ग्रीष्मफुलोरा

 

ग्रीष्मफुलोरा



©®गीता गरुड.

ताम्हणपुष्पांचे जांभुळके झुबके
नील नभावर कशिदाकारी जसे

उन्हांत पहावी गुलमोहराची लालिमा
हिरव्याकंच पंखांत लालबुंद पिसारा

गुलाबी शाल्मली फेडते लोचनपारणे
लोभसवाणे रुपडे वेड्या मना भुलवे

ठाऊकै स्रुष्टीला दोनाचे होतात चार
तरुणाईसाठी बहावातोरणांचा साज

माहेराच्या परसवात फुलते अबोली
गजरा कराया येती त्वरेने लेकीबाळी

घामाचा कामाचा शिणवटा करी दूर
शुभ्रधवलसे इवलाले मोगऱ्याचे फुल

मखमली पलाश हाकारितो पाखरांना
अस्मानात पेटलेला हा अंगार भगवा

कुठे फुले सोनमोहर कुठे फुले चाफा
निसर्गाची रंगपंचमी पहा रे मानसा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट