गोष्ट एका आजीची(भाग सहावा)

 

गोष्ट एका आजीची(भाग सहावा)





नानीच्या हातची ताकाची कढी,भात जेवून परीक्षा झाली की घरी ये, असं रतीशला सांगून प्रथमेश निघाला.

लेक येऊन गेल्याने नानीलाही समाधान वाटलं.

संध्याकाळी तेरेदेसाई आले. नानीने दार उघडलं. ते आत येऊन बसले. नानीने पाणी आणून दिलं. कोणीच बोलत नव्हतं पण ती शांतताही बोलकी होती. शेवटी तेरेदेसाईंनीच विषयाला हात घातला.

------------------------------------------------

"ही कमू मी भाची म्हणून सांगतो ती कौमुदी भाची नव्हे हो माझी. ती आमच्याकडे येणाऱ्या पोळीभाजीवालीची मुलगी. घरात एकटी कशी ठेवायची म्हणून कौमुदीला आमच्याकडे ठेवून ती जायची.

नंदिनीचा कँसर डिटेक्ट झाला. आम्हा उभयतांच्या इस्पितळाच्या वाऱ्या वाढल्या. मुलगा कॉलेजला. कौमुदी एकटीच येऊन दुपारची आमच्या घरी अभ्यासाला बसायची..कधी टिव्ही बघायची.




मध्यंतरी नाताळच्या सुट्ट्या सुरु होत्या. मुलाच्या अंगात सैतान शिरला आणि त्याने ह्या पोरीचा खेळण्यासारखा वापर केला. पोरही भुलली त्याच्या मायावी थापांना.  पोर एक शब्दाने कुणाला बोलली नाही.   त्याच दरम्यान त्याचं बाहेरही लफडं चालू होतं. आई एवढी आजारी असताना त्याने  लग्न केलं.

आमचा आशीर्वाद घ्यायला आला तेंव्हा कौमुदीला समजलं. कौमुदी गळा काढून रडत होती पण पाठीमागे केळीकडे. माझा लेक त्यानंतर आमच्याकडे फिरकला नाही. परदेशात निघून गेला पत्नीसोबत. आई आहे का गेली याचीही चौकशी नाही. मी खोटंच सांगतो मग लेकसून चांगले आहेत,माया लावतात वगैरे..पण तुमच्याशी खोटं बोललो हे लागलं मनाला.

कौमुदी तिच्या यौनशोषणाबाबत स्वतःच्या आईलाही काही बोलली नाही. मला नंतर सांगितलं सर्व तिने पण शपथही घातली त्या धटींगणाला ओरडू नका म्हणून.



कौमुदीची मानसिक अवस्था दिवसेंदिवस बिघडत होती.  मला कळत नव्हतं..नेमकं काय करु..इकडे नंदिनीच्या किमो सुरु होत्या. कौमुदीचं यौनशोषण जगाला ओरडून सांगावं तर आपल्याच हाताने आपल्या नालायक चिरंजीवाचा गळा घोटल्यासारखं..मी त्यापेक्षा शहाजोगपणे कौमुदीच्या शपथेच्या बंधनात राहिलो.

कौमुदी सैरभैर होत गेली तशी तिची आई जास्त दिवस तग धरु शकली नाही. कौमुदी पोरकी झाली मग कौमुदीला घेऊन आम्ही इथे उपनगरात रहायला आलो.

बरेच डॉक्टरउपचार केले. तिच्या वेडाचं प्रमाण आधीपेक्षा बरंच कमी आलंय. डॉक्टर म्हणतात तिला सोबतीची गरज आहे. जीवनसाथी हवा तिला. नानीच्या डोळ्यासमोर मधु शिपायाचा चेहरा तरळू लागला..

मधुला विचारुन तरी पाहू..पस्तिशी पार केलेल्या मधुला जीवनसाथी भेटेल. कौमुदी काही वेडी नाही. तिच्यासोबत झालेल्या यौनशोषणामुळे तिच्या मनावर परिणाम झालाय एवढंच. कदाचित मधु तिच्या आयुष्यात आल्यावर तिला तिच्या आयुष्याचा हरवलेला सूर गवसेल.. मधुची व कौमुदीची रुजवात घालून द्यायचं नानीने ठरवलं.

मधुला निरोप देताच मधु आलाही. नानीने मधुसाठी त्याच्या आवडीची सुरमई तळली होती. नारळाचं दूध,लाल सुक्या मिरच्या मिरच्या घालून घट्टसर सार केला होता.

मधुची आई गेल्यापासनं त्याच्या आवडीचं नानी त्याला अगत्याने खाऊ घाली. जेवणं झाल्यावर तळहातावर बडीशोप ठेवून नानीने त्याला केळीखाली लादीच्या तुकड्यावर बसलेली कौमुदी दाखवली.

कौमुदीने डाळिंबी रंगाचा चुडीदार घातला होता. तिच्या सडपातळ बांध्याला तो ड्रेस शोभून दिसत होता. मधु लाजला. नानीने त्याला तिथेच ओट्यावर बसवलं व कौमुदीची कहाणी सांगितली..अगदी तिला ठाऊक होती तशी..काहीही लपवून न ठेवता. ती रात्रीची कराकरा चावून खेकडे  खाणारी कौमुदी..प्रणयकथा वाचण्यात रंगून जाणारी कौमुदी..तिच्या अज्ञानाचा तेरेदेसाईंच्या मुलाने घेतलेला गैरफायदा..नकळत्या वयात तिचं झालेलं यौनशोषण..त्यातून तिचं भान हरपणं..मग औषधोपचाराने झालेली सुधारणा..आताचं तिचं निगुतीने कामं करणं..तरीही अवसेपुनवेला स्वत:वरचा ताबा सुटणं..सगळं सगळं..



मधु ऐकता ऐकता कौमुदीत गुंतत चालला होता. त्याला कौमुदी आवडली होती. तिच्या भूतकाळासह तो तिला स्वीकारायला तयार होता पण प्रश्न होता घरातल्यांचा. घरी भाऊ,वहिनी काय म्हणतील? ते कौमुदीला कुटुंबाचा एक सभासद करायला तयार होतील का..अशा प्रश्नांचं जाळं मधुच्या चेहऱ्यावर उमटलं.

नानी म्हणाली,"काही काळजी करु नकोस. तू मनावर घेतलस ना मग होईल सगळं नीट. तुझ्या वहिनीला,दादाला नीट सांग. ऐकले तर ठीक. अजूनपर्यंत तुझ्या पगारावर त्यांचे छानछौक चालू होते. वडील नाहीत तर धाकट्या भावाच्या लग्नाची जबाबदारी घेऊ असं तुझ्या दादावहिनीला कधी वाटलं नाही. मधु, अरे ही नाती वगैरे सगळं झूठ आहे. इथे प्रत्येकजण मुखवटा घेऊन वावरतं. आपण भुलतो त्या रुपेरी मुखवट्यांना..चुकून जरं खरं रुप लक्षात आलं नि आपण त्यांच्या मुखवट्याला हात जरी लावू गेलो तर हीच आपली माणसं आपल्याला कलंकीत करायलाही मागेपुढे पहात नाहीत.




मधु, अरे पस्तिशी उलटली तुझी. आता तरी स्वत:चा विचार कर. भले नातेवाईकांनी हिणवू दे. लक्ष नको देऊस. तुझ्या मनाचं ऐक. कौमुदीकडे बघ..बिनमुखवट्याची आहे पोर जणू नुकतच ओघळलेलं बकुळफुल. शरीराचे आजार तसे मनाचे आजार. मनावर फुंकर घातलीस तिच्या,तिच्या मनाला जपलंस की बघ कशी बहरेल ती. संसाराचं सोनं करेल तुझ्या."


"खरंय तुमचं नानी पण ते तेरेदेसाई तयार होतील?"

"का नाही होणार? अरे आनंदच होईल त्यांना. फार म्रुदु स्वभावाचे आहेत तेरेदेसाई. आपल्या मुलीप्रमाणे जपतात तिला."

मग तर प्रश्न मिटला. मी दादावैनीशी बोलून स़ागतो. नानी खरंच आभारी आहे तुझा. चल निघतो..असं म्हणत नानीचा निरोप घेऊन मधु गेला.

संध्याकाळी नानी रतीशसोबत देवळात गेली. मधल्या चौकात महिलामंडळाचं भजन चालू होतं. रतीशने गणरायाच्या मुर्तीला नमस्कार केला नि इकडेतिकडे पाहू लागला. काही लहान मुलं हसतखिदळत इकडेतिकडे पळत होती. दोन तरुण ध्यान लावून बसले होते. व्रुद्ध मंडळी गोलाकार बसून मंदिराचा निधी मोजत होते. पुढच्या कार्यक्रमांची आखणी करत होते.

आजी,रतीश चौकात बसले. रतीशने आजीस विचारलं,"आजी काय मागितलंस देवाकडे? दिर्घायुष्य?"

आजी नुसतीच हसले."रतीश, तो कर्ता करविता सगळं जाणतो. आपलं अंतरंग ओळखतो तो."

"पण आजकाल, याच्या असण्याबद्दलच मनात शंका येतात तेंव्हा काय करायचं? एक मन म्हणतं देव आहे तर दुसरं म्हणतो देव वगैरे सगळ्या भ्रामक कल्पना."

"होतं असं बाळा. मनाची आंदोलनं समुद्राच्या अजस्त्र लाटांपेक्षाही भयावह असतात. या आंदोलनात मन स्थीर ठेवण्यासाठी एका अनामिक शक्तीची गरज असते. ती शक्ती म्हणजेच देव. काही चांगलं घडलं तर आपण देवासमोर पेढे ठेवतो, काही वाईट घडलं तर त्यालाच आपण कोसतो. तो मात्र सगळं अलिप्तपणे स्वीकारतो. मानण्यावर आहे रे बाळा."

"आजी, तू त्या कमुताईचं नि मधुकाकाचं लग्न लावणार आहेस?"

"मदत करेन फारतर त्यांना एकत्र यायला."

"आणि ती कमूताई पुन्हा व्हॉयलंट झाली म्हणजे? मधुकाका सावरुन घेईन तिला?"

"रतीश, मी त्या डॉक्टरशी बोलून आलेय. त्या म्हणाल्यात..लग्नानंतर कमुच्या वागण्यात निश्चित फरक पडेल. थोडाशी रिस्क घ्यावीच लागते. त्यालाच तर आयुष्य म्हणतात."

"तू कधी घेतली आहेस अशी रिस्क आयुष्यात?"

(भेटू उद्या सातव्या भागात🌺🌺)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट