गोष्ट एका आजीची (भाग आठवा)
लग्न पंधरवड्यावर आलं होतं. मधु ,कौमुदी व नानीला घेऊन खरेदीला जायचे बेत आखत होता. एका सकाळी तेरेदेसाईंच्या घराजवळ एक गाडी येऊन थांबली. त्यातून तेरेदेसाईंचा मुलगा व सून उतरले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोघांना पाहुनही कौमुदी हायपर झाली नाही. लवकरच तिला तिचा हक्काचा जोडीदार जो मिळणार होता.
-----------------------------------------------------------
तेरेदेसाईंनी नानीला चहाला बोलावलं. मुलाची,सुनेची ओळख करुन दिली. नानी मनमोकळं हसली पण त्या दोघांनाही नानीशी बोलावसं वाटत नव्हतं. नानीला का बोलावलं उगाच असा त्या उभयतांच्या चेहऱ्यावरचा प्रश्न,नाराजी नानी वाचू शकत होती. इतके वर्ष ती हाडाची शिक्षिका जे होती..कोण किती पाण्यात आहे, तिला पुरतं ओळखता येत होतं. ती मनात म्हणाली..असो, तेरेदेसाईंच्या मनाखातर आले.
चारेक दिवसांत तेरेदेसाईच नानीच्या घरी आले.
"तेरेदेसाई, आता कौमुदीच्या लग्नाची तयारी करायला घेऊ आपण. आयत्यावेळी गडबड नको. हॉल,भटजी..सगळं पाहिलं पाहिजे." नानी म्हणाली.
"त्याबद्दलच बोलायचं होतं"
"अहो, मग असे चाचरताय का? बोला ना. कौमुदीचं काही.."
"नाही ओ, पोर मधुशी भेटी होऊ लागल्यापासनं अगदी खूष आहे. जराही विचित्र वागणं नाही."
"मग.."
"मुलगा नि सुनबाईच्या मनात काही वेगळं," तात्यासाहेब चाचरत म्हणाले.
"वेगळं म्हणजे..कुणी दुसरा बघितला आहे का त्यांनी?"
"तसं नाही. प्रकरण वेगळंच आहे. सूनबाई..सूनबाई आई होऊ शकणार नाही असं कळलंय त्यांना म्हणजे काही तपासणीसाठी गेली होती ती तेंव्हा कळलं."
"अरेरे"
"हो. म्हणूनच त्यांनी सरोगेट मदरचा ऑप्शन चूज केला आहे."
"हो. भारतात आहेत अशा संस्था जिथे काही महिला सरोगेट मदरचं काम करतात. त्यांना योग्य तो मोबदला मिळतो. या कानाची त्या कानाला खबर जात नाही."
"तसं नव्हे. ही जोडी कौमुदीचा वापर करणार आहे सरोगसीसाठी. त्याबदल्यात तिला आयुष्यभर पुरेल एवढा मोबदला देणार आहेत."
"म्हणजे गरजेपुरतं वापरणार असंच ना आणि नऊ महिन्यांनी काम झाल्यावर सोडून देणार..गेंड्याच्या कातडीची आहेत का ही माणसं? आणि तेरेदेसाई..तुम्ही..तुम्हाला पटतय हे?"
"मुलासाठी.."तेरेदेसाई मान खाली घालून म्हणाले.
"मुलाने केलेलं कौमुदीचं यौनशोषण पचवलत,त्यावर पांघरुण घातलत वरती समाजाच्या नजरेत तुम्ही दयावान. आता कुठे ती पोर सावरु पहातेय तर तुमची सून तुमचा वंश गर्भात वाढवण्यास असमर्थ आहे म्हणून परत या निष्पाप पोरीचा फायदा उठवता? तुमचेही दोन मुखवटे आहेत तेरेदेसाई." नानी खवळली.
तेरेदेसाईंनी खांदे उडवले. तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही म्हणत ते चालत राहिले न् नानी त्यांच्या बेढब आक्रुतीकडे पहात राहिली.
घरात येऊन तिने मधुला फोन लावला. मधुला सगळी बातमी सांगितली. दुसऱ्या दिवशी दुपारी कौमुदी नेहमीसारखी केळीखालच्या लादीवर बसली होती.
मधु तिथे गेला.
"चलतेस माझ्यासोबत?"
कौमुदीने त्याचा हात हाती घेतला न् जाऊ लागली. दोघंजणं धार्मिक स्थळी जाऊन विवाहबद्ध झाले. कौमुदी सज्ञान असल्याने तेरेदेसाई काहीच करु शकले नाहीत.
नानीच्या घरासमोर मांडव घातला होता. नानीने नवीन जोडप्याचं स्वागत केलं. पिवळ्या साडीतली केतकी वर्णाची कौमुदी सावळ्या मधुला शोभून दिसत होती.
नानीने आजुबाजूच्या सगळ्या लोकांना रिसेप्शनला बोलावलं. बायका आपापसात हळू आवाजात बोलत होत्या ज्याने कौमुदी थोडी अस्वस्थ झाली खरी पण नानीने तिच्या पाठीवरुन मायेने हात फिरवला.
पहिल्या रात्री नव्या जोडप्यापेक्षा नानीलाच जास्त धास्ती होती.
सकाळी मधु खाली येताच नानीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
मधु म्हणाला,"काही नाही नानी. मी तिच्याशी लग्न केलं हे तिच्यावर उपकारच केले असं पन्नासेक वेळा बरळत झोपली."
नानी हसत म्हणाली,"हत् तिच्या. एवढंच ना. मला वाटलं ते दूध तुझ्यासाठी ठेवलं होतं ते पिऊन टाकलंन की काय!"
"काय नानी तू पण.. ते असो. पण, ही उपकाराचीच भाषा बोलत बसली तर माझं कठीणच दिसतय. आधीच पस्तिशी झाली..त्यात आता रात्रीचा क्रुतज्ञता सोहळा."
"होईल रे सगळं सुरळीत. तिला मनाने मोकळी होऊदेत आधी. कोणतीही घिसाडघाई अपेक्षित नाही तुझ्याकडून. माझी कमू म्हणजे टपोरी कळी आहे. प्रेमाची फुंकर घालत रहा तिच्यावर. नक्की फुलेल ती."
इतक्यात कमु आलीच.
"हे काय तुम्ही उठलात सुद्धा? मला कुणीच कसं उठवलं नाही. माझी फुलं वेचायची राहिलीच.." असं म्हणताना कमूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
नानीने कमूला जवळ घेतलं,"कमू, तेरेदेसाईंनी तुला अंतरलं म्हणून डोळ्यात आसवं नं पण काळजी करु नकोस बेटा. जास्त दिवस दूर नाही राहू शकणार ते. येतील तुला भेटायला."
नानी असं म्हणताच कमूने नानीला मिठी मारली.
नानीला आता बरीच उसंत मिळत होती. सकाळचा नाश्ता,दोन्ही वेळची जेवणं यात अर्धीअधिक कामं कमू हातावेगळी करायची. नानीच्या हाताखाली ती तयार होत होती.
आता कुठे त्या प्रेमी युगुलांच्या रात्री रंगू लागल्या होत्या. नानीच्या म्हणण्याबरहुकुम मधुने कमूप्रकरण अलगद हाताळलं होतं आणि त्यात तो यशस्वीही होत होता. कमू त्याला हवा तसा प्रतिसाद देऊ लागली होती..
परिणामी तिची गौरकाया अधिकच सतेज दिसू लागली होती.
तरी दुपारची कमू समोरच्या तेरेदेसाईंच्या घराकडे बघत बसायची. तिने लावलेली केळही आता पोसवली होती. लालचुटूक केळीचं बोंड न् वरती लटकलेली बाळकेळी ती पहात असताना तिचे डोळे तिच्याही नकळत झरू लागायचे. नानी म्हणायची,"किती गं हळवी तू कमू! इतकंही अळूमाळू असू नये माणसाने."
कधी नव्हे ते निरंजन, शर्वरी लेकीला घेऊन नानीकडे आले. पाण्यात काठी पडली म्हणून पाणी वेगळं थोडंच होणार..नानी स्वत:शीच बोलली.
कौमुदीने त्यांना पाणी आणून दिलं. चहा दिला.
"बरं झालं आलात," नानी म्हणाली.
"हुं," शर्वरीने घर न्याहाळत हुंकार दिला . कौमुदीला वरुन खाली न्याहाळत म्हणाली,"ही बरी ठेवलीत घरकामाला. लग्नपण करुन दिलात म्हणे ह्यांचं."
"तुम्हाला कोणी सांगितलं?"
"अहो, असल्या बातम्या लपून थोडीच रहातात. कौमुदी..तिचं वेडसर वागणं..मधुचं तिला पळवून न्हेणं..लग्न करणं..यात तुमचा पुढाकार..सारं कळलं आम्हाला."

(भेटू नवव्या भागात)




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा