एका आजीची गोष्ट (भाग पहिला)
गोष्ट एका आजीची (भाग पहिला)
नानी तिच्या नवीन ड्युप्लेक्स बंगल्यातल्या खिडकीशेजारी बसली होती.
समोर आटोपशीर आवार, गार्डनिंगसाठी थोडी जागाही होती. फुलझाडं आणायची होती तिला. कुंड्या,खत,माती,रोपं..सगळं आणायचं होतं.
बंगला छान टुमदार होता. नक्षीदार गेट, शहाबादी फरशांचं छोटंसच का होईना अंगण, तुळशी व्रुंदावन.
सागवानी दरवाजातून आत प्रवेश केला की दिवाणखाना,बेडरुम,एटेच्ड वॉशरुम. दिवाणखान्याला लागुनच नागमोडी वळणाचा जिना. जिन्याने वर गेलं की तिथे एक बेडरूम,किचन,टॉयलेट,बाथरुम. मागच्या बाजूलाही गार्डनिंगसाठी छोटीसी जमिनीची तुकडीच म्हणा एवढा छोटा भाग..
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मुलं इकडेतिकडे खेळत होती. त्यांचा कल्ला चालला होता. नानी त्यांचा खेळ बघत बसली होती.
संध्याकाळ झाली तशी नानी घरात आली. तिने देवासमोर दिवा लावला. देवाला नमस्कार केला. टिव्हीवरील मालिका पहात बसली.
तेचतेच सासूसुनेचे रुसवेफुगवे पाहून तिला चीड आली तशी ती थालीपीठ टाकायला वळली. थालीपीठाच्या भाजणीचा सुगंध घरभर पसरायला वेळ लागला नाही.
प्रथमेश,निरंजनच्या पप्पांना किती आवडायचं थालीपीठ..चारेक वर्षापुर्वी ब्रेनस्ट्रोकमुळे अचानक तिची साथ सोडून गेलेल्या तिच्या जोडीदाराची आठव तिला अशा तिन्हीसांजेला हमखास यायची नि तेलाने भरलेल्या निरांजनाप्रमाणे तिचे डोळे भरुन यायचे. ही तिन्हीसांज तिच्या जीवावरच यायची.
इतक्यात दारावरची बेल वाजली. आता तिन्हीसांजेला कोण बरं आलं असेल म्हणून नानीने न्यापकीनला हात पुसत दार उघडलं.
समोर एक पासष्टीचे ग्रुहस्थ उभे.
नानीच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हाला उत्तर देत ते म्हणाले,"नमस्कार मी विक्रम तेरेदेसाई. तुमच्या समोरच्या बंगल्यात रहातो. माझी पत्नी नंदिनी..नंदू म्हणतो मी तिला..नंदू पेशंट आहे. कँसर पेशंट..मी दूध घेऊन चाललो होतो तर थालपीठाचा गंध शिरला नाकात.
माझ्या नंदूला खूप आवडतं हो. द्याल का विकत. मी पैसे देतो किती ते. हल्ली तिला जरा चटकमटक खावंसं वाटतं. ती पोळीभाजीवाली बाई लेकाने,सुनेने सांगून ठेवल्यासारखं सपक अन्न बनवून जाते.
त्या अन्नाला ना मायेची उब असते ना आग्रहाचा गंध. कसंतरी ढकलतो गळ्याखाली झालं. मुलगा,सून तसे स्वभावाने गुणी आहेत बरं का आमचे पण आता हे नंदूचं लोडणं कुठे त्यांच्याकडे ठेवायचं. त्यांनाही त्यांचं लाइफ आहेच की म्हणून सहा महिने झाले हा समोरचा बंगला घेतला भाड्यानं.
माझ्या शाळूमित्राचाच बंगला आहे. ती दोघं तिकडे मुलाकडे असतात युएसला. नंदूची अवस्था पाहून त्यालाही कणव आली आमची. मला म्हणाला, खुशाल रहा हवं तितके दिवस. अगदी माफक भाडं घेतो तो. सदानंद रेगे नाव त्याचं. शिवाय माझी भाची कौमुदीही रहाते आमच्यासोबत."
इतका वेळ विक्रांत तेरेदेसाई एकटेच बोलत होते. नानी त्यांचा चेहरा वाचत होती,बोलणं ऐकत होती. चांगले सहा फुट उंच,गव्हाळ वर्ण,रुपेरी केस,पत्नीच्या आजारपणाने बहुदा चेहऱ्यावर थोडी काळजी पसरलेली, नानीची उंची जेमतेम पाच फुट. तिला मान वर करुन त्यांच्याकडे पहावं लागत होतं.
नानीने त्यांना आत बोलावलं पाणी दिलं. म्हणाली,"तसं मी कोणाही परक्या माणसाला आत घेत नाही पण का कोण जाणे विश्वास वाटला तुमच्या बोलण्यावर. मी महानगरपालिकेत शिक्षिका होते. हल्लीच निव्रुत्त झाले.
तुमच्या नंदिनीचं ऐकून वाईट वाटलं..कँसर म्हणजे दीर्घकाळाचं दुखणं. पुऱ्या कुटुंबाची वाताहात होते. त्यातून तुम्ही काढलेला हा मार्ग आवडला मला. उगा पोराबाळांना त्रास नको. अय्या, बोलत काय बसले मी. थांबा चहा आणते तुमच्यासाठी.
"नको हो एसिडिटी होते. राहुदेत."
"ताक घ्याल थोडं?"
"द्या."..तेरेदेसाईंनी हो म्हंटल्यावर नानीला बरं वाटलं.
नानीने सैंधव,पुदीना लावलेल्या थंडगार ताकाचा ग्लास विक्रम तेरेदेसाईना दिला. तेरेदेसाईंना ताक पिऊन खूप छान वाटलं. मग तिने गरमागरम चार थालपीठं केली. लोण्याचा गोळा नि थालपीठं डब्यात भरुन डबा कापडी पिशवीत घालून ती पिशवी तेरेदेसाईंच्या हवाली केली. तेरेदेसाईंच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.
"किती पैसे देऊ?"
"अहो,भाऊ पैसे कसले देता..तुम्हाला आवडलं म्हणजे मला पैसे पोहोचले बघा. माझ्या मोठ्या आक्कासाठी दिलंय असं समजा हवं तर."
"तुम्हीही या आमच्या घरी. नंदूशी व कौमुदीशी ओळख करुन देईन. बरं वाटेल तुम्हाला कंपनी मिळाली की."
"हो अवश्य येईन," नानी म्हणाली.
तेरेदेसाई परत मागे आले.
"तुमचं नाव..नंदूला सांगितलं पाहिजे ना."
नानी हसली,"नाव दमयंती पण नानीच म्हणतात मला सगळे..अगदी माझी मुलंही नानीच म्हणतात. नानी श्रीखंडे म्हणून सांगा त्यांना."
"बरं" असं म्हणत तेरेदेसाई घराकडे वळले.
(भेटू दुसऱ्या भागात)
--गीता गरुड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा