गोष्ट एका आजीची (भाग पाचवा)

 

गोष्ट एका आजीची (भाग पाचवा)



"डाक्टरांना बोलवून आणू काय?" सखूने काळजीने विचारलं.

"नको अगं. थोडं बीपी लो झालं वाटतं. तू लिंबूपाणी दिलंस नं त्याने बरं वाटलं बघ. कपडे वाळत घाल न् जा तू. नको काळजी करुस माझी. काही लागलंच तर फोन करेन तुला."


"नक्की करा फोन , नानी. कधीव रातच्यालाबी बोलवलात तरीबी धावत इन." सखू चपला पायात सरकवत म्हणाली.

नानीने मग रात्री साधीशी खिचडीच केली. मनावर शीण जो आला होता.

---------------------------------------------------





दुसऱ्या दिवशी सकाळीच दाराची बेल वाजली. रतीश, नानीच्या थोरल्या मुलाचा मुलगा दारात उभा.




नानीने त्याला आत घेतलं. "अरे पत्ता कसा कळला तुला? आधी कळवायचस तरी. मी मधुला पाठवलं असतं तुला आणायला." नानी पाणी आणून देत म्हणाली.

रतीशने पाठीवरची स्याक उतरवली. शूज काढले नि म्हणाला,"मधुकाकांकडूनच एड्रेस मिळाला मला. सध्या घरी वातावरण बिघडलय न् माझी परीक्षा जवळ आलीय त्याचं कुणालाच काही देणंघेणं नाही. तुझ्या ओरड्याला हसायचो मी पण आजी तू बरोबर होतीस. आता कळतय. मी राहू शकतो न् तुझ्यासोबत थोडे दिवस?"

"अरे, असा काय विचारतोयस? जाताना का मी हे घर पोटावर घेऊन जाणारै? आहे ते तुमचंच तर आहे. राहिलास तर मलाही सोबत होईल तुझी."

यावर रतीश हसत म्हणाला," कुठे जात नाहीजस तू. इनफ्याक्ट तुला तशी परमिशनच नाहीए."

"बरं नाही जात कुठे. तुझ्यासाठी उपमा बनवते. तोवर तू न्हाऊन ये. पारोसा कसा रे फिरतोस बाहेर?"

रतिश हसतहसत वॉशरुममधे गेला.

उपमा खाताना तो आजीला म्हणाला,"आजी,पप्पांचा फोन येईल बघ."

"तुझ्याबाबत?"

"नाही. रियाबाबत."

"का काय केलंय रियाने?"

"माती *** तेच सांगतील बघ तुला. नाहीतर मम्मा. कोणतरी सांगेल. मी जातो अभ्यासाला."

नानी विचारात पडली पण आज ती एकटी थोडीच होती. जोडीला नातू होता. तिने झणझणीत मिसळपावचा बेत मांडला. सखू आली..तिलाही मिसळपाव दिली. सखूने आवडीने खाल्ली. "चुकलंच नानी. लेकरांना आणाया व्हयं आसतं. मले काय ठाव तुमच्याकडे बेत हाय त्यो. कायव म्हना, नानी तुमच्या हाताला चव हाय बगा."

आजीने मुलांसाठीही मिसळपाव भरुन दिला नि कालची कौमुदीची हिरव्या बांगड्या,कुंकूवावाली घटना सखूच्या कानावर घातली.

सखू म्हणाली,"आजी देवाच्यान सांगती,नक्षतरावानी पोर हाय कमू पन अशी खुळ्यावानी करती अधीमधी. कायतरी डाळीत काळं हाय बघा. जावदे. पोरीचं भलं होऊंदे.."

दुपारी शर्वरीचा, धाकट्या सूनबाईचा फोन.."अहो आई, तुम्हाला रियाबद्दल कळलं का?तिची म्हणे पाळी चुकली. तो जस्सु का कोण तो. तुम्ही नाही का ओरडला होता त्या हगिंगवरुन तोच तो. मिठीच्या पुढे गेलं प्रकरण नि तो जस्सी यायचाच बंद झाला. बलात्कार केला वाटतं रियावर."

"बलात्कार नाही गं, स्वैराचार म्हणतात अशा वागण्याला आणि आईवडीलच दाणापाणी घालतात अशा प्रक्रुतीला."

"गोळ्या घेतल्या न् सगळं मिटवलं म्हणे."

"होणारच होतं. मला कल्पना होती,"नानी उसासा टाकत म्हणाली.

-------------------------------------

संध्याकाळी रतीश व नानी जरा फेरफटका मारुन आले.
"आजी, तुला कोण बोललं का रियाबद्दल?"

"हो काकू बोलली तुझी."

"तिला आमच्या घराबद्दल जास्तच उत्सुकता. तिचा धाकटा भाऊ का कमी आहे. कितीजणींना घेऊन फिरत असतो बाईकवरुन."

"रतीश, हे बघ माझी तुमच्या मैत्रीला ना नाही रे पण काही मर्यादा या पाळाव्याच लागतात. आपण जंगली जनावरं नाही रे, माणसं आहोत. एखाद्या मुलीशी मैत्री केलीस तर कधीही तिचा गैरफायदा घेऊ नकोस. असं केल्याने फक्त त्या मुलीवरच अन्याय होतो असं नाही तर तिचे आईवडील सगळे यात भरडून निघतात, अगदी भाऊसुद्धा. जसा तू सध्या भरडून निघत आहेस..लोकांच्या नजरा वाईट असतात. तुला त्याच त्रास देत असणार..नाहीतर एवढ्यातेवढ्या गोष्टीने तू घर सोडून येणारा नाहीस."



"बरोबर ओळखलस आजी. परीक्षा हे एक निमित्त मिळालं बघ, घरातून बाहेर पडायला. ग्राऊंडवर, कॉलेजमधे..अगदी हलक्या आवाजात का होईना..माझ्याकडे बघत तिरक्या नजरेने त्या जस्सीचा नि रियाचा विषय घोळवत असतात."

"रतीश, असं दुनियेला घाबरुन नाही चालत रे. त्यांना तोंडं आहेत ती बोलणारच. थोडं वाईट वाटतं खरं पण हीही फेज जाईल बघ. लोकं हे सारं विसरुनही जातील. दुसरा नवा विषय मिळाला गॉसिपला की तो चघळत बसतील. तू आईला फोन केलास का? नाही केला असशील तर आज कर. काळजी करत असतील रे."

"मी पळून थोडीच आलोय. सांगून आलोय."

"तरीही एक फोन करच. मग आपण रात्री क्यारम खेळू. मी मधुकडनं आणून घेतलाय."

"ओके आजी."

-----------------------------------------------

सकाळी प्रथमेश आला.

नानीने त्याला चहा आणून दिला न् रतिशला हाक मारली. रतिश व पप्पांचं थोडावेळ अभ्यासाबद्दल बोलणं झालं मग रतिश आपल्या कामाला गेला.

नानी काहीच बोलली नाही. प्रथमेशच हळवा झाला होता.

"नानी, चल परत घरी."

"अरे बाबा, मी जुनाट वळणाची."

"चुकलो म्हंटलं ना. नाक घासू का आता. तुझं तेच वळण बरं होतं नानी. डोकं फुटायची वेळ आलीय."

"असं काय झालंय?"

"नानी तुला शर्वरी बोललीच असेल एव्हाना. ही शर्वरीला बोलली होती..म्हणजे तिची वहिनी गायन्याक आहे तर शर्वरीला घेतलेली सोबत रियाला तिच्याकडे घेऊन जाताना."

"बरं. झालं ना सगळं सुरळीत. पाळी नियमित सुरु झाली ना, मग आता परत ती तसं करणार नाही यासाठी तिला विश्वासात घ्या. बाहेरच्या कामांना थोडा आवर घाला. ब्रीज,किटी पार्टीज कमी करा सगळं नि मुलांशी संवाद साधा. माझं म्हणशील तर मी इथेच बरीय आणि कधीही तुला काही लागलं तर हक्काने साद घाल. आई थोडीच रुसते मुलाशी. आईचं काळीजच वेडं असतं रे."

नानीच्या हातची ताकाची कढी,भात जेवून परीक्षा झाली की घरी ये, असं रतीशला सांगून प्रथमेश निघाला.

लेक येऊन गेल्याने नानीलाही समाधान वाटलं.

संध्याकाळी तेरेदेसाई आले. नानीने दार उघडलं. ते आत येऊन बसले. नानीने पाणी आणून दिलं. कोणीच बोलत नव्हतं पण ती शांतताही बोलकी होती. शेवटी तेरेदेसाईंनीच विषयाला हात घातला.

(भेटू सहाव्या भागात🌺🌺)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट