गोष्ट एका आजीची (भाग तिसरा)

 



गोष्ट एका आजीची (भाग तिसरा)



निरंजनची लेक,जाई इयत्ता सातवीतली पण अजुनतरी स्वभावाने प्रांजळ होती. नानी आवडायची तिला. नानीचं नि तिचं बरं पटायचं. पण अजून एप्रिलच चालू असल्याने निरंजन बावचळला.
"अगं,नानी जुनमधे आणतो न् तुला!"

"का? मला तुम्हाला पहावसं वाटलं तर मी थोडं आधी आले तर नाही का चालणार!"

--------------------------------------------------

नानीच्या या प्रश्नावर निरंजनला काय बोलावं ते समजेना. तो हडबडला. निरंजनची बायको शर्वरी हीने निरंजनकडे एक रागीट कटाक्ष टाकत त्याच्या हातातला रिसिव्हर जवळजवळ हिसकावून  घेतला.




ती नानीला समजावण्याच्र्या सुरात म्हणाली..."अहो,आई आम्हांला कशी अडचण होईल तुमची! तुमचंच घर आहे. कधीही येऊन रहा पण न् माझे मम्मीपप्पा आलेत सध्या. एकतर टुबीएचकेचं घर. एक बेडरुम मम्मीपप्पांना,एक आम्हाला..तुमची तशी नाही म्हंटलं तरी गैरसोयच होईल हो तेंव्हा जुनमधे आम्ही तिघंही येतो तुम्हांला न्यायला."

'मम्मीपप्पा आले की सासूने येऊ नयेसं कुठे असतं! मी निजले असते हॉलमधे..त्यात काय एवढं. मलाही बरेच दिवस झालेत तुझ्या मम्मीपप्पांना भेटून. चार गप्पा मारल्या असत्या.' नानी मनाशीच म्हणाली.

तिला अगदी कानकोंड्यागत झालं. उपऱ्यासारखं वाटलं. एक एक पै साठवून ठाण्यातला ब्लॉक घेतलेला. पुढे जागेची अडचण नको व्हायला म्हणून टुबीएचके घेतला होता.

हफ्ते भरताना महिन्याच्या खर्चात,कपडेलत्त्यात कपात केली होती. मुलांच्या मात्र साऱ्या हौसीमौजी पुरवलेल्या. आणि आता सुनबाई तिला तिच्याच घरात कधी यावं नि कधी नाही ते सांगत होती.
माझं घर आहे. मी केव्हाही येईन असं ओरडावंस..ओरडून सांगावसं वाटलं तिला पण जीभ नाही रेटली.


प्रथमेश,निरंजन दोघांच बालपण आठवलं तिला. सारखे आई आई करायचे. अभ्यासाला घेतलं की आई आधी माझं बघ..प्रथमेश म्हणायचा,"आई,तू निरंजनचेच जास्त लाड करतेस."

निरंजन म्हणायचा,"आई,तू प्रथमेशला जास्त खाऊ देतेस."आता मात्र दोघंही चेंडूसारखी या घरातून त्या घरात तिला टाकत होती. बरं नानीचा खर्च त्यांना करावा लागतो तर तसंही नव्हतं.

प्रथमेशकडे रहाणंही नानीला दिवसेंदिवस असह्य होत होतं. रिया,रितेशला काही रितीचं सांगायला गेलं की सूनबाई वस्सकन अंगावर यायची. प्रथमेशही तिचीच री ओढायचा. रिया,रितेश नानीच्या मागे तिला हसत.

नानीने शेवटी वेगळं रहाण्याचा निर्णय घेतला. शाळेतला शिपाई मधुला नानीने फोनवर तिच्यासाठी एखादं घर बघण्यास सांगितलं.


मधुने आठवड्याभरात जागेचा शोध लावला.  बदलापूर पुर्वेला स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर सिद्धीविनायक सोसायटी होती ड्युप्लेक्स बंगल्यांची. नानी घर बघायला गेली. मुलांना कळवलं नाही..तशी तिला गरज वाटली नसावी.

पहिलं बदलापूर म्हंटलं की किती लांब वाटायचं पण आता चाळकरी, बिल्डरांना जागा विकून बदलापूर,नेरळ,वांगणी अशा ठिकाणी जागा घेऊ लागले. मोकळा श्वास,न् जास्त जागेत पोराबाळांना रहायला मिळावं यासाठी केलेली तडजोड.  माणूस आयुष्यभर तडजोडच करत रहातो. नानीही आता तडजोडच तर करत होती. पोटच्या मुलांना,सुनानातवंडांना नकोशी झालेय म्हणताच स्वतःच बाजूला होत होती.

बदलापूर स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ती सिद्धीविनायक सोसायटी होती. स्टेशनवर न्यायला मधु आला होता. मधुने जास्त काही विचारलं नाही याचं नानीला बरं वाटलं. नाहीतर बऱ्याचणांच्या नको त्या चौकशाच जास्त असतात. मधु त्यांतला नव्हता. शाळेतही सगळ्यांच्या जीवाला जीव लावणारा होता.

बिल्डर रत्नपारखी साइटवर आले होते. त्यांनी नानीला नमस्कार केला. बऱ्याच बंगल्यांत कुटुंब रहावयास आली होती. शेवटून दुसरा बंगला मात्र रिकामा होता. त्याच्या मालकाने परदेशी रहावयास जाणार म्हणून तो विकावयास काढला होता. नानीला बंगला,आजुबाजूचं हिरवंगार वातावरण आवडलं. बिल्डर रत्नपारखींना 'घेतला' असं म्हणाली. तेही मनापासून हसले.

पैशाची सोय लावून,सगळ्या फॉर्म्यालिटीज पुर्ण करुन नानीने तो बंगला विकत घेतला. निघण्याच्या दोन दिवस आधी निरंजनच्या कानावर घातलं. निरंजन चिडला,"काय गरज होती,एवढी रक्कम त्या जागेत गुंतवायची. आता तुझी राहिली किती वर्ष? मला शेअरमधे इनव्हेस्ट करायला दिले असतेस तर?"

प्रथमेशही नानीच्या निर्णयावर नाराज दिसला.."आता या वयात तू दुसरीकडे रहायला जाणार. एकटीचा संसार थाटणार..लोकं शेण घालतील आमच्या तोंडात. आई जड झाली म्हणतील. आमचा तरी विचार करायचा होतास. एका शब्दाने घर घेण्यापूर्वी सांगायचं होतंस." 

थोरली सून म्हणाली,"जरा नात दोन शब्द बोलली तर लगेच झोंबलं यांना. लहानै ती वयाने. हगिंग वगैरे कॉमन झालंय आता मित्रमेत्रिणींत. यांची मेली नजरच वाईट."

धाकटी सून शर्वरी म्हणाली,"त्यांना काय करायचंय..मुलांना कोणी काही बोलेनात. त्यांना थोडीच सोयरसुतक आहे! तरी आळीपाळीने व्यवस्थित खाऊपिऊ घालत होतो. सुख टोचतं म्हणतात ते हे असं."

नानीने सारं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. भिंतीवरचा  हेमंताचा फोटो काढून ब्यागेत भरला. सगळ्यांचा निरोप घेऊन हसतमुखाने निघाल्या.

निघताना देवाजवळ प्रार्थना केली,"माझी पिल्लं माझ्याशी कशीही वागोत. तू रागावू नकोस त्यांच्यावर. सुखात ठेव दोन्ही कुटु़बांना."

मधु शिपायाने ग्यास कनेक्शनपासून किचनचं सामान लावेपर्यंत सर्व मदत केली. मधु पस्तीशीचा झाला तरी लग्न जुळलं नव्हतं त्याचं. पोराचं बाशिंगबळच जड म्हणत नानीने मान हलवली.

बदलापूर आलं तसं नानी गाडीतून उतरली.
स्टेशनजवळ बसलेल्या मासळीवाल्यांकडून नानीने खेकडे घेतले. त्याचे डेंगे मोडून द्या म्हणून सांगितलं. घरी आणले नि टोपात ओतले. वाटप वगैरे काढून छान कालवण बनवलं. हे समोरचे खात असतील का? द्यावं का त्यांना वाडगाभर न्हेऊन..का अगोचरपणा वाटेल त्यांना?

नानीच्या मनात बरेच प्रश्न..तरी तिने चार भाकऱ्या केल्या. दोन भाकऱ्या नि खेकड्यांचं कालवण घेतलं. दाराला लॉक केलं नि त्यांच्या घराकडे निघाली.

फाटक लोटलं तसं कुर्र आवाज केला त्याने. आतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता..चुकीच्या वेळी आलो का आपण? परत जाऊया का..असं नानीच्या मनात द्वंद्व सुरु झालं.

बागेतल्या रातराणीचा मंद सुगंध तिच्या रंध्रांत भिनला..काय होईल ते बघू म्हणत तिने दाराची बेल वाजवली.


(भेटू चौथ्या भागात.💐💐)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट