गोष्ट एका आजीची(भाग चौथा)
फाटक लोटलं तसं कुर्र आवाज केला त्याने. आतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता..चुकीच्या वेळी आलो का आपण? परत जाऊया का..असं नानीच्या मनात द्वंद्व सुरु झालं.
बागेतल्या रातराणीचा मंद सुगंध तिच्या रंध्रांत भिनला..काय होईल ते बघू म्हणत तिने दाराची बेल वाजवली.
-------------------------------------------
तेरेदेसाईंनी दार उघडलं. नानीची नजर दिवाणखान्यात भिरभिरली. वस्तू इतस्तत: फेकलेल्या दिसत होत्या,
पिंजारलेले केस खांजवत,भेसुर डोळ्यांनी एक तरुणी कोपऱ्यात बसली होती. चोवीसेक वर्षांची असावी. नानीकडेच बघत होती ती. कुठून दुर्बुद्धी सुचली नि इथे आले असं झालं नानीला.
या मुलीबाबत तेरेदेसाई नानीला काहीच बोलले नव्हते. 'भाची रहाते सोबत एवढंच सांगितलं होतं पण ती ही अशी आहे वगैरे. ते तरी पहिल्या भेटीत असं कसं सांगतील म्हणा,'नानी मनात बोलत होती.
"सॉरी हं. आज जरा मेस आहे. आमची कमु रागावलेय. आपण आत जाऊया..माझ्या मिसेसशी.. नंदिनीशी ओळख करुन देतो तुमची." तेरेदेसाई म्हणाले.
घरभर हॉस्पिटलमध्ये येतो तसा वास येत होता ज्याने नानीचं डोकं गरगरु लागलं. बेडरुममधे खिडकीजवळच्या बेडवर नंदिनी पहुडली होती. जीवंत आहे असं म्हणायला फक्त तो देह शिल्लक होता.
एखाद्या सापळ्याला गाऊन घातला आहे असं वाटत होत़. ही रुम मात्र,टापटीप नि स्वच्छ होती. नंदिनीचेही केस विंचरुन वेणी घातलेली दिसत होती. तिच्या हातांना वेणी घालणं जमत नसावं,ते दुबळे होते म्हणजे तेरेदेसाईच हिची वेणीफणी करत असावेत..नानीने कयास बांधला.
तेरेदेसाईंनी नंदिनीशी तिची ओळख करुन दिली.
"कालचं थालपीठ..यांनीच दिलं होतं तुझ्यासाठी.. आपल्या समोर रहायला आल्यात. शिक्षिका होत्या पुर्वी. "
नंदिनीच्या चेहऱ्यावर स्मितरेषा पसरली. नंदिनीने नमस्कारासाठी हात जोडले. हातानेच बसा म्हणाली. तशी नानी शेजारच्या स्टुलवर बसली.
"हल्लीहल्लीपर्यंत वाचा होती हो. आता नाही येत बोलता नंदूला तरी बरंच काही सांगायचं असतं तिला. विशेष म्हणजे ती न बोलताही मला कळतं तिच्या मनातलं. तरुणपणात हिनं मला सांभाळून घेतलं. आता मी हिला. चालायचंच." तेरेदेसाई मन मोकळं करत म्हणाले.
नंदिनीच्या डोळ्यातून आसवाची माळ वाहू लागली जी गालावरनं तिच्या कानात घरंगळत गेली. तीही तेरेदेसाईंनी पंचाने पुसली नि तिच्या केसांवरुन हात फिरवला. नानीला विचारावंसं वाटलं..नेमका कोणत्या अवयवाला कर्करोग झालाय पण तितक्यात. पुढची काही आशा..इतक्यात नानीच्या हातातली पिशवी त्या दिवाणखान्यातल्या कौमुदीने हिसकावून घेतली. तेरेदेसाई काही बोलायच्या आत ती तेथून पसार झाली. नानीला रागच आला कौमुदीचा.
तेरेदेसाईंनी नानीला वरचा मजला दाखवला. वरती पेंटींग्स होती. किती सुंदर निसर्गचित्र होती ती! पहाटेची लोभसवाणी द्रुश्य, अंगणात आलेलं माध्यान्हीचं ऊन, सांजेचे रंग, रात्रीचं चांदण्यांचं आकाश..भकास वाळवंट,त्यातल्या रेतीचे लोट. नानी पहातच राहिली.
"नंदूला आवड चित्रकलेची. तिचीच आहेत ती. गेल्या पाचेक वर्षापासनं तिचे रंग एकटे पडलेत. चला खालच्या खोल्या दाखवतो."
तेरेदेसाईंनी नानीला खालच्या खोल्या दाखवल्या. सगळं काही बऱ्यापैकी टापटीप होतं. एका खोलीच्या खिडकीतून ग्यालरीत पाहिलं तर ती कौमुदी खेकडे कराकरा चावून खात होती. भाकरीचे घास गिळत होती.
तितक्यात तिला प्रचंड ठसका लागला. तेरेदेसाई लगबगीने पाणी घेऊन तिच्यापुढे हजर झाले. ती घटाघटा पाणी प्याली. तेरेदेसाई तिच्या पाठीवरनं हात फिरवत होते. हे घर होतं की वेड्यांचं इस्पितळ की कर्करोगाचं इस्पितळ आणि हा माणूस किती वर्ष इथे असा रहातोय या दोन जीवांना सांभाळत..नानीच्या डोक्यात विचारचक्र फिरत होतं.
"आता मला गेलं पाहिजे. पुन्हा कधीतरी चक्कर टाकेन,"म्हणत ती निघाली. इन्नी इन्नी म्हणत त्या कौमुदीने नानीला टाटा केला. नानीनेही तिला हात दाखवला नि निघाली. रात्री बऱ्याच उशिरा तिला नीज आली.
नानी अधेमधे तेरेदेसाईंच्या घरी जाऊ लागली. पुर्वीचा औपचारिकपणा गेला. तेरेदेसाई नंदिनीला भरवत असताना नानी सोबत असली की नेहमी कां कू करणाऱी नंदिनी मिसेस मुदीएवढा का होईना भात खाई. तेरेदेसाईंची भाची,कौमुदीही नानीला पाहून हसे.
त्या रात्री बकाबका थालपीठं खाणारी ,पिंजारलेल्या केसांची कौमुदी नेमकी हीच का असा नानीला प्रश्न पडे. अगदी अंगणात ठिपक्यांची रांगोळी काढणं,त्यात लाल, निळे,पिवळे,हिरवे रंग भरणं..तगराच्या फुलांचा मधोमध जास्वंद ओवून हार करुन पुजेसाठी तयार ठेवणं, नंदिनीकाकूचे केस अलगद विंचरुन त्याची बोटाएवढी वेणी घालणं..शहाण्या मुलीलाही तोंडात बोट घालायला लागेल अशी निगुतीने व मायेनं कामं करायची कौमुदी. एकदा नानीला तिचं शिक्षण,आईवडील..सारं विचारावंसं वाटलं पण मग ते राहूनच गेलं.
अशीच एकदा नानी दुपारची गेली असता तेरेदेसाई बाहेरच्या केळीखाली आपले कपडे धुत होते.
आपल्यामुळे त्यांच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून नानी हलक्या पावलांनी ओटीवर गेली न् दाराची बेल दाबली.
दारात कौमुदी उभी होती. तिनं कपाळाला लालभडक कुंकू लावलं होतं. कुठे कपाटात मिळाल्या त्या हिरव्याकंच बांगड्या हातात चढवल्या होत्या. सोलापुरी चादरीचा पदर खांद्यावर घेतला होता..
ते द्रुश्य पाहून नानी तिथून पळतच सुटली. घरी येईस्तोवर तिच्या जीवात जीव नव्हता. नानीचं अंग घामाने भिजलं होतं. तितक्यात सखू आली धुणं धुवायला. नानीची अवस्था पाहून सखूने तिला लिंबूपाणी करुन दिलं. नानीने सांगितली तशी ड्रॉवरमधली गोळी काढून दिली.
"सपानबिपान पडलं की काय नानी?" सखूने विचारताच नानीने तिला नौतर सांगते अशी हाताने खूण केली.
"डाक्टरांना बोलवून आणू काय?" सखूने काळजीने विचारलं.
"नको अगं. थोडं बीपी लो झालं वाटतं. तू लिंबूपाणी दिलंस नं त्याने बरं वाटलं बघ. कपडे वाळत घाल न् जा तू. नको काळजी करुस माझी. काही लागलंच तर फोन करेन तुला."
"नक्की करा फोन , नानी. कधीव रातच्यालाबी बोलवलात तरीबी धावत इन." सखू चपला पायात सरकवत म्हणाली.
(भेटू पाचव्या भागात🌺🌺)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा