाते. आईला ग्रुहित धरणाऱ्या पोटच्या लेकरालाही ती वेळीच भानावर आणते . ज्या ज्या गावात जाते, तिथे जे मिळेल ते खाते, कधी दोन दिवस तर नुसत्या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगांवर तिथल्या स्थानिकांप्रमाणे भूक भागवते. कंबर दुखते म्हणून आदिवासी सखीने वाढलेलं भात व बेडकीच्या तंगडीचं सार खाते, कधी भात व उकडलेला पाला खाते. डोंगरदऱ्यांतून, अनेक पाड्यांतून, वस्त्यांतून फिरते, निसर्गाचे विविध रंग तिच्यातल्या चित्रकाराला खुणावत रहातात.
लेखिका यात आदिवासींच्या समस्या मांडतात..
घरातल्या बाईचे दिवसाचे रोज किमान चार तास सरपण गोळा करण्यात व किमान दोन तास पाणी भरण्यात जातात. पाण्याचा दुर्धर प्रश्न. उन्हाळ्यात नदी आटते अशावेळी तिच्यात डबरी खोदून पाणी मिळवावं लागतं. विटभट्टीची कामं करताना पायांची सालपटं निघतात, तुकडे पडतात, कमीतकमी मजुरीवर राबावं लागतं. कामांमुळे येणारा थकवा जाणवू नये म्हणून बाप्यांसोबत बायाही दारू ढोसून लवंडतात, यातूनच पोरांच्याही तोंडात पुढे दारुची बाटली..बहुधा घटस्फोटित, परित्यक्ता, विधवा बाया दारू गाळण्याचा धंदा करतात. हफ्ते जिथे पोहोचवायचे तिथे आधीच पोहोचवतात त्यामुळे धंदा सुरू रहातो. साधं जंगलात पडलेलं लाकूड, करवंद घेऊन आलं तरी फॉरेस्टर हफ्ता मागतो, भ्रष्टाचार किती खोलवर रूजला आहे, माणुसकी समूळ पोखरतो आहे हे जाणवतं. जीव जगवण्यासाठी, प्रथिनांची गरज भागवण्यासाठी ही लोकं रानडुकरं, खेकडे, बेडकं, पक्षी, मेलेल्या जनावरांच मांस हे सारं खातात. बायांच्या छातीला नि कंबरेला लज्जारक्षणापुरती चिंधीवजा कापडं, पुरुषांच्या फक्त कंबरेला, लहानी बहुतेकदा उघडीनागडीच फिरतात. सरकारकडनं शिलाईमशीन मोफत मिळते, प्रशिक्षण मिळतं पण पाड्यावर गिर्हायक कुठची..कापडं कोण पुरवणार मग या बाया मशनी शहरात न्हेऊन विकतात नि थोडेबहुत जे पैसे मिळतात त्यात समाधान मानतात. डास, चिलटांचे चावे, ओडोमॉस, मॉर्टीन हे असले वारे यांना ठाऊक नाहीत नि परवडणारेही नाहीत. वीटभट्टीवर कामाला गेलं की मुलंही त्यांच्यासोबत कामाच्या जागी मग मुलांची शाळा बुडते, परत मुक्कामाठिकाणी आल्यावरही थोडकीच पुन्हा शाळेला रुजू होतात.
आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते इथे शिबिरं घेतात. या लोकांना त्यांच्या हक्काची, सरकारकडून उपलब्ध असणाऱ्या योजनांची ओळख करून देतात, त्यांचे व्यक्तीगत, सामाजिक प्रयत्न सोडवायला मदत करतात,त्यांना निवडणूक लढवण्यास प्रोत्साहन देतात, निवडून आलेल्या काही महिला इथे बचत गट स्थापन करतात, सरकारकडून मदत घेऊन बिगर शेती व्यवसाय सुरू करतात, हापसे बसवतात, शाळा बांधणी मंजूर करून घेतात, त्यासाठी पटसंख्या, तालुका, जिल्हाठिकाणी खेपा तेही आपली मजुरी बुडवून सगळं करताहेत आपल्या पुढच्या पिढीसाठी.
पाड्यावर दवाखाने नाही, असले तर डॉक्टर नाही, इतर सामुग्री नाही, काही गरोदर बाया तालुक्यास झोळीतून न्हेता न्हेताच मान टाकतात, त्यांच्या पोराबाळांनी कोणाला दोष द्यावा, आई जाते म्हणजे आभाळच फाटतं, बाप बहुधा दारुडा, दुसरा पाट लावून मोकळा, पोरांच काय? बऱ्याच समस्या पांढरपेशांना अनभिज्ञ अशा, निदान या समजून घेण्यासाठी तरी पुस्तकात डोकवावं.
वास्तवाच्या झळा कविताताईंच्या प्रखर लेखणीतून आपल्या काळजाला स्पर्शून जातात. उपेक्षित समाजाचं जगणं आपण या पुस्तकातून अनुभवतो.
्

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा