गोष्ट एका आजीची (भाग सातवा)
गोष्ट एका आजीची (भाग सातवा)
रतीश, मी त्या डॉक्टरशी बोलून आलेय. त्या म्हणाल्यात..लग्नानंतर कमुच्या वागण्यात निश्चित फरक पडेल. थोडाशी रिसँक घ्यावीच लागते. त्यालाच तर आयुष्य म्हणतात."
"तू कधी घेतली आहेस अशी रिस्क आयुष्यात?"
------------------------------------------------------
आजी हसली. अरे तुझा बाबा झाला तेंव्हा डॉक्टरांनी आशा सोडली होती. मुल जगणार नाही म्हणत होते. अतिशय कमी श्वासोच्छ्वास चालला होता बाळाचा. मी हट्टाने जवळ घेतलं त्याला. घट्ट छातीशी बिलगून धरलं.
आंजारतगोंजारत राहिले..बाळाच्या तोंडून आवाज फुटला. डॉक्टरांनीही कौतुक केलं.
माझी धाकटी बहीण बेबीआजी ठाऊकय नं तुला. तिला नाचाचं प्रशिक्षण घ्यायचं होतं. घरुन विरोध. मग मीच किडुकमिडुक कामं करुन पैसे गोळा केले. टायपिंगच्या नावाखाली बेबीला न्रुत्याच्या क्लासला धाडलं.
चांगल्यासाठी बोललेलं खोटं पचून जातं रे. वाईटासाठी बोललेलं खरंही पचत नाही. "
"लक्षात ठेवेन आजी. येईन परत तुला भेटायला." नानीने भरल्या डोळ्यांनी नातवाला निरोप दिला.
----------------------------
दुसऱ्या दिवशी नानीला कौमुदी दिसली, तगराची फुलं खुडत होती. प्राजक्ताचा सडा वेचत होती.
नानीने कौमुदीला साद घातली तशी कौमुदी जवळ आली.
"रात्रभर पाय दुखताहेत. जरा चेपून देशील?"
कौमुदीने मानेनेच हो म्हंटलं.
आतल्या खोलीत जाऊन नानी दिवाणावर पहुडली. कौमुदीने तिचे पाय चेपून दिले मग म्हणाली आता निघू? नानीने तिला चार लाडू दिले डब्यात घालून न् चाफ्याची फुलं दिली. कौमुदीने ती फुलं नाकाजवळ न्हेली न् त्यांचा सुवास घेतला..त्यावेळचे तिच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव पाहून नानी मनात म्हणाली..तुला वेडी म्हणणारे वेडे गं बाळा. खरंच फुलवशील मधुचा संसार.
मधु नानीकडून निघाला तो अगदी शीळ घालतच घरी गेला.
पाऊल आत ठेवताच पुतण्याने शाळेच्या सहलीसाठी भरायचे पैसे त्याच्याजवळ मागितले. मधुने खिशातनं काढून दिले. पुतणीने नवीन सँडलसाठी पैसै मागितले . मधुने तिलाही दिले. भावाने वीजबील,फोनचं बील त्याच्या सुपुर्द केलं. मधुने तेही भरलं.
वहिनीने हातात पिशवी व सामानाची यादी दिली. मधुने अगदी तुपापासनं मिठाईपर्यंत सांगितलेलं सगळं सामान आणलं. नोकरी लागल्यापासनं तो हेच तर करत आला होता. आपल्या पगाराचा दादाच्या संसाराला हातभार लागतो याचा मधुला आनंद होता. रात्री जेवणं झाल्यानंतर मधुने लग्नाचा विषय काढला.
"दादा, त्या नै का भांडुपच्या शाळेत श्रीखंडे बाई होत्या शिकवायला..मी नानीच म्हणतो त्यांना त्यांच्या घरातल्यांसारखंच."
"हो कितींदा जेवलायस त्यांच्याकडं. का रं त्यांच काय?"
"त्यांनी मुलगी बघितलीय माझ्यासाठी," मधु लाजत जमिनीवर बोटाने रेघ आखत म्हणाला.
"त्यांच्या नात्यागोत्यातली आहे का?"
"नाही."
"मग रे..तिचे आईवडील कोण? तिचं घराणं..जातपात..सगळं बघावं लागतं बाबा." भिंतीला रेलत पाय पुढे पसरवत मधुचा भाऊ बायकोकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला. ती काम करत असली तरी तिचे कान मधुच्या न नवऱ्याच्या बोलण्याकडे गोळा झाले होते.
मधुने मग सगळा कौमुदीचा इतिहास दादाला सांगितला.
"अरे काय यडबिड लागलं काय तुला का त्या बाईला..खुशाल येडी आणून बसवतेय आमच्या उरावर. नाय जमायचं. कँसल सांग." मधुचा भाऊ खांद्यावरचं टॉवेल झटकत म्हणाला."
मधुला भावाकडून ही अपेक्षा नव्हती. भावाला चांगली नोकरी नसल्याने त्याच्या लग्नाचा खर्चही मधुनेच उचलला होता आणि आता मधुच्या लग्नात आडकाठी घालत होता जे मधुला सहन झालं नाही.
तोही तिरिमिरीत म्हणाला,"दादा पण मी फक्त सांगतोय तुम्हाला. माझा निर्णय मी केव्हाच घेतलाय. मी लग्न करीन तर कौमुदीशीच."
"मग इथला बाडबिस्तरा हलवावा लागेल तुला.."दादा निर्वाणीचं बोलला.
"दादा खरं तर हे घर आपल्या वाडवडिलांचं. आपल्या दोघांचाही समान हक्क आहे घरावर. शिवाय घराच्या डागडुजीला लाखभर रुपये खर्च आला. वरती माडी काढली त्याचे वेगळे. तो सगळा खर्च माझ्या पैशातून." मधु आता बोलत सुटला.
"आता पैशाची भाषा बोलायला लागलास तर." दादा उभं रहात चढ्या आवाजात म्हणाला. दादाची पोरंही भांबावून गेली.
"बोलावी लागते दादा काय करणार. जशास तसं. तुझ्या मर्जीशिवाय मी इथं रहाणार नाही. आम्ही दुसरीकडे बिर्हाड करु."
"आम्ही काय तुझ्या लग्नाला येणार न्हाय." दादाने शिक्का टाकला.
"तुमची मर्जी.."असं म्हणत मधु झोपायला निघून गेला.
चार दिवसांनी मधु नानीकडे गेला. त्याने तिला घरी घडलेला सगळा व्रुत्तांत सांगितला.
मधुचं बोलणं ऐकल्यावर नानी म्हणाली,"बघितलेस नं कसे मुखवटे फाटले ते."
मधु म्हणाला,"आपण थोडे दिवस थांबू, नानी. बघू दादाने मनावर घेतलं तर दूधात साखर."
नानीला मधुचं म्हणणं पटलं. तिने तेरेदेसाईंकडेही सवड बघून हा विषय काढला. तेही खूष झाले. मी स्वत: लग्नाचा सारा खर्च करतो म्हणाले.
नानी आता खूष होती. लवकरच मंगलकार्य घडणार त्याची चाहूल तिला लागली होती. "दादाने रहायला जागा नाही दिली तर काही दिवस इथे माझ्या घरी रहा. मलाही सोबत होईल.."असं तिने मधुला सांगितलं.
नानीने कौमुदीला मधुचा फोटो दाखवला व विचारलं,"याच्याशी लग्न करायला आवडेल तुला?" कौमुदी चक्क लाजली.
नानीने मधुची तेरेदेसाईंशी,नंदिनीशी ओळख करुन दिली. मधुही तेरेदेसाईंसोबत कौमुदीच्या डॉक्टरांना भेटून आला. डॉक्टरांनी मधु व कौमुदीला शुभेच्छा दिल्या.
दोघं आता राजरोस भेटू लागले. कौमुदीला भेटण्यासाठी मधु सुट्टीला हमखास यायचा. जवळच्याच बागेत तिला फिरायला घेऊन जायचा. तिला तिच्या आवडीची चाफ्याची फुलं घेऊन द्यायचा.
कौमुदी व मधुच्या भेटी जसजशा वाढू लागल्या तसतशी कौमुदी अधिक खुलू लागली. कमीतकमी बोलणारी कमू आता नानीशी,मधुशी भरभरून बोलू लागली.
लग्न पंधरवड्यावर आलं होतं. मधु ,कौमुदी व नानीला घेऊन खरेदीला जायचे बेत आखत होता. एका सकाळी तेरेदेसाईंच्या घराजवळ एक गाडी येऊन थांबली. त्यातून तेरेदेसाईंचा मुलगा व सून उतरले.
(भेटू आठव्या भागात🌺🌺)





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा