गोष्ट एका आजीची (भाग दुसरा)

 

गोष्ट एका आजीची (भाग दुसरा)







तेरेदेसाई परत मागे आले.

"तुमचं नाव..नंदूला सांगितलं पाहिजे ना."

नानी हसली,"नाव दमयंती पण नानीच म्हणतात मला सगळे..अगदी माझी मुलंही नानीच म्हणतात. नानी श्रीखंडे म्हणून सांगा त्यांना."

"बरं" असं म्हणत तेरेदेसाई घराकडे वळले.
--------------------------

तेरेदेसाई समोरच्या बंगल्याचं फाटक उघडून आत शिरेस्तोवर नानी त्यांच्या पाठमोऱ्या आक्रुतीकडे बघत राहिली.

तिच्या नवऱ्याची आठव आली तिला. हयात असते तर तेरेदेसाईंच्याच वयाचे असले असते..तिच्या मेंदूने गणित मांडलं. एक सुस्कारा सोडला. जाणारा जातो पण त्याच्या आठवणी सतत अवतीभवती रेंगाळत असतात. नानीचं तसंच काहीसं होत होतं. शाळेत
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुरे वहातील
होईल काही का अंतराय
मी जाता राहील कार्य काय ही कविता कितीदातरी  शिकवलेली तिने पण तिला भा. रा. तांबेंना ओरडून सांगावसं वाटतं होतं..कवीवर्य..सुर्य तळपो की तारे झळको तरी जोडीदाराची साथ सुटली की राहिलेल्याच्या मनात दाटलेला अंधार हे सुर्य,तारे कितीका प्रकाशमान असुदेत..नाही घालवू शकत. काळाचंच मलम त्यावर थोडं का होईना प्रभावी ठरतं.

नानी मग घरात आली. थोडंसं खाऊन तिने ओटा आवरला. भांडी घासली नि निपचित पडली. निद्रादेवीने  तिला झोपेचं पांघरुण घातलं.






सकाळी सखु आली, बारीक चणीची,भोकर डोळ्यांची,हसरी. गळ्यात डोरलं, खणाचा पोलका न् हिरवं पातळ नेसली होती. आजुबाजूच्या विविध फुलझाडांवरच्या फुलांचा फ्लॉवरपॉट तिच्या अंबाड्यात पाहून नानीला हसू फुटलं तशी सखुही मिस्कील हसली.






आजुबाजूच्या बंगल्यातही लादीपोछ्याचं,धुण्याभांड्याचं काम करते म्हणाली. नानीने तिला चहापोळी दिली..थोड्या गप्पा झाल्यावर..देण्याघेण्याचं ठरल्यावर सखु कामाला लागली. नानी होती मागे सूचना द्यायला.

तसा कामाचा आवर बरा होता सखुचा..नानीच्या लक्षात आलं. तासाभरात ती गेलीसुद्धा. नानीनेही मग नित्यकर्म आवरली. थोडं खाऊन घेतलं.

दुपारच्या गाडीने नानी ठाण्याला गेली. तिथे नेहमीच्या दुकानातून बेडशीट,उशांचे अभ्रे क्रोकरी खरेदी केली.

  संध्याकाळी घरी येताना ट्रेन लेट झाल्यावे डब्यात तोबा गर्दी होती तरी प्रत्येकजण एकमेकींना सांभाळत होती. बसलेल्यांतलं कुणी मटार सोलत होतं तर कुणी मेथीची जुडी. त्यांचा उभं असलेल्यांशी फारसा संबंध नव्हता.

कुणी मुलाला मिळालेल्या स्कॉलरशिपबद्दल मैत्रिणींना सांगत होती तर कुणी म्हणत होतं,"सासुबाईंनी कुकर लावून ठेवला असेल. कणिक तिंबली असेल. पोळ्या केल्या नि भाजी फोडणीला टाकली की झालं..तर दुसरी म्हणत होती,"तुझं बरंय बाई. माझ्या सासुबाई इथली काडी तिथे करणार नाहीत,मी घरात गेल्यावर. टिव्हीसमोरुन हलत नाहीत..क्रमाने सिरीयली पहातात जसं काय यांना ड्युटीच लावलेय मालिका नाही पाहिल्या तर महिन्याचा पगार कापतील असं.. नानी एक हात वरच्या हँडलला धरुन दुसऱ्या हातात कसलंतरी पुस्तक धरुन वाचत होती.

एखादं स्टेशन आलं की परत गर्दी आतबाहेर होई. अंबरनाथच्या दरम्यान तिला बसायला जागा मिळाली.. दुधासारखा गंध हवेसोबत येऊ लागला जो सहन  न झाल्याने नानीने नाकाला पदर लावला. बदलापूर आलं तसं की सावकाश उठली.

मोठ्या लेकाचं,प्रथमेशचं घर मुलुंडला. भांडुपला नानीच्या शाळेजवळून बस पकडली की पंधराएक मिनिटात ती घरी पोहोचायची.

नानीचा म्हणजेच श्रीखंडे बाईंचा शाळेत दबदबा होता. मुलांच्या त्या अगदी आवडत्या बाई होत्या. पाठ्यपुस्तकाखेरीज अन्य कथाही त्या मुलांना अगदी साभिनय सांगत.

नानी सेवानिवृत्त झाली तशी  तिचा घरातला नेहमीचा वावर सुनेच्या अंगावर येऊ लागला. नातवंडांनाही ती नकोशी झाली होती. दोघं नातवंड..रिया आणि रतिश.. दोघंही आता कॉलेजात जाऊ लागली होती. त्यांचं घरात चप्पल घालून हिंडणं,लेट नाइट पार्टीज,एकूणच पाश्चिमात्त्य संस्कृतीचं अंधानुकरण नानीला दिवसेंदिवस सहन होत नव्हतं.

त्यादिवशी दुपारी रियाचा फ्रेंड जसविंदर आला होता. चांगला सहा फुट उंच ,तगडा बंदा पण त्याचं मोकळंढाकळं वागणं,रियाला खेटून बसणं,तिच्या खांद्यावर हात ठेवणं नानीला पटेना.

बेडरुममधे सुनबाई पहुडली होती. नानीने काही वेळ किचनमधे काढला. किचनच्या पंख्याचीही हवा लागत नव्हती.

जसविंदर अजून कसा गेला नाही म्हणून पाच वाजता नानी बाहेर आली. तिनं पाहिलं ते द्रुश्य फार विचित्र होतं.




जसविंदर नि रिया एकमेकांच्या बाहुपाशात होते.  नानीला अति संताप आला. ती ताडताड गेली नि नातीच्या नि तिच्या मित्राच्या दोघांच्याही कानशिलात लगावली.
"ओ कमऑन आजी,आम्ही जस्ट हग करत होतो. हगिंग इज व्हेरी नेचरल अँड कॉमन इन अवर जनरेशन. आजी, तू माझ्या फ्रेंडचा अपमान केलास. से सॉरी टू जस्सि. से सॉरी टू हीम आजी.

इतक्यात सुनबाई बाहेर आली. अहो,आई जस्सि अभ्यास करायला आलाय.  त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी आत पडले. तुमचा काळ मागे गेला आता. आता हे मिठी वगैरे कॉमन झालंय. काळाप्रमाणे वागलं नाही तर पोरं मागे पडतील.

नानीला काय बोलायचं ते समजेना. आपण एवढे बुरसटलेले..छे छे! कसं शक्य आहे! जे पाहिलं ते नाटक होतं? इतके एकमेकांना चिकटलेले.. वेड लागेल इथे राहिलं तर..नानीने रात्री निरंजनला फोन केला. निरंजन मी येतेय रे ठाण्याला.

खरंतर ठाण्याचं घर हे नानीच्या मिस्टरांच्या नावावर होतं पण हल्ली म्हणजे नानी सेवानिवृत्त झाल्यापासनं, मुलांनीच अनौपचारिक नियम केला होता..नानी जुनपासून दिवाळीपर्यंत निरंजनकडे रहाणार दिवाळीला सगळे एकत्र आले की प्रथमेश पुढचा जुन येईस्तोवर तिला आपल्याकडे नेणार असा.






निरंजनची लेक,जाई इयत्ता सातवीतली पण अजुनतरी स्वभावाने प्रांजळ होती. नानी आवडायची तिला. नानीचं नि तिचं बरं पटायचं. पण अजून एप्रिलच चालू असल्याने निरंजन बावचळला.
"अगं,नानी जुनमधे आणतो न् तुला!"

"का? मला तुम्हाला पहावसं वाटलं तर मी थोडं आधी आले तर नाही का चालणार!"

(भेटू तिसऱ्या भागात💐💐)





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट