गोष्ट एका आजीची (भाग दहावा)

 

गोष्ट एका आजीची (भाग दहावा)





नानीने थोडा विचार केला, मग म्हणाली,"नको गं शरु. मी सडाफटिंग आहे तेच उत्तम आहे. कधीही उठते. देवळात जाते. भजनीमंडळात जाते."

----------------------------------------------------

"हो घरातल्या माणसांना नको आणि या बाहेरच्या वेडसर मुलीला बरं संसार थाटायला जागा देताय."
शर्वरी फणकाऱ्याने बोलली.

नानींचा तीळपापड झाला,"शर्वरी तोंड आवर. तू माझ्या घरात आहेस याचं भान ठेव. वेडी नाहीय कौमुदी. विपरित परिस्थितीमुळे मनावर परिणाम झाला होता तिच्या. आता अगदी खणखणीत बरी आहे ती. मी स्वतः तिच्या डॉक्टरांना भेटून आलेय. मधुलाही सोबत न्हेलं होतं. त्यांनीही बिनधास्त लग्न करा म्हणून सांगितलं . आपल्या समाजात हे असंच होतं मानसिक रुग्ण बरा झाला तरी त्याला वाईट वागणूक देतात मग तो अधिकच कोषात जातो. कमुच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही."

"अगं नानी पण ती कमू लागते कोण तुझी. तू का तिच्यासाठी एवढी त्वेषाने भांडते आहेस?" निरंजन शरुची बाजू घेत म्हणाला.

"निरंजन, कमू एक प्रातिनिधिक स्त्री आहे रे. अशा कितीक महिला लहानपणी आपल्या जवळच्या माणसांकडून यौनशोषणाच्या शिकार झाल्या आहेत. मीही त्यांतलीच एक. मलाही शेजारचा ग्रुहस्थ असंच जवळ बोलवून रापायचा. तेंव्हा हे असं बोलून दाखवायचं असतं वगैरे काहीच कळत नव्हतं. सुदैवाने तुझ्या आजोबांची बदली झाली न् सुटले मी त्या राक्षसाच्या तावडीतून. जर आम्ही तिथेच राहिलो असतो तर..कल्पनेनेच मला घाम सुटला बघ. अशा बालकळ्या नासू नयेत ही समाज म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि चुकून एखादीवर अतिप्रसंग झाला तर तिला कळपातून हाकलून देण्याऐवजी तिचं मनोबल वाढवणं,तिचं पुनर्वसन करणं ही नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे."

एवढ्याशा बोलण्यानेही नानी थकली. कमूने तिला पाणी आणून दिलं. शर्वरीवर मात्र नानीच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही.

"मग तुमचा नकार समजायचा तर आम्ही." शर्वरीने निर्वाणीचं विचारलं न् नानीने मानेनेच हो म्हंटलं.

शर्वरी तणतणत निघाली तसं तिच्यामागून निरंजन व लेक बाहेर पडली.

नानी कठड्याला डोकं टेकून बसली.





मधु म्हणाला,"नानी, एकदोन महिन्यात माझी घराची सोय होईल. लोन मिळतय मला. तू शर्वरीताईला नकार द्यायला नको होतास."

नानी म्हणाली,"अरे नाही बोलायला शिकतेय मी. वेळेवर नाही म्हणताही आलं पाहिजे. अनुभवाचे बोल आहेत हे लक्षात ठेव."

चारेक दिवस मधे गेले असतील. फाटकाचा आवाज आला म्हणून नानीने खिडकीतून पाहिलं. तेरेदेसाई आत येत होते. नानीने दार उघडलं. त्यांना आत बोलावलं.

तेरेदेसाईंनी नानीपुढे हात जोडले..म्हणाले," नानी, मी फारच संकुचित विचार करत होतो. चुकलं माझं. मला माफ करा." इतक्यात मधु व कौमुदी खाली आले. दोघांनी तेरेदेसाईंना नमस्कार केला. तेरेदेसाईंनी त्यांना  सुखी रहा असा आशीर्वाद दिला.

तेरेदेसाई पुढे म्हणाले,"मुलगा नि सून निघून गेले. तुम्ही दोघं येत जा आम्हा म्हाताऱ्यांटशकडे. कमू, तू गेल्यापासनं तुझ्या काकूच्या डोळ्यातलं पाणी खळलं नाहीए गं."

तेरेदेसाईंचं बोलणं ऐकून कमूचेही डोळे वाहू लागले. तिच्या पाठीवर हात ठेवत मधु म्हणाला,"नक्की येतो काका."

रात्री, नानी नवीन जोडप्याला घेऊन तेरेदेसाईंच्या घरी गेली. सुहासिनीच्या वेषातल्या कमूला पहाताच नंदिनी उठून बसायला पाहू लागली. तेरेदेसाईंनी खाट एडजस्ट केली व तिला बसतं केलं.

नंदिनीने कमुच्या गालावरुन,खांद्यापाठीवरुन सायीचा हात फिरवला. मधुलाही डोळ्यांनीच कमूला जप म्हणून नजरेने सांगितलं. उभयतांनी नानीचा आशीर्वाद घेतला.

तेरेदेसाईंनी जोडप्याला यधोचित आहेर दिला. बाहेरुन खास कमूच्या आवडीचं जेवण मागवलं होतं. सगळे गप्पा मारत जेवले. कमूने स्वतःच्या हाताने नंदिनीकाकूस भरवलं.

रात्री निजताना मधु कमेला जवळ घेत म्हणाला,"काय मग, एक माणूस खूष आहे ना. आता झालं ना मनासारखं." कमू गोड हसत त्याच्या छातीवर डोकं घुसळू लागली. मधुने तिच्या केसातला गजरा काढून बाजूला ठेवला न् तिला गच्च मिठी मारली.


खिडकीतल्या तगराचा मंद सुगंध त्यांच्या खोलीत पसरला होता.

नानीने दुसऱ्या दिवशीसाठी कडधान्य भिजत घातलं नि झोपायला जाणार तोच दारात रिया हजर.

"अगं इतक्या रात्री? रतिशला तरी घेऊन यायचंस.'

"आजी, मम्मी माझ्याशी नीट बोलत नाही. माझ्यामुळे तिचं नाक कापलं म्हणते. मिझ्या मैत्रिणीही मिझ्याशी बोलत नाहीत. मला ओव्हरलुक करतात. रतीश तेवढा बोलतो माझ्याशी. माझ्या मनात सुसाइडचे विचार येताहेत. रतीश म्हणाला..तुझ्याशी बोल. तू त्याला छान गाइड केलस म्हणत होता."

आजीने रियाला सोफ्यावर बसवलं."अगो, अशी किती वावटळं येतील न् जातील. आपण खंबीर रहायला हवं."

"पण आजी, तो जस्सी गेला पंजाबला."


"बरंच झालं गेला तो. तो थोडी तुला जन्मभर पुरणार होता. इडापिडा गेली समज. हे वर्ष गेलं असच. पुन्हा जोमाने अभ्यासाला लाग. बीकॉम आहेस. एमबीएची तयारी कर. परीक्षा दे. तिथेच हॉस्टेलला रहा. नेटाने अभ्यास कर. पैशाचं बघायला नानी आहे. सगळं.सुरळीत झालं की तुझेच मम्मीपप्पा तुला न्यायला येतात की नाही ते बघ."

नानीने तिला दहीभात वाढला न् जेवण झालं तसं अंथरुण घालून दिलं. मुलं चुकतात, निसरड्या वाटेवरुन घसरु नये म्हणून दक्ष रहावं लागतं, तरीही ती भरकटल्यास दिशादर्शक होणं हे वडीलधाऱ्यांचं कर्तव्य, अशावेळी.त्यांना हिडिसपिडिस करुन काय साध्य होतं..नानी नातीच्या केसांत बोटं फिरवत विचार करत होती.

सकाळी रिया फारच फ्रेश वाटली. नानीला म्हणाली,"आजी, तू काल दिलेला डोस मुरला गं मनात माझ्या. मी नक्की काहीतरी चांगलं करीन बघ." नानीने हसत तिच्या हातात कॉफीचा कप दिला.

देवाला पुजताना नानी देवाशी बोलत होती," बाप्पा, बाईच्या जातीने कितीही अलिप्त रहायचं ठरवलं तरी नाही येत तिला अलिप्त रहायला. साऱ्यांची काळजी असते बाईच्या काळजात.

"उगाच का स्त्रीला स्रुजनाची शक्ती दिली आहे मी!" नानीशी जणू बाप्पा संवादत होता.


मधुला भांडुपला शाळेशेजारीच एका चाळीत जागा मिळाली. नानीही मोठ्या हौसेने त्यांच्यासोबत खरेदीला गेली. नव्या संसारासाठी लागणारी भांडीकुंडी, कपाट, ग्यासशेगडी,पंखे,लाईट्स..सगळं काही घेतलं.

सामानाचा ट्रक भरला. मधु व कौमुदी जायला निघाली, इतक्यात नानी पडली. तिच्या डोक्याला खोप पडली नि तिची शुद्धच हरपली.

तेरेदेसाई,मधु,कौमुदी..साऱ्यांनी मिळून नानीला इस्पितळात हलवलं. रियाने घरी फोन करुन आजी पडल्याचं कळवलं.

इस्पितळात न्हेईस्तोवर जखमेतून रक्तस्त्राव बराच झाला होता. रक्त चढवायची गरज होती. मधुचा रक्तगट नानीच्या रक्तगटाशी जुळला. मधुने नानीसाठी रक्तदान केलं.

(भेटू पुढच्या भागात)

पुढच्या भागात रिया आपल्याशी बोलणार आहे,मधु बोलणार आहे. नक्की वाचा काय म्हणतात ते न् नानीची तब्येत सुधारतेय का तेही कळेल पुढच्या भागात.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट