गोष्ट एका आजीची (भाग अकरावा)
गोष्ट एका आजीची (भाग अकरावा)
#रिया
आजी चक्कर येऊन पडली,तिच्या डोक्याला केवढी मोठी खोप पडली. मला क्षणभर काहीच सुचेना. किती ब्लिडिंग होत होतं.
मी मधु अंकलला हाक मारली. मधु अंकल धावतच आला..त्याच्यापाठोपाठ कौमुदी. हॉस्पिटलमध्ये माझे आई,बाबा,निरंजन काका,शर्वरी आंटी एकापाठोपाठ एक येत होते. बाबांनी माझ्याकडे पाहिलं ..का पाहून नं पाहिल्यासारखं केलं.
शर्वरी काकू मात्र माझ्याच बाजूला येऊन बसली. ."तब्येत बरी ना आणि तो जस्सी गं..कुठे असतो हल्ली..मला वाटलं तू माझं मूल वगैरे म्हणून धिंगाणा घालशील पण ऐकलीस बाई." तू नक्की आजीला पहायला आलेयस की माझी चौकशी करायला..तोंडात आलेला प्रश्न मी मागे लोटला.
आई काहीच बोलत नव्हती. तिला शरम येत होती माझी बहुतेक. अगं पण, द्यायचा होतास नं मला पुरेसा वेळ. मी चुकत होते..वहावत होते तेव्हा का नाही थांबवलंस? आजीने थांबवलं तर हेटाळणी केलीस तिची. मलाही तेव्हा आजीच चूक वाटली. नाहीतरी आजीच्या अपरोक्ष तू ती किती सेलफिश,सेल्फसेनटर्ड आहे तेच ठसवण्याचा प्रयत्न करायचीस आमच्यावर. हळूहळू बाबाचं नि माझंही मत तुझ्या पारड्यात पडलं. रितेशला मात्र तुझा दोन आज्यांत तुलना करण्याचा स्वभाव मुळीच आवडत नव्हता. तो मला तसं सांगायचाही पण मी त्याचं म्हणणं फारसं मनावर घेत नव्हते. अभ्यासात मीच त्याच्यापेक्षा हुशार होते. त्यामुळे त्याला ढब्बू समजायचे.
शर्वरीने मग आईजवळ मोर्चा वळवला."अशी कशी पडली म्हणते मी? म्हातारपणात व्याप. किती खर्च येतोय देव जाणे. चांगलं माझ्या ममीपप्पांना सोबत रहायला पाठवत होते तर नको म्हणाल्या. तुसडा स्वभाव. असंच होतं असल्यांचं. कायकाय इजा झाल्या असतील ते डॉक्टर जाणे."
डॉक्टरांनी बाबा व काकांना केबिनमधे बोलावून घेतलं..म्हणाले,"मेंदूला मार लागला नाही नशीब. ही अशी चक्कर आली की माणूस कसाही पडू शकतो. बीपी फार वाढलय आजींचं. माइल्ड हर्ट एटेक येऊन गेलाय. तुम्ही जपा आता त्यांना. कोणत्याही प्रकारचा ताण,भांडणं त्यांच्यासमोर नकोत. होता होईल तो आनंदी ठेवा त्यांना."
डॉक्टरांचं बील निरंजन काकानेच भरलं. शर्वरी काकीला ते मुळीच आवडलं नाही पण काका फारच इमोशनल झाला होता. हे असं इमोशनलपण त्याला आधीच आलं असतं तर? का आपलं माणूस मरणाच्या दारात असतानाच येतो कळवळा? एरवी ग्रुहितच धरलं सर्वांनी आजीला. मी तरी काय आता ही अशी परिस्थिती आली म्हणून तिच्या आश्रयाला आले. आजीने पाठीवर हात फिरवला तेंव्हा किती धीर आला. शब्दांत नाहीच सांगू शकणार पण हीच आजी पुर्वी का आपलीशी वाटली नाही कधी का आईने ती वाटू दिलीच नाही.
आताही बाबांनी का नाही भरलं बील निदान मी भरतो रे असं तरी म्हणायचं होतं. का ही लोकं पैशाला महत्त्व देतात जीवाभावाच्या माणसांपेक्षा?
रतीश फार उशिरा आला. त्याला मी सारं इत्थंभूत सांगितलं. आजीला शुद्ध आलीच नव्हती. हाय झालेलं आजीचं बीपी अचानक लो होत होतं. डॉक्टरांची धावाधाव सुरु होती. शर्वरी काकू, आई..दोघी घरी झोपायला गेल्या होत्या. बाबा त्यांना घेऊन गेले. मलाही यायला सांगत होते पण आजीला अशा अवस्थेत सोडून झोपणं मला तरी शक्य नव्हतं. रतीश घरी जायला गेला. त्याचे सबमिशन्स होते. तो आला तेच केवढी सोबत वाटली मला.
कमूदी माझ्या हातावर हात ठेवून बसली होती. मला ती बिलकूल वेडीबिद्री वाटली नाही. तिच्या डोळ्याला पाण्याच्मा धारा लागलेल्या. हे कोणते बंध आजीने जोडले होते..मायेचे, ऋणांचे. मलाही असंच व्हायचंय आजीसारखं..कर्तव्य करुन फळाची अपेक्षा न करणाऱ्यांतलं, कुणा गरजवंतांच्या हाकेला धावून जायचंय त्यासाठीच लॉ कॉलेजला एडमिशन घेतली. हॉस्टेलमध्ये रहायचा विचार होता पण आता नाही. आता वर्षभर तरी आजीकडेच राहीन. आजीला एकटीला सोडणार नाही मुळीच.
#मधु
नानीला सोडून जाणं खरंच जीवावर आलं होतं पण त्यादिवशी ती आजीची धाकटी सून मला जाऊदे पण माझ्या कमुलाही बोलली. म्हणून भाड्याने खोली घ्यायचा निश्चय केला. आजीनेही आमच्या पायात मायेच्या बैड्या ठोकल्या नाहीत. कौमुदीला मी स्वीकारलं यात मोठंसं काही केलं नाही. माझी आईही शेवटाशेवटाला मानसिक रुग्ण झाली होती. घरच्यांनी तिला समजूनच घेतलं नाही. उलटपक्षी अशी वागायची की ती आणखीनच बिथरेल.
कमुचं आजीने जे वर्णन केलं त्यात मला माझी आई दिसली..एकटीच तासन्तास ओला कपडा घेऊन साबणाने चोळत बसणारी. मी एकदोनदा तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचा प्रयत्न केला होता पण तिथे ती अधिकच व्हॉयलंट व्हायची. शेवटी वेडातच गेली मला एकट्याला टाकून. भावाने फक्त पैशापुरता संबंध ठेवला माझ्याशी. कुणी नसलेल्या मला आपलंस केलं ते नानीने. कौमुदी अगदी काही क्षण त्या वेडाच्या अवस्थेत जाते खरी..तेव्हा तिची नजर बदलते पण फार म्हणजे फारच क्वचित. नानीच्या मायेने आणि माझ्या प्रेमाने बहरतेय ती दिवसागणिक.
आता कुणी काही बोलोत, आम्ही नानीसोबतच रहाणार निदान ती बरी होईस्तोवर तरी. तिची काळजी घ्यायला हवी. या विचारांतच पहाट झाली. नानी शुद्धीवर आली होती.
कमू आणि रिया एकमेकांच्या मांडीवर डोकं ठेवून निजल्या होत्या. मी उठवायचा प्रयत्न नाही केला. निरंजन म्हणाला,"डॉक्टर आले की भेटू नानीला. जरा चहा घेऊन येऊ चल." आम्ही समोरच्या चहाच्या टपरीवर गेलो. चूळ भरली,तोंड धुतलं नि चहा घेऊन उभे होतो.
निरंजनने सुरुवात केली."मधु, थँक्स. तू वाचवलस नानीला. ताबडतोब इस्पितळात दाखल केलंस. ना नात्याचा ना गोत्याचा पण तिला समजून घेतलंस पण मी पोटचा पोरगा असून मला तिचं मन कळत नव्हतं. दादाच्या,बायकोच्या,वहिनीच्या डोक्याने वागत होतो. सहासहा महिन्यांची तिची आम्हा दोघांकडे वाटणी करताना आम्हाला लाज वाटायला हवी होती. शर्वरीला दोष देऊन काय उपयोग. मीच माझ्या आईचा होऊ नाही शकलो तर तिच्याकडून तशी अपेक्षा का करावी! आता मात्र ठरवलंय..नानीला ठाण्याला घेऊन जायचं माझ्याकडे आय मिन ते घर तिचंच तर आहे. तीच खरंतर आम्हाला त्या घरातनं हाकलवू शकते पण तिने तसं केलं नाही आणि करणार नाही. आईयं ना ती. आम्ही कितीही बोललो तरी ऐकून घेते. "
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला नि थोपटत राहिलो. प्रथमेशदाची गाडी येताना दिसली. दोघी वहिनी,प्रथमेशदा,तेरेदेसाई सारेच आले होते. डॉक्टरांनी बोलवून घेतलं. आता धोका टळला आहे म्हणाले पण यापुढे आईला जपा असंही निरंजनचा हात दाबत म्हणाले.
आम्ही नानीजवळ गेलो. नानीला डोळे उघडायलाही किती त्रास होत होता. चेहरा पांढुरका पडला होता. तेरेदेसाई,मुलं,मी,कौमुदी साऱ्यांना पाहून नानीच्या चेहऱ्यावर स्मितरेषा झळकली. कौमुदी डोळ्यातले अश्रु थांबवू शकली नाही. आजीने तिला जवळ बोलावलं. कुठे जात नाहीए मी इतक्यात. अजून भरपुर दिवस जगायचंय मला. हो ना डॉक्टर. आजीची जिजिविषा पाहून डॉक्टर प्रसन्न हसले.
निरंजनने घरी ठाण्याला चलण्याचा केलेला आग्रह नानीने मान्य नाही केला. तिने त्याची समजूत घातली. तूच येत जा माझ्याकडे म्हणून सांगितलं.
नानीला घरी आणलं. कौमुदी,मी,रिया सारेच नानीच्या तैनातीला आहोत. निरंजन सुट्टीला इकडे फेरी मारतोच. त्याची नि माझी दोस्ती झालीय. शर्वरी आईकडनं मेडीकलचं बील माग म्हणून त्याच्या मागे लागलीय म्हणत होता. रिया कॉलेजला जाऊ लागली आहे. नानीची तब्येत सुधारतेय..तिला नुकतीच कौमुदीने गोड बातमी सांगितलेय ती नव्याने आजी होणार असल्याची
.
क्रमश:
नमस्कार🙏
कथा खरंतर दहा भागांत संपवणार होते पण तुम्हा सर्वांचा रिस्पॉन्स पाहून इतर पात्रांनाही बोलकं करावंसं वाटलं. कसा वाटला हा भाग नक्की कळवा. लवकरच भेटू अंतिम भागात.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा