गोष्ट एका आजीची (भाग नववा)
गोष्ट एका आजीची (भाग नववा)
"बरं झालं आलात," नानी म्हणाली.
"हुं," शर्वरीने घर न्याहाळत हुंकार दिला . कौमुदीला वरुन खाली न्याहाळत म्हणाली,"ही बरी ठेवलीत घरकामाला. लग्नपण करुन दिलात म्हणे ह्यांचं."
"तुम्हाला कोणी सानगितलं?"
"अहो, असल्या बातम्या लपून थोडीच रहातात. कौमुदी..तिचं वेडसर वागणं..मधुचं तिला पळवून न्हेणं..लग्न करणं..यात तुमचा पुढाकार..सारं कळलं आम्हाला."
------------------------------------------------
"मधु आणि कौमुदी मला माझ्या मुलांसारखीच प्रिय आहेत आणि हो पुरती बरी झालेय कमू आता. हवंतर डॉक्टरानचं सर्टिफिकेट बघू शकता."नानीने उफाळून आलेला राग आवरत म्हंटलं.
"बरं बरं," शर्वरी कुत्सित हसत म्हणाली.
"बऱं वाटलं तुम्हाला भेटून. माझी नातपण आता उंचीला लागली," नानी नातीला मांडीवर घेत म्हणाली. आता निवांत रहा दोन दिवस. अनायासे सुट्टी आहेच. मी तुमच्या आवडीचं करुन घालते तुम्हाला. मला तेवढंच समाधान."
"निवांत कसलं रहायला सांगताय. बरीच टेंशन्स आहेत आम्हाला." शर्वरीने डोक्याला हात लावत म्हंटलं.
"बोलू आपण. नक्कीच मार्ग निघेल चर्चेतून पण आधी स्वैंपाक,जेवण, आणि हो निरंजन तुला बंबातलं पाणी आवडतं ना. ते बघ तापलेलं आहे बंबात पाठीमागे. न्हाऊन घे वाटल्यास. तुझ्या पुतण्याचे, रतीशचे कपडे आहेत कपाटात ते देते बदलायला."
शर्वरी नको म्हणत असतानाही बंबात तापवलेलं पाणी म्हणताच निरंजन आंघोळीला पळाला.
शर्वरी मग नानीच्या मदतीला लागली.
-----------------------------------------
एव्हाना कौमुदीने कुकर लावून मटार सोलावयास घेतले होते. मधुने नानीच्या सुचनेनुसार डेअरीवरुन पनीर आणलं. शर्वरीने कणिक मळली व पोळ्या लाटल्या. नानीने बोलत बोलत कोशिंबीर केली. सगळा स्वैंपाक तयार झाला.
नानीने आग्रहाने वाढलं साऱ्यांना. नात तर आजीच्या पानातच जेवली. जेवणं आटोपली तशी सखू भांडी घासायला आली. नानीने तिलाही पोटभर जेवायला वाढलं व ती निघताना मुलींसाठी जेवण बांधून दिलं. शर्वरी सारं पहात होती. नसती उधळपाधळ..ती मनाशीच पुटपुटली.
नानीने दिवाणखान्यात सतरंजी पसरली. नातीसोबत तीवर पसरत नानीने विषयाला हात घातला.
"हं काय अडचण आलीय एवढी,बोला."
शर्वरी पाढा वाचू लागली."नानी,मम्मीपप्पांची तब्येत ठीक नसते हल्ली. कधी मम्मीची साखर वाढते तर कधी पप्पांच बीप शूट होतं."
"शरु, अगं व्हायचेच हे त्रास वयोमानानुसार. माझ्यापाठी कशी ही सांधेदुखी लागलेय हात धुवून. तरी बरं, कमू रोज पाय चेपून देते तेंव्हा कुठे डोळा लागतो माझा."
"पण नानी, वैनीने फतवाच काढलाय. व्रुद्धाश्रमात ठेवायला निघालेय त्यांना."
"तो त्यांच्या घरचा विषय आहे शरु. मी त्यात बोलणं उचित ठरणार नाही. एकवेळ तू किंवा निरंजन बोलू शकता. मी त्यांच्या लेखी पाहुणीमाणूस."
"बरोबर. मला वाटलंच होतं नानी तुम्ही असंच बोलणार. ते माझे मम्मीपप्पा आहेत. मला वाईट वाटतय फार माझे मम्मीपप्पा व्रुद्धाश्रमात..मी कल्पनासुद्धा नाही करु शकत नानी." असं म्हणत शरु स्फुंदू लागली.
नानीने तिच्या केसांवरुन हात फिरवला, म्हणाली,"अगं मग आपल्या ठाण्याच्या घरी रहातील की ते तुमच्यासोबत. "
"नानी, ते घर तुमचं आहे."
"कागदोपत्री माझं असलं तरी तिथल्या तुळशीला सध्या पाणी कोण घालतय,तुच ना. खुशाल घरी आणून सेवा कर तुझ्या मम्मीपप्पांची. माझी अजिबात ना नाही."
यावर शर्वरी म्हणाली,"नानी, पण मग आम्हालाही अडचण होतेच ना. हल्ली विस्मरणाचा त्रास सुरु झाला आहे पप्पांना. रात्री दोन वाजता टॉयलेटमधे जाऊन बसतात, नळ सुरु करुन. मग ते बाहेर येईस्तोवर झोपेचं खोबरं. तासभर झाला तरी बाहेर येत नाहीत. परत थोड्या वेळाने परत परसाकडे जायला उठतात. दोघांसाठी सकाळसंध्याकाळ नाचणीच्या भाकऱ्या, बिनातेलाचं, बिना मीठाचं खाणं..मम्मीचं तर सारखं काही नं काही तरी दुखत असतं. अगदी लहान मुलांसारखी बारीकसारीक गोष्टींवरुन चिडचिड करते आणि मग हा निरंजनही मलाच गिल्ट देतो. याचीही चिडचिड वाढते. "
यावर निरंजन म्हणाला," होणारच ना चिडचिड. माझी नानी सगळं आपलं आपण करायची तरी ती यायची म्हंटलं की तुझ्या डोक्याला सतरा आठ्या पडायच्या."
आता मात्र नानी मधे पडली, "हे बघ निरंजन, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. माझी तुलना शर्वरीच्या मम्मीशी किंवा तिची माझ्याशी करणं बिलकुल चूक आहे."
नानीने आपली बाजू घेतली याचं शर्वरीला खूप बरं वाटलं. आपलं म्हणणं पुढे रेटत ती म्हणाली,"हेच म्हणायचंय मला नानी. हा निरंजन, मम्मीपप्पा आमच्याकडे रहायला आले की किरकोळ गोष्टींवरुन माझ्याशी वाद घालतो. त्याचं न् मम्मीचं पटतच नाही. मी काय म्हणते नानी..असं केलं तर, नाहीतरी हा छान ऐसपेस बंगला आहे आपला. याच्या वरच्या मजल्यावर माझ्या मम्मीपप्पांना रहायला दिलं तर..तुम्हाला पप्पा भाडं देतीलच. त्याची काळजी नको. हो आणि तुम्हालाही आपल्या माणसांची सोबत होईल. काही म्हणा, शेवटी लोकं ती लोकंच."
नानीने थोडा विचार केला, मग म्हणाली,"नको गं शरु. मी सडाफटिंग आहे तेच उत्तम आहे. कधीही उठते. देवळात जाते. भजनीमंडळात जाते."



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा